पदे ३५१ ते ४००

ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.


थोर यासि बहु मारिग पाहा । मारितो बहुत फार गपा हा ॥
भार हा उरिंहूनी उचलावा । दुष्ट हा तरि करी कुचलावा ॥३५१॥
भारेंकरोनि मरतो परतोनि पाहा । झाला मदीय वदने रुधिरोक्त दाहा ॥
आली पहाल वसनी मजलागिं शंका । राखा चुडे सदनिचे निजधर्म शंका ॥३५२॥
सकळही दळभार मिळोनेया । बसतसा उगलेच कळोनिया ॥
हळुहळु सुढळा धनु येकदां । शफत हा सदनासि नये कदां ॥३५३॥
लावुनी सकळही नृप हातां । प्राण जात तरि काय पहातां ॥
येकदां तरि तुह्मी यश घ्यावे । प्राणदान मजलागुनि द्यावे ॥३५४॥
मी करी बहुत आरवधांवा । पुण्य फार बहुभार वधावा ॥
सर्वही मिळुनि मानव धांवा । कां उगा द्विज सुजाति वधावा ॥३५५॥
कोणिही निज बळासि करावे । यास तोलुनि वधूस वरावे ॥
भाषिते कितिक सार वदावी । मी कदा परि मुखासि न दावी ॥३५६॥
विदेह पाही मग राजरेखे । परंतु कोणी उठतां न देखे ॥
बोले उभारुन करांस राजा । उठोनि मागेच सरा सरा जा ॥३५७॥
विदेहराजा मग काय बोले । कोदंड हे तों कवणा न तोले ॥
सर्वसही साच कुनाम आले । नीर्विरमूर्तितल काय झाले ॥३५८॥
ऐसी नृपांला नृप देत आज्ञा । रामाकडे तो मुनिनेत्रसंज्ञा ।
होतांच तो राम उठे स्वभावे । गजावरि सिंह जसा विभावे ॥३५९॥
सकल अवनिदेवा वंदिले सुंदराने ।
तदनु शिवशिवेते चिंतिले आदराने ॥
दशशत किरणांला नम्त्र झाला तथा की ।
निज चरणनखाने कार्मुका दूर टाकी ॥३६०॥
मग नमुनि तयांते आदरे राघवाने ।
उचलुनि चढवीले चित्तिच्या लाघवाने ॥
श्रवण अवधि हस्ते काढिल्या तीन वोढी ।
कडकडकड मोडी ती स्थळी ख्याति गाढी ॥३६१॥
त्या शब्दे भूमि फाटे गगन तटतटे सिंधुचे तोय आटे ।
वैराटा कंप वाटे सुरकर टिवटे देव देती कपाटे ॥
ब्रह्मांडी कीर्ति थाटे कमठ पुटफुटे येति शेषासि कांटे ।
सीतेला सौख्य वाटे दशमुख निसटे रामसाम्राज्य थाटे ॥३६२॥
विदेह बोले मग भारतीते । घेऊनि यावें गज आरतीते ॥
दारास येती मग राजदारा । आर्तिक्यसा होय वरा उदारा ॥३६३॥
येतसे मग पहा बरवंटी  । शोभते अतिपहा परवंटी ॥
फार चारुतर कंबुककंठी । माळ घालित रघूत्तमकंठी ॥३६४॥
सामर्थ्य याच्या बळवैभवाचे । कोदंड येणे शांमले भवाचे ॥
अदृष्ट मोठे यथ यावयाचे । शूरत्व पाहा पण या वयाचे ॥३६५॥
जयजय रामा, जगदभिरामा । दुरितविरामा पणजित रामा ॥
सुफलितनामा मुनिकृतकामा । हनह्रतलामा अगाणेतधामा ॥३६६॥
अविदितसारा गळगतहारा । क्षितिह्रतभारा नृप अवतारा ॥
सुललितचरणा विमलितनेत्रा । दशरथपुत्रा कुसुमविचित्रा ॥३६७॥
सुललितचरणा जगदघहरणा । मुनिजनशरणा जनसुखकरणा ॥
झळकतरदना मिरवितवदना । निजसुखसदना कृतरिपुकदना ॥३६८॥
दुर्जनकाळा सज्जनपाळा । भूपतिबाळा बहुवेल्हाळा ॥
निश्चललीळा,भाविकशीळा । वरिदनीळा नवभूपाळा ॥३६९॥
वारिजनेत्रा सुंदरगात्रा ।
वैभवचित्रा सुरसत्पान्ना ॥
भूपतिपुत्रा नित्य पवीत्रा ।
आगमसूत्रा भवसन्मीत्रा ॥३७०॥
दशरथा लिहितो नृपपत्रिका ।
करिधरा मजलागिं करा कृपा ॥
सपरिवारक सर्व सवे नृपा ।
अति सुशोभित मंगळ मंडपा ॥३७१॥
दशरथ मग आला तो पहा राजभारी ।
मिळति सुत तयाचे सर्वही कारभारी ॥
कारिति परम शोभा आयती आयतीला ।
घडवित बहुसोने भूषणे राय तीला ॥३७२॥
विघ्नाधीश गणेश पूजुनि करी भूपाळा वाङनिश्चया ॥
मंत्रे युक्तवधूत वाह्रत असे वस्त्रे नगस्वश्रिया ॥
रामाला विभवें विदेह जनके शेला मुदी वाहिली ।
त्याची मूर्ति बरी धरोनि ह्र्दयी सर्वातरी पाहिली ॥३७३॥
जोशी पंचकशुध्दलग्नविषयी केली असे पत्रिका ।
देती त्यास समानमान वसने सद्भूषणे मुद्रिका ॥
वाद्ये होत वधूवरांस समई लागे हरिद्रा पहा ।
नाना मंडपवेदिका करिति ते देवप्रतिष्ठा महा ॥३७४॥
देशाचार कुलप्रचार नगराचारास ते मानिती ।
नानाशास्त्रविचारपारग सदाचारसही जाणती ॥
लग्ना ही रविमंडळाधर्मसमयी वेळा बरी साधिली ।
पात्री निर्मळ नीर ते भरुनिया जोशी घडी घातली ॥३७५॥
आधी लक्षणदक्ष लक्ष्मण वरा धावा बरा येतसे ।
पूजाचंदनवस्त्रभूषणगणी माहावरी होतसे ॥
मूळी मूळसवे महसखवते आली वराकारणे ।
सर्वाच्या नयनांस देखत पदे होते बरे पारणे ॥३७६॥
पूर्वी पूर्वपुरोहितासि पूजिले त्यानंतरे त्या वरा ।
वस्त्रे भूषणपुष्पहार रचना केली असे सत्वरा ॥
बैसोनी शिबिके तया रघुपती वाद्ये पुढे वाजती ।
मागे अक्षत टाकिती गजगती त्या कामिनी साजती ॥३७७॥
वाद्ये वाजसि साजती नर तथा नारी महासुंदरी ।
भारी त्या विदरी करीत अमरी नागांगना किन्नरी ॥
कोणी त्या गजागामिनी सुजघनी आणीक कुंभस्तनी ।
कोणी त्या मृगलोचनी सुवदनी कोणी मरालस्वनी ॥३७८॥
कोणी चारुताधरामृतधरा कोणी उरुपी वरा ।
कोणी रम्यकरा स्वभावचतुरा आणीक सूक्ष्मोदरा ॥
कोणी पद्मिनि रम्यचंद्रवदनी कोणी असे चित्रिणी ।
कोणी आणिक शंखिणी निजगुणी कोणी असे हस्तिणी ॥३७९॥
जे अंगी अतिकोमला कृशतनू हसस्वरा सुंदरी ।
जीचे वीर्य सुगंध हंसगति जे जे देवपूजा करी ॥
कामागारसरोज केशरमणी जे श्रेणि पीनस्तनी ।
सुग्रीवा मृगलोचनी सुवदनी ते जाणिजे पद्मिनी ॥३८०॥
जीचे श्यामल केश कोमल पहा जे कंबुकंठी असे ।
संभांगी रुचि अल्प जीस बहुशी भोगोपभोगी नसे ॥
कामगार सलोम वर्तुळ सदा बोले सुवृत्तस्तनी ।
पीतांगी मृदु जे सुवृत्तनयनी ते जाणिजे चित्रिणी ॥३८१॥
संभोगी करजक्षते करितसे जे क्षारगंधी द्रवे ।
आरक्ता वसनासि वांछित असे संभोग इच्छी नवे ॥
मध्यारथूळ करांघ्रि आयत दया नाही महा कोपिनी ।
पाहे वक्र वदे कठोर वचनी ते जाणिजे शांखिणी ॥३८२॥
ओष्ट्री स्थूल असे मदे द्रवतसे आम्ले बहु खातसे ।
चित्ती भूतदया नसे ढळतसे पिंगत्व केशी वसे ॥
बोले सद्गदसे रती ह्मणतसे पिंगत्व केशी वसे ॥
ग्रीवाखर्व कुवृत्त मंदगमनी ते जाणिजे हस्तिनी ॥३८३॥
ऐशा विधिपथी महोत्सव गती ऐकोनि वाद्यश्रुती ।
पाहाया नवरा त्वरे नगरिच्या त्या कामिनी धांवती ॥
कोणी एक घरांत भुक्तिकरितां तैशीच ते जातसे ।
तीते देखुनि सर्व लोक ह्मणती उष्टी पहायेतसे ॥३८४॥
वेणी घालित घालितांचि तरुणी पाहावया धांवल्या ।
दोघी त्या उठतां भुलोनि बुचड्या येके स्थळी बांधिल्या ॥
अभ्यंगाकरिता त्वरीत मग पै तैशीच ते धांवत ।
घेऊनी लुगडे निजांग उघड तैशीच गुंडाळिते ॥३८५॥
संभोग करितां प्रियास ह्मणते वेगीं उठा वीजते ।
जाते दूरि तियेप्रति प्रिय ह्मणे गेले नसे दूरि ते ॥
तो तीने ढकलोनि त्यास दिधले धांवे करी सोवळे ।
तीमागे पति धांवतो ह्मणतसे वेडे कसे लागले ॥३८६॥
नेत्री अंजन घालिता सळइने कानी सळे घातली ।
हस्ताने मग तो धरोनि नवरा देखोनि भांबावली ॥
कोणी एक विड्यांस घेत असतां नाकी विडी घातली ।
गेले दूरि ह्मणोनिया स्वनयनी पाहवया धांवली ॥३८७॥
कोणी येकिस धांवता लगबगे नीरी पुढे फीटली ।
हस्ताने लगडे धरोनि पुढती तैशीच ते धांवली ॥
वाद्ये वाजत लेंकुरास भुलली श्वाना कडे घेतसे ।
केकेतें उगला ह्मणोनि वनिता स्तन्यासही देतसे ॥३८८॥
बाळाला स्तनपान देत असतां तैशीच ते धांवते ।
पान्हा फार पयोधरी पयभरे मार्गास ते सिंचते ॥
भाळी कुंकुम रोखतां गलबला ऐकोनि भांबावली ।
नाकी घासित कुंकुमा लगबगे वेगे वधू धांवली ॥३८९॥
ऐशा धांवुनि पाहती रघुविरा येवोनि त्या बोलती ।
जोडा येक वधू वरास दिसतो हे ईश्वराची गती ॥
जेथे रुप वरास भासत असे तेथे वधूला नसे ।
जेथे सुंदर कामिनी नर पहा तेथे कुरूपी वसे ॥३९०॥
ऐसे फार महोत्सवे वर नृपद्वारास तो पावला ।
वेगे घे दहिभात राजवनिता येवोनि ओवाळिला ॥
आले सर्वहि वाडियांत नृपती स्थानी यथा बैसती ।
पाने पुष्पफळा विशेष विमला आणूनिया ठेविती ॥३९१॥
नारेळे फणसे बिही अननसे पूगीफळे सुंदरे ।
केळे आम्रफळे रसाळ बहूळे ते खारिका खोबरे ॥
जंबीरे बदरे तुरंज मधुरे द्राक्ष तथा जांभळे ।
तूते नाबद शर्करा कमरखे सीताफळे निर्मळे ॥३९२॥
अंजीरे बहुबुध्धुरें सुमधुरे कलिगडे फालसे ।
नारंगे अतिरंगिते खिरणिया संपूर्ण झाल्या रसे ॥
दाळिंबे पिकली बरी खिसमिसे पेरु कसी सेउपे ।
बादामे बहुखर्बुजे लसलसी ते आणियेली नृपे ॥३९३॥
कैसे केतकपत्र सुंदर करा शोभामुदे राखडी ।
मासाकासव मोरबोर कुहिरी ज त्रिस्थळी वांकुडी ॥
तवा ताहत नागबद विलसे पुष्पावरी आरसी ।
पाहा दाळिम आवळा परिनटे चांपेकळी फारशी ॥३९४॥
शोभे भोंकरे फार साल फळ तें गोंडे झबी आवळे ।
नाडे रंगित फारसे विलसती वेणी जिही आवळे ॥
शीर्षीचे फुल हांसळ्या झळकती पाने पट्या त्या महा ।
शोभे भांगटिळा नसे मग तुला त्या चंद्रहंसा पहा ॥३९५॥
नाकी बेसर आणि मौक्तिक फुली मोती नथ चांगले ।
कर्णीचे नग आयका बुगडिया पंखे फुले तोंगले ॥
ताटंके जडिते सकाप घडिते नागोत्तरे बाळिका ।
पानाच्यासह घोंस मौक्तिक कृता कोथिंबिर्‍या आणिका ॥३९६॥
थोरां भोवरिया घडूनि जडिते ते कुंडले शोभती ।
कंठीचे नग आयका वदतसे जे बायकां साजती ॥
आधी टीकमणी सवें गळासरी येकावळी साजिरी ।
नाही जीस सरी सरी मुरडिवा साधी सरी दुसरी ॥३९७॥
मोत्याचे सर थोर थोर दुलडी चित्ताक शोभे महा ।
पेटी ताइत साखळी धुकधुकी ते एकदाणे महा ॥
मोठी मोहनमाळ माळ पुतळी निंबोळियांची असे ।
माळा आणिक रम्य रत्नचिता चांपेकळ्यांची वसे ॥३९८॥
कैसा अंबरसा पहा हयकला त्या चींचपेट्या टिका ।
शोभे सुंदर कारल्यास पदकीं हीरा झळाळे निका ॥
मुक्ताजाळ विशाळ शोभत असे तो हार हंबीरही ।
कैसे ते कटिसूत्र किंकिणिगणी अत्यंत गर्जेतही ॥३९९॥
बाजूबंदहि रुंद सुंदर कशा त्या तोळबंद्या पहा ।
वाकी कंकण आवळे सरचुडे वाळे निराळे महा ॥
दोरे पाटलिया जवे अतिज त्या कंकण्या पोहची ।
हीरे जे हे गिर दशांगुळेसि का त्या मुद्रिकाला रुचि ॥४००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP