मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नागोशीकृत सीतास्वयंवर| पदे २५१ ते ३०० नागोशीकृत सीतास्वयंवर पदे १ ते ५० पदे ५१ ते १०० पदे १०१ ते १५० पदे २५१ ते ३०० पदे ३०१ ते ३५० पदे ३५१ ते ४०० पदे ४०१ ते ४१५ प्रस्तावना. पदे २५१ ते ३०० ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली. Tags : nagoshisitasvayamvarनागोशीमराठीसीतास्वयंवर पदे २५१ ते ३०० Translation - भाषांतर बत्तीस ठायी विधु कर्वतूनी । केले तिचे वंदन असेचि मानी ॥कलंक तैसाचि वसे निराळा । त्याच्याचि केल्या चिरिया सुनीळा ॥२५१॥सोळा कळा, की चिरिल्या समाना । हे युक्ति तीच्या रदनांस माना ॥पूर्वी कळांनी तम खादिलेसे । ते कापितां काय चिर्यांत बैसे ? ॥२५२॥हांसे तियेच्या वदनास यावे । चंद्रोदये काय तदा करावे ॥ते नोबले कीं वचनासि जेव्हा । तमिस्त्ररुपी जन होय तेव्हा ॥२५३॥महादीप्ति मोठी कपोलद्वयासी । जशी दीधली वोप ते कांचनासी ॥कपोलद्वयी बिंबते रुप साचे । जणों ठेविले आरसे कांचनाचे ॥२५४॥नासा शुकाची जरि नीट होती । नाकास तीच्या उपमेस येती ॥नासा तियेची अति उच्च माने । पुष्पे तिळांची गळती भयाने ॥२५५॥सौंदर्य तीच्या नयनांस पाहे ।तद्वर्णनी कोण समर्थ आहे ? ॥देखोनि तीच्या नयनांस कांती । पळोनि जाती हरिणी वनांती ॥२५६॥इचे नेत्रलावण्य आह्मांस नाही । चकोरे कशी भक्षिती वन्हि पाही ॥बरे साजती चांगले नेत्र कैसे । जळामाजि हो पाहतां मीन जैसे ॥२५७॥नेत्र धांवतचि सत्वर आले । कर्णकूपकुहरा मग भ्याले ॥अन्यथा बहुत लांबत जाते । स्थान आश्रवण यास्तव त्याते ॥२५८॥अहो नेत्र शोभेति मोठ्या विलासे । जणो खेळती मन्मथाचेच फांसे ॥ललाटी प्रभा साजिरी पूर्ण देखा । जशी अष्टमीमाजि शुभ्रा सुरेखा ॥२५९॥धि:कारिला चंद्र तदाननाने । तो अंतरी दाह महाsपमान ॥मध्ये विधू यास्तव नीळ झाला । कलंक ऐसे ह्मणती तयाला ॥२६०॥तिचे केश देखोनिया चामराते । जग्नामाजि तात्काळ धि:कार येते ॥तथा देखिल्या सुंदरा केशपाशा । मयूरे कशी सांडिती पिच्छ आशा ॥२६१॥नसे वेणिका ते असे भृंगरेखा । सुखा जातसे पाठिशी येत देखा ॥तिची पाठि मोठ्या विलासे विराजे । जसे हेमकेळीदळी तेज साजे ॥२६२॥धम्मिल्लराहूदरभेद झाला । त्या आंत की तो मुखचंद्र आला ॥तो धाक अद्यापि तसाच आहे । यालागिं की बोलति भांग पाहे ॥२६३॥केशावली की समहेम लेखा । विद्युल्लता की मुदिरांत देखा ॥मंदाकिनी की गगनी विराजे । अथोमुखे वेणि कटीस साज ॥२६४॥नखारंभ्य हो केशपर्यत पाहा । तियेचे असे अंगसौदर्य माहा ॥प्रभेने तिचे लोक हा दीप्त झाला । नभामाजि तो सूर्य लोपोनि गेला ॥२६५॥त्यानंतरे सुंदर माडियेसी । आली सखीवेष्टित ती सुकेशी ॥उच्चसनी बैसत पंकजाक्षी । महदरे सर्व सभा निरीक्षी ॥२६६॥झरोक्यावरी बैसली राजबाळा । पुढे ठेविली चांगली पुष्पमाळा ॥वधू पाहते ज्यां नृपांलागिं दृष्टी । तयां होतसे काय पीयूषवृष्टी ॥२६७॥जे कीं महा आप्त न पारखी ते । जे सर्वही लक्ष्मण पारखी ते ॥नामे जया दूरुनि जानकीते । सभासदां दाखविते सखी ते ॥२६८॥कोकणस्थ नृप हा जळधीचा । स्वामि तो चतुर निर्मळधीचा ॥घालिशील जरि माळ कराने । देखसी तरि तमालकराने ॥२६९॥ज्या घरी बहुत हे शतवाजी । ज्यासमोर रिपु हेशतवाजी ॥तो नृपाळवर माळवराजा । यास देइं वर माळ वरा जा ॥२७०॥दाक्षणांत बहु दक्ष पहा हा । जो सुलक्षण विचक्षण माहा ॥शोभतें करिं शरासन एका । हा तुझ्या तरि मनास नये का ? ॥२७१॥ज्याची अभंगा परि भा विराजे । जो कीं स्वतेजे परिभावि राजे ।काशीनिवासी अनुभावराशी । वरीसि ना तूं तरि या वरासी ? ॥२७२॥कोणी पहा थोर मिशांसि तावी । आकर्ण कोणी रदनांसि दावी ॥कोणी तसा आंगहि मोडिताहे । कोणी विलासें अति वक्र पाहे ॥२७३॥कोणी महा मस्तकि हात ठेवी । तांबूल कोणी सविलास सेवी ॥कोणी करां चोळित फार देखा । कोणी मही वोढिति वक्र रेखा ॥२७४॥स्वांगास कोणी तरि खाजवीतो । कोणी स्वये वस्त्रहि पालवीतो ॥अधोमुखे आणिक बैसताहे । आणीक कोणी कर चोळिताहे ॥२७५॥हे समस्त नृपपुत्र देखिले । काय चित्रपट भूमि रेखिले ॥दाखवी सखि पाहिन राजसा । सर्वरत्ननिचयी हिरा जसा ॥२७६॥सर्वात तो हा सिरताज पाहा । श्रीरामपायी निरता जपा हा ॥वंशावळी आइक राजयाची । नसेल संख्याच जया जयाची ॥२७७॥वैवस्वताचा मनु वंशधर्ता । दिलीप नव्यण्णव यज्ञ कर्ता ॥जो नंदिनी धेनु पुजूं रिघाला । तेणे गुणे तो रघु पुत्र झाला ॥२७८॥शास्त्रस्त्रविद्या बहुसाल ज्याते । युध्दांत जो मानवि वासवाते ॥करुनियां विश्वजिती दिगंती । भूपात्र सेवा वरिली विभूती ॥२७९॥तो कुत्स आला शुभ लक्षणेसी । नृपास मागे गुरुदक्षिणेसी ॥विशेष संतोष तयास पोटी । द्रव्यासि मागे मनुसंख्य कोटी ॥२८०॥नभीहुनी द्रव्य पडे पवाडे । पावोनियां विप्र वदे पवाडे ॥सुपुत्र आशीर्वदला तयाला । त्याच्या प्रसादें अज पुत्र झाला ॥२८१॥वरुनियां इंदुमती अजाने । केली समस्ते समरी अजाने ॥जो सर्वदा सर्व घटी समान । आले पहा आत्मगृहा समान ॥२८२॥दशरथ सुत कैसा, ख्यात, झाला अजाला ।सुलभ कलभ कैसा होतसे दिग्गजाला ॥समरि विजित शुक्राचार्य जेणे नृपाने ।सकल सुरवरांची घेतली प्रीतिपाने ॥२८३॥पुत्रेष्टि केली बहुतां विचारी । तयासि झाले मग पुत्र चारी ॥त्यांमाजि हा मुख्य महावतारी । श्रीराम, नामे सकलांस तारी ॥२८४॥विचार माझा ह्रदयी धरावा । सीते तुवां हा ह्रदयी वरावा ॥याचेपुढे भासति सर्व तैशी । सिंहापुढे की मृगजाति जैशी ॥२८५॥खद्योत जैसे द्युमणीस येतां । चंद्रोदयी की नलिनी पहातां ॥मूर्खै जशी पंडितभाविलोके । दिवा जशी की दिसती उलूके ॥२८६॥भूपाळवृंदे अति तेजमंदे । झाली पहा रामसुखारविंदे ॥वरा वराया स्वमनीच पाहे । रामापुढे आणिक कोण आहे ॥२८७॥काय भासत विभा वदनाची । कोण दीप्ति झळके रदनांची ॥देवता त्रिजगतीसदनाची । काय मूर्ति मिरवे मदनाची ॥२८८॥तोरा महासा गरजो जयाचा । तो राम हा सागर जो जयाचा ॥पाहा वयाचा भवभाव लाहे । पाहावयाचा भवभावलाहे ॥२८९॥उपमा न दिसे शरासनाते । मग तें वैरिउरा शरासनाते ॥नृप घे तुरगीं बसोनि भाला । मग ये बहु कंप तया नभाला ॥२९०॥महा थोर उत्कर्ष वाणे जयाचा । टिका घेतलासे जयाने जयाचा ॥नभस्पर्शनाते महामान लाहे । ह्मणोनी नृपांलागिं हा मानला हे ॥२९१॥बागदार समशेर पुराणी । देखतांचि पळतो रिपु रानी ॥चीरली अति विभाकरबाडे । जीपुढे रिपुकुळे करबाडे ॥२९२॥थोर तेज मिरवे तरवारे । जीसमोर रिपुचे दळ वारे ॥संमरी झळकतां परजाला । दिव्यमार्गपर तो पर जाला ॥२९३॥तेज फार दिसते जमदाडे । क्रूर फार अति तीक्षण गाढे ॥देखतांचि परजीभ वळेना । लागतां करिल काय कळेना ॥२९४॥चामरी अति सुशोभित वाजी । ज्यासमोर रिपुचे शत वाजी ॥साजताति पर ते हुमियांचे । देखतां बळ गळे भुमि याचे ॥२९५॥महा साजिरा अश्व तो राजयाचा । जगन्मंडळी थोर थोरा जयाचा ॥कसे नेत्र संतोषती सज्जनांचे । असा अश्व तो हा क्षिती सज्ज नाचे ॥२९६॥अरब्बी बदक्षान ताजी तुरक्की । रुमी पर्वती घुट्ट कच्छी इराखी ।सुरंग सारंग सुभेद दक्ष माहा । असे राघवाचे घरी अश्व पाहा ॥२९७॥सुरंग सारंग सुभेद नीळे । ज्र पंचकल्याण विशेष काळे ॥जर्दे बनोजी अबलख्ख तेजी । नृपा घरी ते बहुवेग वाजी ॥२९८॥हस्ती पहा वर्षति फार दानी । जे चित्रिले चित्रविशारदांनी ॥शोभा दिसे त्यांस बरी रदांनी । नेणो मही व्यापित नीरदांनी ॥२९९॥तुळता न जरा सुखासना ही । तरि याच्याच जरा सुखास नाही ॥वसते अभिराम वासनाही । नृप देशांतक हीमवासनाही ॥३००॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP