अंक पाचवा - प्रवेश तिसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


स्थळ - फाल्गुनरावांचे घर

( भादव्या येतो. )

भादव्या - कालपासून एका घटकेचा विसावा नाही ! इकडे धांव तिकडे धांव ; ही चिठ्ठी दे, तो निरोप कळीव, खरं सांग, खोटं बोलतोस, हा गोंधळ चालला आहे सारखा ! पुष्कळ धनी पाहिले, परंतु ही तर्‍हा अजब आहे ! हं, आलं वाटतं कुणी ! कोण बरं ?ही आमची धनीन ! आतां मात्र शंभरी भरली ! धनीसाहेब आणि रेवती खोलींत खलबत करीत, बसले आहेत, हें जर हिला कळलं तर नुसता विजेचा कडकडाट , दुसरं बोलणं नाही ! इकडेच आली ही ! धनीसाहेब, धनीसाहेब !
फाल्गुन - ( दारांतून डोकावून ) काय रे, कोण आलं ? ती आली का रे ?
भादव्या - होय धनीसाहेब ?
फाल्गुन - रेवती आंत आहे म्हणून सांगूं नकोस बरं का ?
भादव्या - मला विचारतील तर सांगायचं ! तशाच आंत घुसल्या तर ? पण या आल्याच ! दार घ्या ओढून - ( फाल्गुनराव तसें करतो. ) फार झपाट्यानें येताहेत. कुणीकडे गेल्या होत्या बरं ?
कृत्तिका - भादव्या, आहेत का रे ते आंत ?
भादव्या - आहेत वाटतं !
कृत्तिका - दुसरं कुणी आहे का जवळ ?
भादव्या - छे, कुणी नाहीं बाईसाहेब ! एकटेच पत्र लिहित बसले आहेत आणि कोणाला आंत सोडूं नकोस म्हणून सांगितलं आहे !
कृत्तिका - मी नाही जात आंत बरं ! खुशाल बसूं देत एकांत करीत !
भादव्या - ( मनाशीं ) आं ? यांना कसं समजलं ? ( उघड ) एकांत नाही बाईसाहेब, कांहीं लिहित वाचीत बसले आहेत !
कृत्तिका - इतक्यांत कित्ती खोटं बोललास ! आतां खरं बोल, खोटं बोल, मला काम करायचं आहे ? संबंध सुटला आणि तंटा मिटला ! मीच आतां हें घर सोडून जाणार आहे. मी गेलें म्हणून त्यांना कळीव आणि म्हणावं आतां हवातसा स्वच्छंदपणा करा ! माझी कांहीं अडचण पडायची नाहीं ! ( जाते. )
( फाल्गुनराव आणि रेवती बाहेर येतात )
रेवती - मला कृत्तिकाबाईंशीं एकच शब्द बोलायचा आहे.
फाल्गुन - छे - छे, मेहेरबानी करुन आतां नको !
रेवती - एक दोन प्रश्नांत जर माझा सर्व संशय नाहींसा होतो, तर आपण का बरं अडथळा घालतां ?
फाल्गुन - कां तें विचारु नकोस, हजार कारणं आहेत ! तूं जर घरांत तिला दिसलीस तर काय अनर्थ होईल तो नाहीं तुझ्या लक्षांत आला ! शेकडों कुतर्क काढीत बसेल ! तूं इथं आहेस तोंपर्यंत माझ्या जीवांत जीव नाही; पण तूं तरी कां इतका आग्रह धरतेस ?
रेवती - आश्विनशेटजींवर जो आळ आला आहे, तो खरा की खोटा, याचा मला शोध लावायचा आहे, दुसरं कांहीं नाही कारण !
फाल्गुन - त्याचा उलगडा करायला ती कशाला पाहिजे ? मी करतो. अग, इथं काय पुर्‍यावर पुरावा ! मी तुला भेटलों त्यानंतर माझ्या घरांत तिच्या खोलींत त्याला लपून बसलेल्या मी पाहिला !
रेवती - त्यांच्या खोलींत ?
फाल्गुन - हो - हो, अगदीं तिच्या निजायच्या खोलींत. पुढं बोल ! --
रेवती - आतां काय कपाळ बोलूं ? खरं का पण हें ?
फाल्गुन - खरं का ? हे डोळे, हा मी ! प्रत्यक्ष त्याला पाहिला, त्याच्याशीं बोललों, त्याची फजिती केली ! झाली खात्री ? तिच्याच कुळंबिणीनं , म्हणजे रोहिणीनं, त्याला खोलींत लपवून ठेवला होता. अर्थांत तिच्याच मसलतीनं ! आणखी किती पाहिजे पुरावा ?
रेवती - आणखी असेल तितका सांगा --
फाल्गुन - आतां नको, आणखी केव्हां तरी ! आतां तुला भादव्या पोंचवायला येईल, त्याच्याबरोबर घरीं जा ! कदाचित् तिनं आम्हां दोघांना एका ठिकाणीं पाहिलं तर उगीच - ( ऐकून ) आली. आली वाटतं !  तूं जा ! - भादव्या कुठे गेला बरं !
रेवती - हें जर खरं ठरलं तर थोडी कुठं अशा होती तीहि संपलीच म्हणावं झालं ( सुस्कारा टाकते . )
मघा - ( पडद्यांत ) अरे ए, माझी मुलगी रेवती आंत आहे का रे ?
रेवती - अग बाई , माझी आई आली ! तिला मी इथं नाहीं म्हणून सांगा आणि मला कुठं तरी लपवा अगोदर ! त्या खोलींत जाऊं का ?
फाल्गुन - म्हणजे खास, लपण्याकरतां चोरानं चावडीकडे धांव घ्यायची. उत्तम काम ! तुझी आई त्याच खोलीकडे चालली आहे.
रेवती - बरं, माडीवर जाऊं का ? सांगा ?
फाल्गुन - हें त्यांच्याहिपेक्षा नामी ! म्हणजेच आयतीच माझ्या बायकोच्या हाती लागतेस ! ( ऐकून ) जिना वाजतो, झाला घात ! तीच खाली आली ! आतां - हो - हो- त्या पेटीच्या आड ! हो लौकर !
रेवती - मी अगदीं भेदरुन गेलें आहे. मला हवी तिथं उचलून ठेवा, माझा बाई पायच उचलत नाही ! ( फाल्गुनराव तिला हातांत धरुन्न उचलून नेतो. ) अग बाई, या केरकचर्‍यांत बसूं ?
फाल्गुन - बैस लौकर ! ( ती बसते ) निभावलं म्हणायचं ; ये म्हणावं आतां ?
( कृत्तिका येते. )
कृत्तिका - मला एक गोष्ट विचारायची आहे, माझा माहेरचा कंठा आपल्याजवळ होता --
फाल्गुन - मग आतां काय त्याचं ? ( मघा आंत येते. )
मघा - तुम्ही गृहस्थ आणि मी नायकिण. तेव्हां न विचारतां तुमच्या घरांत शिरले म्हणून तुम्हाला राग येईल; पण त्याला माझा इलाज नाही. माजी रेवती इथं आहे असं समजलं, म्हणून तिचा शोध करायला आलें आहे !
फाल्गुन - अहो पण --
कृत्तिका - ऐका हो महाराज ! तिलासुध्दां कळलं !
मघा - ती कशाकरिता आली आहे, हें जरी मला कळलं नाही, तरी तिच्यासारख्या अल्लड पोरीला तुम्ही फूस लावून घरांत घेणं म्हणजे अगदीं, अगदीं वाईट !
फाल्गुन - अहो पण सांगितलं कुणी मी तिला घरांत घेतली म्हणून ? अशी भलतीच गोष्ट मी करीन कशी ?
कृत्तिका - छे, भलतंच ! त्यांच्या हातून अशी गोष्ट मुळींच व्हायची नाहीं ! साधु पुरुष हे ! आहे हो, तुमच्या मुलीला फूस यांची आहे !
मघा - खरंच कां ?
फाल्गुन - छे हो, बिलकुल नाहीं ! ही लबाड बोलते !
कृत्तिका - अगदीं खरं बोलतें मी. अहो, बाई, तुमच्या मुलीला आश्रय देऊन, मला घराबाहेर काढण्याचा यांचा विचार आहे !
फाल्गुन - तुम्ही काय ऐकतां हिचं ? तिला अलिकडे वेड लागलं आहे; त्याच्या लहरींत अशीच बडबडत असते !
कृत्तिका - आपल्याच रेवतीचं वेड लागलं आहे. मला कुणाचं लागणार वेड ?
फाल्गुन - ( पाहून ) कुणाचं ? हे पहा येत आहेत, यांचं !
( इतक्यांत आश्विनशेट येतो. )
मघा - बरं झालं, देवच पावला ! अगदीं वेळेवर आलांत !
फाल्गुन - ( बायकोस ) आणि तुला नाहीं कां देव पावला ? हे म्हटलं तुझे - तुझे आश्विनशेट !
आश्विन - अहो, फाल्गुनराव, मी कांहीं लपून छपून आलों नाहीं, राजरोस आलों आहे; कां म्हणाल, तर इतक्या मंडळीच्या देखत तुमच्याकडून तुमच्या नीच कृत्याचा जबाब मागायला आलों आहे !
फाल्गुन - मग त्याला असा राजरोसपणा कशाला ? ती खोली आहेच ! रिकामी ! चला आंत, बाहेरुन कुलूप लावायला रोहिणी तयार आहेच !
कृत्तिका - असलं खोडसाळपणाचं बोलणं पुन्हा बोलाल तर जीभ झडून पडेल ! म्हणे ती खोली आहे रिकामी ! त्या मेल्या रोहिणीच्या चुकीसाठीं माझ्यावर असा भलताच आळ म्हणजे काय ?
फाल्गुन - तुझ्या सल्लामसलतीनं झालेल्या गोष्टींत रोहिणीची कसली चुकी ! ती काय हुकूमाची बंदी !
मघा - पण या तंट्याशीं मला काय करायचं आहे ? मी माझ्या मुलीसाठी आलें आहे, ती या घरांत आहे कीं नाहीं सांगा !
फाल्गुन - या घरांत ? आमच्या घरांत अशा नायकिणीच्या मुली येत नसतात ! अहो, तिची माझी ओळखसुध्दां नाही !
कृत्तिका - ओळख नाही ? चांगली मांडीवर घेऊन बसला होतां आणि ओळख नाही म्हणायला कांहीं वाटतं का ?
मघा - मांडीवर ! म्हणजे काय ! सांगा पाहूं ! कधीं ? कुठें ?
कृत्तिका - कुठं काय ? तिथं या झाडाखाली - त्यांनाच विचारा म्हणजे सांगतील ! " ज्यानं कराव पाप, त्यानंच ओतावं माप " मी कशाला उच्चारुं !
फाल्गुन - काय आगलावी बायको आहे पहा !
मघा - तें जाऊं द्या, पण मांडीवर कधीं घेतली होती ?
कृत्तिका - मी सांगते, काल सकाळी त्या आंब्याच्या झाडाखाली.
आश्विन - हं हं, हं हं ! कृत्तिकाबाई हें साफ खोटं, मी शपथेवर सांगतो.
फाल्गुन - आणि मीहि पाहिजे त्याची शपथ घेऊन सांगतो कीं, यांत एक अक्षरसुध्दां खरं नाही ! ( आश्विनशेटच्याजवळ जाऊन कुजबूजतो )
कृत्तिका - समजलें ! चोराला चोर सामील ! तुम्ही दोघांनी मिळून कट केला आहे !
फाल्गुन - मघाजी, ती काय सांगते आणि तुम्ही काय ऐकतां ? वाटसरुलासुध्दां शंका आली नसती वास्तविक !
आश्विन - त्या गोष्टींत शंका घेणं म्हणजेच पातक !
कृत्तिका - तुम्ही काय ऐकतां त्यांचं ? दोघेहि लबाड आहेत !
आश्विन - म्हणजे हें बघा, रेवती वाटेंत घेरी येऊन पडली, तिला या फाल्गुनरावांनी सांवरुन धरुन शुध्दीवर आणली, हा काय यांचा अपराध ?
मघा - यांत काय अपराध ? उपकाराला का अपराध म्हणायचा ! ती गोष्ट मला कळली आहे. घरीं आल्यावरदेखील तिला काल एकदां घेरी आली होती.
फाल्गुन - बघा म्हणजे झालं ! आणि ही दीड शहाणी असं म्हणते !
आश्विन - अहो, मी सांगतों ना ! रेवती थोडीशीं गर्विष्ठ आहे, म्हणून तिचं माझं पटत नाही, एरव्ही वागणुकीसंबंधानं म्हणाल तर गरतीची छाती नाहीं तिला नांवं ठेवायला !
फाल्गुन - बरोबर आहे,अगदीं वाजवी ! मघाजी , बोला ; ही काय ती खरी हकीकत. बोला, आतां या प्रकरणांत माझ्याकडे काय दोष ? कृत्तिका - ही सगळी खरी हकीकत का ? चोरुन कां ठेवता आतां ? ती तसबीर तुम्हाला नजर केली ती --
फाल्गुन - तिनं मला नजर केली कीं या आश्विनशेटजींनी, तुला नजर केली ?
कृत्तिका - ऐका, ऐका, आश्विनशेटजींनी,  ऐका हीं स्वारींची मुक्ताफळं !
आश्विन - फाल्गुनराव, हें तुम्ही निव्वळ खोटं बोलतां ! मीं यांना मुळींच तसबीर दिली नाही.
फाल्गुन - हें तुम्ही अत्यंत खोटं बोलतां ! तुम्ही तिला दिलीत तिनं तिचं चुंबन घेतलं तें मीं पाहिलं आणि मग तिच्या हातून ती तसबीर ओढून घेतली !
आश्विन - हे सुध्दां खोटं, ती तसबीर मी रेवतीला दिली होती. तिला घेरी आली तेव्हां तिच्या हातांतून गळून पडली, ती तुमच्या कुटुंबाला सांपडली.
कृत्तिका - हो, असं झालं खरं ! उगीच कां म्हणून खोटं बोलावं ? मला ती त्या झाडाखाली सांपडली .
आश्विन - ऐका फाल्गुनराव, झाली खात्री ?
फाल्गुन - तसबिरीचं जाऊं द्या हो, त्या बाबतींत तुमचं खरं करुन चालतों मी ! पण तुम्ही हिच्या निजायच्या खोलींत लपून बसला होतां, त्याचा द्या जबाब ! म्हणे झाली कां खात्री ?
कृत्तिका - त्याचा काय जबाब ? मघांशीं नाहीं कां सांगितलं कीं, त्या रोहिणीची चुक म्हणून, त्यांच्याकडे काय ह्याचा संबंध ? का उगीच आपलं " सोनुबाईनं चोरली सरी आणि साळूबाईच्या गळ्यांत बांधा दोरी " असें करण्यांत काय अर्थ ?
मघा - मला वाटतं फाल्गुनराव, हा सगळा संशय तुमचा तुम्हांला बाधला ! तसंच या बाईचं. मी कशाला बाजारच्या भाकरी भाजूं म्हणा, पण मला वाटल तें सांगितलं. या बाईनं उगीच माझ्या मुलीचं नांव मध्यें गोवलं झालं !
कृत्तिका - उगीच गोवल का ? म्हणजे मीच खोटी ? बरोबरच आहे. ’ कावळ्यात बगळा आणि तोसुध्दां झाला कावळा ’ जें कोणी येतं तें त्यांना मिळत. मिळा म्हणावं, मी आतांच्या आतां चालती होतें भावाकडे !
फाल्गुन - तूं मोठ्या आनंदानं चालती होशील भावाकडे, पण मी जाऊं दिली पाहिजे ना ? ( तिला आडवतो. )
कृत्तिका - मग मला खोडा घालून अडवून ठेवणार कीं काय ?
फाल्गुन - हो, हो !
कृत्तिका - बायको झालें हें पातक झालं वाटतं ?
फाल्गुन - अलबत !
कृत्तिका - म्हणजे, मला इतकीसुध्दां मोकळीक नाही कां ?
फाल्गुन - मुळीचं नाहीं !
कृत्तिका - तर मग जन्मभर तुम्ही मला अशीच का छळणार ?
फाल्गुन - यांत काय संशय ?
कृत्तिका - बरोबर आहे. ’ गोंठणचं गाईला आणि घरांतली बाईल, द्याल तितका मार खाईल !
मघा - बरं; फाल्गुनराव खरंच माझी मुलगी इकडे आली नाही ना ?
फाल्गुन - छे हो ! असून का मी नाहीं म्हणेन ! पण पहा हवी तर कुठें लपवून ठेवली आहे का -- ( इतक्यांत रेवती खोकते. )
आश्विन - आतां कोणी खोकल्यासारखा नाहीं का आवाज आला ?
फाल्गुन - ( स्वत:शी ) छे, छे, छे, घात झाला, घात झाला !
आश्विन - कां हो ! तुम्हीं नाहीं का ऐकला ?
फाल्गुन - तिकडे ती रेवती - रेवती नव्हे, आपली रोहिणी पलिकडे काम करतां खोकली असेल झालं ?
कृत्तिका - रोहिणी ! रोहिणी कशी खोकेल ? तिला तर मी बाहेर कामाला पाठविली आहे !
फाल्गुन - रोहिणी नसेल तर भादव्या असेल !
कृत्तिका - भादव्या नव्हे हा ! बायकोचा आवाज आहे हा !
फाल्गुन - बायकोचा कुठला ? इथं कोणाची आली बायको भादव्याच तो !
कृत्तिका - त्या पेटीच्या बाजूनं आला, पहातें.
( फाल्गुनराव अग ! अग, करीत असतां कृत्तिका जाते. रेवती खोकत उभी रहाते )
कृत्तिका - हा पाहिलात का भादव्या ! भादव्या, ये बाबा असा पुढें ! ( तिला धरुन आणून ) कांहो, रेवती नव्हती ना इथें ? मग कां आभाळातूंन उतरुन पेटीच्या आड गेली वाटतं ?
भादव्या - ( मनाशीं ) ही सगळी मसलत अंगावर ढांसळली ! हिला हा मध्येच खोकला कुणीकडून आला कोण जाणे !
कृत्तिका - काय ग ? आमच्या स्वारीनं तुला बोलावली म्हणून तूं आलीस ना ?
रेवती - मी होऊन आले; फाल्गुनरावांकडे कांहीं नाहीं त्यांतलं.
कृत्तिका - इथं कां आलीस ?
रेवती - तुम्हां नवराबायकोंचा आचरटपणा मला बाधायला लागला.
कृत्तिका - माझा नव्हे, या स्वारीचा आचरटपणा ! या आश्विनशेटजींवर विनाकारण भलताच आळ घेतला त्यांनी !
आश्विन - खरंच. तो तर फाल्गुनरावांचाच आचरटपणा आहे ! अहो मघाजी ही रेवती इथं कां आली आणि या पेटीच्या आड कां लपली होती याचा जबाब पाहिजे.
रेवती - अशी आडून गोळी कशाला ? मी सांगते, ती तसबीर या कृत्तिकाबाईंना तुम्ही दिली, असं या फाल्गुनरावांनी मला सांगितलं; पण मला तें खरं वाटेना , म्हणून मी कृत्तिकाबाईचीच गांठ घ्यावी आणि संशयाचा उलगडा करुन घ्यावा म्हणून येथें आले ! पण हें बघ आई, त्या घरांत नव्हत्या, म्हणून इथं जरा उभी होतें. इतक्यांत तूं आलीस म्हणून भिऊन लपून बसलें !
आश्विन - माझा तर झाला !
रेवती - मला तसा संशय नव्हताच आधी.
मघा - अहो फाल्गुनराव, झाला ना सगळा उलगडा ?
फाल्गुन - उलगडा कसा होतो ? या, आतां तुम्हला मी सगळी हकीगत सांगतो, पण हिच्या समक्ष नको. अशा इकडे या !  ( तिला नेऊं लागतो. )
कृत्तिका - माझ्या समक्ष कां नको ? अहो महाबाई, मलाहि यांच्या पुष्कळ लबाड्या सांगावयाच्या आहेत, मी येतें ! ( तीही जाते. )
मघा - ( जातां जातां ) आलेंच बरं का ?  आश्विनशेटजी आहांत ना इथं ? ( तिघेंहि जातात )
( रेवती व आश्विनशेट तोंडें वळवून उभीं राहातात )
रेवती - अशी चूक म्हणून माझ्या हातून पुन्हा कधीं व्हायची नाही.
आश्विन - मी पुन्हां असा संशय येऊं द्यायचा नाही !
रेवती - खरंच, मी अगदीं वेडेपणा केला !
आश्विन - माझ्या हातून हा मूर्खपणाच झाला !
रेवती - बरं झालं तें झालं आतां काय त्यांच ?
आश्विन - हो, होऊन गेल्यावर मग काय करायचं ?
रेवती - पण अबोला चालायचा किती वेळ ?
आश्विन - पण तिहींचा आणि सहाचा बसायचा कसा मेळ ?
रेवती - ज्यानं पहिल्यांदा भांडण काढलं, त्यानं बसवावा हवा तर, मी कांहीं एक अक्षरसुध्दां निघायचं नाही !
रेवती - त्यांत काय करायचं ? क्षमा मागायची म्हणजे कांही पाया नको पडायला ! नुसती चुकली - चुकली म्हणायचं !
आश्विन - चुकलो, क्षमा कर. असं दहांदा म्हटलं ; पण राग जाऊन समजूत पडत नाही, त्याला काय करायचं ?
रेवती - दहांदा म्हटलंत तसंच आणखी एकदां !
आश्विन - ( तोंड फिरवून ) इतकं कळल्यावर आणखी एकदांच कां शंभरदां ! रेवती !
रेवती - झाला आरंभ ?
रेवती - ( तोंड फिरवून ) प्रियकर प्राणपति --
आश्विन - वाहवा !मी तुझ्याविषयी खोटा संशय घेतला, चुकलो चुकलों ?
रेवती - ( हंसत ) पुरे, पुरे, पुरे !
आश्विन - हंसली रे हंसली, झालं आतां ?
रेवती - ती तसबीर दिल्याशिवाय झालं म्हणतां ?
आश्विन - ही घे तसबीर . ( देतो. )
रेवती - ( हंसत ) शेवटी तुम्हीच हरलांत अं ? तुम्ही अगोदर बोललांत मग मी !
आश्विन - अग तुझ्या माझ्या भांडणांत मीच हरायचा नेहमी ?
( इतक्यांत फाल्गुनराव मघा, कृत्तिका हंसत बाहेर येतात. )
फाल्गुन - आतां मात्र माझ्या पागलपणाबद्दल मला हसूं येतं. त्यांत हिच्या मुर्खपणाबद्दल तर फारच ! खरंच सांगतो आश्विनशेट, इतकी उघड उघड गोष्ट आम्हांला कळली नाहीं म्हणजे केवढं आश्चर्य ! तुमच्या माझ्यांत त्या - तिनं केवढा घोंटाळा केला होता ?
आश्विन - तुम्ही " ती " कृत्तिका समजत होता --
फाल्गुन - आणि तुम्ही रेवती समजत होता ! मिळून तुम्ही आम्ही दोघेहि धोत्रा प्यालों होतों ! आणखी पहा - ( हंसत हंसत कुजबूजतात. )
कृत्तिका - रेवती, तूं म्हणत होतीस तें खरंग खरं ! या तुझ्या आईन कशी हा हा म्हणता समजूत घातली. काय मेलं डोक्यांत शिरल होतं कुणाला ठाऊक ? पण त्यांच्या दहापांच प्रश्नांचा निकाल !
आश्विन - फाल्गुनराव , मी सांगत नव्हतो तुम्हाला ! मी तुमच्या घरी काल पहिल्यांदाच काय तो आलो. ह्याच्यापूर्वी कधी पाऊल नाही कीं तुमच्या कुटुंबाशी भाषण नाही !
फाल्गुन - तें आतां सगळं ध्यानांत आलं ! अहो, एकदां मनुष्य संशयाच्या डगरीवरुन घसरायला लागलं कीं चाललं घसरत खाली खाली ! ज्या रंगाचा चष्मा त्याच रंगाची वस्तु, हेंच खरं !
मघा - आणि कृत्तिकाबाई, तुम्ही तरी माझ्या मुलीच्या संबंधानं अगदीं राईचा डोंगर केला होता !
फाल्गुन - हो ना ? मुळापासून अशी संशयी !
कृत्तिका - ( हंसत ) आणखी आपण काय कमी ? माझ्यापेक्षां कांकणभर जास्त ! मला कारण तरी लागतं, आपल्याला तेंसुध्दां नको !
भादव्या - ( दूरुनच ) धनीसाहेब, मी म्हणत नव्हतों ! पण आपण उलट मलाच पागल ठरवलं होतं !
रोहिणी - मीं किल्ली देत नाही म्हटलं, तेव्हा बाईसाहेबांनी केवढे डोळे केले होते, तें तूं पाहिलंस ना भादव्या ?
मघा - तें झालं तुमचं दोघांच आणि या आश्विनशेटजीनीसुध्दां तुमचाच कित्ता गिरवला होता फाल्गुनराव !
आश्विन - हो, हो, बरोबर. रेवतीनं कृत्तिकाबाईचा उचलला म्हणून मी फाल्गुनरावांचा पसंत केला !
रेवती - पण पहिल्यांदा आपण, मग मी !
मघा - हा सगळा तसबिरीचा घोंटाळा ! असो, झालं तें झालं यापुढें तरी ज्यानं त्यानं नीट जपून वागावं झालं ! ( बुवा आंतून ह्रदयिं धरा हा बोध खरा हें पद म्हणतों व बाहेर येऊन )
बुवा - कां ? माझ्या उपदेशाचा सत्यपणा तुम्हालां बिंबला ना ? आतां तरी कार्तिकनाथाच्या दीपोत्सवाकरितां दानधर्म कराल कीं प्रार्थन आहे कीं,

कोरस
चिन्मया सकल ह्रदया, सदया दे या गोविंदा, वर वरदा, कलिमलविलया ॥धृ०॥
विषय पिपासापीडितसा, नि:सारा, संसारा, मृगनीरा, सम भुललों मी परी फसलों,
विस्मरलों तव भजनीं लागाया ॥१॥
कामधनाशा ही विवशा, मन्नाशा, सरसावे, तत्पाशीं सांपडलों, ये धांवोनी, यांतुनी सोडवुनी मज घ्याया ॥२॥
सौख्य सदा नव ज्या ठायीं, तपाचा, पापाचा लेश नसे, शांति वसे, ने येवोनी, त्या स्थानीं,
सुखभुवनीं दासाया ॥३॥
॥धृ०॥

समाप्त  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP