संगीत विक्रमोर्वशीय - अंक चवथा

सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.


( सहजन्या व चित्रलेखा येतात. )
सहजन्या : गडे, सुकलेल्या कमळाप्रमाणं आज तुझं तोंड दिसतं. यावरून मला वाटतं तुझ्या मनाला कांहीं तरी काळजी लागली आहे. असं असेल तर काळजीचं कारण सांग, म्हणजे मीही तुझी वाटेकरीण होईन.
चित्र : सखे, सूर्याची सेवा अप्सरांनीं पाळीपाळीनं करायची या नियमाप्रमाणं मी सेवेंत आहेंच. पण माझी मैत्रिण उर्वशी जवळ नाहीं, म्हणून मला फ़ार वाईट वाटतं.
सह० : तुमची दोघींची मैत्रीच तशी आहे.
चित्र० : सखे, या दिवसांत तिचं कसं काय चाललं आहे हें कळावं म्हणून मी सहज ध्यान करून ध्यान करून पाहिलं, तो मला बाई कांहीं भयंकरच दिसलं.
सह० : असं काय बाई तें ?
चित्र० : सखे, त्या राजर्षीकडून सर्व राज्यकारभार प्रधानावर सोंपवून. माझी उर्वशी त्याला घेऊन गंधमादन पर्वतावर विहार करण्यासाठी गेली.
सह० : खरंच गडे ! अशा रम्यप्रदेशांत जाऊन विहार करणं, यालाच विलास म्हणायचं. बरं मग ?
चित्र० : तिथें विद्याधराची कन्या उदयवती, ही मंदाकिनी नदीच्या कांठी वाळूचे पर्वत करून खेळत होती. तिच्या राजाचं मन गेलं, असं पाहून उर्वशीला राग आला बाई.
सह० : गडे, यायचाच. जिथें प्रीति फ़ार तिथें हें कुठून सहन व्हायला ? बरं मग ?
चित्र० : मग त्या राजानें तिची पुष्कळ समजूत केली, पुष्कळ आर्जवकेलें, पण तिनं कांहीं बाई तें ऐकलं नाहीं. आणखी कुमारवनांत स्त्रियांनीं जायचं नाहीं, या गोष्टीचं, गुरुजींच्या शापानं, तिला विस्मरण पडलं, आणि ती त्या वनांत गेली. मग काय ? षडाननाच्या शापानं लता होऊन राहिली.
सह० : दैवाच्या पुढें कोणाच्यानं जाववत नाही बाई. तशा प्रीतीचा हा असा परिणाम व्हावाना देवा ! बरं मग, त्या राजाची तरी बिचार्‍याची  पुढें काय स्थिति झाली बरं ?
चित्र० : तो वेडा होऊन उर्वशी ! उर्वशी ! करीत त्या वनांतच इकडे तिकडे अहोरात्र फ़िरतो आहे. तशांतून मनाला अधिकच चेतवायला हा मेला मेघकाळ सुरू झाला. आतां तर त्या बापड्याचे फ़ारच हाल होतील.
सह० : गडे, अशा थोर पुरुषावर कसा जरी प्रसंग आला, तरी तो फ़ार वेळ रहात नाहीं असा नेम आहे. म्हणून तुला सांगतें कीं कुणाच्या तरी प्रसादानं त्याचा आणि तिचा पुन: खास संगम होईल. पण हे पहा भगवान् सूर्यनारायण उदयास आले. चल, त्यांची पूजा करूं.
( दोघी जातात. )
( उन्मत्त वेशानें राजा येतो. )
राजा : हा दुष्टा राक्षसा ! उभा रहा. माझ्या प्रिय सखीला घेऊन कुठें चाललास ? अरे, हा पर्वतशिखरावरून आकाशांत जाऊन माझ्यावर शरवर्षाव करूं लागला. ( पाहून ) छे छे !

पद ( नोहे हा पवन नवन )
नोहे हा असुराधम घनचि फ़िरतसे ॥ चाप न हें वाकविलें इंद्रधनु असें ॥धृ०॥ बाण न हे मजवरती । जलधारा तीव्र सुटति ॥ निकषावरि कनकदीप्ति ॥ तेचि रम्य चपला ती ॥ सुंदरिची गौर कांति खचित ती नसे ॥१॥
तर मग ती कुठें गेली असावी बरं ? कदाचित् माझ्यावर रागावून आपल्या प्रभावाणं गुप्त झाली म्हणावं, तर ती इतकी दीर्घकोपी नाहीं. पुन: इंद्रलोकीं गेली म्हणावं तर तिचं सर्व मन माझ्यावर आहे. बरं, दुष्ट राक्षसांनीं नेली म्हणावं तर तेंही संभवत नाहीं. कारण --

दिंडी.
जवळि असतां भूप हा सुंदरीला ॥ न्यावयाचें बल नसे राक्षसांला ॥ तरी कोठें ती मला दिसत नाहीं ॥ दैव माझें प्रतिकूल कसें पाही ॥१॥
( चोहींकडे पाहून दु:खानें श्वास सोडून ) हरहर !

साकी
दु:खामागुनि दु:खचि येतें, फ़िरतां काळ नराचा ॥ विरह सखीचा दु:सह असतां ऋतु ये नवमेघाचा ॥ दिन हे रम्य खरे ॥ परि तिजवांचुनि चित्त झुरे ॥१॥
‘ राजा कालस्य कारणम् ’ असं मुनींचं वान असून मी व्यर्थ आपल्या मनाला क्लेश देत आहें. तर या मेघकालाचं निवारणच केलं पाहिजे. पण नको, असं करूं नये. कारण यानं मला ही राजभोगाची सामग्री कशी सादर केली आहे पहा.

पद ( निर्धनतेनें लज्जा निपजे )
कांचनरेखेसम ही झळके वीज सघनअंबरीं ॥ माझें छत्र निळें भर्जरी ॥धृ०॥ वेतस तरुचे तुरे हालती वायूनें वरिवरी ॥ ढाळिति चौर्‍या जणुं मजवरी ॥ चाल ॥ ऋतु निदाघ सरतां मोर मधुर बोलती ॥ ते मजला माझे बंदीजन वाटती ॥ हे पर्वत सारे सौदागर बैसती ॥ धारारूपी हार घालिती या कंठीं निजकरीं ॥ भोगी राजभोग या परी ॥१॥
पण या श्लाघेपासून माझी प्रिया कुठें गेली, हें मला कसं कळणार ? तर तिचाच शोध करावा. ( पाहून ) आहा ! ही मला खूण सांपडली.

पद ( यादव रायां भाईयारे )
जलबिंदूनीं भरलेली हीं लाल फ़ुलें दिसती ॥ सखिचे कोपें लाल सजल ते नेत्र मला स्मरती ॥ चाल ॥ या काननभागीं सिकता भिजली दिसे ॥ या मागें गेली मानूं जरि मी असें ॥ उठल्या असत्या नितंबभारें ॥ लाल चरणपंक्ती ॥ परि चिन्हे तीं दिसति न कोठें या भागावरतीं ॥१॥
( पुढें पाहून हर्षानें ) आहा ! ही मात्र चांगली खूण सांपडली. इच्यावरून ती कुणीकडे गेली, याचं अनुमान करतां येईल.

पद ( चाल मागील )
ती त्वरित गतीनें जातां रागाउनी ॥ नयनाश्रु भिजविती अधरपुटां, तेथुनी ॥ रंग तयांचा घेउनि ते स्तनवसनावरि गळती ॥ दिसे वसन तें शुकोदरापरि ध्यावें तरि हातीं ॥१॥
हर हर ! हें तर कोवळं गवत ! आणि याच्यावर हे इंद्रगोपकीटक बसले आहेत. व्यर्थ फ़सलों ! ( इकडे तिकडे पहात ) या निर्जनवनांत माझ्या प्रियसखीचा शोध कुठून लागणार ! बरं, हा मोर पर्वतशिखरावर बसून, उंच मान करून मेघाकडे पहात आहे, याला विचारावं. हे नीलकंठा ! माझी मृगनयना प्रिया या वनांत कुठें तुझ्या दृष्टीस पडली कांरे ? अरे हा तर प्रश्नाचं उत्तर न देतां आनंदानं नाचूं लागला ! समजलों याच्या आनंदाचं कारण काय तें.

पद ( निपजे नारायण रविवंशी )
सुंदर काळा कलाप याचा मंदवायुनें हा हाले ॥ कांता जातां प्रतिपक्षाला कोणि न याच्या उरलें ॥ विगलित झाली जी रतिकालीं वेणी सखिची जींत फ़ुलें ॥ तत्करिं बघतां जरि तरि करितां काय शिखी हा नकळे ॥ परि तें सर्वचि कीं फ़सलें ॥ म्हणुनि स्फ़ुरण यास आलें ॥१॥
तर दुसर्‍याचं दु:ख पाहून आनंदानं नाचणारा हा, याला विचारून कांहीं फ़ळ नाहीं. ( दुसरीकडे पाहून ) हां ! ही कोकिला ग्रीष्मकाळ सरत आल्यामुळें अधिक उन्मत होऊन या जांभळीच्या झाडावर बसली आहे. सर्व पक्ष्यांत हिची जात शहाणी असं म्हणतात. तर हिची प्रार्थना करूं.

पद ( वाडवडिला )
स्मरदूती तुज म्हणती कामी ॥ बहु चतुरा तूं ऐशा कामीं ॥१॥
मानी स्त्रीचा मान हराया ॥ तुजविण दुसरें साधन वाया ॥२॥
जाउनि येथें आण सखीसी ॥ अथवा मजला ने तिजपाशीं ॥३॥
( ऐकलेंसें करून ) काय म्हणतेस ? तिची तुझ्यावर इतकी प्रीति असतां ती तुला कशी सोडून गेली ? ऐक.

साकी
प्रीति असोनी कोपे ती परि कारण मज आठवेना ॥ सत्ता स्त्रीची पतिवरि मोठी, त्याचा दोष नसेना ॥ सोडुनि रागानें ॥ -
काय ! ही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच नादांत निमग्र झाली ! हर हर ! “ परदु:ख शीतल ” ही म्हण सर्वथैव खरी आहे. कारण माझ्या विनवणीचा अनादर करून,

दिंडी
अधरमधुचा स्वाद कीं घ्यावयाला ॥ अर्धपक्का या जंबुच्या फ़ळाला ॥ धरी वदनीं मदमत्त कोकिला ही । कींव माझी कांहींच येत नाहीं ॥१॥
असो. हिचा स्वर माझ्या प्रियेच्या स्वरसारखा मंजुळ आहे, म्हणून हिच्यावर कोप करीत नाहीं. आपणच इथून दुसरीकडे जावं झालं. ( फ़िरता फ़िरता ऐकलेंसें करून ) अरे ! या दक्षिणेकडून नूपुरांचा शब्द ऐकूं येतो. माझी प्रिया चालली आहे वाटतं. तर - ( पाहून ) अरे अरे ! पुन: फ़सलों. मेघांनीं सर्व दिशा कृष्णवर्ण झाल्या असं पाहून, हे हंस मानससरोवराकडे निघाले आहेत. त्यांचा शब्द हा ! हे उडून गेले नाहींत तोंपर्यंत यांच्यापैकी कुणावर तरी विचारून पहावं.

पद ( गुणगंभिरा तूं गुणिरे )
सांगुनी सुखकर वार्ता सखिची दु:खितासी ॥ हंसवरा जाई मग तूं आपुल्या स्थलासी ॥ तोंवरी पंकजनाल मुखीचें ठेवि खालीं ॥ थोर दया स्वार्थाहुनि बा वाटते सतांसी ॥१॥
अरे, हा जाण्याच्या गडबडींत मीं तिला पाहिली नाहीं असं म्हणतो. ( हंसास ) पाहिली नाहीं म्हणतोस, तर मग चोरा ! तिची विलासगति तुला कुठून मिळाली ? हें पहा, आतां मुकाट्यानं माझी कांता मला परत दे. नाहीं तर - ( हंसून ) चोराला दंड करणारा हा राजा आहे, असं समजून हा बेटा उडून गेला ! असो हा चक्रवाक् पक्षी आपल्या प्रियेजवळ बसला आहे; यावर विचारावं. चक्रावाका, माझी प्रिया कुठें पाहिलीस ? हा तर क: क: असं विचारतो ! यावरून मी कोण तें याला ठाऊक नाहीं वाटतं. चक्रवाका ऐक -
अंजनीगीत.
माझा मातामह तो सविता ॥ जनकहि तैसा शशि मत्ताता ॥
धरा उर्वशी दोघी कांता ॥ त्यांनीं मज वरिलें ॥१॥
अरे, हा तर स्वस्थ बसला ! बरं. याचे थोडी निंदा केली पाहिजे. चक्रवाका,

पद ( रामराय राज्याचा )
तुम्हां उभयतांमध्यें येतां, आड पान कमलाचेम ॥ स्त्रीसाठीं तूं तळमळ करिसी, स्मरण न कां त्याचें ॥१॥ स्नेहें सखिच्या धैर्य तुझेंबा, जाय गळूनि साचें ॥ जाणुनि हें कां वृत्त न वदसी, मजला कांतेचें ॥२॥
खरोखरच माझं दैवच फ़िरलं म्हणून हें असं होतं. तर दुसरीकडेच जावं. ( कांहीं पाउलें जाऊण ) अहाहा !

साकी.
भ्रमर करी गुंजारव ज्यांतुनि कमल असें हें दिसतें ॥ त्या वदनासम, अधर चावितां करि जें सीत्कारातें ॥ यातें पाहोनी ॥ जाउं कसा मी येथोनी ॥१॥
या कमळांतल्या भ्रमराला तरी विचारावं. नाहींतर तेवढीच रुखरुख राहील. हे मधुकरा, त्या माझ्या मदिरालोचनेची कांहीं वार्ता सांग. ( विचार करून ) छे ! पण ती याच्या दृष्टीस पडली नाहीं. तसं असतं तर तिच्या मुखकमलाचा सुवास सोडून या कमलाकडे हा का आला असता ? जावंच झालं इथून. ( कांहीं चालून ) अरे, हा गजराज झाडाच्या फ़ांदीवर सोंड टाकून आपल्या स्त्रीसह इथें उभा आहे. याला आपल्या प्रियेची माहिती विचारावी. ( हत्तीकडे पाहून ) परंतु घाई करून उपयोग नाहीं. कारण,

पद ( मम जिवाची )
नव पल्लव दे आणोनी ॥ आसवगंधरसाचा खासा स्वकरें मोडुनि पत्प्रियकरिणी ॥धृ०॥ खावो तरि हा आनंदानें ॥ वृत्त पुशिन मग यालागोनी ॥१॥
( कांहीं वेळ उभा राहून ) याचं खाणं झालं. आतां जवळ जाऊन त्याला मी विचारतों. हे गजश्रेष्ठा, माझी प्रिया तुझ्या नजरेस पडली ? तुला मी तिच्या खुणा सांगतों. तिचा वाणी मधुर आहे. यूथिकापुष्पाप्रमानें तिचे केश काळे आहेत. तरुणी असून सुंदर आहे. ( आनंदानें ) प्रियेचा वृत्तांत माहित आहे, असं सुचविणार्‍या याच्या गंभीर गर्जनेनं मला धीर आला. हे गजराजा, तुझ्या माझ्यांत साम्य असल्यानं तूं मला फ़ार आवडतोस, साम्य कसं म्हणशील, तर पहा.

पद ( जो जिंकुनि )
अधिनायक नृपतींचा मी ॥ तूंही अससि गजांचा स्वामी ॥धृ०॥ बहु दान सोडिसी नेहमीं ॥ तुष्ट करितों मी धनकामीं ॥१॥ तव भार्या करिणीमाजीं ॥ तैसी नारिंत सुंदर माझी ॥२॥ हें सर्व जुळे जरि नामी ॥ तुज विरह नसो स्त्रीकामी ॥३॥
गजराजा, सुखी ऐस ! मी जातों. ( थोडेंसें वळून ) - अरे हा सुरभिकंदर नांवाचा रमणीय पर्वत अप्सरांचा फ़ार आवडता आहे. तर माझी प्रिया कदाचित् इथें असल्यास पहावी. पण हा अंध:कार पडला, आतां कसं करावं. असो. या विजेच्या उजेडानं पाहूं. हर ! हर ! काय पहा दुर्दैंवाचा सपाटा ! पर्वतावर जाऊन तिचा शोध केल्याशिवाय माघारा नाहींच फ़िरणार. ( पर्वतास विचारतो. ) हे गिरिराजा, रतीप्रमाणं सुंदर अशी माझी कांता तूं कुठें पाहिलीस कां ? हा उत्तर कां बरं देतं नाहीं ! समजलो. मी दूर असल्यानं ( जवळ जाऊन )

साकी.
सर्वांगें ती कोमल सुंदर जीची ऐसी कांता ॥ रम्य वनीं या एकलि फ़िरतां पाहिलि भूधरनाथा ॥१॥
( ऐकून ) काय ! पाहिली म्हणतां ? शाबास ! तर तुम्हांला यापेक्षांहि अधिक गोड वार्ता ऐकायला मिळो. कुठें आहे तर माझी प्रिया ? ( प्रतिध्वनि ऐकून ) शिव शिव ! हा माझ्याच शब्दांछा प्रतिध्वनी ! खालीं पडतो ) हाय ! हाय ! फ़ारच थकलों. या नदीच्या कांठीं तरी जाऊन बसावं; म्हणजे तिच्या तरंगावून येणार्‍या गार वार्‍यानं जरा बरं वाटेल. ( तसें करून ) ही नवीन पाण्यानं गढूळ झालेली नदी पाहून, मला असं वाटतं कीं,

पद ( केलीस अशी )
धरुनि रूप सरितेचें तीच जातसे ॥ माझा अपराध गणुनि दोष देतसे ॥धृ०॥ भ्रूभंगासम तरंग दिसति हे मला ॥ पक्ष्यांची पंक्ति गमे कटिस मेखला ॥ धवल फ़ेन हाचि शुभ्र शालु नेशिला ॥ गळतां तो गडबडिनें सावरीतसे ॥१॥
तर हिची प्रार्थना केली पाहिजे. ( हात जोडून ) प्रिये, माझ्यावर कां इतका राग बरं ?

पद ( त्या मदन मनोरम रूपीं )
तुजवरी प्रेम बहु केलें ॥ बोलोनि मधुर सुखवीलें ॥ तव वचन कधिं न भंगीलें ॥ वांकडे मनीं नच आलें ॥ चाल ॥ अपराध काय मग घडला ॥ तो प्रिये तुज न आवडला ॥ म्हणुनि या दीन दासाला ॥ विरहिं लोटिलें ॥ वद तुला कसें हें रुचलें ॥१॥
बोल बोल. कां बरं बोलत नाहीं ही ! अथवा ही खरीच नदी ! उर्वशी असती तर मला सोडून समुद्राला भेटायला कधीं गेली नसती. असो. आपण आतां खिन्न न होतां उत्साह धरावा. कारण उत्साहानं कल्याण होत असं म्हंणतात. जावं तर, माझी प्रिया ज्या प्रदेशांत नाहींशी झाली तिकडेच जावं. ( कांहीं चालून ) इथें हा हरिण बसला आहे, याला पाहून

अंजनीगीत.
बनशोभा ही पहावयला ॥ काननक्ष्मी सोडी याला ॥ काय तियेचा कटाक्ष काळा ॥ ऐसें मज वाटे ॥१॥
( पाहून ) अरे ! हा माझी अवज्ञा करायलाच तोंड फ़िरवून बसला वाटतं ! छे, छे !

अंजनीगीत.
येतां इकडे हरिणी, तिजसी ॥ बालक झोंबे स्तन प्यायासी॥ वळूनि तिजवरी दृष्टी ऐसी ॥ लावी एकाग्रें ॥१॥
हे हरिणा, तुझ्या प्रियेप्रमाणंच दीर्घलोचना अशी माझी प्रिया या वनांत तूं कुठें पाहिलीस कां ? तो प्रियेकडेच पहातो आहे, माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीं. बरोबर आहे. ज्याचं दैव फ़िरलं त्याचा असा अपमान व्हायचाच. दुसरीकडे जावं. ( कांहीं चालून ) तिच्या मार्गाची खूण सांपडली ! हाच तो रक्तकदंब. याचंच शेवटाच्या भराचं अर्धं उमललेलं पुष्प प्रियेनं त्या दिवशीं वेणींत  ( एकदम पाहून ) अरे ! या दगडाच्या कपारींत तांबड काय बरं चकाकतं आहे. सिंहानं मारलेल्या हत्तीचं मांसखंड नव्हे, निखाराही नव्हे, कारण नुकतीच या वनांत सर्वत्र वृष्टी झाली आहे. हां ! समजलो, तांबड्या अशोकाच्या पुष्पगुच्छाप्रमाणं हा मणी आहे व तो घ्यायला सूर्यानें आपला हात सरसावलेला दिसतो. आपणच घ्यावा तर.
( थांबून ) पण काय करायचा घेऊन ?

साकी.
त्या सुंदरिच्या वेणीमाजीं मंदराच्या कुसुमीं ॥ शोभा देतां परि दुर्लभ ती झाली मग याला मी ॥ घेउनि अश्रूंनीं ॥ टाकुं कशाला मळवोनी ॥१॥
( मागें फ़िरतो. इतक्यांत पडद्यांत ) घे, घे वत्सा.

ओवी.
गिरिजाचरणरक्तिमेपासोनी ॥ झाला जो हा संगमनीय मणी ॥
धारण करील त्यालागोनी  ॥ प्रियजन भेटे सत्वरी ॥१॥
राजा -- हा कुणाचा बरं उपदेश ? ( पाहून ) या मृगसंचारी मुनिमहाराजांची ही कृपा वाटतं. भगवान् ! हा माझ्यावर आपला प्रसादच झाला. ( मणी घेऊन ) हे संगमनीय मणे,

पद. ( कान्होबा संभाळरे )
जरि त्या सुंदरिची ॥ तव संगें ॥ होइल भेटी मजला ॥१॥
तरि मी वाहिन रे ॥ भूषणसा ॥ मस्तकिं माझ्या तुजला ॥२॥
जैसा शंकर तो ॥ शिरिं धरितो ॥ द्वितियेच्या चंद्राला ॥३॥
( इकडे तिकडे फ़िरून ) ही लता पुष्परहित असतां हिच्यावर माझं मन कां बरं वेधलं ? अथवा ठीकच आहे. कारण

पद. ( धनहीन असा होय सखे )
चरणीं मी लीन तरी दोर सारुनी ॥ आली या काननिं ती प्राणमोहिनी ॥धृ०॥ मेघजलें पल्लव हे आर्द्र जाहले ॥ धुतले जणु अधर तिचे अश्रु वाहुनी ॥१॥ कुसुमकाल जाय म्हणुनि कुसुमशून्य ही ॥ अलंकाररहित दिसे तीच भामिनी ॥२॥ श्रवणिं न ये भ्रमरांचा शब्द मधुर तो ॥ खिन्न मनें बैसलि कीं मौन सेवुनी ॥३॥
असो. पण ज्या अर्थीं ही लता माझ्या प्रियेसारखी दिसते, त्या अर्थीं हिला आलिंगन दिलंच पाहिजे. ( लतेस आलिंगन देतो. तत्क्षणींच लतेची उर्वशी होते. तिचा स्पर्श होतांच ) अहाहा ! उर्वशीच्या आलिंगनानं जें सुख व्हायचं, तेंच मला या लतेच्या आलिंगनापासून होतं, हें काय बरं ! ही उर्वशी तर नसेल ? छे पण, विश्वास येत नाहीं. कारण

दिंडी.
तिच्याविषयीं कल्पना जी करावी ॥ क्षन न जातां सर्व ती विफ़ल व्हावी ॥ म्हणुनि सहसा नुघडीन नेत्र आतां ॥ असा राहिन मानोनि हीच कांता ॥१॥
( हळूच डोळे उघडून ) अरे ! ही खरीच माझी प्रिया !
उर्व० : ( अश्रु पुसून ) महाराजांचा जयजयकार !
राजा :

साकी.
तव विरहाच्या गाढ तमीं मी बुडलों असतां कांते ॥ दैवें मजला लाभलीस जसि मृता चेतना येते ॥१॥
उर्व० : महाराज, मला हें शरीर जरी नव्हतं, तरी अंत:करणानं मला आपला सर्व वृत्तांत समजला आहे.
राजा : जरी हें शरीर नव्हतं, तरी अंत:करणानं समजला म्हणजे ?
उर्व० : तें मी सांगतें, पण महाराज,

पद. ( बाला प्रति करो )
मनिं कोप नका ठेवूं हे महाराज ॥ विनती ही या पदिं आज ॥धृ०॥ हे हाल असे, केले मी कोपुनी ॥ तुम्हां सोडुनी ॥ गेलें हो ॥ काहिं नसुनि काज ॥१॥
राजा : विनंति कसली ! भलतंच. उलटं तुझ्या कल्याणदायक दर्शनानं मी प्रसन्न झालों आहें. पण प्रिये तूं मला सोडून एकटी इतके दिवस कशी राहिलीस बरं ?
उर्व० : ऐकावं महाराज. अखंड ब्रह्मचर्यव्रत धरून

पद. ( एकट्या मल्हारराया )
सुगंधमादनगिरिशेजारी ॥ अकलुष नामक भागावरि ॥ स्वामी कार्तिक वसती करी ॥ करि एक नियम जी येथें ॥ येइल नारी ॥ त्या समयिंच लतिका होइल ती निर्धारीं ॥१॥

अंजनीगीत.
या नियमाचें गुरुशापानें ॥ स्मरण न झालें यायोगानें ॥ होतें मी लतिकारूपानें ॥ आजवरी येथें ॥१॥
राजा : प्रिये, आतां सर्व जुळलं. कारण

पद ( आले वनमाळी रात्रीं )
होतां रतिखेद सखे, निजलों मी शयनिं जरी ॥ होत असे दु:ख तुला, गेलों मी म्हणुनि दुरीं ॥ भीरु असुनि इतुकी तूं, घोरवनीं आजवरी ॥ दीर्घविरह सोसुनियां, राहिलि नसतीस खरी ॥१॥
असो. तूं सांगितलंस तसंच झालं. या मण्याच्या योगानं तुझा पुन: संगम घडेल असं एका मुनींनीं सांगितल्यावरून मी हा मणि घेतला.
उर्व० : अग बाई ? हाच कां तो मणी ! ( मस्तकावर धरिते. )
राजा : प्रिये, अशीच एक क्षणभर उभी रहा. अहा !

पद. ( सुविहित जहालें )
तव शिरिं धरितां प्रिये सुमणि हा, कांति मुखीं कशि रुचिर पसरली ॥धृ०॥ वदन दिसी जणु कमलचि ज्यावरि, बालरवीची छबिच विलसली ॥१॥
उर्व० : महाराज.

पद. ( प्राणीपति अजुन नये )
जाउं चला नगरा ॥ आतां ॥ झाले बहु दिन इकडे येऊन यास्तव परतुन ॥ नाथा ॥धृ०॥ प्रजाजनांचा मजवरि सारा ॥ दोष असेल खरा ॥१॥
राजा : चला. आपली आज्ञा होईल तसं वागायचं.
उर्व० : महाराजांच्या मनांतून कसं जायचं आहे ?
राजा :

पद. ( किती तरी पहाटेची वेळ )
नेइं मला नवमेघावरि बसवुनि राजमंदिरीं ॥धृ०॥ चपलाध्वज ज्यावरचा ॥ झळके बहु तेजाचा ॥ चित्ररंग सुरधनुचा ॥ रम्य ज्यावरी ॥१॥
( पडदा पडतो. )

अंक ४ था समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP