संगीत विक्रमोर्वशीय - अंक दुसरा

सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.


( विदूषक प्रवेश करितो. )
विदूषक : काय करावं ! परान्नलंपट ब्राह्मणाचं अधाशीपणाचं पोट फ़ुगून जसं फ़ुटायच्या बेताला येतं, तसं राजरहस्यानं माझं पोट फ़ुटून जाईल कीं काय असं वाटतं. जीभ तरी किती आवरून धरूं ! बरं तर, आतां असं करतों. माझा मित्र राज्यकारभार आटपून येईपर्यंत या देवच्छंद नामक प्रासादावर निर्वातसा जाऊन बसतों. म्हणजे तिथें फ़ारशीं मनुष्यें नसल्यामुळें माझ्याशीं कुणी बोलायचं तरी नाहीं.
( तदनंतर निपुणिका चेटी प्रवेश करिते. )
निपुणिका : सूर्योपस्थान करून महाराजांची स्वारी परत आली, त्या दिवसापासून महाराजांचं मन अगदीं उदास झालं आहे. तर हें कुणाच्या उत्कंठेनं ! हें त्यांचा प्रियमित्र माणवकभट त्याच्यापासून हळूच युक्तीनं काढून आण, अशी मला काशीराजकन्या राणीसाहेबांनीं आज्ञा केली आहे. हें त्या भटुर्ग्यापासून कसं बरं काढून घ्यावं ? ( किंचित् विचार करून ) हात्तिच्यारे ! यांत मेला इतका विचार तो कशाला पाहिजे ? कारण, गवताच्या पातीवर दहिंवराचा बिंदु जसा क्षणभरही ठरत नाहीं. तसं तें राजरहस्य फ़ार वेळ कांहीं त्याच्या पोटांत रहायचं नाहीं. बरं तर, त्याचा आतां शोध करतें. ( इकडे तिकडे फ़िरून व विदुषकास पाहून. )  तो पहा माणवकभट आपल्याच मनाशीं काहीं पुटपुटत बसल आहे. अहाहा !! काय दिसतोय पण. जसं कांहीं एखादं चित्रांतलं माकडच !! ( जवळ जाऊन नमस्कार करिते ) आर्या मी नमस्कार करितें.
विदूषक : ( त्रासानें ) कल्याण कल्याण. ( आपल्याशीं ) या दुष्ट चेटीला पाहून तें राजरहस्य माझं हृदय विदारून बाहेर येतं कीं काय असं वाटतं. ( उघड ) निपुणिके तूं आपलं गायचं, नाचायचं काम सोडून कोणीकडे या निघालीस ?
निपुणिका : भटजीबुबा, राणीसाहेबांच्या आज्ञेवरून इकडेच आले आहे.
विदू० : असं काय ! राणीसाहेबांची काय आज्ञा आहे बरं ?
निपु० : बाईसाहेबांचं असं म्हणणं आहे कीं, आपली मजवर निरंतर ममता असल्यामुळें मला काहीं दु:ख्ह होत असतां आपण कांहीं माझी उपेक्षा करणार नाहीं.
विदू० : निपुणिके, माझ्या मित्रानं राणीसाहेबांच्या मनाला वाईट वाटेल असं कांहीं आचरण केलं कीं काय ?
निपु० : दुसरं कांहीं नाहीं, ज्या स्त्रीची महाराजांना उत्कंठा लागलेअए आहे, तीच ही, असं समजून तिच्या नांवानं त्यांनीं राणीसाहेबांना हाक मारली.
विदू० : हं ! एकूण ह्या राजेश्रींनीं आपलं रहस्य आपणच फ़ोडलं वाटतं ! मग मी तर भट ! मला आपली जीभ कशी आवरणार ? ( निपुणिकेस ) काय राणीसाहेबांना माझ्या मित्रानं उर्वशी म्हणून हांक मारली कां ? तर मग आतां खरं सांगतों. हें पहा, तो केवळ राणीसाहेबांनाच दु:ख देतो असं समजूं नकोस ; मला देखील त्याच्यापासून अलीकडे फ़ार पीडा होते. कारण माझ्याश्सीं कधीं थट्टा नाहीं, मस्करी नाहीं, हंसणं नाहीं, कांहीं नाहीं ! रात्रंदिवस तिचा निजध्यास !
निपु० : ( आनंदानें ) शाबास ! ह्या राज्यरहस्यरूपी किल्ल्याचा तर मी भेद केलाच. ( उघड ) तर मग भटजी, राणीसाहेबांना जाऊन काय सांगूं ?
विदू० : निपुणिके राणीसाहेबांना, माझी अशी विनंति सांग कीं, जेव्हां ह्या मृततृष्णेपासून मी माझ्या मित्राला माघारा फ़िरवीन तेव्हांच हें तोंड आपल्याला दाखवीन.
निपु० : बरं, कळवितें तर असें. ( जाते. )
( पडद्यांत स्तुतिपाठक स्तुति करतात. )
महाराजांचा विजय असो :-

गद्य.
अधिकार तुझा, तेवि त्या तेजोनिधि सवित्याचा, समचि आम्हीं मानितों भूमिकांता ॥ करिसि विध्वंस तूं प्रजाजन कुमति तिमिराचा, रविहि पळवी घोर तमासि दिगंता ॥ दिवसाच्या षष्ठभागीं क्षणभरि घेत विश्राम तो, तूं हि त्या समयीं स्वच्छंदें आनंदविसी स्वाता ॥१॥
विदू० : हा पहा माझा मित्र राज्यकारभार आटपून इकडेच येत आहे, तर आतां त्याच्या जवळ जावें. ( नंतर उत्कंठित झालेला राजा प्रवेश करतो. )
राजा -

पद ( कोन जाय ब्रिजमो० )
पाहिली त्या क्षणिंच शिरे ॥ हृदयमंदिरांत कशी ॥ दिव्य सुंदरी ॥धृ०॥ नेम चळेना त्या मदनाचा । पाडी तो तीव्रशरें ॥ छिद्र या उरीं ॥१॥ त्या मार्गें ती गेली वाटे ॥ न कळे कां देत असा ॥ ताप अंतरीं ॥२॥
विदू० : ( मनांत ) त्या बिचार्‍या राणीला जी पीडा होत आहे, ती खरी आहे.
राजा : मित्रा, तूं तें रहस्य गुप्त ठेवलं आहेस ना ?
विदू० : ( मनांत ) म्हणजे ! हा ज्या अर्थीं मला असं विचारतो, त्या अर्थीं ही गोष्ट याच्याकडून फ़ुटली नसावी. एकूण त्या लबाड चेटीनं मला फ़सविलं म्हणायचं तर मग ?
राजा : ( शंकित होऊन ) कां ? प्रश्नाचं उत्तर दिलं नाहींस ?
विदू० : अशी - अशेसे मी आपली जीभ आवरून धरली आहे कीं तुला देखील एकदम उत्तर दिलं नाहीं.
राजा : शाबास ! असंच पाहिजे. पण माझं मन उद्विग्न झालं आहे, तें कोणत्या उपायानं स्वस्थ होईल बरं ?
विदू० : चल, स्वयंपाक घरांत जाऊं.
राजा : तिथेरे कशाला ?
विदू० : कशाला म्हणजे ? तिथं नानाप्रकारची पक्वान्नं तयार करून ठेविली आहेत. त्यांतले एक दोन लाडू म्हण, दोन मोदक म्हण, खाल्लेस म्हणजे झालं.
राजा : मित्रा, ते पदार्थ खाऊन तुझ्या मनाल अमात्र स्वस्थता येईल. परंतु मला जी वस्तु पाहिजे ती फ़ार दुर्मिळ आहे. ती मिळाल्यावांचून माझ्या मनाला कशी बरं स्वस्थता येईल ?
विदू० : बरं, मी तुला असं विचारतों कीं, तूं त्या उर्वशीच्या कधीं दृष्टीस पडला आहेस का ?
राजा : हो, पडलों आहें, मग ?
विदू० : तर मग ती तुला मुळींच दुर्मिळ नाहीं.
राजा : ( मनांत ) याचं म्हणणं पक्षपाताचं आहे. (  उघड ) मित्रा, पण ती इतकी रूपवती आहे, कीं तिच्या रूपाला दुसरी उपमाच नाहीं.
विदू० : तूं तिचं इतकं वर्णन करतोस, म्हणून मी तुला विचारतों कीं मी बसा अद्वितीय कुरूप तशी ती अद्वितीय सुंदर आहे का ?
राजा : तुला काय सांगूं मित्रा ? ती इतकी रूपवती आहे की तिच्या संपूर्ण अवयवांचं वर्णन करणं तर माझ्या हातून व्हायचंच नाहीं, पण थोडक्यांत सांगतों. ऐक :

पद ( कसें मी मारू, माझे नवलाचें० )
आभरणाचें ॥ आभरण होय ती साचें ॥धृ०॥ जीं जीं शोभाद्रव्यें तयां ॥ शोभा देत तिची ती काया ॥ उपमानांचें ॥ उपमान जाण वपु तीचें ॥१॥
विदू० : म्हणूनच बरं ! त्या सुरांगनेच्या नादी लागून तूं हें चातकाचं व्रत धरलंस ?
राजा : म्हणजे काय रे ?
विदू० : म्हणजे,  मेघजलाच्या आशेनं चातक जसा वर मान करून मेघवृष्टीची वाट पाहत बसतो, तसा तूं त्या उर्वशीची आशा धरून बसला आहेस.
राजा : कांहीं म्हण मित्रा, पण उर्वशीची उत्कंठा फ़ार लागल्यानं मला फ़ारशा एकांतावांचून चैन पडायचं नाहीं. मला प्रमदवनांत घेऊन चल.
विदू० : ( मनांत ) करतां काय, गेलं पाहिजे, इलाज नाहीं. ( उघड ) असं इकडून यावं महाराज. हा दक्षिणेकडून किती गार वारा येत आहे. मला वाटतं कीं आपण येणार म्हणून त्या प्रमदवनानं आपला आदर करण्याकरितांच याला सामोरं पाठविलं असावं.
राजा : ( हंसून ) मित्रा, तुझा तर्क बरोबर आहे. तसंच, या वायूला दक्षिणवायु हे नांव अगदीं योग्य आहे. कारण:-

अंजनीगीत.
पुष्पकालिं हा मधुलतिकेला ॥ सिंचन करुनी सुखवी तिजला ॥ लावी नुसतें डोलायाला ॥ कुंदलतेला या ॥१॥ सत्य प्रेमा एकीवरती ॥ दावि दुजीवरि लटकी प्रीती ॥ पाहुनि ऐसें वाटे कामी हा साचा ॥
विदू० : महाराज, आपलंहि वर्तन सध्यां या वायूप्रमाणेंच आहे. ( इकडे तिकडे फ़िरून ) महाराज, हेंच प्रमदवनाचं द्वार. चलावं आंत.
राजा : अगोदर तूंच हो पुढें. ( दोघे आंत जातात. ) मित्रा, प्रमदवनांत गेलों असतां माझी व्यथा कांहीं तरी कमी : होईल असं वाटत होतं. पण नदीच्या ओघांत सांपडलेल्या मनुष्याला उलट पोहून जाण जसं कष्टदायक होतं, तसं माझं इथं येणं झालं.
विदू० : तें कसं बरं ?
राजा : ऐक :-

साकी
वांछी दुर्लभ वस्तुस मन जें, आधिंच मदनें झुरतें ॥
तशांत पानें गळलीं ऐशा आम्रतरूचे बघ ते ॥
अंकुर नव दिसती ॥ पीडा दु:सह मज देती ॥
विदू० : हें पहा, आतां उगीच दु:ख करूं नकोस. थोडक्याच वेळांत प्रत्यक्ष मदन तुला साह्य होऊन तुझा इष्ट हेका पूर्ण करील.
राजा : मी या ब्राह्मणवचनाचा मोठ्या आनंदानं स्वीकार करितों.
विदू० : मित्रा, वसंतकाळ समीप आला, असं सुचविणारी या प्रमदवनाची शोभा तरी पहा. किती रमणीय दिसते ती !
राजा : ती तर मला प्रत्येक वृक्षाच्या ठिकाणीं दिसते, हें पहा :-

पद ( परम सुवासिक पुष्पें० )
कोगटीची कलिका वरती स्त्रीनखसम आरक्त असे ॥ तैसी दोहों बाजुंस खालीं श्यामवर्ण बहु रम्य दिसे ॥१॥ अशोक तरुची बाळकळी ही तांबुस सुंदर फ़ुललि नसे ॥ अल्प रजांनीं युक्त सुकोमल आम्रमंजरी ही विलसे ॥२॥ या उद्यानीं शोभा ऐसी पाहुनि मजला वाटतसे ॥ बाल्य तरुणपण या दोहोंच्या मधें मधुश्री शोभतसे ॥३॥
विदू० : अरे मित्रा, ही पहा इथं वासंतीलतेची मंडपाकार कशी सुरेख जाळी आहे. तिच्या अंतल्या बाजूला तो इंद्रनीलमण्याचा चौरंग आहे, आणखी त्यावर भ्रमरांच्या संघट्टनानं हीं पुष्पं गळून पडलीं आहेत, पहा. हा सर्व थाट पाहून हें प्रमदवन आपलीच वाट पाहत आहे कीं काय असं वाटतं. तर मित्रा, याच्यावर अनुग्रह कर.
राजा : बरं तर ( असें म्हणून बसतो. )
विदू० : हां, आतां इथें स्वस्थ बसून या रम्य लतेकडे दृष्टि लाव, आणखी उर्वशीविषयींची जी तुझ्या मनांत उत्कंठा आहे, ती घालीव कशी.
राजा : ( श्वास सोडून ) छे मित्रा, काय सांगतोस हें !

अंजनीगीत
दिव्य रूप तें बघुनि तियेचें ॥ नयनां लागे वेडचि साचें ॥
मग लतिका ही पाहुनि त्यांचें ॥ रंजन केवि घडे ॥१॥
तर ती मला पुन: दिसेल असा एखादा उपाय सांग.
विद० : मी उपाय सांगूं ? व: अहिल्येवर लंपट झालेल्या इंद्राचं वज्र आणि उर्वशीवर लंपट झालेला तुझा मी, हे दोघेही असल्या कामांत अगदीं निरुपयोगी.
राजा : अरे, तूं माझा प्रिय मित्र असल्यामुळें तुला कांहीं तरी उपाय सुचेल म्हणून म्हणतों.
विदू० : पहातों सुचतो का. पण तूं असलं रडगाणं लावून माझ्या समाधीचा भंग करणार नाहींस तर पाहतों>
राजा : नाहीं करीत, झालं.
विदू० : मग हा बसलों विचार करीत. ( डोळे मिटून बसतो. )
राजा : हा माझा दक्षिण बाहू कां बरं स्फ़ुरूं लागला ?

पद ( परिणिले न मुनिकन्येला० )
नच साध्य होय सुरललना ॥ मज ठावें ती शशिवदना ॥ करुं कसें ॥धृ.॥ परि मदनविचेष्टित देतें ॥ आनंद बहुत चित्तातें ॥ हें कसें ॥ कां इष्टफ़लाची होते ॥ प्राप्ति हें मला उमजेना ॥ करुं कसें ॥१॥
( इतक्यांत विमानांत बसून चित्रलेखा व उर्वशी येतात. )
चित्र० : सखे, कांहीं कारण सांगितल्यावांचून निघालीस तरी कुणीकडे तूं ?
उर्वशी : अग, त्या हेमकूट पर्वतावर एका वेलीला माझी माळ गुंतली तेव्हढी सोडीव, असं मीं तुला म्हटलं, त्या सरशीं ‘ छे बाई ! ही फ़ार बळकट गुंतली आहे, माझ्यानं नाहीं सुटायची ’ असं म्हणून माझी थट्टा केलीस, नि आतां असं विचारतेस का ?
चित्र० : अस्सं अस्सं ! समजलें. त्या पुरूरव राजाकडे चाललीस होय ?
उर्वशी : होय. पण हें माझं करणं निर्लज्जपणाचं वाटतं बाई !
चित्र० : अग, पण तूं येणार म्हणून कळवायला पुढं कुणाला पाठिवलं आहेस ?
उर्वशी : कुणाला म्हणजे ? मी आपल्या मनाला पाठिवलं आहे.
चित्र० : पण तिकडे जाण्यापूर्वीं नीट विचार कर हो. इतकी उतावळी होऊं नकोस.
उर्वशी : अग, उतावळी कसली आणि विचार तो काय करायचा ? मी आपण होऊन कां जातें पण तो मदन मला ओढून नेतो आहे. मी तरी काय करूं बरं !
चित्र० : झालं, यापुढं बोलणंच खुंटलं.
उर्वशी : तर मग गडे, मी तिकडे जातांना वाटेंत कुठ्ठं विघ्न येणार नाहीं असा मला मार्ग दाखीव.
चित्र० : अग, त्याची तुला काळजी नको. आम्हांला दैत्यांपासून पीडा होऊं नये म्हणून भगवान बृहस्पतींनीं ‘ अपराजिता ’ नांवाची शिखाबंधिनी विद्या सांगितली आहे ना ? मग कां भितेस ?
उर्व० : खरंच गडे, त्याची मला आठवणच नव्हती.
चित्र० : सखे, आम्हीं कुठं आलों पाहिलंस कां ? गंगायमुनेच्या पवित्र संगमांत प्रतिबिंब पडलं आहे तें, तें राजमंदिराचंच. या प्रतिष्ठान नगरीचं तें शिरोभूषणच दिसतं नाहीं ?
उर्व० : खरंच गडे ! हें स्थान म्हणजे मध्यलोकचा स्वर्गच, असं मला वाटतं. पण दीनावर दया करणारा तो राजर्षि कुठं असेल बरं ?
चित्र० : नंदनवनासारखं हें प्रमदवन दिसत आहे, त्यांत जाऊन पाहूं चल, म्हणजे समजेल. ( जातात. ) सखे, हा पाहिलास का ? नुकताच उदय पावलेला चंद्र चंद्रिकेची अपेक्षा करितो, तसा हा राजा तुझीच अपेक्षा करीत बसला आहे.
उर्व० : ( पाहून ) गडे ! मागं पाहिला होता त्यापेक्षां हा राजा आज मला खरच सुंदर दिसतो.
चित्र० : अग, दिसायचाच ! चल तर आतां जवळ जाऊं.
उर्व० : नको बाई ! मी अगोदर गुप्त रूपानं उभी राहून महाराजांचा नि माणवकभटाचा कायसा एकांत चालला आहे, तो ऐकतें.
चित्र० : बरं तर. तसं कर. ( दोघीही आड उभ्या राहतात. )
विदू० : मित्रा, सुचला उपाय. तुझी प्रिया तुला कशेसे दिसेल, याचा मला उपाय सुचला.
उर्व० : महाराजांना इतकी उत्कंठा लागली असून अजून त्यांचा अंत पाहणारी अशी कोण बरं भाग्यवान स्त्री ही ?
चित्र० : गडे, असं मध्यलोकच्या माणसासारखं काय विचारतेस ती. अंतर्ज्ञानानं पहा, म्हणजेअ समजेल कोण ती.
उर्व० : मला बाई तसं करायची भीति वाटते. माझ्याशिवाय दुसरीच कोणी असली म्हणजे उगीच --
विदू० : मित्रा, उपाय सुचला म्हणतो ना ?
राजा : कोणता तो सांग, सांग पाहूं.
विदू० : ऐक, तूं आतां सडकून झोंप घे, म्हणजे स्वप्नांत तिचा आणि तुझा समागम होईल; हा एक. अथवा त्या उर्वशीची एका चित्रपटावर सुंदरशी तसबीर काढून तिच्याकडे एकसारखा पहात बैस, हा दुसरा.
उर्व० : ( आनंदानें ) मना, थोडा धीर धर; इतकी घाई करूं नकोस.
विदू० : कां ?
राजा : छेरे मित्रा ! हे दोन्ही उपाय व्यर्थ आहेत.
ठुंबरी ( गोकुलसे श्याम० )
स्मरबाण सलति हृदयांत सदा ॥ मज झोंप नये पळ एक कदा ॥धृ०॥ स्वप्नीं संगम मग कोठुनि तो ॥ काढावी जरि चित्रपटीं ॥ अश्रुजळें नच खळती मित्रा ॥ दृष्टि होत ही अंध तदा ॥१॥
चित्र० : सखे, ऐकलंसना हें ?
उर्व० : होय बाई, पण अजून मनाची तृप्ति नाहीं झाली.
विदू० : झालं तर मग ! आमची अक्कल काय ती इतकीच.
राजा : ( श्वास सोडून )

पद ( मी कुमारी ती) )
अति कठिण रोग हा माझा ॥ तिजला कां ठावा नाहीं ॥धृ०॥ अथवा ती दिव्यज्ञानें ॥ जाणतें घडे जें कांहीं ॥ मग करी उपेक्षा कांरे ॥ हे क्लेश सुखानें पाही ॥ चाल ॥ जो मनीं मनोरथ केला ॥ नेउनि तो निष्फ़ळतेला ॥ तृप्त स्मर होवो, मजला ॥ विरहाच्या लोटुनि डोहीं ॥१॥
चित्र० : गडे ऐक.
उर्व० :

पद ( रूके मारे गैलबा० )
मजसि मानितात अशी ॥ सखे करूं काय ग ॥धृ०॥ त्या समोर जाउं कशी ॥ उत्तर तरि देउं कशी ॥ धीर होत नाहिं मजसि ॥ सखे करूं काय ग ॥१॥
तर मग आतां मी आपल्या प्रभावानं एक भूर्जपत्र निर्माण करतें नि त्याच्यावर माझ्या मनांतला उद्देश लिहून त्यांना कळवितें.
चित्र० : हो गडे ! बरी आहे ही युक्ति. लिही तर आणि टाक त्यांच्यापुढं.
( उर्वशी भूर्जपत्रावर कांहीं लिहून राजापुढें तें टाकते. )
विदू० : अरे अरे ! हें काय ! हें काय ! सापाच्या कातीसारखं काय पडलं हें !
राजा : ( हसून ) हा मूर्खा कात नव्हे, भूर्जपत्र आहे हें; समजलास ? आणि त्याच्यावर कांहीं लिहिलेलें आहे वाटतं.
विदू० : हां समजलों आतां ! इथंच कुठं तरी गुप्त रूपानं उभं राहून त्या उर्वशीनं तुझा शोक ऐकला असेल, आणखी तुझ्याप्रमाणंच माझी प्रीति आहे, अशा अर्थाचा हा लेख लिहून टाकला असेल, असा माझा तर्क धांवतो.
उर्व० : आर्या, चांगलं बोललास. तूं मोठा चतुर आहेस.
राजा : हो ! मनोरथच करायचे मग काय कमी !
विदू० : नाहीं, पण त्यांत काय लिहिलं आहे तें मला ऐकायचंय.
राजा : ( पत्र पाहून ) मित्रा, तुझा तर्क अगदीं खरा आहे.
विदू० : हं ! तर मग मोठ्यानं वाच पाहूं.
राजा : ऐक ( वाचतो ).

पद ( अभिनव मधु० )
मजवरि अनुराग तुझा तेविं तुजवरी ॥ न करीं मी, म्हणसि असें नेणतां जरी ॥धृ०॥ पारिजातकुसुमशयनिं सुख मलां नसे ॥ नंदनवनपवन तनुस ताप देतसे ॥ व्हाया हें कारण मग कोणतें तरी ॥१॥
उर्व० : महाराज आतां काय म्हणतील बरं ?
चित्र० : अग, म्हणायचं तें काय आणखी ? महाराजांचं सर्व शरीर कमलाच्या देंठाप्रमाणं सुकून गेलं आहेअ; यावरून नाहीं का समजत ?
विदु० : शाबास मित्रा ! शाबास. मी बुभुक्षित असतांना मला जसं एखाद्या पंचपक्वान्नांचं आमंत्रण मिळावं तसं तुला हें आश्वासन मिळालं म्हणायचं !
राजा : अरे, आश्वासन म्हणून काय म्हणतोस ? पहा:-

पद ( काय सखे मुद्रिके० )
किति तरि पद सुंदर हें ॥ अर्थहि केवळ मधुरस वाहे ॥धृ०॥ प्रेम समचि उभयांचें ॥ सुचविते ऐसें शब्द पदाचे ॥ अवलोकन मी याचें ॥ करितां नयनीं वाटे साचें ॥ चुंबन त्या सुंदरिचें ॥ या वदनें मी घेतचि आहें ॥१॥
उर्व० : तर मग, उभयतांची प्रीति सारखीच आहे म्हणायची.
राजा : मित्रा, हाताच्या घामानं हीं अक्षरं मळतात. तर हें भूर्जपत्र तुझ्याजवळ असूंदे.
विदू० : ( घेऊन ) ती उर्वशी हें मनोरथपुष्प तुला दाखवून, त्याचं फ़ळ देणार नाहीं म्हणतोस ? छे: असं व्हायचंच नाहीं.
उर्व० : सखे, महाराजांबरोबर बोलायचा मला धीर युईतों तूंच पुढं होऊन माझ्या मनांतलं त्यांना कळीव, म्हणजे झालं.
चित्र० : ( होय म्हणून राजापुढें होऊन ) महाराजांचा जयजयकार असो.
राजा : ( आनंदानें ) कोण ! चित्रलेखे, ये. ( तिच्या मागें पाहून ) चित्रलेखे,

दिंडी.
जान्हवीसह यमुनेस तुजसि तेवी ॥ सखीसंगें मी पाहियलें पूर्वीं ॥ हर्ष जैसा त्या समयिं मला झाला ॥ होत नाहीं तुज बघुनि एकटीला ॥१॥
चित्र० : आपण म्हणतां तें खरें. पण पहिल्यानं मेघमाला यायची, आणि तिच्या मागून वीज. वीज आधीं कशी येईल महाराज ?
विदू० : ( आपल्याशीं ) मी समजलों कीं हीच उर्वशी. पण चुकलों. ही बेटी उर्वशीची सखी !
चित्र० : महाराज, उर्वशीची आपल्याला एक विनंती आहे.
राजा : विनंति ! भलतंच ! तिची काय आज्ञा आहे ?
चित्र० : जसं पूर्वीं राक्षसांपासून आपण माझं रक्षण केलं, तसंच आपल्या दर्शनानं उत्पन्न झालेला मदन मला फ़ार ताप देतो, तर त्याच्यापासूनही माझे रक्षण करावं.
राजा : प्रियवदने !

पद ( काहीं बोलो महाराज० )
देतो ताप मदन काय ॥ उत्सुक झाली  म्हणसि सखी ती, लागुनि माझी हाय ॥धृ०॥ मीही कामाकुल तिजसाठीं, सुंदरी कां न पहासी ॥ मदनाचा हा प्रसाद, झाले तप्तचि दोन्हीं काय ॥१॥ म्हणुनि सांगतों तप्तलोह तें, तापविल्या लोहाशीं ॥ योग्य होय गे सांधायाला, हाचि एक सदुपाय ॥२॥
चित्र० : ( उर्वशीजवळ जाऊन ) सखे, तुझ्या प्रियकराची अवस्था त्या मेल्या मदनानं अगदीं तुझ्यापेक्षां भयंकर करून सोडली आहे ! तर त्याची मी दूती म्हणून सांगतें, कीं आंत जा आतां.
उर्व० : ( थोडी पुढं होऊन ) अग ! काय निर्दय आहेस ग ! मला एकटीला सोडून चाललीस ना ?
चित्र० : कशाला बोलूं ! आतां समजेल कोण कुणाला सोडून जाईल तें. पण महाराजांना नमस्कार कर जा अगोदर. ( उर्वशी जयजयकार म्हणून नमस्कार करते ).
राजा : ( अत्यानंदानें ) सुंदरी :-

साकी.
इंद्रावांचुनि जयशब्दें त्वां कवणाहि न आदरिलें ॥ आजवरी परि त्या शब्दें मज लोकीं धन्यचि केलें ॥ सखये या समयीं ॥ झालों जाण खरा विजयी ॥१॥
( तिचा हात धरून खालीं बसवितो. )
विदू० : काय ग ए ! प्रत्यक्ष राजाचा प्रियमित्र मी ! त्यांतून ब्राह्मण ! असं असून तूं मला नमस्कार करीत नाहींस काय ? आं !!
( उर्वशी किंचित् हंसून नमस्कार करते. विदूषक ‘ कल्याण. ’ असें म्हणतों इतक्यांत देवदूत पडद्यांत बोलतो )
देव० : चित्रलेखे, उर्वशीला घेऊन चल लवकर. कारण

ओवी.
अभिनयसुंदर सुरसीं भरला ॥ भरतमुनीनीं तुम्हां शिकविला ॥
प्रयोग ऐसा पहावयाला । इंद्र इच्छी देवांसवें ॥१॥
चित्र० : सखे, देवदूत काय म्हणाला तें ऐकलंसना ? महाराजांचा निरोप घे तर मग आतां.
उर्व० : माझ्या नाहीं बाई तोंडांतून शब्द निघायचा ! तूंच -
चित्र० : बरं तर मीच घेतें. ( राजास ) महाराज. उर्वशीची अशी विनंती आहे कीं, परतंत्र, म्हणून न गेलें तर इंद्राची आज्ञा मोडल्याचा दोष माझ्यावर येईल; तो न यावा म्हणून मला परत जायची आज्ञा असावी.
राजा : ( दु:खानें ) तुम्हीं आपल्या स्वामीची आज्ञा मोडावी, असं माझं म्हणणं नाहीं. इतकंच कीं, माझं स्मरण असावं.
( उर्वशी वियोगदु:ख दाखवून सखीसह निघून जाते. )
राजा : मित्रा, आतां हे डोळे असून व्यर्थरे व्यर्थ !
विदू० : अरे व्यर्थ कां ? हें पहा, ( घाबरून आपल्याशीं ) अरे हें काय झालं ! त्या उर्वशीच्या दर्शनानं मी अगदीं भांबावून गेल्यानं, माझ्या हातांतून तें भूर्जपत्र केव्हां गळून पडलं तेंसुद्धां मला समजलं नाहीं. आतां काय करावं !
राजा : अरे, अर्धाच कां थांबलास ? काय बोलणार तें बोल.
विदू० : नाहीं - मी म्हणत होतों - कीं हें पहा - तूं असा निराश होऊन हातपाय गाळूं नकोस. उर्वशीची तुझ्यावर खरी प्रीति आहे.
राजा : हो, मलाही असंच वाटतं. कारण तिनं माझ्या निरोप घेऊन जातांना

पद ( ही मुरली गुंगवी० )
मन मजला वाहिलें ॥ दुसर्‍याची तनु परि आपुलें ॥धृ० ॥ स्तनदेशीं जो हार फ़ुलांचा ॥ लोळत होता बहु भाग्याचा ॥ निश्वासें हो कंप तयाचा ॥ पाहुनि हें मी ताडिलें ॥१॥
विदू० : ( आपल्याशीं ) माझं काळीज धडधडायला लागलं आहे. कारण हे राजश्री त्या भूर्जपत्राचं नांव केव्हां काढतील कोण जाणे.
राजा : मित्रा, आतां मी या दृष्टीचं रंजन कशानं करूं ? ( आठवून ) खरंच ! तें माझ्या प्रियेनं लिहिलेलं भूर्जपत्र दे पाहूं.
विदू० : तेंच मी पाहतों आहे रे ! पण बेटं कुठं सांपडत नाहीं, काय करावं ! आहा ! - मला वाटतं तें उर्वशीच्या मागूनच उडून गेलं असावं. नाहींतर -
राजा : चल मूर्खा ! नेहमीं तुझी अशीच धांदल. पहा पहा कुठं गेलं तें. ( दोघेही शोधीत जातात. इतक्यांत राणी व निपुणिका येतात. )
राणी : निपुणिके ? महाराज व माणवकभट लतामंडपांत गेलेले मीं पाहिले, असं सांगितल्म्स तें खरंच ना पण ?
विदु० : पण बाईसाहेब, या पायांपाशीं आजपर्यंत मी कधीं तरी खोटं बोललें आहें कां ?
राणी : तर मग मी या जाळीच्या आड उभी राहून, त्यांचा काय एकांत चालला आहे तो ऐकतें.
निपु० : बरं तर बाईसाहेब.
राणी : ( पुढें होऊन ) निपुणिके, अग हें दक्षिणेकडून वार्‍यानं चिंचीसारखं काय उडत येतं आहे पहा बरं.
निपु० : ( पाहून ) बाईसाहेब, हें भूर्जपत्र दिसतं; आणि त्याच्यावर कांहीं लिहिलेलं आहे वाटतं. अगबाई ! पण हें बाईसाहेबांच्या अगदीं तोरडीलाच येऊन लगटलं ! वाचून तरी पाहूं का ?
राणी : वाच, पण त्यांत माझ्याविरुद्ध कांहीं नसेल, तर मी ऐकेन.
निपु० : ( वाचून ) बाईसाहेब, हें सगळं त्या उर्वशीचंच कौटाळ. महाराजांना उद्देशून उर्वशीनं रचलेलं पद याच्यावर लिहिलं आहे. हें बहुतकरून त्या माणवकभटाच्या हलगर्जीपणानं आपल्या हातीं लागले.
राणी : बर त्यांतला मतलब काय आहे पाहूं ? ( निपुणिका वाचते. ) आण तर - हीच भेट घेऊन मी त्या अप्सरालंपट महाराजांना जाऊन भेटतें. आण इकडं तें भूर्जपत्र.
( घेते. दोघी निघून जातात. )
विदू० : अरे तें पहा प्रमदवनांतल्या क्रीडापर्वताजवळ काय दिसत आहे. मला वाटतं तेंच तें.
राजा : हे भगवंता ! वसंतप्रिया ! दक्षिण मारुता !

पद ( वसंतीं बघुनि० )
लतिका - कुसुमपरागातें ॥ नेइ हरुनि बा, सेवाया त्या मधुर सुवासातें ॥१॥ परि वद लाभ काय तूतें ॥ सखिनें लिहिलें प्रीतिपत्र जें हरण करुनि त्यातें ॥२॥ कंठिति कामी प्राणांतें ॥ मन रमवाया संग्रहिं ठेउनि ऐशा वस्तूंतें ॥३॥
निपु० : ( येऊन ) बाईसाहेब, हें पाहिलंत ना ? त्या भूर्जपत्राचाच शोध चालला आहे १
राणी : पाहिलं ग ! उगीच रहा तूं.
विदू० : अरे फ़सलोरे फ़सलों ! हें बेटं निळ्या कमळाच्या रंगाचं मोराचं पीस हें ! मला वाटलं भूर्जपत्र असेल.
राजा : हर हर ! माझा सर्वथैव घात झाला !
राणी : ( पुढें होऊन ) महाराज, इतकं काहीं कासावीस व्हायला नको. घ्या आपलं भूर्जपत्र.
राजा : ( गडबडून ) कोण प्रिये, तूं का ? तुझं स्वागत असो.
विदू० : ( मनांत ) स्वागत क्सलं हें कपाळाचं ! दुरागत हें.
राजा : ( मित्रास ) आतां हिला काय रे बहाणा सांगूं ?
विदू० : महाराज ! मुद्देमालासकट चोर सांपडल्यावर बहाणा कसला सांगणार :
राजा : भलत्याच वेळीं काय थट्टा ! ( राणीस ) प्रिये, मी हें भूर्जपत्र शोधीत नव्हतों. दुसरंच कांहीं होतं, तें आपलं -
राणी : हो हो ! तें समजलं. अशा वेळेला असंच बोलून वेळ साजरी केली पाहिजे.
विदू० : बाईसाहेब, लवकर जाऊन आधीं महाराजांच्या भोजनाची तयारी करा; म्हणजे यांचं पित्त शमून हे ताळ्यावर येतील.
राणी : निपुणिके, या भटानं आपल्या मित्राला चांगलं संभाळून घेतलं !
विदू० : तसं नव्हे हो बाईसाहेब ! चांगलं भोजन घातलं म्हणजे पिशाच्चसुद्धां शांत होतं, म्हणून म्हणतों.
राजा : मूर्खा, बळेनच माझ्यावर अपराध लागू करतोस वाटतं ?
राणी : महाराज, आपला कसला अपराध ? भलतंच ! अपराध माझा. कारण मी इथं येऊन आपल्या आनंदाचा विरस केला. चल ग निपुणिके --
राजा : छे: छे: !

पद ( किती सुंदर तरि० )
अपराधी मी साच तुझा परि, प्रीति धरी चित्तीं ॥ कोप नको हा करि अनुकंपा; आतां मजवरती ॥१॥ सेव्या तूं मज तव सेवक मी, कोप जरी तुजला ॥ आला तरि हा जन अपराधी न्यायानें ठरला ॥२॥
( राणीच्या पायां पडतो. )
राणी : या पायां पडण्याचं मला कांहीं वाटत नाहीं. कारण हें मेलं सगळं ढोंग आहे. पण मीं तिकडे लक्ष दिलं नाहीं, म्हणून पुढं मला वाईट वाटेल कीं काय, कोण जाणे ! ( असें म्हणून रागानें निघून जाते. )
विदू० : पावसाळ्यांतल्या गढूळ नदीप्रमाणं बाईसाहेब तर रागारागानं निघून गेल्या. उठा उठा महाराज आतां !
राजा : ( उठून ) मित्रा, हें असं व्हायचंच ! कारण

पद ( वस्त्रानें देह सारा० )
जरि नुसतें आर्जवीलें, प्रियवचनें बोलुनी ॥ नच फ़सली चतुर नारी, लटिकीं तीं मानुनी ॥ मणि जैसा रंग खोटा, त्यावरती चढवुनी ॥ दाखवितां मार्मिकांना, देती कीं फ़ेंखूना ॥१॥
विदू० : पण यांत तुझं काय बिघडलं ? त्याचं जाणं उलट तुझ्या पथ्यावरच पडल. कारण नेत्ररोग झाला असला, म्हणजे माणसाच्यानं दिव्याच्या ज्योतीकडे बघवत नाहीं. कां ? असंच ना ?
राजा : छे छे मित्रा, उर्वशीवर जरी माझं मन बसलं आहे, तरी राणीला बहुमान द्यायचा, तो दिलाच पाहिजे. अरे, तिनं माझ्या विनवणीकडे लक्ष दिलं नाहीं, यानं तर मला जास्त जोर आला.
विदू० : महाराज, पुरे करा या जोराच्या गोष्टी आतां ! माझा प्राण भुकेनं कासावीस झाला आहे, स्नानाची वेळ झाली; तर चला आतां - आमच्या पोटाची काहीं व्यवस्था लावूं द्या.
राजा : ( वर पाहून ) खरचं ! दोनप्रहर टळली.

पद ( धन्य उषा ही ) रवितापानें त्रस्त शिखी तो गार तरुच्या तलिं बसला ॥
कोरुनि पांगार्‍याच्या कलिका, भ्रमर अंतरीं तो शिरला ॥१॥
त्यजुनि तत्पजल, कारंडव ही, सेवी तटीच्या नलिनीला ॥
तृषाक्रांत तो पंजरस्थ शुक, मागतसे जल प्यायाला ॥२॥
( सर्व जातात. )

अंक २ रा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP