अंक पाचवा - प्रवेश दुसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


स्थळ - रेवतीचें घर

( मघा आणि तारका येतात. )

मघा - काय ग तारके, कुठं गेली ही ? आणि परवापासून या पोरीनं काय घोंटाळा माजविला आहे ?
तारका - घोंटाळा माजला होता, पण तो आतां मिटत आला आहे. त्यासाठीच ह्या आतां बाहेर गेल्या आहेत.
मघा - पण मी असतांना या पोरीला स्वत:च थेर थेर करायला सांगितलं होतं कुणी ? आश्विनशेट, आश्विनशेट, म्हणून महिनाभर नाचली. तेव्हांच मी सांगणार होते. पण म्हटलं एकुलती एक पोरगी राहिनाका तिच्याच मनाप्रमाणं त्याच्याजवळ. पण अलिकडे दोन तीन दिवस पाहातें तों तीं त्याच्याशीं भांडली म्हणून ऐकतें !
तारका - तसं कांहीं नाहीं, आपलं गोडीगुलाबीचं भांडण आहे.
मघा - बरं, काल तो फाल्गुनराव कशाला ग आला होता तिच्याकडे ?
तारका - तें नाही मला कळलं ! पण आतां त्यांच्याच घराकडे जाऊन येतें म्हणून बाहेर गेल्या आहेत.
मघा - त्यांच्या घराकडे गेली आहे ? जा आधीं माझी गाडी जोडायला सांग. असा नाचरेपणा चांगला नाही म्हणून मी दहांदा सांगितलं आहे कारटीला ! सदाच आपला छंद, हें नाही मला आवडत ! जा तूं --
तारका - जातें - त्याच इतक्यांत येतील म्हणून --
मघा - तूं आपली गाडी तयार करायला सांग जा ! तोंवर मी आंतून जाऊन येतें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP