मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दीप रत्नाकर| अध्याय सातवा दीप रत्नाकर अनुक्रमणिका प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा आरती अष्टक अध्याय सातवा श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर. Tags : deep ratnakarpothiramanandदीप रत्नाकरपोथीमराठीरामानंद अध्याय सातवा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नम: ॥ जय जय सद्गुरू चिदानंदा ॥ जय जय सद्गुरू आनंदा ॥ जय जय सद्गुरू स्वत:सिद्धा ॥ नमन अगाधा गुरुराया ॥१॥ जय जय सद्गुरु आत्मारामा ॥ जय जय सद्गुरु विश्वधामा ॥ जय जय सद्गुरु आगम निगमा ॥ नकळे महिमा कोणासी ॥२॥ जय जय सद्गुरु अनेकीं एक ॥ जय जय सद्गुरु विश्वव्यापक ॥ जय जय सद्गुरु दृश्यप्रकाशक ॥ तर्क वितर्क रहित तूं ॥३॥ तूं तर्कवितर्का अतीत ॥ अनंत ब्रह्मांडे तुजमाझीं भासत ॥ सूक्ष्म तरी डोळां न खुपत ॥ अससी अतीत होवोन ॥४॥ तुमचे कृपेनें मजला ॥ ऐसा अनुभव असे झाला ॥ देहभाव अवघा उडाला ॥ संदेह गेला जीवींचा ॥५॥ आतां नि:संदेह झालो असें ॥ गेलें देहाभिमानाचें पिसें ॥ जें निर्भरलें असे सोसें ॥ स्वहिताचें नसे भान कांहीं ॥६॥ देहचि सत्य मानिला ॥ अभिमान प्रपंच आवडला ॥ तेणें अभिमान होता जडाला ॥ त्याचाचि लागला छंद मज ॥७॥ शरीराचें महत्व व्हावें ॥ म्हणोनि भरलों होतों हावें ॥ धन मेळवोनि मनोभावें ॥ पेसावें स्त्रीपुत्रासीं ॥८॥ कुटुंबाचे करितां पाळण ॥ आठवेना श्रीकृष्णस्मरण ॥ धनासाठीं वेंचीत होतों प्राण ॥ तरी प्राप्त जाण प्रारब्धेंचि ॥९॥ धनाकरितां सुहृदजन ॥ माझें माझें करत होतों जाण ॥ त्या सुहृदातें देखोनि मोहोमान ॥ मजलागोन होत होता ॥१०॥उत्तम अन्नाचें भोजन ॥ उत्तम वस्त्रांचें परिधान ॥ उत्तम मंदिर रहावया जाण ॥ प्रयत्नें करोनी केलीं तीं ॥११॥ परमार्थीं कवडी वेचितां ॥ महादु:ख होय सद्गुरुनाथा ॥ पुत्राचें लग्न करितां ॥ द्रव्य वेचितां आल्हाद ॥१२॥ अतीत आलियां द्वारीं ॥ कण न निघेचि मुष्टिभरी ॥ बायलेसीं अलंकार करी ॥ पोरावरी नग घालितासे ॥१३॥ आलिया एकादि पर्वणी ॥ तेव्हां मस्तकं येवोनि ठेवी चरणीं ॥ कां जे कांहीं वेंचितील नाणीं ॥ ब्राह्मण येवोनि मागतील ॥१४॥ ब्राह्मणासीं देतां एकारूका ॥ वाटे जैसें चोरानें पागविलें असे देखा ॥ घर बांधितां वेचितो टक्का ॥ त्यासीं लेखा न करावे ॥१५॥ नित्यनैमित्त्यातें सांडोन ॥ काम्यकर्म करी आदरेंकरून ॥ नाना देवता उपासोन ॥ वांछित मनीं फळाशा ॥१६॥ त्या फळाशा करूनि जाण ॥ कामनीक स्तोत्रें पढे आदरेंकरून ॥ भूतप्रेताचें करी पूजन ॥ प्रपंचीं मनी ठसावलें ॥१७॥ कामीक देव कामीक मंत्रें ॥ कामीक व्रतें कामीक स्तोत्रें ॥ कामीक पूजन कामीक यंत्रें ॥ केलें अग्निहोत्र कामीक ॥१८॥ जें जें कांहीं कर्म करी ॥ तें तें कामीक निर्धारी ॥ कामीका वेगळें दुजें अंतरीं ॥ क्षणभरी न ठसावेचि ॥१९॥ कामीक होम कामीक यज्ञ ॥ कामीक भाव कामीक भज । कामीक नेम कामीक यात्रागमन ॥ ऐसें आडरान धरिलें होतें ॥२०॥ रात्रंदिवस चिंता करी ॥ उगा नसे क्षणभरी ॥ अभिमानें करून संसारी ॥ बरवियापरी नांदत ॥२१॥ शरीराची स्तुति ऐकतां ॥ फार हर्ष वाटे चित्ता ॥ निंदा मोठी श्रवण करितां ॥ जीव घाता येवों पाहे ॥२२॥ ऐसें देहसंगेकरून ॥ मिथ्याचि पडलें होतें बंधन ॥ तुमचे कृपें करून ॥ भ्रम भान हरपलें ॥२३॥ हा भ्रमें भ्रम वाढला ॥ भ्रमें मी देह ऐसा मानिला ॥ तव कृपें भ्रम गेला ॥ उजेडु पडला प्रकाशरूप ॥२४॥ जैसें प्रकाशीं अंधार नसे ॥ देहें अभिमान गेलिया तैसे ॥ मग अविनाश वस्तुचि असे ॥ येर भासे फोलकट ॥२५॥ मी देहाची जाणता ॥ असें देहाहोनि परता ॥ देहादिकांचा प्रकाशता ॥ ऐसेंचि चित्त भासलें ॥२६॥ तुमचे प्रकाशेंकरोन ॥ म्यां मज देखिलें जाण ॥ मी आनंदादि चैतन्यघन ॥ सर्व व्यापोनि उरलोंसे ॥२७॥ मज नाम नाहीं मी अनाम ॥ मी सर्वत्रीं एक आत्माराम ॥ मी रूपातीत वस्तु परम ॥ अति सूक्ष तें मी होय ॥२८॥ आतां सूक्ष्म देहाची स्थिती ॥ सांगा मज गुरूमूर्ती ॥ स्थूळापासोन सहजस्थिती ॥ माझी स्थिती परतली ॥२९॥ आतां वृत्ति निवृत्ति झाली ॥ आतां लिंगदेहाची गुह्य बोली ॥ कां जे स्थूळ भावना उडाली ॥ सांगावी ही गुरूराया ॥३०॥ ऐसें ऐकोन वचन ॥ सद्गुरु बोलिले आपण ॥ तूं स्थूळाचा साक्षी होवोन ॥ करीं श्रवण सावध ॥३१॥ जैसे डोळे उघडतां सर्व भासे ॥ डोळे झांकितां आपणचि असे ॥ म्हणोन नेत्रींच स्थूळ वसे ॥ नेत्रींचें पिसें सांडीं रे ॥३२॥नेत्रीं जें जें भासलें ॥ तें तें सर्व स्थूळचि बोलिलें ॥ म्हणोन नेत्रींचें पाहाणें वहिलें ॥ सांडोनि आपलें हित करीं ॥३३॥ नाना रूप नेत्रीं देखत ॥ तेणें मन चंचळ होत ॥ हो मन चंचळत्व भांबावत ॥ तेणें उडत कल्पना ॥३४॥ त्या कल्पनेचें योगेंकरून ॥ परमार्थी पडतसे हाण ॥ प्रपंचीं वाटे ज्ञान ॥ होय अभिमान देहाचा ॥३५॥ देह अभिमानाचें कारण ॥ बापा हें आहे नेत्रस्थान ॥ कां जें दिसें अनेक भान ॥ तेणें मन भांबावलें ॥३६॥ जरी हा नेत्रीं न देखता ॥ तरी हा याचा एकलाचि असता ॥ आपणा आपण देखता ॥ इतरांची कथा कायसी ॥३७॥ जो आपणा देखे आपण ॥ तो इतरातें न देखे जाण ॥ तेथें कैंचा रूपाभिमान ॥ म्हणोन नेत्रे आपण त्यागावे ॥३८॥ पुढें जें जें देखसी ॥ तें सांडोन पाहें पाहा त्यासीं ॥ त्या पाहत्याचाही जाणता आहेसी ॥ साक्षित्वेंसी व्यापकू ॥३९॥ म्हणोनि पुढील पाहाणें सांडोनी ॥ तूं पाहे आपण आपणालागोनी ॥ तेव्हां स्थूळ देहापासूनि ॥ निश्चयेंनीं सुटतील ॥४०॥ जोंवरी नेत्राचें पाहाणें घेसी ॥ त्यातेंचि सत्य मानिसी ॥ मुक्त असतां बंधन करून घेसी ॥ म्हणोन जगतीसी सांडीं रे ॥४१॥ आतां लिंगदेहाचा विचार ॥ करोनि सांगतों साचार ॥ मन करूनियां स्थिर ॥ बैसा सादरें कथेसी ॥४२॥ आतां लिंगशरीर जाण ॥ अवस्था स्वप्न कंठस्थान ॥ प्रविक्तभोग सत्वगुण ॥ तैजस आपण अभिमानी ॥४३॥ उकार मात्रा हे जाण ॥ परि हें पंचभौतिक ॥ तयांचाही विशदार्थ एक ॥ विभाग सम्यक् सांगतों ॥४४॥ अंत:करण पंचक ॥ हें नभापासाव देख ॥ प्राणपंचक आणिक ॥ हें एक पवनाचें ॥४५॥ तेजाचें ज्ञान इंद्रियपंचक जाण ॥ विषयपंचक जीवापासोन ॥ कर्मेंद्रिय आपण ॥ हें लक्षण पृथ्वीचें ॥४६॥ अंत:करण प्राणपंचक ॥ ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय देख ॥ आणि विषयपंचक ॥ हें एक सांगों रे ॥४७॥ तूं सर्वांहूनि वेगळा ॥ अससी सर्वांचा जिव्हाळा ॥ तुजमाजी न जाणती कळा ॥ नाहीं बाळा तिळ एक ॥४८॥ तूं जाणत्याचा अनुभविता ॥ अससी जाण त्याहूनि परता ॥ येथें नाहीं अतूची वार्ता ॥ तेचि प्रकाशीं तूंचि रे ॥४९॥ यांसी करोनियां जतन ॥ माझें आइकरे वचन ॥ निर्विकल्पीं कल्पी - तेंचि अंत:करण ॥ जेणें जीवपण बिंबलें ॥५०॥ त्यामाजी देखतां आपणा आपण ॥ तेथें तुजचि संकल्प उठला जाण ॥ जैसें कांच मंदिरमाजी श्वान ॥ आपणा देखोनि भुंके ॥५१॥ तें जेथें पाहात ॥ तेथें आपणासीं देखत ॥ दुसरें जाणूनि भुंकत ॥ परीं तें सत्य नोहें कीं ॥५२॥ तैसें अंत:करण केलें ॥ एकीं अनेक भासविलें ॥ जैसें श्वानासीं कांच मंदिर झालें ॥ तैसें घडलें तुजसी ॥५३॥ श्वान जों नेत्रीं पाहत ॥ तों एकीं अनेक भासत ॥ त्या भासें आपणा विसरत ॥ एकीं भावी अनेक ॥५४॥ अहं ब्रह्मास्मि वचन ॥ तेंचि निर्विकल्पी अंत: - करण ॥ तेथें तुझें तुजला विस्मरण ॥ मग द्वैतभान सहजचि ॥५५॥ जीव शिव माया ब्रह्म ॥ हा तुझा तुजचि झाला भ्रम ॥ परि हा उगाचि झाला भ्रम ॥ आहे सूक्ष्म वर्म हें ॥५६॥ निर्विकल्प स्फुरण ॥ तेंचि जाणावें अंत:करण ॥ संकल्प विकल्प देहाभिमान ॥ यालागीं मन म्हणती त्यातें ॥५७॥ त्याचा निश्चय करितां पूर्ण ॥ तेचि बुद्धि म्हणावी आपण ॥ चित्त तेंचि चिंतन ॥ धरीं खूण जीवीं हे ॥५८॥ मीपण जें देहीं ॥ तोचि अहंकार पाहीं ॥ तुसीं यासीं संबंध नाहीं ॥ मिथ्या कांहीं भुलों नको ॥५९॥ तूं आकाशाचा साक्षी आहेसी ॥ मग अंत:करण कैसा होसी ॥ अंत:करणातेंही जाणसी ॥ साक्षित्वें अससी वेगळा ॥६०॥ तूं जरी अंत:करण असतासी ॥ तरी अंत:करणातें न जाणतासी ॥ तपचि होवोनि वर्ततासी ॥ तूं जाणसी साक्षित्वेंसी ॥६१॥ अरे बा तूं मनन होयेसी ॥ तूं मनाचा साक्षी आहेसी ॥ कां जें मनाचे मल्पिलें जाणसी ॥ तुज मनासी नातें नाहीं ॥६२॥ तुझेनी मना मनपण ॥ तूं मनाहुनी भिन्न ॥ मनासीं नाहीं तुझें ज्ञान ॥ सत्य वचन मानावें ॥६३॥ मन सर्वातें जाणत असे ॥ परी स्वरूपीं लयातें पावतसे ॥ म्हणवोनी स्वरूपाचें ज्ञान नसे ॥ तूं अनायासें वेगळाचि ॥६४॥ तूं म्हणतोसी मीच मन ॥ येणेंच तुज होय बंधन ॥ तूं भ्रमें भुलोन आपण ॥ सत्य मन मानितोसि ॥६५॥ मनचि बद्धमुक्ततेचें कारण ॥ मनचि सुखदु:खांचें कारण ॥ यातायाती होती जाण ॥ मनेंचि करोनि निश्चयी ॥६६॥ जे जे मना आधीन झाले ॥ ते ते आपणासी वंचिले ॥ मने एकीं अनेक केलें ॥ मनेंचि नेलें अध:पाता ॥६७॥ मनें इंद्रचंद्रांसीं ठकविलें ॥ रावणासीं जिवें नेलें ॥ नारदासीं नारदी केलें ॥ साथी निपजले संवत्सर ॥६८॥ तूं स्वतां दाहिदिशा फिरत ॥ कल्पों नये तेंचि कल्पित ॥ जाऊं नये तेथें जात ॥ नाहीं विश्रांत क्षणभरी ॥६९॥ तूं स्वतां ब्रह्म आहेसी ॥ मनसंकल्पें देह म्हणतोसी ॥ तेणेंचि तूं दु:ख पावसी ॥ सत्य वचन मानावें ॥७०॥ तूं बद्धमुक्तते अतीत ॥ बद्धमुक्तता मनेंचि भासत ॥ तूं मन कल्पनेसीं जाणत ॥ अससी अतीत त्याहोनी ॥७१॥ तरी आतां मनातें त्यागोनी ॥ राहें साक्षी होवोनी ॥ तूं दु:ख धरीं अंत:करणीं ॥ प्रयत्नें करोनी सांगतों ॥७२॥ जें जें मनामाजी आलें ॥ तें तें वमनापरि सांडीं वहिलें ॥ मनाआधीन जे जे झाले ॥ तें ते गेले अध:पाता ॥७३॥ मनें कल्पितां सर्व आहे ॥ मनें त्यागितां सर्व जाये ॥ निर्विकार वस्तूचि राहे ॥ तें स्वयें अससी रे ॥७४॥ तरी तूं चित्तहीन होसी आपण ॥ चित्तासीं तुझें चित्तपण ॥ तूं चित्ताचा जाणता चित्ताहोन ॥ अससी जाण वेगळा ॥७५॥ चित्त सर्वांसी चिंतित ॥ तें साक्षित्वेंसी असे जाणत ॥ तूं तों अससी चिंतनातीत ॥ प्रकाशीत सर्वांतें ॥७६॥ तरी चित्तातें सांडोन ॥ तूं राहें साक्षी होवोन ॥ तूं बुद्धिहीन नव्हेसी आपण ॥ धरीं खूण जीवीं हे ॥७७॥ जें जें आलें बुद्धीसी ॥ तें तें सर्व तूं जाणसी ॥ म्हणवीन तूं बुद्धि नव्हेसी ॥ साक्षित्वें आहेसी वेगळा ॥७८॥ तूं बुद्धि जरी असतासी ॥ तरी बुद्धिचे बोध न जाणतासी ॥ तूं अहंकार नव्हेसी ॥ वेगळा आहेसी साक्षित्वें ॥७९॥ अहंकारासीं अहंकारपणा ॥ ते तुझीच सत्ता जाण ॥ तूं अहंकारा जाणता आपण ॥ अससी भिन्न साक्षित्वें ॥८०॥ मन बुद्धि चित्त अहंकार ॥ तूं याचा जाणता याहोन पर ॥ तूं निर्विकार ॥ अससी साचार संचला ॥८१॥ परी तूं मन बुद्धि चित्त अहंकारें ॥ भुलला अससी बा रे ॥ पूर्णत्व सांडोनि आत्मा रे ॥ हे भूल पडली असे ॥८२॥ आपलें पूर्णत्व सांडितां आपण ॥ मीपणचि उठलें मन ॥ मनमागें बुद्धि जाण ॥ निश्चयपूर्ण करितसे ॥८३॥ त्या निश्चयाचें करितां चिंतन ॥ तेणेंचि चित्त झालें आपण ॥ त्याचा धरितां अभिमान ॥ अहंकार जाण आलासे ॥८४॥ आपलें स्वरूपाचें विस्मरण ॥ तेंचि भेदांचें कारण ॥ तेणें वृद्धि पावे मन ॥ तूं याहोनी वेगळाचि रे ॥८५॥ तुझिया भ्रमें भुलला ॥ मन बुद्ध्यादिकांचा भास झाला ॥ ऐसें जाणोनि कल्पनेला ॥ सांडीव वहिला रत्नाकरा ॥८६॥ जें जें मन बुद्धीमाजी आलें ॥ तें तें त्वां स्वतांचि देखिलें ॥ ऐसें जाणॊन आपलें ॥ हित वहिलें करीरें ॥८७॥ स्वप्नीं अमृत प्याला ॥ तो जागृतीस चिरंजीव झाला ॥ सत्य मानील या बोला ॥ तो भुलला आपणासीं ॥८८॥ स्वप्नींचें धन जागृतीस ॥ जरी प्राप्त होय कोणास ॥ तरी मनयोगें स्वरूपास ॥ प्राणी सावकाश पावता ॥८९॥ जैसा निद्रेमाजी एकलाचि निजला ॥ तोचि स्वप्नीं अनेकाला ॥ तेथें दु:ख भोगूं लागला ॥ परी एकपणाला नाहीं मुकला कीं ॥९०॥ स्त्रीपुत्र घर धन जांवई ॥ मातापिता व्याहिभाई ॥ सासुसासरा जात गोत पाहीं ॥ देश परदेश सर्वही देखता झाला ॥९१॥ पुण्य पाप स्वर्ग नरक जाण ॥ देवी देवता तीर्थपट्टण ॥ ब्रह्मा विष्णु आदिकरोन ॥ देखिलें मंडण पृथ्वीचें ॥९२॥ राजें आणि मजूर ॥ महाजन सावकार ॥ हत्ती घोडे परिवार ॥ नसताचि भार देखिला ॥९३॥ गंगा यमुनादि सरिता ॥ देखिलें मेरू मंदार पर्वता ॥ परि तीं अवघींच मिथ्या ॥ जागृत होतां झालींसे ॥ ९४॥ जों तो निद्रेमाजी आहे ॥ तोंवरी स्वप्न सत्यची पाहे ॥ तैसे दहींभिमानें कल्पनेसी होये ॥ भासताहे नसतेंचि ॥९५॥ जागृत होतां पाहों जाय ॥ तों आपला आपण एकलाचि आहे ॥ स्वप्न भासलें मिथ्या पाहें ॥ तैसें होय मनायोग्य ॥९६॥ जें जें मन बुद्धीस आलें ॥ तें तें स्वप्नापरि सांडीं वहिलें ॥ हे मनचि अवघे विस्तारलें ॥ म्हणोन त्यागिलें पाहिजे ॥९७॥ मन होतां निर्विकल्प ॥ स्वत: सिद्धचि आहे स्वरूप ॥ मनें करितां संकल्प ॥ एकीं अनेक होतसे ॥९८॥ म्हणवोनी मनादिकातें सांडोनी ॥ तूं राहें साक्षी होवोनी ॥ जेणें सुटसी कल्पनेपासोनी ॥ तें तुजलागोनी सांगितलें ॥९९॥ मन आध्यात्म संकल्प अधिभूत ॥ चंद्रमा अधिदैवत ॥ तूं यांतें अससी जाणत ॥ याहोन अससी अतीत कीं ॥१००॥ चित्त अध्यात्म चिंतन अधिभूत ॥ वासुदेव अधिदैवत ॥ तूं याहोन अतीत ॥ अससी जाण साक्षित्वें ॥१॥ बुद्धि अध्यात्मपूर्ण ॥ बोधव्य आपण ॥ अधिभूत चतुरानन ॥ तूं याहोन वेगळाचि ॥२॥ अहंकार अध्यात्म जाण ॥ अधिभूत मीपण ॥ अधिभूत गौररमण ॥ तूं भिन्न याहोनी ॥३॥ चंद्रमा विराटाचें मन ॥ बुद्धीतें ब्रह्मा जाण ॥ वासुदेव चित्त आपण ॥ गौरीरमण अहंकारू ॥४॥ तूं या चौघांचा साक्षी आहेसी ॥ म्हणवोन चौघांतें जाणसी ॥ त्यागितां आपलें अंत:करणासीं ॥ सहजेसीं ठकविलें ॥५॥ पिंड ब्रह्मांडाचें अंत:करण ॥ तूं दोघांचा जाणतां अससी भिन्न ॥ उत्पत्ति स्थिती संहारण ॥ झालें निरसन येथोनी ॥६॥ इति अंत:करण निरसन ॥ प्राणपंचक पवनापासोन ॥ तुझेनि पवनास पवनपण ॥ पवनाहोनी भिन्न अससी ॥७॥ अपान प्राण व्यान ॥ समान आणि उदान ॥ हें सांगतों वेगळें करून ॥ सावधान ऐकावें ॥८॥ अपान बैसला अधोद्वारीं ॥ तो मळमूत्राचें रेचन करी ॥ तूं त्याचा जाणता त्याहूनि दुरी ॥ अससी निर्धारीं वेगळाची ॥९॥ ऊर्ध्व चालिला तो प्राण ॥ श्वासोच्छ्वास करी उच्चारण ॥ तुझेनि प्राणासीं रोघनीघ जाण ॥ तूं प्राण आपण नव्हेसी ॥११०॥ सर्वांगीं व्यापोन ॥ राहिला असे व्यान ॥ तूं याचा जाणता याहोन ॥ अससी भिन्न साक्षित्वें ॥११॥ कंठामाझारी उदान ॥ तो करी क्षुधादिकासीं जाण ॥ हस्तपादादिकां चालवी समान ॥ तें ज्ञान तुजलागीं ॥१२॥ तूं म्हणसी शरीराचा चालक ॥ तरी तें अवघेंचि माइक ॥ शरीरवार्ता प्राणपंचक ॥ तुज एकचि करणें नाहीं ॥१३॥ शरीरा येवोन काय केलें ॥ तें सांगा बापा वहिलें ॥ तूं साक्षित्व सांडूनि आपलें ॥ मना मनिलें तें करितोसि ॥१४॥ तरी तूं शरीराचा चाळक नव्हेसी ॥ आणि प्राणाचा प्राण आहेसी ॥ तूं साक्षित्वें यांसी जाणसी ॥ ब्रह्म आहेसी स्वत:सिद्ध ॥१५॥ तेजाचें ज्ञानेंद्रिय पंचक जाण ॥ तूं याचा जाणता याहोन भिन्न ॥ म्हणसि ज्ञानेंद्रियें कोण कोण ॥ तेंही तुजलागोन सांगतों ॥१६॥ श्रवण नयन जिव्हा घ्राण ॥ आणि पांचवी ते त्वचा जाण ॥ तुझेनी ज्ञानेंद्रियासीं ज्ञान ॥ परी तुझें भान त्यांसी नाहीं ॥१७॥ तूं म्हणसी मी नेत्रांनीं पाहें आपण ॥ परी तूं नेत्राहून अतीत जाण ॥ रत्कापित्तादि अवलोकन ॥ तूं ते परीक्षा न करिसी ॥१८॥ चक्षु इंद्र येथें ॥ त्याचें तेज तें अध्यात्म निश्चित ॥ देखणें जो पदार्थ ॥ अधिभूत त्या नांव ॥१९॥ अधिदैवत सूर्य अधिष्ठात्री ॥ जो देहाचा प्रकाश करी ॥ तूं याचा जाणता याहूनि दूरी ॥ अससी निर्धारी वेगळा ॥१२०॥ अधिभूत अध्यात्म अधिदैवत ॥ या त्रिपुटीतें अससी जाणत ॥ जो जो दिसे पदार्थ तूंतें ॥ तूं अतीत त्याहोनी ॥२१॥ म्हणसी नेत्रेंद्रिय नव्हे आपण ॥ परे नेत्रेंकरोन अवलोकितों मीचि जाण ॥ तरी हेंही तुजला विदीत करोन ॥ सावधान सांगतों ॥२२॥ नेत्रेंद्रिय आहे ॥ आणि पदार्थही होय ॥ परी सूर्यदैवत अस्तमाना जाय ॥ तैं स्तब्ध राहे देखणें ॥२३॥ अथवा सूर्य आहे आपण ॥ आणि अधिभूत पदार्थ असे पूर्ण ॥ परी अध्यात्म तें जीवन ॥ नसे मान वस्तूचें ॥२४॥ कीं अध्य आहे ॥ सूर्यही प्रकाशला राहे ॥ परि पदार्थ नसे पाहें ॥ तेथें देखावें काय दृष्टीनें ॥२५॥ एवं हें एक एकाविण ॥ स्वतां नसे वर्तन ॥ याला त्रिपुटीचें भान ॥ असे अन्योन्य रत्नाकरा ॥२६॥ म्हणोनि तूं कांहीं नव्हेसी आपण ॥ तरी तूं सर्वांचा जाणता पूर्ण ॥ तूं सूर्याचा सूर्य जाण ॥ सूर्य तुझेनि प्रकाशे ॥२७॥ तूं म्हणतोसी मी श्रवण करितों आपण ॥ येणेचि तुज होतसे बंधन ॥ राहें साक्षी होवोन ॥ सांगतों खूण जीवींची ॥२८॥ श्रवण अध्यात्म जाण ॥ श्रोतव्य अधिभूत पूर्ण ॥ दिशा अधिदैवत आपण ॥ तूं विलक्षण याहोनी ॥२९॥ तूं श्रवण नोहेसी आपण ॥ तूं शब्दाहोनी भिन्न ॥ तूं दिशांचा जाणता पूर्ण ॥ साक्षी करोनि वेगळाचि ॥१३०॥ त्वचा अध्यात्म जाण ॥ अधिभूत स्पर्शन ॥ अधिदैवत पवन पूर्ण ॥ तूं विलक्षण त्याहोनी ॥३१॥ तूं त्वचाहि नव्हेसी ॥ स्पर्शाचा जाणता आहेसी ॥ तूं पवनाचा पवन होसी ॥ सर्वां जाणसी साक्षित्वें ॥३२॥ अध्यात्म घ्राण असे ॥ तेथें अधिभूत गंध असे ॥ अश्विनौ दैवत प्रकाशें ॥ तूं अनायसें जाणसी ॥३३॥ तूं घ्राण नव्हेसी आपण ॥ तूं गंधाचा जाणता पूर्ण ॥ अश्विनी दैवताहोनी भिन्न ॥ चैतन्यघन स्वरूप तूं ॥३४॥ जिव्हा अध्यात्म येथ ॥ रस सेव्य वरुण अधिभूत ॥ अरुण अधिदैवत ॥ तूं जाणसी साक्षित्वें ॥३५॥ तूं जिव्हाही न होसी ॥ रसाचा रस होसी ॥ वरुणाचे कर्मा जाणसी ॥ साक्षी अससी वेगळाचि ॥३६॥ श्रवण नयन जिव्हा घ्राण ॥ त्वचाही आपुली ज्ञानेंद्रिय जाण ॥ सूर्य दिशा पवन वरुण ॥ अश्विनी देह पूर्ण विराटाचा ॥३७॥ शशि सूर्य विराटाचे नेत्र ॥ वरुण तो जिव्हा साचार ॥ अश्विनीदेव घ्राण सुंदर ॥ कर्णरंध्र दाहिदिशा ॥३८॥ जिव्हा ते विराटाचा वरुण ॥ हीं पांचही ज्ञानेंद्रियें जाण ॥ तूं या दोघांचा जाणता पूर्ण ॥ अससी आपण वेगळाचि ॥३९॥ आपुल्या ज्ञानेंद्रियाचें निरसन ॥ करितां विराटची गेलें जाण ॥ जैसें अग्निसंगें दाहकपण ॥ सहज जाण त्यागिलें ॥१४०॥ पुष्प त्यागितां सुगंध ॥ गाय त्यागितां दुग्ध ॥ विवेक त्यागितां बोध ॥ द्वैत त्यागितां क्षोम ॥ सहजचि गेला ॥४१॥ तैसें ब्रह्मांडाचें करितां निरसन ॥ पिंडाचेंही होय जाण ॥ तूं दोहींचाहि साक्षी आपण ॥ ब्रह्मपूर्ण तूंचि तूं ॥४२॥ विषयपंचक जीवनापासोन ॥ तूं जीवनाचाही जीवन ॥ विषयाचा साक्षी पूर्ण ॥ अससी आपण वेगळाचि ॥४३॥ शब्द स्पर्श रूप रस गंध ॥ हे विषय एवंविध ॥ तूं याचा जाणता अनादि सिद्ध ॥ अससी प्रसिद्ध प्रकाशला ॥४४॥ तूं शब्द नव्हेसी आपण ॥ तूं शब्दातीत साक्षी पूर्ण ॥ म्हणोन साक्षी आले ते सांडोन ॥ साक्षी होवोनि राहीं रे ॥४५॥ तूं स्पर्शातें जाणसी ॥ म्हणवोनी स्पर्शही नव्हेसी ॥ जें जें आलें स्पर्शांसी ॥ तें तें वेगीं सांडी रे ॥४६॥ तूं रूप नव्हेसी आपण ॥ रूपासीं तुझें निरूपण ॥ करिसी नाना रंगांचें परीक्षण ॥ म्हणवोन भिन्न अससी रे ॥४७॥ जें जें स्वरूपामाजी आलें ॥ तें तें सर्व जाणितलें ॥ म्हणवोन रूपापासोन वहिलें ॥ साक्षित्व आलें जाण रे ॥४८॥ तूं रसही नव्हेसी आपण ॥ रसासीं तुझें निरसपण ॥ रसाचा जाणता रसाहोनी भिन्न ॥ साक्षी पूर्ण अससी रे ॥४९॥ तूं गंधही नव्हेसी आपण ॥ तूं गंधाचा जाणता गंधाहोन भिन्न ॥ तूं निर्विकार निर्गुण ॥ सर्व व्यापोन उरलासी ॥१५०॥ एवं पांचही विषय न होसी ॥ पांचा विषयांचा जाणता आहेसी ॥ तुज आणि विषयांसी ॥ नातें सहजचि असेना ॥५१॥ याविषयीं होतां मन रत ॥ बहूतांचा झाला घात ॥ तूं तो यांहोनियां अतीत ॥ अससी जाण साक्षित्वें ॥५२॥ जें आपलें साक्षित्व विसरले ॥ विषयानें त्यासींच नाडिलें ॥ विषयोगें अधोगतीस गेले ॥ आवर्ती पडले भवजन्मीं ॥५३॥ मीच देह असे म्हणती ॥ तेचि या विषयीं रत होती ॥ आपल्या साक्षित्वें जे जाणती ॥ ते त्यागिती विषापरी ॥५४॥ विषय सेविलिया देहचि जाय ॥ परी विषयानें थोर घात होय ॥ ऐसें जाणूनि सोय ॥ सांडोनि राहें साक्षित्वें ॥५५॥ जरी आपुलें साक्षित्व विसरसी ॥ आणि विषय आदरें सेविसी ॥ तरी स्वहितातें वंचिसी ॥ धरीं मानसीं खूण हे ॥५६॥ विषयसंगें देहभावना होय ॥ विषय त्यागितां ब्रह्मचि होय ॥ म्हणोनि यासाठीं पाठिमोरा राहें ॥ धरीं सोय मळींची ॥५७॥ तूं मळींचा निरसंग आहेसी ॥ परी विषयसंगें भांबावलासी ॥ माझें माझें करितोसी ॥ आपणासीं विसरोनी ॥५८॥ तरी या विषयाचें बंधन ॥ करावें अनुभवेकरून ॥ देहभावनेतें सांडोन ॥ मग ब्रह्म पूर्ण होय तूं ॥५९॥ या शब्दविषयें नाडिलें बहुतासीं ॥ निर्विकार विकारासीं ॥ नाना मतांसीं ॥ स्थापिताती ॥१६०॥ ब्रह्म निर्गुण शब्दातीत ॥ जेथें नाहीं हेतुमात ॥ तेथें शब्द नाना मत ॥ केलें सत्य द्वैतमतीं ॥६१॥ अनिर्वाच्य जें वचन ॥ तेंच द्वैताचें कारण ॥ शब्द सांडिता द्वैताभान ॥ सहज जाण हरपलें ॥६२॥ शब्दें अनामा नाम ठेविलें ॥ शब्दें जीवीशीं बोलविलें ॥ म्हणवोनि शब्द सांडोनि वहिलें ॥ हित आपुलें करीं रे ॥६३॥ तूं शब्दादिकांचा जाणता ॥ अससी शब्दादिकां परता ॥ म्हणवोनि शब्दादिकां समस्ता ॥ सांडी आतां साक्षित्वें ॥६४॥कर्मेंद्रिय पृथ्वीपासोन ॥ तूं त्या पृथ्वीचा नियंता पूर्ण ॥ तुझेनें पृथ्वीसी कठिणपण ॥ तूं त्याहोन वेगळा ॥६५॥ तरी तूं कर्मेंद्रिय नव्हेसी ॥ कर्मेंद्रियाचा जाणता आहेसी ॥ कर्मेंद्रिय कां न म्हणसी ॥ तेंहि पर्येसी सांगतों ॥६६॥ वाचा आणि कर ॥ पाद शिश्न अधोद्वार ॥ हीं कर्मेंद्रियें साचार ॥ तूं निर्विकारा वेगळा ॥६७॥ मुख्य जें जें बोलत ॥ तें तें तूं अससी जाणत ॥ ब्रह्माहूनि तें बोलण्यातीत ॥ शब्दें निशब्द जाणत ॥ तो तूं सत्य अससी रे ॥६८॥ कर जे घेती देती कांहीं ॥ तें तूं जाणसी सर्वही ॥ तूं त्यांचा नियंता पाहीं ॥ साक्षित्वें राहीं वेगळा ॥६९॥ चरणें करितां गमनागमन ॥ तें तूं जाणसी आपण ॥ म्हणवोनि वेगळा आहेसि रे जाण ॥ साक्षी पूर्ण तो तूंचि ॥१७०॥ मूत्र भोग शिश्नाचा ॥ तूं जाणता अससी त्याचा ॥ तूं नियंता सर्वांचा ॥ परा वाचा पार नेणें ॥७१॥ गुदीं जें कर्मक्षरण ॥ तें तूं जाणसी साक्षित्वेंकरून ॥ आदि आणि अवसान ॥ तूं भिन्न यांहोनी ॥७२॥ तूं आदि अवसाना परता ॥ अससी आदि अवसानाचा जाणता ॥ तें सांगितलें आतां ॥ तें सांडिता होय रे ॥७३॥ वाचा अध्यात्म येथ ॥ वाचतें अधिभूत ॥ अग्नि अधिदैवत ॥ शक्ति तेथें सरस्वती ॥७४॥ हस्त अध्यात्म आपण ॥ ग्रहणादि अधिभूत पूर्ण ॥ अधिदैवत इंद्र जाण ॥ क्रियाशक्तीचा पूर्ण निर्वाहो ॥७५॥ तूं हस्ताचा नियंता ॥ ग्रहणादिकांचा जाणता ॥ इंद्र तुझेनी तत्वतां ॥ तूं आतां वेगळाचि ॥७६॥ अध्यात्म चरण ॥ अधिभूतगति आपण ॥ अधिदैव उपेंद्र पूर्ण ॥ तेथें जाण गमनशक्ती ॥७७॥ तरी तूं चरणांचा नियंता ॥ आणि गतीचाही जाणता ॥ उपेंद्राचा प्रकाशिता ॥ सर्व सत्ता तुझीच ॥७८॥ अध्यात्म गुणेंद्रियें ॥ विसर्न अधिभूत होये ॥ नैरृत्य अधिदैवत पाहे ॥ तेथिंचा निर्वाह क्रियाशक्ती ॥७९॥ तरि तूं गुह्येंद्रिय न होसी ॥ निसर्ग अधिभूतासीं ॥ नैरृत्य अधिदैवतासीं ॥ साक्षित्वासे वेगळा ॥१८०॥ अध्यात्म शिश्नेंद्रियांत ॥ अधिभूत रतिसुख ॥ प्रजापति अधिदैवत देख ॥ तेथें आणिक क्रियाशक्ति ॥८१॥ तूं शिश्नेंद्रियाचा जाणता ॥ अधिभूत रतिसुखाचा नियंता ॥ प्रजापतीचा कर्ता ॥ सर्वांपरता अससी रे ॥८२॥ प्रजापतीचें करितां निरसन ॥ सर्व वृत्तीस पडे शून्य ॥ उरलें अविनाश चैतन्यघन ॥ तें तूं पूर्ण स्वयेंचि ॥८३॥ यापरी कर्मेंद्रियां वेगळा ॥ जैसें गगन जळीं भासोन न लिंपे जळा ॥ कीं वसंत जैसा वनीं सकळां ॥ पालवोनि निराळा असे कीं गा ॥८४॥ अंत:करण प्राणपंचक ॥ ज्ञानेंद्रिय प्राणपंचक ॥ आणि कर्मेंद्रिय देख ॥ तूं प्रकाशक सर्वांचा ॥८५॥ अंत:करण व्यानश्रवण ॥ शब्द वाचा हे गगनापासोन ॥ तूं याचा नियंता याहोन ॥ साक्षी पूर्ण वेगळाचि ॥८६॥ मनसमान त्वचा स्पर्श जाण ॥ हस्त हे वायूपासोन ॥ तूं वेगळा अससी याहोन ॥ ब्रह्म पूर्ण तेंचि तूं ॥८७॥ बुद्धी उदानयन ॥ रूप प्रदह आपण ॥ तेजापासाव उत्पन्न ॥ तूं जाणता याहोन वेगळा ॥८८॥ चित्त अपान जिव्हा रस शिश्न ॥ हे जळाचे अंश जाण ॥ तूं याचा जाणता याहोन ॥ साक्षी पूर्ण वेगळाचि ॥८९॥ अहंकार प्राण घ्राण ॥ गंध गुद अपान ॥ हे झाले धरणीपासोन ॥ तूं यांहोनी वेगळाचि ॥१९०॥ तूं आदि मध्य अवसानीं ॥ तूं अलिप्त अससी व्यापकरणीं ॥ हें तुजचिपासोनी ॥ तूं याहोनि वेगळाचि ॥९१॥ उकार मात्रा सत्त्व गुण ॥ हेंही तूं नव्हेसी आपण ॥ तूं याचा जाणता याहोन भिन्न ॥ साक्षी पूर्ण वेगळाचि ॥९२॥ सत्व गुणापासोन जें जें झालें ॥ तें तें सर्व जाणितलें ॥ तरी जें जें जाणण्यामाजि आलें ॥ तें बोललें माइक ॥९३॥ म्हणवोनी जाणत्यासीं जाणिजे ॥ मग जाणतेपणा विसरिजे ॥ नाहींच होवोनि राहिजे ॥ तेव्हांचि लाहिजे सव सुख ॥९४॥ तूं प्रविक्त भोगही नव्हेसी ॥ प्रविक्त भोगाचा जाणता आहेसी ॥ तूं अनेकीं एक अससी ॥ सांडीं तर्कासी येथोनी ॥९५॥ एवं हें लिंगशरीर जाण ॥ तें लिंगशरीराचा नियंता पूर्ण ॥ परि कल्पनायोगें स्वप्न ॥ शिव पूर्ण देखतसे ॥९६॥ शिव एकलाचि एक आहे ॥ परि कल्पनायोगें अनेक पाहे ॥ हेंही कळे तुजसीं सोये ॥ साक्षी पाहे तूंचि तूं ॥९७॥ तरीं हें तुझ्या अज्ञानानें तुजला ॥ स्वप्नावभास असे झाला ॥ तो तुझा त्वांचि जाणितला ॥ म्हणोनि कल्पनेला सांडी रे ॥९८॥ यालागीं देहाचें कारण ॥ हे कल्पनाचि आहे जाण ॥ एकीं अनेक मान ॥ हे जाण कल्पना खरी ॥९९॥ तूं त्या कल्पनेचा जाणता ॥ अससी निर्विकल्प आयता ॥ म्हणोन कल्पनीक सांडीं आतां ॥ पाहें पूर्णता आपली ॥२००॥ निर्विकल्प तें एक संचलें ॥ जैसें आब्रह्म प्रळयोदकें व्यापिलें ॥ तेथें मी म्हणावया कोण उरलें ॥ सांग वहिलें रत्नाकरा ॥१॥ ब्रह्मीं संकल्प मुळींच नाहीं ॥ परि तुझ्या अभावें तुज भासे पाहीं ॥ तेथें मनादिक विकार सर्व पाहीं ॥ कल्पनेचे ठायीं होतील ॥२॥ हें विकारयुक्त भासे ॥ येर निर्विकार असे ॥ जैसी पाहतां साखर दिसे ॥ परि असे गोडी ते एक ॥३॥ आकार मात्रचि दिसे ॥ परि ते गोडीच संचलीसे ॥ तैसें कल्पनायोगें अनेक भासे ॥ परी न नासे एकपण ॥४॥ जैसें वायूचे संगेंकरून ॥ जीवनीं तरंगाचें भान ॥ तरी काय जीवनीं तांगाचि खाण ॥ पहिलीच जाण होती कीं ॥५॥ परि पहिले जीवनीं तरंग नाहीं ॥ परि वायुवेगें भासलें पाहीं ॥ तरी ते जीवनावेगळे आहेत काई ॥ तैसी सोयी मनादिकांची ॥६॥ जीवनीं तरंग होती ॥ परि ते जीवनरूपचि आहेती ॥ जीवनावेगळें तरंग दिसती ॥ तैसें निर्विकारीं भासले विकार ॥७॥ वायुवेगें तरंग सागरीं ॥ तैसें कल्पनेसंगें विकार निर्विकारीं ॥ ऐसें जाणोनियां अंतरीं ॥ सांडी दुरी तर्कातर्क ॥८॥ तरी तर्कातर्क सांडोन ॥ तूं निर्विकार होय आपण ॥ एकी दिसे अनेक भान ॥ परि एकपण न मोडेचि ॥९॥ जैसें तरंग सागरीं भासती ॥ परि ते सागररूपचि असती ॥ आदि अवसान अंतीं ॥ सहजस्थिति सागर त्यासीं ॥२१०॥ ते भासमात्रचि दिसती ॥ परि ते सागरांशचि आहेती ॥ तैसे मनादिकीं विकार उठति ॥ परि आत्मस्थिति न मोडेचि ॥११॥ वायुसंगें तरंग झाला ॥ परि तरंगीं वायु नाहीं राहिला ॥ तैसा कल्पनायोगें विकार भासला ॥ परि विकारीं संचला निर्विकारी ॥१२॥ कल्पना संगेंकरून ॥ निर्विकारी विकार भान ॥ परि स्वप्नरीति जाणोन ॥ साक्षी होवोन राहीं रे ॥१३॥ कर्दळीयोगें कापुर ॥ परि कर्दळी नाहीं कापुरामाझार ॥ तैसें कल्पनायोगें निर्विकारीं विकार ॥ परि कल्पना साचार वेगळी ॥१४॥ जैसे सोनारें केलें अलंकार ॥ परि अलंकारीं नाहीं सोनार ॥ तैसे मनादिक भासती विकार ॥ परि निर्विकार वस्तुचि ॥१५॥ सुवर्णाचे झाले अलंकार ॥ परि अलंकारी सुवर्ण साचार ॥ तैसें विकारीं निर्विकार ॥ परावर संचलें ॥१६॥ मृत्तिकेमाझार पाहीं ॥ भांडियांची खाण नाहीं ॥ परि तीं कुलालें करी पाहीं ॥ तैसी निर्विकल्पीं सोय कल्पनेची ॥१७॥ प्रथम मृत्तिका निर्विकार ॥ तेथें कुलालें केलें भांडियांचे विकार ॥ परि कुलाल नाहीं त्यामाझार ॥ तैसा तूं साचार अससी रे ॥१८॥ कुलाल आणि भांडी जैसीं ॥ आकाशामाजी वस्ती दोघांसीं । तैसी परात्परीं विकार निर्विकारांसी ॥ वस्ती अनायसें असे किं गा ॥१९॥ तरि विकार आणि निर्विकार ॥ तूं यांचा साक्षी यांहोन पर ॥ परि तुझे अभावें तुज साचार ॥ नसते विकार भासती ॥२२०॥ तरी निर्विकारीं सर्व नसे ॥ विकारीं सर्व भासे ॥ जैसें नेत्र चेपितां चंद्रद्वय दिसे ॥ येर्हवीं असे एकचि ॥२१॥ तैसें मुळींचें आहे एकपण ॥ परि कल्पनेनें भासे द्वैतभान ॥ हे अवघें मिथ्या जाणोन ॥ साक्षी होवोन राहीं रे ॥२२॥ तरि हें सर्व कल्पनिक ॥ आदि मध्य अवसान देख ॥ सगुण निर्गुण मायिक ॥ जैसें स्वप्न सुख मिथ्याचि ॥२३॥ जोंवरी कल्पनेचें अधिष्ठान ॥ तोंवरी लिंगशरीराचें भान ॥ म्हणऊन कल्पनेतें सांडोन ॥ निर्विकार आपण होय रे ॥२४॥ तूं तों निर्विकार आहेसी ॥ परी कल्पनासंगें बद्ध होसी ॥ मग मुक्तीचा उपाव करिसी ॥ तेणें भांबावसी आपणा ॥२५॥ जैसें सूर्यासी होतां विन्मुख ॥ छाया पहातए सन्मुख ॥ मग ती धरों धांवती मूर्ख ॥ परि त्यांसीं देख न सांपडे ॥२६॥ जों जों सांवली धरूं जाय ॥ तों तों सावली पुढेंचि होय ॥ मग जो जो करी उपाय ॥ तो तो अपाय होतसे ॥२७॥ तैसें आत्मत्वासीं विन्मुख होतां ॥ आपणासी भासे बद्धता ॥ मग साधावयास मुक्तता ॥ नाना व्रतें करिताती ॥२८॥ जों जों हा करी साधन ॥ तों तों वाढतसे गा मन ॥ मग नानापरी तर्क जाण ॥ नसतेंचि आपण करितसे ॥२९॥ जों जों मन वाढे ॥ तों तों कल्पनेची गाठी पडे ॥ जैसें अन्न सांडोनियां हाडें ॥ श्वान कोडेंखातसे ॥३०॥ तैसें झालें अज्ञानासीं ॥ जे विन्मुख आत्मत्वासीं ॥ बद्धता भासे त्यांसीं ॥ तेणें कासाविसी होतसे ॥३१॥ जो झाला सूर्यासन्मुख ॥ त्यासीं छाया झाली विन्मुख ॥ तैसें आत्मत्वा जाणतां देख ॥ नसे नि:शेष कल्पना ॥३२॥ जेव्हां नि:शेष कल्पना तुटे ॥ तेव्हां लिंगदेहाची ग्रंथिका सुटे ॥ जैसें जळ आटतां गोमटे ॥ बिंब भेटे बिंबासी ॥३३॥ सूर्यापासोनी जळ होत ॥ तेथें सूर्यचि असे बिंबत ॥ तेज जळबिंबातें प्रकाशित ॥ परि तें अतीत दोघांसीं ॥३४॥ तैसें तुझे विसरें तुजला ॥ दुजेपणाचा भ्रम झाला ॥ तोही त्वां जाणितला ॥ तूं अनेकीं संचलासी ॥३५॥ तूं अनेकां एकचि आहेसी ॥ परिस्वरूपें अज्ञानें भ्रमलासी ॥ तूं त्या भ्रमातेंही न जाणसी ॥ त्याहोनि आहेसी वेगळा ॥३६॥ जैसा अग्नीपासोन धूम्र होय ॥ धूम्र अग्नीसीं लागला आहे ॥ हें धूमअग्नी नातें काय ॥ अग्नि पाहें वेगळा ॥३७॥ तैसें हें सर्व तुजपासोन होत ॥ सर्व आहे तुज आंत ॥ परि तूं याहोन अतीत ॥ प्रकेशीत सर्वांतें ॥३८॥ अग्नीपासोन धूम्र झाला ॥ जनीं हा शब्द प्रवर्तला ॥ परि तो धूम्रचि आहे पहिला ॥ हें कोणाला नकळेचि ॥३९॥ अग्नीमाजी धूम्र निघून ॥ तरि काष्ठांविना नच दिसत ॥ म्हणोनि अग्नि काष्ठांच होत ॥ संयोगता तुटत ॥४०॥ तैसें निर्विकारीं नाहीं विकार ॥ परि कल्पनायोगें भासे साचार ॥ म्हणवोनि तूं यापासोनि दूर ॥ अससी परप्रकाशिता ॥४१॥ तरि तूं प्रकाशाचा प्रकाशक ॥ तूं अर्काचाहि निजअर्क ॥ तूं सर्वांचा होसी जनक ॥ साक्षी संमुख सर्वांचा ॥४२॥ तुझे सत्तेनें सर्व होतें ॥ परि तूं नातळशी कर्मातें ॥ जैसें सूर्यप्रकाशें जन वर्ते ॥ परि सूर्य यातें अलिप्त ॥४३॥ जैसा जैसा याचा व्यापार ॥ तो तैसाचा करी साचार ॥ परि सूय कर्मा माझार ॥ अणुमात्र न लिंपेची ॥४४॥ सूर्य जरी लिप्त होता ॥ तरि त्या काळिमेसी येता ॥ तैसा तूं सर्वांपरता ॥ सर्व सत्ता तुझेनी ॥४५॥ जनकर्मीं सूर्य अलिप्त ॥ सैदा तूं मनादिकां अतीत ॥ तूं कल्पने तेंहि जाणत ॥ वस्तु निर्धूत तेचि तूं ॥४६॥ जरी अहं ब्रह्मस्मि आहेस ॥ सांडूनि होय निर्हेत ॥ तेव्हा कल्पनेचा होईल अंत ॥ जैसा प्रकाशातें अंधार ॥४७॥प्रकाशीं अंधारू असे ॥ परि तो तद्रूपचि असे ॥ तैसी निर्विकार कल्पना वसे ॥ मानीं विश्वास वचनातें ॥४८॥ जरी संदेह असेल कांहीं ॥ तरि बोल बोल रे लवलाहीं ॥ आपलें समाधान करून घेईं ॥ धरीं सोय हिताची ॥४९॥ ऐसें ऐकोन सद्गुरूवचन ॥ बोल रत्नाकर कर जोडून ॥ माझें झालें समाधान ॥ उडालें भान कल्पनेचें ॥२५०॥ या कल्पनेचे योगेंकरून ॥ मी भ्रमलों होतों जाण ॥ बद्धता होती घेतली मानोन ॥ तेणें हाण झाली माझी ॥५१॥ मनामागें धावतां ॥ फार कष्टी झालों सद्गुरुनाथा ॥ तीर्थें व्रतें देवी देवता ॥ केलीं ताता उदंड ॥५२॥ परि मनाची निवृत्ती ॥ नोहेचि गा सद्गुरुमुर्ती ॥ अधिकचि विकार होती ॥ नाना मतीं भांबावलों ॥५३॥ एक तुझे कृपेविण ॥ जें जें कीजे तो भ्रमचि जाण ॥ झालें लिंगदेहाचें निरसन ॥ सांगा खूण कारणाची ॥५४॥ स्थूळ आणि कारण ॥ यांचा साक्षी मी वस्तू पूर्ण ॥ तुमचे कृपेनें हें मजलागोन ॥झालें ज्ञान निश्चयीं ॥५५॥ आतां कारणाचें निरसन ॥ करावें सद्गुरु आपण ॥ तवं सद्गुरु बोलिले वचन ॥ सांगेन पुढिले अध्यायीं ॥५६॥ हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ जेणें वस्तु होय हस्तगत ॥ मनादिकांचा पुरे अंत ॥ होय निर्हेत तत्काळीं ॥५७॥ हा ग्रंथ करितां श्रवण ॥ भवभयाचें उडे ज्ञान ॥ राहे ब्रह्मचि होवोन ॥ हें वरदान गुरूचें ॥५८॥ जें सर्वांसी गुह्य होतें चोरलें ॥ तें दीपरत्नाकरें प्रगट केलें ॥ सर्वत्रीं जें भरोनि उरलें ॥ तें भासविलें दोन्ही डोळां ॥५९॥ म्हणोनियां शब्द रत्नाकरासी ॥ जनन करी अति प्रयत्नांसी ॥ साक्षी मानोनि आपणासीं ॥ होय कथेसीं सादर ॥२६०॥ स्थूल सूक्ष्माचें कथन ॥ तुज सांगीतलें वेगळें करोन ॥ हा अध्याय झाला येथोन ॥ पुढें सावधान होईंजे ॥६१॥ सातवा अध्याय पूर्ण झाला ॥ आतां आठवा आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकरा वहिला ॥ चित्त कथेला दीज बापा ॥६२॥ सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ कथा विनोदें चालिली ॥६३॥ इतिश्री चिदादित्यप्रकाशे ॥ दीपरत्नाकर ग्रंथे ॥ सूक्ष्मदेहनिरसनयोगो नाम सप्तमोध्याय गोड हा ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥इति दीपरत्नाकर सप्तमोsध्याय: समाप्त । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP