मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दीप रत्नाकर| अध्याय चौदावा दीप रत्नाकर अनुक्रमणिका प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा आरती अष्टक अध्याय चौदावा श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर. Tags : deep ratnakarpothiramanandदीप रत्नाकरपोथीमराठीरामानंद अध्याय चौदावा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ नमो सद्गुरु परिपूर्णा ॥ तूं गुणातीत निर्गुणा ॥ लागतां तुझिया चरणा ॥ माझ्या मीपणा नागवलों ॥१॥देहसंगें मीपण जडलें होतें ॥ तें देहेंचि निरशिलें सद्गुरुनाथें ॥ पूर्ण बोध केला मातें आतां एकत्वें एकलाचि ॥२॥मी चौंदेहांचा जाणता साक्षीप्रमाण ॥ चौंदेहाचें म्यां पाहिलें स्वप्न ॥ त्यामाजी जीव शिव माया ब्रह्म पूर्ण ॥ ऐसें बहुत प्रकार देखिले ॥३॥चार खाणी चार वाणी ॥ चौर्यायशीं लक्ष जीवयोनी ॥ अनंत ब्रह्मांड आदिकरोनी ॥ स्वप्नामाजी देखिलीं ॥४॥सत्य कैलास वैकुंठलोक ॥ सप्त पाताळ एकवीस स्वर्ग दे ॥ मेरुमांदार सकळिक ॥ स्वप्न कौतुक देखिलें ॥५॥स्वप्नामाजी केला घराचार ॥ तेथें लेंकलेंकी झालीं अपार ॥ व्याही जांवई झाले साचार ॥ हव्यास थोर करित होतों ॥६॥चारी वर्ण अठरा पगड जाती ॥ वेदशास्त्रादिक ब्राह्मण पढितेजी ॥ परस्परें वाद सांगती ॥ नाना मती देहाभिमानें ॥७॥सहा दर्शनें छत्तिस पाखांडें जाण ॥ आपलाले मतीं करती स्थापन ॥ ऐसें म्यां देखिलें स्वप्न ॥ तेणें मन भांबावलें ॥८॥त्या स्वप्नामाजी जाण ॥ मी झालों होतों ब्राह्मण ॥ त्या विद्येचें अभिमानें करोन ॥ बरळत आपण होतों मी ॥९॥मीच एकला आचारवंत ॥ मजहोनि थोर नाहीं सृष्टींआंत ॥ कवित्वकर्ता बहुश्रुत ॥ हेंचि सत्य बरळत होतों ॥१०॥मी अग्निहोत्री ब्राह्मण ॥ काव्य - व्याकरणीं निपुण ॥ वेदवक्ता जाणें पारायण ॥ ऐसें जाण बरळत होतों ॥११॥तीर्थव्रतें केलीं बहुत ॥ दान धर्मांसीं नाहीं गणित ॥ चालविलें सदा व्रत ॥ ऐसें सत्य बरळत होतों ॥१२॥ऊर्ध्वबाहू पंचाग्निसाधन ॥ ठाडेश्वरी मौन्यमुखीं धूम्रपान ॥ टिळे माळा विभूतिलेपन ॥ ऐसें जाण बरळत होतों ॥१३॥निंदा आणि स्तुती ॥ उत्तम अधम जाती ॥ प्रजा आणि भूपती ॥ ऐसी स्थिति बरळत होतों ॥१४॥चोर आणि साव ॥ भक्त आणि देव ॥ दुर्बळ आणि वैभव ॥ ऐसें सर्व बरळत होतों ॥१५॥अधर्म आणि स्वधर्म ॥ सत्कर्म आणि असत्कर्म ॥ स्त्री - पुरुषाचें युग्म ॥ ऐसें बरळत होतों ॥१६॥मूर्ख आणि शाहाणा ॥ घरधणी आणि पाहुणा ॥ जांवई आणि मेहूणा ॥ ऐसा जाण बरळत होतों ॥१७॥परिस आणि पाषाण ॥ विष आणि अमृत जाण ॥ नवें आणि पुरातन ॥ ऐसें जाण बरळत होतों ॥१८॥ऐसें बरळणें ऐकोनी ॥ धांवले सद्गुरु तत्क्षणीं ॥ मस्तकीं अभय कर ठेवोनी ॥ कृपा वचनीं जागविलें ॥१९॥जंव झालों मी जागृत ॥ तंव तें हरपलें माझें मज आंत ॥ बुडली द्वैताची मात ॥ प्रकाशली ज्योत एकत्वें ॥२०॥मुळीं मी एकला एकचि आहें ॥ परि हें भासत होतें मायामोहें ॥ आतां वंदिले तुमचे पाये ॥ भ्रम राहे कैशियापरी ॥२१॥या जनाचे मूळीं भ्रमचि असे ॥ आणि जग हें भ्रमेंचि करोन भासे ॥ तो भ्रम जाहला आत्मआभासें ॥ मज ऐसें कळों आलें ॥२२॥आतां भ्रम तोचि झाला निभ्रम ॥ स्वयेंचि झालों आत्माराम ॥ मीच सर्व सुखाचें धाम ॥ वस्तु परम तेचि मी ॥२३॥माझ्या सत्तेनें हें सर्व वर्तत ॥ परि मी लिप्त नाहीं यांत ॥ जैसें सूर्यतेजें होत ॥ परि सूर्य अलिप्त सर्वांसीं ॥२४॥जैसा वनीं वसंत वृक्ष पालवोन वृक्षातीत ॥ कीं चुंबकलोहातें चालवीत ॥ दीप गृहांत प्रकाश करीत ॥ परि तो अतीत त्याहोनी ॥२५॥कीं गृहामाजी दीप आहे ॥ परि गृहकर्मासिं लिप्त नोहे ॥ तैसा मी सर्वांभूतीं आहें ॥ परी साक्षित्वें पाहें वेगळा ॥२६॥अनंत ब्रह्मांड मजमाझारी ॥ मी त्या ब्रह्मांडाच्या सबाह्य अभ्यंतरीं तुमचे कृपें निर्धारीं ॥ अनुभवें मज कळों आलें ॥२७॥आतां मी तूंसीं पडलें मौन्य ॥ अवघें झालें चैतन्यघन ॥ उडालें स्वामी सेवकपण ॥ पूजा पूजन दिसेचिना ॥२८॥ऐसें ऐकोनियां वचन ॥ सद्गुरु बोलिले हांसोन ॥ भला भला रे म्हणवोन ॥ पोटासीं जाण धरियलें ॥२९॥म्हणे माझे मनोरथ पूर्ण झाले ॥ कां जें तुज ब्रह्म अनुभवा आलें ॥ आपणासकट ब्रह्मचि भासलें ॥ खालीं उरलें सद्गुरुपूजन ॥३०॥सद्गुरु म्हणजे सद्वस्तु जाण ॥ जें समविषयीं व्यापक समान ॥ शीत उष्णतेविना पूर्ण ॥ असें घन कोंदलें ॥३१॥ज्यासीं आदि अंत नाहीं ॥ तें परात्पर ते पाहीं ॥ मनबुद्ध्यादिकां नकळे सोई ॥ ते सद्गुरु पाहीं वस्तु ॥३२॥ जें मनाचें मन बुद्ध्यादि बोध जाण ॥ चित्ताचें जें चित्तपण ॥ तोचि निश्चयीं निधान ॥ सद्गुरुरावो ॥३३॥जो अहंकाराचे आदी ॥ अविद्याची अवधी ॥ विचारितां न पाविजे शुद्धी ॥ तोचि सद्बुद्धि सद्गुरुरावो ॥३४॥जो श्रवणाचें श्रवण ॥ आणि नयनांचे जो नयन ॥ जो जीवा जीवा जाण ॥ तो निधान सद्गुरुरावो ॥३५॥जो सर्वांचा प्रकाशक ॥ आदि मध्य अवसानीं एक ॥ जो अलिप्त विश्वव्यापक ॥ तो सम्यक् सद्गुरुरावो ॥३६॥सद् चिद् आनंद ॥ ध्येय ध्यान ध्याता प्रसिद्ध ॥ त्याचाहि जाणता अनादि सिद्ध ॥ तो अगाध सद्गुरुरावो ॥३७॥त्वंपद आणि तत्पद ॥ असिपदाचा जाणता शुद्ध ॥ जो सर्वसाक्षी आनंदकंद ॥ तोचि प्रतिपाद्य सद्गुरुरावो ॥३८॥जो सप्तपाताळां खालता ॥ आणि येकवीस स्वर्गांवरता ॥ अनंत ब्रह्मांडांचा प्रकाशिता ॥ तोचि जाण चित्ता सद्गुरुरावो ॥३९॥जेणें सर्वांसीं जाणितलें ॥ ज्यामाजी सर्व थोकावलें ॥ जें जाणों जातां जाणतेंचि गेलें ॥ तोचि संचला सद्गुरुरावो ॥१४०॥जो सर्वांपरिस वाड आहे ॥ जैसाचि संचला पाहें ॥ सर्वां चालवोन वेगळाचि आहे ॥ तोचि होय सद्गुरुरावो ॥४१॥जो नामरूपातीत ॥ शीत उष्णतेविण प्रकाशिली ज्योत ॥ जो अखंड दंडायमान सदोदित ॥ तो सत्यसत्य सद्गुरुरावो ॥४२॥हें सर्व होतें जातें पाहीं ॥ परि ज्यासीं होणें जाणें नाहीं ॥ ऐसें जें आहे कांहीं ॥ नेणवेचि सोई सद्गुरुरावो ॥४३॥ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ यांचाही साक्षियाहोन पर ॥ जो मायेचा नियंता साचार ॥ तोचि निर्विकार सद्गुरुरावो ॥४४॥जैसा सूर्य उदय होतां ॥ अंधार न दिसेचि पाहता ॥ तैसें सद्गुरुचें पायीं लागतां ॥ द्वैताची वार्ता बुडाली ॥४५॥आतां अद्वैत ना द्वैत ॥ याचा उडालाचि हेत ॥ अवघा सद्गुरुचि सदोदित ॥ म्हणवोन आर्त धरिजे येथें ॥४६॥ज्यां सद्गुरुचें कृपेंकरून ॥ द्वैताचें झालें बोळवण ॥ त्या सद्गुरुसीं मानी मनुष्य म्हणवोन ॥ त्याचें ज्ञान सिद्धि न पावें ॥४७॥रत्नाकरा सर्व साधनांचे साधन ॥ ते शिष्यासी सद्गुरुचे चरण ॥ येथें आभाव धरितां जाण ॥ त्याचें ज्ञानसिद्धि न पावे ॥४८॥जेणें चौंदेहांसीं निरसिलें ॥ आक्षि स्वयेंचि ब्रह्म केलें ॥ त्यासी मनुष्य म्हणवोन जेणें मानिलें ॥ ते गेले अधोगती ॥४९॥सद्गुरुकृपेनें झालें ज्ञान ॥ परि तें जतन होतां अति कठिण ॥ कां जे हो सद्गुरुसेवेसिं करी अभिमान ॥ तेणें हान त्या ज्ञानासी ॥५०॥सद्गुरुचरणीं मस्तक ठेविला ॥ तेव्हांचि हा देह त्यासी अर्पिला ॥ आतां हा तों शिवनिर्माल्य झाला ॥ म्हणवोन सेवेसीं लाविला पाहिजे ॥५१॥कां जे देह हा तो नाशिवंत ॥ आणि सद्गुरुने वस्तु दिली शाश्वत ॥ ऐसें जाणोनि जो सेवेसीं वंचित ॥ तो पतीत जाणावा ॥५२॥ज्या वस्तूसाठीं वनवासी झाले ॥ एकें विषय वमनप्राय मानिले ॥ एक गिरिकपाटीं राहिले ॥ परि अनुभवीं आलें ऐसें नाहीं ॥५३॥एक अखंड बैसले ध्यानस्थ ॥ येक ब्रह्मचर्यादि व्रत आचरत ॥ येक धूम्रपानादि करीत ॥ येक राहात ठाडेश्वरीं ॥५४॥एक भगवीं करोनी लुगडीं ॥ फिरताती नागवीं उघडीं ॥ त्यजोनी अन्न - उदकांची गोडी ॥ ओढिती तोटी तपाची ॥५५॥येक टिले माळा लावोन ॥ सदा करिताती कीर्तन ॥ येक सदा करिताती अनुष्ठान ॥ चित्त ठेवोन वस्तूचे ठाईं ॥५६॥एक सदावर्त घालिती ॥ एक गंगेंत बुडोन मरती ॥ एक गोराजन खाती ॥ आस चित्तीं वस्तूची कीं ॥५७॥एक गोदानें भूमिदानें देती ॥ एक अनाथांचें पालण करिती ॥ एक जीवहि दानें अर्पिती ॥ एक राहती सदां मौन्य ॥५८॥एक वेदाध्ययन करिती ॥ एक उपनिषद् अखंड विचारिती ॥ एक न्यायमीमांसादिक पढती ॥ एक पढती अखंड स्तोत्र ॥५९॥एक अग्निहोत्र घेती ॥ एक विधियुक्त कर्म आचरती ॥ एक शाक्त वैष्णव घेऊन ॥ अशा चित्तीं वस्तुचि असे ॥६०॥एक काळीं वस्त्रें करोन ॥ महात्मे होताति आपण ॥ एक वैराग्य घेऊन ॥ करिती भजन रात्रंदिवस ॥६१॥ऐसे वस्तूसाठीं बहुत ॥ कष्टी होताति सत्य ॥ परी ते नोव्हेचि प्राप्त ॥ म्हणोन पडत मतवादी ॥६२॥वस्तूसाठीं सहा दर्शनें झालीं ॥ सन्निध असतांचि भांबावलीं ॥ म्हणवोन आपुलालीं मतें स्थापिलीं ॥ अगोचर राहिलीं सर्वंपरतीं ॥६३॥कां जें वस्तु मन बुद्धींस अगोचर आहे ॥ आणि हे तों करिती मनबुद्धीनें उपाय ॥ म्हणवोन उपाय तोचि अपाय ॥ होतो पाहें बा रत्नाकरा ॥६४॥ऐसी जे सर्वांसीं चोरली ॥ जेथें ध्येय ध्यानें हरपलीं ॥ सर्व साधनें सरलीं ॥ दृष्टातें वाहिलीं आण जेथें ॥६५॥जें आहे नाहीं म्हणतां नये ॥ जाणों जातां जाणणेंचि जाय ॥ जें सर्व गुह्यांचें गुह्य ॥ तें देत आहे सद्गुरु शिष्यांसीं ॥६६॥कांहीं कष्ट न करविता ॥ बहुत दिवस लाजों न देतां ॥ क्षणामाजी बोध करविता ॥ भासवी तत्त्वतां ब्रह्मसर्वत्रीं ॥६७॥गुरुमुखेंविण होय उपदेश करविता ॥ शिष्य कर्णाविण होय एकता ॥ जें न कळे नाना सायास करितां ॥ बाणे एकात्मता क्षणामाजी ॥६८॥जैसा दीपें दीप लावला ॥ तो दुसरा दीप तैसाचि झाला । नेणवे आधिल मागला ॥ सद्गुरुकृपेनें शिष्य झाला तैसा ॥६९॥आत्मप्रचीत आणि गुरुप्रचीत ॥ तिसरी शास्त्रप्रचीत ॥ ऐसें समतेजो भास करित ॥ भ्रांत हरी तात्काळचि ॥७०॥भ्रांत हरोनि सर्वसाक्षी करोन ॥ उडवी मीतूंपणाचें भान ॥ ऐसें जें सद्गुरुनिधान ॥ त्यासी वंचितो पामर ॥७२॥जेणें भवजन्मापासोन सोडविलें ॥ त्या सद्गुरुसी जेणें वंचिं ॥ ते महापतीत बोलिले ॥ ते रौरवीं पडले कल्पकोटी ॥७३॥सद्गुरुसी मनुष्यापरी मानिती ॥ आणि त्याचे वचनासी अमान्य करिती ॥ मुखें आपुली ज्ञानवित्पत्ति ॥ ते बोलिजेति कृतघ्न ॥७४॥कार्यापुरती करिती लोलिंगता ॥ जैसी व्यभिचारिणी भुलवी आपुला भर्ता ॥ सद्गुरुपुढें रोधोन होय बोलता ॥ तो जाण चित्तीं कृतघ्न ॥७५॥सद्गुरुचे ठाईं जे अभाव धरिती ॥ आणि देवी देवतांतें मानिती ॥ तीर्थयात्रेसी फिरती ॥ ते जाण चित्तीं कृतघ्न ॥७६॥जो सर्व देवांचा मुकुट - मणि ॥ सर्व तीर्थे ज्याचे चरणीं ॥ सद्गुरुमहिमा जे नेणती कोणी ॥ ते जाण कृतघ्न ॥७७॥ज्यासीं परिणामविचार नाहीं ॥ लीन नसेचि सद्गुरुपाईं ॥ शुभाशुभ नकळेचि कांहीं ॥ ते सोई शिष्याची ॥७८॥तूं कतरशी अनुमान ॥ अशिष्य सच्छिष्य त्याचें काय लक्षण ॥ तेंहि सांगतों सावधान जेणें पावन होइजे ॥७९॥सद्गुरुचरणीं एकनिष्ठा नाहीं ॥ अखंड चित्त चंचळ पाहीं ॥ वेळ अवेळ नेणें कांहीं ॥ तोचि पाहें अशिष्य ॥८०॥ज्यापासोन झालें ब्रह्मज्ञान ॥ त्याचे चरणीं भावहीन ॥ आणि मिरवितो ज्ञानाभिमान ॥ तोचि जाण अशिष्य ॥८१॥जो सद्गुरु परिचर्येसी आळशी ॥ आणि तत्पर स्वकार्यासीं ॥ लोभ ज्याचे मानसीं ॥ तोचि निश्चयेंसीं अशिष्य ॥८२॥जो गुरुसांप्रदायासी पाठमोरा ॥ आणि घाली ज्ञानाचा पसारा भाव नाहीं एकसरा ॥ तोचि खरा अशिष्य ॥८३॥सद्गुरुसन्निध एक क्षण न बैसे ॥ श्रवणींतो चाडचि नसे ॥ मी ज्ञाता ऐसें म्हणत असे ॥ तोचि खरा अशिष्य ॥८४॥आप स्तुत पराची निंदा ॥ जो अखंड प्रवर्ते वादा ॥ न मानी वडिल प्रबोधा ॥ तोचि शुद्ध अशिष्य ॥८५॥माझे महत्त्व व्हावें ॥ ऐसें कल्पित जीवेंभावे ॥ मान झाल्या संतोष पावे ॥ तो जाणा अशिष्य ॥८६॥सद्गुरुसेवेसी विन्मुख ॥ जया आवडे लौकिक ॥ विषयसुखाचा मानी हरिख ॥ तोचि सम्यक् अशिष्य ॥८७॥सद्गुरुची निंदा करी ॥ आणि उगाचि फिरे घरोघरीं ॥ वैराग्य नाहीं अंतरीं ॥ तो निर्धारीं अशिष्य ॥८८॥उत्तम वस्त्राचें परिधान ॥ उत्तम अन्न भोजनालागोन ॥ एकाग्र नाहीं ज्याचें मन ॥ तोचि जाण अशिष्य ॥८९॥गुरु जो जो करी उपदेश ॥ त्याचा करी उपहास ॥ अखंड निद्रा करणें ज्यास ॥ तोचि परियेसीं अशिष्य ॥९०॥सर्वत्र समान बुद्धि नाहीं ॥ भूतदया न मिळेचि पाहीं ॥ नेणे भजनाची सोई ॥ तोचि पाहीं अशिष्य ॥९१॥सद्गुरुचे ठायीं उदास ॥ आणि करी तीर्थव्रतास ॥ भजे देवीदेवतांस ॥ तोचि परियेसीं अशिष्य ॥९२॥विषयवासना ज्याचें मनीं ॥ आणि लोभें करी ज्ञानकथन मनीं ॥ भोंदी बाळ्याभोळ्यां लागोनी ॥ तो निर्वाणीं अशिष्य ॥९३॥परोपकारीं चित्त नसे ॥ शम दमीं आळशीं असे ॥ परस्त्री परधनांत चित्त वसे ॥ तो जाण अनायसें अशिष्य ॥९४॥मातापित्याशीं वंचोन ॥ करी स्त्रीपुत्रांचें पाळण ॥ गाई ब्राह्मणां उदासीन ॥ तोचि जाण अशिष्य ॥९५॥नित्यनैमित्याची बोळवण ॥ कामिककर्मे करी आदरेंकरोन ॥ शिके मंत्रयंत्रालागोन ॥ तोचि जाण अशिष्य ॥९६॥जारण मारणादिक ॥ शिके गारोडलावक ॥ परपीडे मानी सुख ॥ तोचि सम्यक् अशिष्य ॥९७॥ऐसी अशिष्याची कथा ॥ किती म्हणोन सांगावी सुत ॥ असो अपवित्राची वार्ता ॥ जिनें आत्महिता ठकविलें ॥९८॥ऐसियाशीं सद्गुरुकपेंकरून ॥ जरी प्राप्त झालें असे ज्ञान ॥ परी तें निष्फळचि जाण ॥ जैसें रत्नभूषण मर्कटा ॥९९॥कीं खटकीं बीज पेरिलें ॥ तें न उगवलें आणि सिंचलें ॥ बहिर्यापुढें कीर्तन केलें ॥ तें गेलें वायांची ॥१००॥जन्मांधा रत्न लाधलें जाण ॥ कीं नपुंसकासी पद्मिण ॥ कीं खराशीं लाविलें चंदन ॥ तैसें ज्ञान त्याशीं प्राप्त ॥१॥कीं चोराशीं वेव्हार केला ॥ तो मुद्दलचि घेवोन गेला ॥ तैसा त्यासी सद्गुरु प्रसन्न झाला ॥ तो बुडाला वेव्हारु ॥२॥तैसें नित्यासी प्राप्त ज्ञान ॥ तें वायांचि गेलें जाण ॥ तो अंत्यजापरी पाळावा जाण ॥ त्यासीं संभाषण न करावे ॥३॥जो सद्गुरुसेवेसी आळसी ॥ तो महापतित पापाची राशी ॥ त्याचा भार होय भूमीशीं ॥ जो सद्गुरुशीं वंचला ॥४॥देह मळमूत्राचें माहेंर ॥ अस्थिमासांचें कोठार ॥ याचा मोह करी साचार ॥ आणि सेवेसी अंतर पाडित ॥५॥तो महापापाची खाणी ॥ ज्यासी देहलोभ मनीं ॥ आणि शिवनिर्माल्य घे परतोनि ॥ तो सज्जनानीं वाळिला असे ॥६॥गोड लागे सतीचे घेतां वाण ॥ परी सती होणें अति कठिण ॥ तैसे सद्गुरु करितां हो पुरुषायमान ॥ परी दास्त्वीं मन काढितसे ॥७॥सतीनें जाळिलें देहाशीं ॥ शिष्यें देह असतां जाळावें जिवासी ॥ आवरोनियां सर्व वृत्तींसी ॥ गुरुसेवेने लावावें ॥८॥जैसें वृक्षास बुडीं पाणि घालावें ॥ तैं पत्रपुष्पफळमुळासी पावावें ॥ तैसें गुरुसेवेनें स्वरूपाधिकारीं व्हावें ॥ बुद्धि धांवें विवेकापरी ॥९॥अहं ब्रह्मास्मि बाणली जाण ॥ तेव्हांचि उडे द्वैताचें ठाण ॥ ज्ञानसिद्ध त्याशींच म्हणणें ॥ आदरें करणें गुरुसेवा ॥११०॥आणिक तों कांहीं उरलें नाहीं ॥ देवी दैवतें हरपलीं पाहीं ॥ ब्राह्मण म्हणणें तेंही ॥ अनिर्वाच्य कांहीं बोलवेना ॥११॥जे परवाचेपर ॥ तेहि उरले साचार ॥ तोचि सद्गुरु निर्विकार ॥ शिष्यजना सारजापूतेचि ॥१२॥शिष्यासी हें भान नाहीं ॥ सच्छिष्यासी सांगणें नलगे कांहीं ॥ सच्छिष्य कैचें कांहीं ॥ सावध तेंही सांगतों ॥१३॥सांगितलें अशिष्याचें लक्षण ॥ तें सांडावया लागोन ॥ ज्यासी हिताची चाड असेल पूर्ण ॥ तेणें वमनप्राय जाण मानावों ॥१४॥जैसा राजहंस सांडी दुर्गंधीसी ॥ कीं ब्राह्मण त्यजी श्वपचासी ॥ कीं विवेक त्यजी दुर्बुद्धीसी ॥ तैसें या लक्षणासी त्यजावें ॥१५॥कीं मक्षिका अन्नामधून ॥ तात्काळचि सांडिजे निवडोन ॥ तैसें अशिष्याचें लक्षण ॥ प्रयत्नें करोन सांडावें ॥१६॥विप्र सांडी अनाचार ॥ की पतिव्रतेसी नावडे व्यभिचार ॥ कीं चोरासी त्यजी सावकार ॥ तैसें सत्वर सांडावें ते ॥१७॥ब्राह्मणसभेसी जैसें श्वान ॥ आलिया काढिती तत्काळ मारोन ॥ तैसें अशिष्याचें लक्षण ॥ अंगीं जाण स्पर्शो न द्यावें ॥१८॥धर्मिष्ठ त्याजिती अधोगति ॥ ज्योतिषि सांडिती कुमुहूर्तासी ॥ तापसी त्यजती अहंतेसी ॥ तैसेंच त्या लक्षणासीं सांडावें ॥१९॥कीं ज्ञानी त्यजिती देहाभिमान ॥ कीं रोगी त्यजिती कुपथ्यासी जाण ॥ तैसें अशिष्याचें लक्षण ॥ मनींहून सांडावें ॥१२०॥जे सच्छिष्य असती ॥ ते अशिष्यातें जाणती ॥ आपले स्वहितीं चित्तवृत्ती ठेविती ॥ आदरें सेविती सद्गुरुतें ॥२१॥शरीर सद्गुरुसी अर्पिलें ॥ तें न म्हणेचि आपलें ॥ नित्य सेवन अंगिकारिलें ॥ तेचि बोलिले सच्छिष्य ॥२२॥जैसे चकोर चंद्रामृत सेवित ॥ तैसा हा सद्गुरुशब्द झेलित ॥ चकोरा जैसें चंद्राची आर्त ॥ तैसा तो पाहत सद्गुरुमुख ॥२३॥माता पिता बंधू बहिणी ॥ ही माझी सद्गुरुचि मानी ॥ सन्निध राहे लीन होउनी ॥ तोचि जाण मनीं सच्छिष्य ॥२४॥सद्गुरुमुखें निघतां वाणी ॥ ते वरच्यावर झेलोनि ॥ जैसा पपैया मेघथेंबालागोनि ॥ आदरेंकरोन झेलित ॥२५॥सरिता समुद्र उदंड भरिलेती । परी ते पपैयाचे न येती चित्तीं ॥ तैसी इतर जाती उदंड असती ॥ परि सद्गुरुमूर्तिच आवडे ॥२६॥सद्गुरुमुखींचे कवित्व जाण ॥ तें मानिती वेदशास्त्राप्रमाण ॥ इतर स्थळीं न घाली मन ॥ तोचि जाण सच्छिष्य ॥२७॥मंजुळ वचन बोलत ॥ शब्द विकारारहित ॥ करसंपुष्ट जोडोन उभा राहत ॥ तोचि सत्य सच्छिष्य ॥२८॥जों जों सद्गुरुची सेवा घेवोन ॥ झाडी सद्गुरुचें आंगण ॥ उदक आणोन भरी रांझण ॥ सांडोन अभिमान थोरपणाचा ॥१३०॥धनलोभी जैसा धनासीं ॥ रात्रंदिवस मिळवी हर्षेसीं ॥ तैसाच हा सद्गुरुसेवेशीं ॥ अतिप्रेमेंसीं करीतसे ॥३१॥अति विनीत होऊन ॥ मंजुळ वचनें करी प्रश्न ॥ सद्गुरु सांगती तें आदरें करोन ॥ हृदयीं सांठवोनी ठेवित ॥३२॥सद्गुरुसेवा नित्य नैमित्य ॥ सद्गुरुयज्ञ महायज्ञ म्हणिजेत ॥ सद्गुरुसान्निध कैवल्यवास म्हणत ॥ तोचि बोलिला सच्छिष्य ॥३३॥सद्गुरुवरोन जाण ॥ करी शरीराचें लिंबलोण ॥ अंत:करणीं आल्हादपूर्ण ॥ तोचि बोलिला सच्छिष्य ॥३४॥म्हणे सद्गुरुसी व्हावया उत्तीर्ण ॥ कांहीं न दिसेचि जाण ॥ म्हणवोन तनु मन आणि धन ॥ करी अर्पण सद्गुरुसी ॥३५॥वाचे सद्गुरुचें स्तवन ॥ शरीरें सद्गुरुसेवन ॥ द्रव्यें सद्गुरुचें पूजन ॥ मनीं ध्यान सद्गुरुचें ॥३६॥म्हणे सद्गुरुनें दिली शाश्वत ॥ आणि पदार्थमात्र अशाश्वत ॥ म्हणे अंत:करण करी संकोचित ॥ उत्तीर्णार्थ दिसत नाहीं ॥३७॥म्हणोन अखंड तळमळ करी ॥ म्हणे उत्तीर्ण होऊं कैशापरी ॥ म्हणोन वेळोवेळां नमस्कार करी ॥ तोचि निर्धारीं सच्छिष्य ॥३८॥म्हणे सद्गुरुनें दिधलें निधान ॥ आणि त्यासीं कवडी दिल्ही नेवोन ॥ ते रीतीनें कोण होइजे उत्तीर्ण ॥ ऐसें अनुमान करीतसे ॥३९॥कल्पतरूसाठीं शेरु देइजे ॥ तरी तों त्यासी काय उत्तीर्ण साजे ॥ तैसें दास्यत्व करणें माझें ॥ आणि अर्पि जे जे वस्तु ॥१४०॥माझी सेवा ते किमर्थ ॥ जे की उत्तीर्णत्वाचें मनोहित ॥ म्हणवोन अखंड होय सद्गदित ॥ तोचि निश्चित सच्छिष्य ॥४१॥अमृत घोवोन कांजी देणें ॥ तैशी मानी सेवा करणें ॥ कामधेनु घेवोनि शेळीं देणें ॥ तैसें होणें उत्तीर्ण कीं ॥४२॥म्हणवोन उत्तीर्णासी न दिसे कांहीं ॥ ऐसें अखंड चिंतीतसे हृदयीं ॥ म्हणवोन सर्वस्व उदार पाहीं ॥ विनटला पायीं एकनिष्ठ ॥४३॥प्रात:काळापासोन सायंकाळपर्यंत ॥ स्नानसंध्यादि भोजन करोन समस्त ॥ सेवा करी यथायुक्त ॥ शय्या झाडित निद्रेशीं ॥४४॥सद्गुरु निद्रा करिती ॥ आपण चरण चुरी अति प्रीति ॥ आनंदत जाय चित्तीं ॥ म्हणे धन्य त्रिजगतीं मीच एक ॥४५॥जें ब्रह्मादिकांसी दुर्लभ असे ॥ हरिहर ज्याचें ध्यान करीतसे ॥ त्या सद्गुरुची सेवा अनायसें ॥ घडत असे पूर्वपुण्य़ें ॥४६॥माझ्या भाग्या नाहीं पार ॥ जो अनंत अपरंपार ॥ त्या सन्निध मी निरंतर ॥ ऐसा आल्हाद थोर मानित ॥४७॥सद्गुरुशीं निद्रा लागलियावरी ॥ आपण सन्निधचि निद्रा करी ॥ कां जे सद्गुरु उठल्यावरी ॥ बोल सत्वर कानीं पडे ॥४८॥ऐसिया प्रात:काळ झालियावरी ॥ तांब्या घेवोन जाय सद्गुरुमाघारीं ॥ ते मैदान फिरोन आलियावरी ॥ मुखमार्जन करीत ॥४९॥मग स्नानासी उदक सारिलेंसे ॥ मी उदक ऐसें आपणासिं भासवितसे ॥ सोंवळें पादुका घेवोन उभा राहत असे ॥ अति हर्षे वोसंडित ॥१५०॥स्नान झालियावरी ॥ अंगवस्त्र पिळोन दे करीं ॥ मग खंबाइत झडकरी ॥ अति सत्वरीं देतसे ॥५१॥मग खडावा पुढें ठेवोन ॥ सद्गुरुसी बैसवी आसनीं नेवोन ॥ आपणही करोन स्नान ॥ विधियुक्त पूजन करीतसे ॥५२॥षोडशोपचार पूजा करोन ॥ संतुष्ट करी सद्गुरुलागोन ॥ हें सच्छिष्याचें लक्षण ॥ साधुजन जाणती ॥५३॥सद्गुरु पायीं चालती ॥ तेव्हां तो मागें मागें चाले अति प्रीतीं ॥ चरणाचें रज उधळती ॥ ते अंगासी लागे ऐसें करी ॥५४॥ते रज:कण अंगीं लागत ॥ ते कैवल्यसमान मानित ॥ अति हर्षे असे आनंदत ॥ तोचि बोलिजेत सच्छिष्य ॥५५॥जेव्हां अश्वारूढ होती सद्गुरुपाथ ॥ तेव्हां आपण पुढें असे धांवत ॥ म्हणे आजि मी झालों पुनीत ॥ तोचि बोलिजे सच्छिष्य ॥५६॥सन्निध असतां ऐसी सेवा करी ॥ आज्ञेनें जातां दुरी ॥ तेथोन ध्यानस्थितीनें पूजा करी ॥ एक क्षणभरी विसंबेना ॥५७॥गुरुमंदिर आणि सर्व परिवार ॥ तें सर्व सांठवी हृदयामाझार ॥ प्रारब्धें फिरतांही देशांतर ॥ मन निरंतर गुरुगृहीं ॥५८॥गुरुगृह ज्या देशीं ॥ तो देश असे मानसीं ॥ जैसें लोभ्याचें चित्त ठेवण्यापाशीं ॥ परदेशीं असतांही ॥५९॥गुरुचे गांवींचे कोणी आले ॥ ते मानी अति आप्त आपुले ॥ म्हणे आजी मज स्वयेंचि सद्गुरु भेटले ॥ म्हणवोन डोले अतिप्रेमें ॥१६०॥अथवा गुरुनेंचि कोणी धाडिले ॥ कीं दुर्बळा निधान प्राप्त झालें ॥ कीं अंधासी नेत्र आले ॥ तैसें होत तयाशीं ॥६१॥कीं मुक्यासी जैसी वाचा आली ॥ कीं भणंगे सदान्नावरतीं तृप्त झालीं ॥ की तृषार्थे अमृतकुंडीं पडलीं ॥ तैसें होत तयाशीं ॥६२॥जैसा चुकोन अटवीमाजी पडला ॥ आणि तो घाबरा झाला ॥ तेथें एकाएकीं सांगाती जोडला ॥ तैसा झाला लाभ तया ॥६३॥त्या लोभें आनंदात ॥ वेळोवेळां क्षेम देत ॥ अति प्रेमें चरण धूत ॥ आसन देत बैसावया ॥६४॥षोडशोपचारें पूजा करोन ॥ उभा राहे करसंपुट जोडोन ॥ अति म्लान वदनें करोन ॥ पुसे आपण प्रेमयुक्त ॥६५॥सांगा सद्गुरुची वार्ता ॥ जेणें संतोष होय माझे चित्ता ॥ सद्गदित कंठ करोन तत्वतां ॥ असे लीन होवोनी ॥६६॥ते जो सद्गुरुचा सांगती निरोप ॥ तो ऐके प्रेमयुक्त ॥ अति आल्हादें असे कांपत ॥ अश्रुपात नेत्रां येती ॥६७॥जैसे साधु वेदशास्त्र श्रवणरिती ॥ तैशा त्या गोष्टी ऐके प्रीतीं ॥ जैसी दरिद्र्यासी जोडे संपत्ती ॥ तैसा चित्तीं आल्हाद मानी ॥६८॥म्हणे कैसी सद्गुरु कृपा करिती ॥ आणि आपुलें दर्शन देती ॥ अथवा मजचि तेथें नेती ॥ ऐसी स्थिति केवीं घडे ॥६९॥जैसें वासराचें चित्त गाईपासीं ॥ परि गळां दावें बांधिलें त्यासीं ॥ वरती मान करोन हंबरे हर्षीं ॥ जावयासीं ओढ करी ॥१७०॥तैसाचि हा संसार सांडोन ॥ परमार्थ करावया आपण ॥ ऐसें अखंड करी अनुमान ॥ परि गुरुआज्ञें करोन बांधला ॥७१॥उदासवृत्तीनें संसार करित ॥ मायामोहें नाहीं लिंपत ॥ जैशी घरामाजी दीपज्योत ॥ परी अतीत गृहकर्मासीं ॥७२॥स्त्रीपुत्रादिक सर्व आहेती ॥ परी ते पाहुण्यापरि मानी चित्तीं ॥ मीपणाची सांडोन अहंकृती ॥ पाहे सर्वांभूतीं जगदात्मा ॥७३॥अतीत अभ्यागतां मानीत ॥ आलिया पदार्थ नाहीं वंचित ॥ गुरुनामें गर्जना करित ॥ तोचि सत्य सच्छिष्य ॥७४॥नित्यनैमित्य आदरें करी ॥ हरिभक्तीसीं प्रेम धरी ॥ निर्विकल्प वर्ते संसारी ॥ तो निर्धारी सच्छिष्य ॥७५॥परस्त्री मातेसमान ॥ परधन म्हणे पाषाण ॥ वेळोवेळां करी स्मरण ॥ तोचि जाण सच्छिष्य ॥७६॥वेदशास्त्रें मानीत ॥ गाई - ब्राह्मणातें पूजित ॥ वडिलांची मर्यादा पाळित ॥ तोचि बोलिजे सच्छिष्य ॥७७॥पाखांड मता अव्हेरी ॥ अध्यात्मग्रंथीं प्रेम धरी ॥ अखंड श्रवण मनन निर्दारीं ॥ भावेंकरोन करी अहर्निशीं ॥७८॥तो ईश्वरासमान ॥ साधुसंतांसी मानी आपण ॥ मनोभावें करी पूजन ॥ जेणें समाधान होय त्याचें ॥७९॥सर्वसाक्षी होऊन वर्तत ॥ म्हणे मी नाहीं या कर्माआंत ॥ कर्म त्रिगुणयोगें होते ॥ ऐसा निश्चय केला असे ॥१८०॥आकाश पडतां कोसळून ॥ परी धैर्य न सांडीच आपण ॥ मनोभावें म्हणे मी अविनाश पूर्ण ॥ मज नाश कोण करूं शके ॥८१॥मी अचळ अढळ अविनाश ॥ माझ्याप्रकाशें भासतें दृश्य ॥ दृश्य पावतें नाशास ॥ मी अदृश्य सर्वांसीं ॥८२॥सृष्टि होतां मज होणें नाहीं ॥ सृष्टि प्रळयीं मी जैसा तैसाचि पाहीं ॥ ऐसिया बोधें वर्तत देहीं ॥ संदेह कांहीं न धरीच ॥८३॥विधियुक्त कर्म करी ॥ परी सांटोप नाहीं शरीरीं ॥ मी साक्षी ऐसें जाणे अंतरीं ॥ तोचि निर्धारीं सच्छिष्य ॥८४॥सद्गुरु आज्ञेनें संसार करी ॥ तरी तो ऐसियाप्रकारीं ॥ अहंता नाहीं तिळभरी ॥ सुखी करी सर्वांतें ॥८५॥शांतिक्षमेचा आगर ॥ आणि सद्विद्येचें माहेर ॥ ज्यासी नावडे अनाचार ॥ तोचि साचार सच्छिष्य ॥८६॥कधीं दुष्ट उत्तर नाहीं बोलत ॥ मानी सर्वत्रीं एकचि भगवंत ॥ कामक्रोधांतें नाहीं नभ ॥ पाहे स्वयंभू अनेकीं एक ॥८८॥ऐसी सच्छिष्याचीं लक्षणें ॥ किती म्हणोन वाखाणणें ॥ देहाभिमान सांडिला जेणें ॥ तोचि जाणणें सद्गुरुरूप ॥८९॥जैसी कीटकी भृंगीचे ध्यानेंकरोन ॥ भृंगीच झाली आपण ॥ तैसा सद्गुरुचे सेवेनें जाण ॥ सद्गुरुचि आपण झाला असे ॥१९०॥सद्गुरुशीं गेला शरण ॥ आणि चिंतीत राहे देहाभिमान ॥ हे बोल न ऐकती माझे कान ॥ पाखांड जाणा दिसोन येतें ॥९१॥जो राजाचे उदरीं जन्मला ॥ तो कुमरु राजाचि जैसा झाला ॥ मा जो सद्गुरुसी शरण गेला ॥ तो कैसा राहिला जीवदशे ॥९२॥जैसा अग्निमाजी कापूर पडला ॥ तो न जळे तैसाचि उरला ॥ कीं जळीं लवणखडा बुडविला ॥ तो राहिला लवणरूप ॥९३॥ जैसें अग्निसन्निध ठेविलें घृत ॥ तें न वितळें हें काय सत्य ॥ कीं वायुमाजी दीपज्योत ॥ राहे असत्य बोलणें ॥९४॥जैसें कर्पुराचे राशी अग्नि लाविला ॥ कर्पूर न जळे अग्नि विझोन गेला ॥ गज्रशस्त्रें तोडों न शके कर्दळी स्तंभाला ॥ या बोलाला सत्य कोण मानी ॥९५॥जाहला सूर्याचा प्रकाश ॥ आणि अंधाराचा न होय नाश ॥ तरी शरण गेलिया श्रीगुरूस ॥ जीवदशेस ऊर कैंची ॥९६॥जे अज्ञान मंदमती असती ॥ ते या बोलातें सत्य मानिती ॥ आणि ज्ञानी जे असती ॥ ते मानिती मिथ्याचिन्हें ॥९७॥जैसें अग्नीमाजी जे घातले ॥ ते ते अग्निरूपचि जाहलें ॥ तैसे जे सद्गुरूसीं शरण गेले ॥ ते ते जाहले सद्गुरुरूप ॥९८॥काष्ठ अग्नीस मिळालें ॥ तें अग्निरूपचि जाहलें ॥ तैसे जें सद्गुरुसीं प्रेम जडलें ॥ तें झालें सद्गुरुरूप ॥९९॥कीं गंगेशीं ओघ मिळाला ॥ तो गंगारूपचि झाला ॥ तैसा सद्गुरुशीं शरण गेला ॥ तो झाला सद्गुरुरूप ॥२००॥लवण जळीं पडतां ॥ ते जळजि झालें तत्त्वतां ॥ तैसें सद्गुरुशीं शरण जातां ॥ शिष्यअहंता विरेकीं ॥१॥तूं आशंका करिशी मानसीं ॥ जो शरण गेलिया सद्गुरुसीं ॥ बोध का न होय शिष्यासीं ॥ ऐसी करिशी कल्पना ॥२॥तरी होऊनियां सावधान ॥ एक एकाग्र निरूपण ॥ जेणें बोधे तुझें मन ॥ तें संक्षेपेंकरोन सांगतों ॥३॥शिष्य अति श्रद्धेंकरून ॥ जरी सद्गुरुशीं जाय शरण ॥ प्रपंच भासे जैसें वमन ॥ तरी त्याची जाण कार्यसिद्धि ॥४॥आत्माकार्य साधावया जाण ॥ प्रथम वैराग्य पाहिजे पूर्ण ॥ तें वैराग्य म्हणीशी कोण ॥ तेंही लक्षण सांगतों ॥५॥म्हणे नरदेह झाला प्राप्त ॥ येणें साधावा भगवंत ॥ आणि मी विषय झालों रत ॥ माझी गत पुढें काय ॥६॥स्त्रीपुत्रादि धनगोत ॥ हीं तर अवघीं नाशिवंत ॥ अभ्रापरि असती भासत ॥ ऐसी अखंडित विवंचना करी ॥७॥ज्या पासोन मी झालों निर्माण ॥ तीं मातापिता गेलीं मरोन ॥ तीच गती माझीही जाण क्षणक्षणा वय जातें ॥८॥ज्यांहीं थोर हव्यास केले ॥ ज्यांहीं सर्व पृथ्वीचें राज्य घेतलें तेही नाशातें पावलें ॥ सर्व राहिलें येथेंचि ॥९॥मनेंचि संहार मनेंचि उत्पत्ती ॥ ऐसे ज्याचे पुरुषार्थ असती ॥ जे देवदानवा अप्रीत म्हणविती ॥ तयाचानिगुती अंत झाला असे ॥२१०॥चौदा चौकडीचें राज्य रावण ॥ सवालक्ष नातीं पोतीं जाण ॥ जयाचे भाग्यासीं नाहीं गणना ॥ तोही जाण लया गेलासे ॥११॥मार्कंड भृशुंडी आदिकरोनी ॥ जो समुद्राचें आचमन करी अगस्तीमुनी ॥ ज्यांची कीर्ति इतिहासदेवपुराणीं ॥ तेही नासोन गेलेती ॥१२॥ज्यांहीं सृष्टिवरी सृष्टि केली ॥ ज्यांहीं गंगादि तीर्थे आणिलीं ॥ त्यांचीही झाली रांगोळी ॥ वार्ता उरली माघारी ॥१३॥अवतारादिक गेलेती ॥ तेथें इतरांची काय गती ॥ जे जे मृत्युलोका आलेती ॥ ते पावती नाशातें ॥१४॥ सप्त पाताळें एकवीस स्वर्ग जाण ॥ चंद्रसूर्य आदिकरोन ॥ जे जे भासती दृश्य जाण ॥ ते ते संपूर्ण नासणार ॥१५॥पुत्र पित्यातें मरतां देखत ॥ पिता पुत्राची क्रिया करीत ॥ देखत देखतां प्राणी उठोनि जात ॥ मी काय निवांत राहिलोंसे ॥१६॥काय होईल कोणे वेळे ॥ हे कांहींच माझें मज न कळे ॥ दिवसेंदिवस नेला काळें ॥ म्हणवोनि तळमळी अखंडित ॥१७॥पिशाच्च जैसें अखंड भ्रमित ॥ तैसें झालें असे त्याचें चित्त ॥ रात्रीं निद्रा नाहीं लागत ॥ विषापरी भासत विषयसुख ॥१८॥म्हणे मागें बहुत जन्म गेले ॥ तेथें विषय फार भोगिले ॥ नरदेहीं तेचि पुढे आलें ॥ कैसें वोढवलें अदृष्ट ॥१९॥भोजनीं गोड न लागे अन्न ॥ संसरावरोन उतरलें मन ॥ म्हणे मी आतां जाईन मरोन ॥ फल कोण जन्मल्याचें ॥२२०॥मनुष्यजन्म झाला प्राप्त ॥ बहुतहि केलें आपुलें हित ॥ नारद आणि शुकादिक बहुत ॥ जडली प्रीत हरिचरणीं ॥२१॥जनक विदेही विदुर ॥ व्यास आणि सनत्कुमार ॥ वसिष्ठ उद्धव अक्रूर ॥ जाहले स्थिर हरिचरणीं ॥२२॥भीष्म धर्म आणि अर्जुन ॥ ध्रुव प्रलाहाद उपमन्य ॥ सांडोनियां विषयसेवन ॥ हरिचरणीं जोडिले ॥२३॥ऐसे संत महंत अपार ॥ ज्यांहीं त्यजोनियां लौकिक व्यवहार ॥ हरिभजनीं झाले साचार ॥ ऐसा विचार अखंड करीं ॥२४॥ज्यांहीं भावें वोळेंगिला श्रीपती ॥ तयांची वेदपुराणें स्तुति करिती ॥ संसर करितां जे जे मेलेति ॥ त्यांची गणती कोण करी ॥२५॥उदंड मेले संसार करितां ॥ परि नायकोंच कोठें वार्ता ॥ जे लागले भक्तिपंथा ॥ त्यांची कथा पुराणीं ॥२६॥तरी तैसेंच व्हावें आपण ॥ तरी जन्मल्याचें सार्थक जाण ॥ ऐसे म्हणोन करी रुदन ॥ कैं भगवान पावेल मज ॥२७॥कैसा संतुष्टेल हरी ॥ मज काढील संसारा - बाहेरी ॥ ऐसा अखंड संकल्प करी ॥ जाय घरीं संतांचे ॥२८॥अखंड वाचेसीं नामस्मरण ॥ अथवा संतमुखें करी श्रवण ॥ ऐके देवाची स्तुतिक्रीडन ॥ सद्गदित जाण कंठ दाटे ॥२९॥थोर शब्द रुदन करी ॥ विकळता पडे शरीरीं ॥ म्हणे धांव पाव श्रीहरी ॥ धांवा करी आकांतें ॥२३०॥म्हणे देवा तूं पतीतपावन ॥ मी तो पतीताहून ॥ सांडोनियां तुझें भजन ॥ करीं सेवन विषयांचें ॥३१॥संसार करितां कांहीं ॥ परमार्थाचा हेत नाहीं ॥ पडलों कल्पनेचे डोहीं ॥ धांव लवलाहीं जगदिशा ॥३२॥स्त्रीपुत्र घर धन ॥ यांहीं केलें दृढबंधन ॥ दिवसेंदिवस गेला जाण ॥ झाली हाण माझी देवा ॥३३॥पडलों संसारबंदिखानीं ॥ सुटका न होय यापासोनी ॥ धांव पाव चक्र घेवोनी ॥ ऐसें म्हणवोनी रडत ॥३४॥ऐसें होतें तुझें मनीं ॥ तरी कां घातलें मनुष्ययोनीं ॥ आतां धांव कृपा करोनी ॥ संसारापासोनी सोडवावें ॥३५॥ऐसा नित्य धांवा करित ॥ काया वाचा मनें प्रेमयुक्त ॥ सांडोनियां विषय - स्वार्थ ॥ असे स्मरत देवराया ॥३६॥ऐसें श्रद्धायुक्त करितां स्मरण ॥ संतुष्ट होय भगवान ॥ संतुष्ट झाल्यानें ॥ संतजन भेटती ॥३७॥जोंवरी देवाची कृपा नाहीं ॥ तोंवरी संतजन न भेयती पाहीं ॥ संत भेटल्याविना कांहीं ॥ सद्गुरुची सोई न कळेचि ॥३८॥संत अध्यात्म ग्रंथ वाचिती ॥ तेथें सहज सद्गुरुची स्तुती ॥ दिवसेंदिवस पालटें चित्तवृत्ती ॥ वाटे चित्तीं सद्गुरु करावा ॥३९॥मग अखंड चिंता करित ॥ म्हणे तो कैं भेटे सद्गुरुनाथ ॥ माझिया संदेहाचा कैं होईल घात ॥ ऐसें कल्पित अहर्निशीं ॥२४०॥जो जो संत भेटत ॥ त्याची आदरें सेवा करित ॥ सद्गुरुचीं लक्षणें लिहिलीं ज्यांत ॥ ते ग्रंथ अवलोकित अतिप्रेमें ॥४१॥गीता आणि भागवतीं ॥ जीं जीं सद्गुरुचीं लक्षणें बोलती ॥ ते खूण धरोनियां चित्तीं ॥ संतमूर्ति अवलोकित ॥४२॥ऐसें अखंड प्रेम ठसतां ॥ भेटी होय सद्गुरुनाथा ॥ जेंवी दीप लावितां ॥ होय तत्वतां दीपचि ॥४३॥कां जें भक्तिवैराग्य सोज्वळ झालें चित्त ॥ म्हणोनि त्यास भास झाला त्वरित ॥ जैसे उत्तम क्षत्रीं जें बीज पडत ॥ तें उगावत अतिबळें ॥४४॥ ऐसिया प्रकारें जे सद्गुरु करिती ॥ त्यांची आत्मस्थिती बाणे चित्तीं ॥ आणि देखो - देखीं जे शरण येती ॥ त्यांची मति पालटेना ॥४५॥श्रद्धावांल्लभते ज्ञानं ॥ ऐसें गीतेमाजी बोलिले भगवान ॥ श्रद्धेविना कैसें ज्ञान ॥ प्राप्त जाण होईल ॥४६॥ज्यासीं अंतरापासोन झाली श्रद्धा ॥ ते शुद्ध श्रदेचें लक्षण प्रबोधा ॥ जेणें पाविजे गोविंदा ॥ जोडे सुधामार्ग तयाला ॥४७॥तो सद्गुरुचरणीं जडला कैसा ॥ गुळाशिं अडकला माकुडा जैसा ॥ कधींनीं जैसा धनपिसा ॥ ऐसी आशा सद्गुरुची ॥४८॥कीं मक्षिका जैशी मधाशीं ॥ कीं पिलें जैसीं पक्षिणीसीं ॥ कीं कामिक जसा रूपवती स्त्रीशीं ॥ सद्गुरुचरणासीं जडे तैसा ॥४९॥जैसें चकोराविणें चंद्र आर्त ॥ कीं चातक मेघबिंदूतें इच्छित ॥ कीं जीवनासीं जैसा तृषाकांत ॥ तैसी प्रीत सद्गुरुपायीं ॥२५०॥कीं क्षुधार्त इच्छित अन्नातें ॥ कीं दरिद्री जैसा भाग्यातें ॥ की प्रपंची जैसा महत्वातें ॥ तैसा सद्गुरुतें ध्यात असे ॥५१॥कीं देही लोभिया प्रपंचीं ॥ कीं बक जैसा माशीशीं टपत ॥ तैसें आर्त गुरुपायीं ॥५२॥कर्मिष्ठ फळातें इच्छिती ॥ भक्त भगवंतातें ध्याती ॥ विरहिणी इच्छी जैसा पती ॥ तैसी प्रात गुरुचरणीं ॥५३॥संत जैसे ज्ञानीं रत ॥ कीं तापसी आदरें तप करित ॥ कीं उदासा आवडे एकांत ॥ तैसी प्रीत श्रीगुरुचरणीं ॥५४॥कीं पतंगा आवडे दीपज्योत ॥ कीं मनाशिं जैशी जळीं प्रीत ॥ कीं मृग जसे गानीं भुलत ॥ तैसी प्रीत गुरुचरणीं ॥५५॥कीं कवीस जैसें कवित्वीं प्रेम ॥ कीं शूरास आवडे संग्राम ॥ कीं भक्तांस आवडे नाम ॥ तैसा विश्राम गुरुपायीं ॥५६॥कीं आंधळे पाहती सांगात ॥ कीं पथिकाचें जैसें मजलेसिं चित्त ॥ कीं अमळ्यासीं जैसें अमळचि आर्त ॥ तैशी प्रीत गुरुचरणीं ॥५७॥सच्छिष्याचें कथन ॥ रत्नाकरा सांगीतलें तुजलागोन ॥ कां जे शरण गेलें श्रद्धेंकरून ॥ म्हणवोनि ज्ञान ठसावलें ॥५८॥ज्ञानप्राप्तीचें फळ पूर्ण ॥ अति आदरें करावें सद्गुरुसेवन ॥ सद्गुरुसेवनीं असतां लीन ॥ अंतरींचें ज्ञान कळो न येतें ॥५९॥जो संसारासि विटला ॥ वैराग्ययुक्त सद्गुरुशीं शरण गेला ॥ तोचि आपुले हितीं प्रवर्तला ॥ चाले बोला - सारिखाचि ॥२६०॥बोलासारिखा चाले आपण ॥ तोचि या संसारामाजी धन्य ॥ जयावरी ईश्वरीकृपा पूर्ण ॥ त्यासींच जाण घडे हें ॥६१॥जे संसारी आसक्त ॥ विषयापासोन परतलें नाहीं चित्त ॥ आणि देखोदेखीं अनुग्रह घेत ॥ पाखांडमत तेथें वसे ॥६२॥जे शम - दमीं आळशी ॥ वैराग्य नाहीं जया मानशीं ॥ आणि शरण जाती सद्गुरुशीं ॥ अंतरीं बोध त्यासीं होईचना ॥६३॥काम क्रोध लोभ पूर्ण ॥ जेथें वसे देहाभिमान ॥ गुरुकृपा झालिया जाण ॥ त्याचें मन पालटेना ॥६४॥आणि सद्गुरु तो दीन दयानिधी ॥ शरण आलिया नुपेक्षी कधीं ॥ शुद्ध तेंचि बोधी ॥ जेणें उपाधि द्वंद्वाची ॥६५॥करी महाकाव्याचा उपदेश ॥ म्हणे तूं ब्रह्म स्वप्रकाश ॥ तूं जाणशी मनबुद्ध्यादिकांस ॥ चौंदेहांस साक्षी तूंचि ॥६६॥तूं परावाचे परता ॥ सर्व इंद्रियां हा नियंता ॥ पिंडब्रह्मांडाचा जाणता ॥ तुझी सत्ता सर्वत्र ॥६७॥तूं देहाभिमान सांडोन ॥ मानशी ब्रह्मचि पूर्ण ॥ सर्व संदेहातें सांडोन ॥ साक्षी होऊन राहें रे ॥६८॥जाणत्याशीं जाणोन ॥ पहात्याशीं पाहे परतोन ॥ तूं अनादि चैतन्यघन ॥ धरीं खूण जीवीं हे ॥६९॥सद्गुरु कळवळ्याशीं ॥ ऐसा बोध करी शिष्याशीं ॥ सच्छिष्य रोनि मानसीं ॥ चौंदेहाशीं नातळें तो ॥२७०॥जयाचेनी शिष्याव्रती ॥ मोहें संदेह निवृत्ती ॥ जे स्वयेंचि ब्रह्म झालेती ॥ ते ब्रह्म करिती शिष्यातें ॥७१॥ऐसा सद्गुरु विरळा कोणी ॥ भेटे बहुत भाग्यें करूनी ॥ तत्काळ सोडवी चौंदेहांपासोनी ॥ तो मुकुटमणि सद्गुरुरावो ॥७२॥जो सदा संतोषी ॥ जया कल्पना नाहीं मानसीं ॥ जो साधनीं न गोवी शिष्याशीं तोचि निश्चयेशीं सद्गुरुरावो ॥७३॥जो नाना देखणीं निरसोन ॥ सांगे अंतरींची गुह्य खूण ॥ जो जीवशिवाचें उठवी भान ॥ तो भाग्येंकरोन भेटे सद्गुरु ॥७४॥राव रंक सारखेच पाहीं ॥ जो तर्कातर्क न करी कांहीं ॥ कामक्रोधाचा लेश नाहीं ॥ तोचि पाहें सद्गुरुराव ॥७५॥देहलोभ नाहीं ज्याशीं ॥ आत्मचिंतनीं अहर्निशीं ॥ शरण आल्या शिष्यासीं ॥ ब्रह्मबोधाशीं तात्काळ करी ॥७६॥जैं भेटे ऐसा गुरु ॥ तो तात्काळ करी साक्षात्कारु ॥ फिटे चौंदेहांचा आधारु ॥ या ग्रंथीं साचारु होय त्याशीं ॥७७॥येथें ब्रह्मज्ञानाविणें कांहीं ॥ दुसरा विचार नाहीं ॥ म्हणवोन जो लीन सद्गुरुचे पायीं ॥ त्यासींच या ठाईं होय रीग ॥७८॥जैशी हातीं धरोनियां दीपज्योत ॥ जो रात्रीं रिघे घराआंत ॥ त्याशीं सर्वही दिसे वस्तुजात ॥ यथास्थित जैशी तैशी ॥७९॥तैसा हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ भावें श्रवण मनन जो करित । तो वर्ततां संसाराआंत ॥ वस्तु भासत सर्वत्रीं ॥२८०॥विषयीं जे समान आहे ॥ तें या दीपरत्नाकरें प्राप्त होये ॥ नाना मतांची हरपे सोये ॥ संदेह जाय निश्चयेंसीं ॥८१॥जयाशी आपुलें स्वहित करणें ॥ तेणें या ग्रंथीं भाव धरणें ॥ चुके भवजन्मींचें फिरणें ॥ उठलें ठाणें भेदाचें ॥८२॥जैसें दधी मंथोनियां नवनीत काढिजे ॥ मग तें कढवोनी घृत कीजे ॥ घृत झालिया मग सहजें ॥ मुखें भक्षिजे अति आदरें ॥८३॥भोजनीं घृताशिं आदरु ॥ भले वाढती फार फारू ॥ तैसा हा दीपरत्नाकरू ॥ अनुभवी विचार फार बोले ॥८४॥विविध ज्वर नसे जयाशीं ॥ त्याशिं होईल उपयोगाशीं कांहीं ज्वर असतां मानसीं ॥ सन्निपाताशिं उपज कीं ॥८५॥तो सन्निपात त्या सन्निपाता लागुन ॥ शब्दब्रह्म करी जल्पन ॥ म्हणवोनी जीवदशेच्या प्राण्यास जाण ॥ ये ग्रंथींची खूण न कळेचि ॥८६॥हे साधुसंत जाणती मानसीं ॥ वेदांत अनुभवले जयासीं ॥ जे विनटले सद्गुरु चरणासीं ॥ ते या खुणेसी पावती ॥८७॥ज्ञानदेवाचे चरण देखोन ॥ भेटले रामानंद सद्गुरु जाण ॥ त्यांहीं बोध केला पूर्ण ॥ कृपा करोन आज्ञा केली ॥८८॥कीं भक्ति ज्ञान वैराग्यासीं ॥ तूं सुखें विचरे महीशीं ॥ ब्रह्मबोध करी शरण आल्याशीं ॥ भक्ति जनाशीं जागे तें करीं ॥८९॥द्रव्यलोभा सांडोन धांवें ॥ अयाचित वृत्तीनें असावें ॥ निर्लोभें भक्तीतें करावें ॥ त्यजावें विषयसुखा ॥२९०॥तयाची आज्ञा वंदोन शिरीं ॥ निर्लोभें फिरे देशांतरीं ॥ अलोपानें खेडिया भीतरीं ॥ तत्प्रीती ऋणानुबंधें ॥९१॥तेथें प्रेमपुरुष भेटले ॥ तेही प्रेम - पाशियातें गोंविले ॥ आदरें मठासी बांधले ॥ तेथें आसन केलें सद्गुरुनें ॥९२॥तया आसनीं बैसोन जाण ॥ सद्गुरु करिते झाले निरूपण ॥ जेणें अज्ञानबोध होय पूर्ण ॥ साधुसंत संतोषती ॥९३॥हें सर्व गुह्याचें गुह्य पाहें ॥ वेदांताचें सार आहे ॥ जेणें अवैराग्यें वैराग्य होय ॥ आशांता यात शांतिसुख ॥९४॥हे चौदा अध्याय झाले पूर्ण ॥ परि एक एकाहोनी अधिक जाण ॥ सर्वत्रीं केलें ब्रह्मकथन ॥ न्यून पूर्ण कोण म्हणे ॥९५॥या ग्रंथीं जे भाव धरिती ॥ तयांसी प्राप्त होय ज्ञानसंपत्ती ॥ रिद्धिसिद्धि दासी होती ॥ ब्रह्मस्थिति बाणतांचि ॥९६॥म्हणवोन मुख्य भाव पाहिजे ॥ तेणें सर्व सुखाधिकारी होइजे ॥ भावेंविण कष्टचि होइजे ॥ शेवटीं जाइजे अधोगती ॥९७॥यासाठीं भाव धरोन ॥ याचें करावें शत आवर्तन ॥ तरी अज्ञान्याशीं होईल ज्ञान ॥ हें वरदान सद्गुरुचें ॥९८॥सद्गुरुचे कृपेंकरून ॥ काय कमी होईल जाण ॥ म्हणवोन येथें भावच पूर्ण ॥ धरीजे आपण एकनिष्ठ ॥९९॥जेणें चौंदेहांतें निरसोन ॥ सोडविलें ज्ञान देहापासोन ॥ करी निर्विकार पूर्ण ॥ तो हा जाण ग्रंथराज ॥३००॥जेणें ब्रह्मत्व ये अंगासीं ॥ व्यापकता ये सर्वांशीं ॥ देहाभिमानाचा ठाव पुशी ॥ तो निश्चयेंसीं ग्रंथ हा ॥१॥अभक्तासीं भक्त दाखवीत ॥ वैराग्याशीं वैराग्य चेतवीत ॥ ज्ञानियासीं थापटोनि उठवीत ॥ तोचि हा ग्रंथ दीपरत्नाकर ॥२॥या ग्रंथीं श्रोता वक्ता सद्गुरुनाथ ॥ म्हणवोन पूर्णतेस आला ग्रंथ ॥ संतचरणीं रत्नाकर लोळत ॥ मी अंकित तुमचा असें ॥३॥तैसें ब्रह्म निर्गुण निर्विकार ॥ त्याचा जनांसीं काय कळे विचार ॥ तो संतजनीं साचार ॥ केला निर्धार बोलण्याचा ॥४॥जे परावाचा परते ॥ वैखरीनें वर्णिते ॥ नाना छंद फंदादि कवितें ॥ करोनी जनातें उद्धरिलें ॥५॥ऐशिया संतासीं नमन ॥ तरी काय सद्गुरु संत दोन ॥ आणि मजही कैचें भिन्न ॥ जरी करी स्तवन वेगळें ॥६॥आहे नाहीं जें बोलणें ॥ तेंही प्राशिलें मुळींच मौन्यें ॥ जैसें तैसें संचलेंपण ॥ राहिले जाण कोंदनी ॥७॥इति श्रीदीपरत्नाकर ग्रंथ ॥ श्रोता वक्ता सद्गुरुनाथ ॥ येथें रत्नाकरा निमित्त ॥ ईश्वरकृपें जाहला ॥८॥सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंदपदें ॥ रत्नाकरा संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥३०९॥इति श्रीचिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकरग्रंथे विशेष अद्वैतबोधगुरुभक्तिवर्णनो नाम चतुर्दशोsध्याय गोड हा ॥१४॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ॐ॥ओंव्या३०९॥ॐ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP