केशवचैतन्यकथातरु - अध्याय पहिला

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


जयजया जी मंगलमूर्ति । त्रैलोक्यपावन जयाची कीर्ति । देवासुरमानव वर्णिती । विघ्नसमाप्ती व्हावया. ॥१॥
परमात्मा जो प्रकृतिपर । तो विनायकरूपें धरिला अवतार । तयाचें नाम विघ्नहर । देव यास्तव ठेविती. ॥२॥
ब्रह्मयानें सिंदुरासुरासी । वर दिधला अविनाशी । आलिंगन देशील जयासी । तो नाशासि पावेल पैं. ॥३॥
ऐसें होतांचि वरदान । तेणें ब्रह्मयावरि केलें प्रस्थान । पुढें ब्रह्मा मागें आपण । सिंदुरासुर लागला. ॥४॥
तेव्हां संपूर्ण देवें तुज प्रार्थिलें । सिंदुरासुरासि वधावया वहिलें । गजाननरूप धारण केलें । पार्वतीचे उदरासीं. ॥५॥
चतुर्भुजव्यक्ति गौरवर्ण । शुंडादंड लंबायमान । शूर्पाकृति शोभति कर्ण । भाळ विशाळ नेटकें. ॥६॥
नेत्र आरक्त जैसे हिरे । वक्र - तुंड अति साजिरें । मुगुटावरि खोंविले तुरे । दूर्वांकुरांचे लसलसित. ॥७॥
एकदंत करी झळाळा । गळां नवरत्नांच्या माळा । पीतांबर वेष्टिला पिंवळा । भाळीं कस्तूरीतिलक. ॥८॥
सर्वांगीं चर्चिला सेंदूर । कटीतटीं मेखळा फणीवर । रत्नखचित कटकें केयूर । रक्तांबर विलसतसे. ॥९॥
फरश पाशांकुश रदन । हस्तीं आयुधें शोभायमान । विशाळ दोंद मूषक वहन । गौरिनंदन शोभतसे ॥१०॥
ऐसा गणपति देवें वंदिला । जेणें सिंदुरासुर वधिला । तो म्यां आरंभीं स्तवियेला । ग्रंथसिद्धि पावावया. ॥११॥
मूळमाया जे चिच्छक्ति । ती हे शारदा सरस्वती । हंसवाहन पुस्तक हातीं । वीणावादन करितसे. ॥१२॥
चवदा विद्या चौसष्टि कळा । जिचे ठायीं वसती सकळा । वागेस्वरी ब्रह्मबाळा । ग्रंथारंभीं वंदिली. ॥१३॥
आतां वंदू श्रीसद्गुरु । जो या भवसागरिंचा तारुं । मोक्षदाता कल्पतरु । अति उदारु सर्वार्थी. ॥१४॥
जनस्थान गोदातीरनिवासी । रघुनाथ नामें आनंदरासी । जेणें विज्ञान बोधोनि मजसी । निरंजन नाम ठेवियेलें. ॥१५॥
जो योगींद्रचक्रवर्ति । लोकत्रयीं जयाची कीर्ति । शांतिक्षमेची केवळ मूर्ति । लोकोद्धारा प्रगटली. ॥१६॥
श्रीदत्तात्रयसाक्षात्कार । व्हावया मजसीं जयाचा वर । तयासी माझा नमस्कर । ग्रंथारंभीं असो हा. ॥१७॥
आतां वंदूं संत सज्जन । जे सच्चिदानंद स्वयें आपण । असोनि उद्धरिती जन । कृपानिधान दयाळ. ॥१८॥
श्रीपरमात्मा जगद्गुरु । जगदाधिष्ठान परात्परु । तया करूनि नमस्कारू । ग्रंथारंभ करितसे. ॥१९॥
जो ब्रम्हरूपें जग अवतारी । विष्णुरूपें पालन करी । रुद्ररूपें सकळ हारी । पुनरपि तें रचावया. ॥२०॥
श्रीविष्णू जो वैकुंठवासी । तो चतुश्लोके ब्रह्मयासी । भागवतमिसें उपदेशी । आत्मतत्वालागीं पैं. ॥२१॥
ब्रह्मयानें नारदा कथिलें । नारदें व्यासासि बोधिलें । पुढें कलियुग प्राप्त जालें । तंव शिष्य न मिळे अधिकारी. ॥२२॥
व्यास चिंतिती मानसीं, । ‘ जे सर्वसुखाची राशी । तें आत्मतत्त्व कोणासी । सांगूं आतां या काळीं ? ’ ॥२३॥
तंव राघव नामें द्विजसत्तम । जो उत्तमामाजी उत्तम । अनुष्ठानांतीं अति नि:सीम । व्रतालागीं आचारे. ॥२४॥
उत्तमनाम नगरी । मांडवी पुष्पावतीचे तीरीं । राहोनियां बहुकाळवरी । तप आचरता जाहला. ॥२५॥
व्हावें व्यासांचें दर्शन । हेचि इच्छा धरुनी पूर्ण । वातांबु पर्णाशन । करुनि देह शुष्क केला. ॥२६॥
जाल्या नखांच्या चुंबळी । आंगावरी वाढली धुळी । जटा लोंबती भूतळीं । देह शुष्क जाहला. ॥२७॥
तंव सत्यवतीहृदयनंदन । श्रीव्यास येऊनि आपण । देऊनियां अभयदान । मस्तकीं हस्त ठेविला. ॥२८॥
जो तत्त्वज्ञानाचा उपाय । ‘ नमो भगवते वासुदेवाय ’ । प्रणवयुक्त हा मंत्रराय । कर्णामाजीं सांगितला. ॥२९॥
परमहंसदीक्षा देऊन । बोधिते जाले तत्त्वज्ञान । तेणें मूळ अविद्या निरसुन । परमानंद जाहला. ॥३०॥
उठले अष्ट सात्विक भाव । चंचळ मनाची मोडली धांव । कल्पनेनें सांडिली हांव । ब्रह्मवस्तु अनुभवितां. ॥३१॥
अष्टांगयोगाच्या कळा । द्वैपायनें कथिल्या सकळा । अगोचरी मुद्रां डोळां । आखंडित बाणली. ॥३२॥
मावळोनि गेली बुद्धि । जाली निर्विकल्प समाधि । गेल्या सर्वही आधिव्याधी । सुखसमृद्धि जालिया. ॥३३॥
मग जयजयकार बोलुन । केलें श्रीगुरूचें स्तवन । करूनियां साष्टांग वंदन । चरणीं मस्तक ठेविला. ॥३४॥
शिष्य पाहुनी परम धन्य । नाम ठेविलें राघवचैतन्य । संपूर्ण जगीं होशिल ( मान्य ) । ऐसा वर दिधला. ॥३५॥
व्यास निजाश्रमीं गेल्यावरी । राघवचैतन्य त्या वनामाझारी । व्याघ्रादिक नाना वनचरीं । वसते जाले निर्भयें. ॥३६॥
तें स्थान अति गहन । अनेक जातींचे पक्षीगण । नानावृक्षांचें निबिड वन । चिंचिनी आम्र असती. ॥३७॥
स्वस्तिकादि नाना आसनें । नित्य करावीं निश्चळपणें । पूरक कुंभक रेचन । प्राणायाम करावा. ॥३८॥
जालंदर आणि उडयान । तिसरा मूलबंध जाण । अपानातें ऊर्ध्व करून । अधोगमन प्राणाचे. ॥३९॥
करूनि कुंडलनीप्रबोध. । सुषुम्नेचा शोधिला मार्ग । कर्णीं अनुहाताचा शब्द । श्रवण करित असावा. ॥४०॥
नासिकांतरीं वाहे श्वास । नित्य सहस्त्रदळीं सहवास । ज्ञानी पद अविनाश । जया ह्मणती. ॥४१॥
सर्वदां असावे निवृत्ति। भूतमात्रीं समान स्थिति । आंगावरी सर्प पक्षी बैसती । निर्भयत्वें येऊनि ॥४२॥
अष्ट महासिद्धींचा पाळा । भोंवळा होऊनि गोळा । आज्ञा मागती वेळो वेळां । स्वामीलागीं प्रार्थुनी. ॥४३॥
धैर्याचा मेरू अचळ । अंगीं वैराग्याचें बळ । कदाचित् प्राशन करावें जळ । अन्न न खावें सर्वथा. ॥४४॥
एकमासपर्यंत एका वृक्षी. । द्वितीयमासीं दुसरे वृक्षीं । उडोनि जातो जैसा पक्षी । तैसें जावें निजांगें. ॥४५॥
नग्नवृत्ति दिगंबर । शयन करावें वृक्षांवर । एका वृक्षीं ठेवूनि शिर । दुज्या वृक्षीं चरण पै. ॥४६॥
कदाचित् सिद्धासन घालुन । वृक्षाग्रीं बैसावें जाउन । करावें शीतोष्णाचें सहन । ऐसा काळ बहु गेला. ॥४७॥
राघवचैतन्य यापरी । एकाकी वसतां वनमाझारी । पुढें कथा वर्तली ते चतुरीं । श्रवण केली पाहिजे. ॥४८॥
राघव चैतन्यालागून । केशव चैतन्य गेले शरण । त्याची विस्तारे करून । पूर्णकथा वर्णिली. ॥४९॥
पूर्वकथेचें अनुसंधान । श्रोते विचारोत भाविक जन । नृसिंहभट परम सुजन । पूर्वकथा त्याची परिसासी. ॥५०॥
कर्नाटक देशाचे अंतरी । तृणामल्ल नामें नगरीं । देशपांडे तेथील अधिकारी । असते झाले निर्धारें. ॥५१॥
तेथें शिवगंगा महान सरोवर । त्याचे अग्नेयकोनास त्रिंबकेश्वर । नित्य पूजा उपचार । करीत होते बहु जन. ॥५२॥
ब्राह्मणीं करावें पूजन । नित्य रुद्रावर्तनें करून । त्रिंबकेश्वरापासीं जाऊन । करिते जाले सर्वही ॥५३॥
कांहीं दिवस जाल्यावर । शिवालय पाहुनियां थोर । यवनें त्रास मानूनि क्रूर । होता झाला तये वेळीं ॥५४॥
मनीं आणिलें सत्वर । ब्राह्मणाचा मोडावा थार । अवघे मिळोनि करिती विचार । त्रास द्यावा निश्चयेसीं. ॥५५॥
ऐसें आणोनि मनांत । शिवालयावरी घुमट बांधूं लागत । सर्व ब्राह्मण नृसिंहभट । गेले बोलावया तेथें ॥५६॥
यवनाप्रति बोलते जाले जाण, । ‘ आह्मीं येथील अधिकारी पूर्ण । शिवालय मोडूं जाणतोसी पण । होईल मोठा घात पैं येथें. ’ ॥५७॥ इकडे यवनानें काय केलें । गवंडी पाथरवट बोलाविले । ‘ खणा रे ! खणा, वहिलें । बोलता झाला निष्ठुरत्वें. ॥५८॥
कामगार लागती खणावयासी । ब्राह्मण स्त्री पुरुष योगराशी । अवघे मिळाले उपवासी शिवालयासंनिध. ॥५९॥
सर्व ब्राह्मण देवावर । पडते जाले सत्वर । ‘ या दु:खाचा परिहार । निवारण करीं देवराया ! ’ ॥६०॥
पायीं धरूनियां ब्राह्मणां । ओढूनि टाकिती ते क्षणां । ब्राह्मण म्हणती, ‘ नारायणा ! । काय संकट आम्हां पैं केलें ? ॥६१॥
यवनास दुर्धर क्रोध येऊन । ब्राह्मणांच्या स्त्रिया आणून । त्यांचे शिरावरी पाषाण देऊन । ताडिता झाला निजांगें. ॥६२॥
कित्येक स्त्रियांएं गर्भपतन । लहान बाळकें भूमीं आपटून । स्त्रियांचे स्तनीं सांडस लागून । हाहाकार पैं केला. ॥६३॥
ब्राम्हणांच्या कंठास दोर बांधून । कूपांत घालूं लागला जाण, । ‘ आतां आठवा शिवालागून ’ । ऐसें बोले सक्रोधें. ॥६४॥
तेव्हां स्त्रिया म्हणती, ‘ न हे आमचे पती । आम्हां देऊनि यवनाचे हातीं. ’ । महान सरोवराच्या भोंवतीं । हाहाकार पैं जाहला. ॥६५॥ ब्राह्मणांस संकट पडलें गाढें । शिवासी प्रार्थिती निजकोडें, । ‘ धांव रे ! धांव आम्हांकडे ’ । उच्चस्वरें रुदन करिती. ॥६६॥
असो. ब्राम्हणास त्रास देऊन । त्यांचें हिरूनि घेतलें धनधान्य, । वतनेंही हस्तगत करून । घालवूनि दिधले तेथूनियां. ॥६७॥
वृद्ध ब्राह्मण नृसिंहभट । तेथुनी निघाले अवचट । नारायणगिरीवरी चोखट । तप करिते जाहले. ॥६८॥
येरीकडे काय वृत्तांत । यवन शिवालय खणीत । रक्ताचा स्राव भडभडत । निघता जाला तेधवां. ॥६९॥
यवनें आश्चर्य मानूनि थोर । बंद केले सकळ कामगार । पूजाउपचार करून थोर । भजनगर पैं केला. ॥७०॥
‘ शिव कोपला आह्मांवर । जाळून टाकित सकळ नगर ’ । ऐसी भीति मानूनि सत्वर । स्तब्ध होता जाहला. ॥७१॥
यवनीं करुनी विचार, । ‘ येथुनि ब्राह्मण गेले गिरीवर । आतां त्यांसी घेऊनि येऊं सत्वर ’ । असा निश्चय मनीं केला. ॥७२॥
आपण दूत पाठवुनि सत्वर । घेऊनियां पूजाउपचार । दंडवत नानाप्रकार । करिता झाला तयेवेळीं,. ॥७३॥
दूत सांगे वर्तमान, । ‘ राज्य देतों तुम्हांलागुन । द्रव्य घरें वतनें आपण । देऊम निश्चयार्थीं ब्राम्हणां. ’ ॥७४॥
ब्राम्हणीं संतोष मानुन । नगरप्रति आले जाण । शिवगंगाभोंवतीं संपूर्ण । बोलते जाले आनंदें. ॥७५॥
त्यावरी जाऊनियां देवालयांत । शिवस्तव करिते जाले अद्भुत, । प्रेमाश्रूपर लोटत । स्वानंदसुख अनुभवितां. ॥७६॥
ब्राम्हणांस देऊनि धनधान्य । त्यांचें संतोषलें मन, । ‘ आम्हांवरी शिव त्रिनयन । प्रसन्न जाला वाटतसे. ’ ॥७७॥
वाजत गाजत आणिले गृहासी । सर्व जन येती भेटावयासी । ब्राम्हणीं संतोष मानुनी चित्तासीं । परमानंद पैं केला. ॥७८॥
सर्व ब्राम्हण गिरीवरून । आले तेथें आसें करून । तेथें नृसिंहभट राहून । तप करिते जाहले. ॥७९॥
वृत्ती जाली उदासीन । अष्टांगयोगसाधन । करूनियां पूर्णपणें । देह शुष्क पैं केला. ॥८०॥
प्रथममासीं निराहार । दुसरे मासीं प्यावें नीर । ऐसें तप करूनिया थोर । शुकयोगींद्रासारखें ॥८१॥
करूनि पंचाग्नीसाधन । धूम्रपानीं होऊनि निमग्न । जटा पादपरियंत लांबुन । नारायणीं बुद्धि ठेली. ॥८२॥
घालोनियां सिद्धासन । नित्य करावें भस्मधारण । अक्षयीं नारायणाचें ध्यान । आदरेंसीं करावें. ॥८३॥
‘ देवा ! देह करवतीं घालीन । कीं जीव पर्वतीं देईन । किंवा फेनीं जाईन बुडोन । देवराया ! श्रवण करीं. ॥८४॥
नलगे मज पुत्र धन । तुझे नलगे मज धनधान्य । आतां हा किंकर जाण । पायातळीं ठेवावा. ’ ॥८५॥
देवास संकट पडलें गाढें, । ‘ याचें निवारावें कोडें । याहीं घातलें आम्हां सांकडें । प्राणनाश करिल हा. ’ ॥८६॥
ऐसा करूनि विचार जाण । नृसिंहभट निद्रासंपन्न । होतांच स्वप्नीं येऊन । बोलतां जाला निर्धारें. ॥८७॥
ब्राम्हणाचा वेष धरून । स्वप्नीं येऊनि नारायण । भक्ताचें वाढवावया महिमान । करुणावचनें बोलत. ॥८८॥
‘ अगा माझ्या बाळका ! । तुजलागीं शिणविलें फुका, । तुझ्या निवारावया शोका । होइन पुत्र तुझा मी. ॥८९॥
तुझिया तपें करून । बहु संतोषलें मन, । आतां तुवां येथुन । जावें ’ ऐसें अज्ञापिलें. ॥९०॥
ऐसें बोलोनि नारायण । स्वप्न पाहूनि संतोषलें मन । नारायणगिरीवरी जाण । ब्राह्मणभोजन बहु केलें. ॥९१॥
कांहीं दिवस जाल्यावर । प्रस्थान करिते जाले सत्वर, । नृसिंहभट पूजा उपचार घेऊनि गेले देवालयीं. ॥९२॥
पूजा करूनि त्वरित । साष्टांग केला प्रणिपात, । ‘ आतां देवराया ! त्वरित । येतों ’ पुसोनी ॥९३॥
मार्गी चालतां सत्वर । तों अकस्मात् पाहिलें गंगातीर, । मध्यान्हासीं आला दिनकर । क्षुधा बहुत लागली. ॥९४॥
नृसिंहें मनामाजी आणिलें । आतां गंगास्नान करावें वहिलें । ऐसें बोलुनि सिद्ध जाले । स्नानालागीं करितसें. ॥९५॥
गंगेमाजीं उभे राहुन । करीत होते अघमर्षण । नृसिंहमूर्ति हातां लागुन । परम संतोष पावले. ॥९६॥
नृसिंह हातामाजीं घेऊन । षोडशोपचारें पूजा करून । चरणीं मस्तक ठेवून । परमानंदें डुल्लतसे. ॥९७॥
नृसिंहभट गमन करित । स्त्री आनंदीबाईसहित । आले पुणेवाडीस निश्चित । परमानंदें करोनियां. ॥९८॥
कांहीं दिवस जाल्यावर । आनंदीबाईस जाला कुमर । शंख चक्र आयुधें सुंदर । पीतांबर वनमाळा. ॥९९॥
रम्य मूर्ति पीतवर्ण । कटीतटीं मेखळा दिव्य जाण । ‘ सोडोनियां वैकुंठभुवन । आलों येथें तुजलागीं. ’ ॥१००॥
ऐसें बोलोनियां वचन । हृदयीं आनंदी आनदली जाण । गर्भा नाहीं आली वेण । प्रत्यक्ष नारायण उभे ठेले. ॥१०१॥
‘ तुझे उदरास आलों आतां । तुवां न करावी सर्वथा चिंता ’ । ऐसें बोलोनि तत्त्वतां । अदृश्य होता जाहला. ॥१०२॥
आनंदी देहावरी येऊन । पाहे तंव जाला नंदन । अति हर्ष करोनि पूर्ण । मुखचुंबन करितसे. ॥१०३॥
तेरावा दिन होतां पूर्ण । नाम ठेविलें विश्वनाथ जाण, । स्नान घालोनी निंबलोण । करिती जाली आदरें. ॥१०४॥
नारायण प्रत्यक्ष येऊन । आपलें नाम विश्वनाथ ठेवून । ज्येष्ठ बंधु त्रिंबक पूर्ण । तृतीय पुत्र बापु जाला. ॥१०५॥
त्रिंबकबापुनें करावा संसार । विश्वनाथ बाबा पुजेसी तत्पर । संसार न करोनी उदार । ऐसे असते जाहले. ॥१०६॥
त्यावरी लोटले दिवस कांहीं । नृसिंहभट कैलासवासी जाले पाही । त्रिवर्ग बंधु एके ठायीं । राहते जाले सर्वदां. ॥१०७॥
कांहीं काळ राहोनि तेथें । पुढें गमन होईल ओतूरातें । ते कथा ऐकिजे स्वस्थचित्तें । द्वितीयाध्यायीं सज्जनीं. ॥१०८॥
निरंजन रघुनाथ जनस्थानवासी । कथा वर्णिली पुण्यराशी । श्रवणमात्रें गुरु भक्तांसीं । आल्हाददायक निश्चयीं. ॥१०९॥ श्रीचैतन्यविजयकल्पतरू । संपूर्ण फलदायनी उदारू । श्रवण पठणें दु:खपरिहारू । होईल श्रोत्यावक्त्यांचा. ॥११०॥
॥ श्रीराघव चैतन्य केशव चैतन्यार्पणमस्तु. ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP