योगसंग्राम - प्रास्‍ताविक ६

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


गपराधर्मांतील सामान्य जनतेच्या अनाथावस्‍थेबद्दल किंवा पारतंत्र्याबद्दल लिहितांना शेख महंमदांनी तितक्‍याच कळकळीचे उद्‌गार काढले आहेत.

‘‘पवित्राचे पोटीं पवित्र। हें तंव तुम्‍ही बोलिलेती उत्तर। त्‍यांत आडताळा देखिला जाहिर। तो परियेसा पैं ॥२६॥
पान न करावें ही भल्‍याचीं उत्तरें। प्रत्‍यक्ष शिंदळकी केली पाराशरें। तेथें व्यास कवणिया विचारें। अवतरले स्‍वामी ॥२७॥
आणिक दासीचे पोटीं विदूर। अशुभापासूनि शुभ पवित्र। प्रत्‍यक्ष चोखामेळा महार। नामघोष करी ॥२८॥’’.
 
आणिक प्रल्‍हादादिकांची उदाहरणें सांगून जन्मविशिष्‍ठ श्रेष्‍ठत्त्वाचें निखंदन केले आहे. आणखीहि धर्मांतील विषमता दाखवतांना शेख महंमद लिहितात की,

‘‘यातीचा ब्राह्मण आचार्य। विधिपूर्वक आंघोळी नाक धरी। शुद्रीसी रमोनि दासीपुत्र कुमरी। म्‍हणवीतसे ॥२०॥
....इकडे म्‍हणवी कृष्‍णजी जाणावा। तिकडे मेसावी ना सटवा। परी लाज न धरीच गा सदशिवा। मूळ वंशाची शुचत्‍वें ॥२२॥
विप्र स्‍वयें देंही म्‍हणे काशी लक्ष्मी। शूद्रीचें कुसीं म्‍हणवी लुमी गोमी। नाना मतें शास्त्रें पढोनि अधमीं। व्युत्‍पत्ति दावीतसे ॥२३॥’’.

अशा स्‍थितींतहि अपवित्रांच्या उद्धरणाची आवश्यकता आहे असें सद्‌गुरूस विनवितांना शेख महंमद लिहितात की,

‘‘मलीन जालें तें उदकें शुचावें। उदकें दवडिल्‍या कोठें जावें। तैसें तुम्‍हीं जेव्हां चांडाळ म्‍हणावें। तेव्हां उद्धरितां कवण ॥२९॥
पातकी नष्‍ट चांडाळ भला। तरी सद्‌गुरु पावनालागीं पावला। नाहीं तरी कोण वैकुंठ मुक्तिला। तुम्‍हांसहि पुसतें ॥३०॥
स्‍वयें सारिखेंच असतें त्रिभुवन। कोण नेणती पापपुण्यालागून। यालागी स्‍वामी सद्‌गुरूचें वंदन। रामकृष्‍णें केलें असे ॥३१॥
स्‍वामी ठायीचेच असती सगुण। तरी कवण वंदी तुम्‍हांलागुन। तुमचे कृपादृष्‍टीनें अवगुण। पळोन जातील ॥३२॥’’.

मुसलमान यातीबद्दलहि शेख महंमदांचे उद्गार तत्‍कालीन धार्मिक विषमतेची साक्ष पटविणारे आहेत.

‘‘मुसलमान म्‍हणविले एक्‍यागुणें। मुसेस नव मास वस्‍तीकरूपणें। होतो म्‍हणवुनी वोळखा खुणें। पवित्र हो तुम्‍ही ॥११॥
आतां गर्भ मुसेवेगळा जन्मता। मजला कोणी न दिसें तत्‍वतां। वोळखा कैसे आपुलिया मता। धर धरूं राहिले ॥१२॥
जितुकें दिसें तितुकें मुसावले। मुसेवेगळे नाहीं चराचर झालें। हें पाहिजे अनुभवास आले। संतां श्रोत्‍यांच्या ॥१३॥
सर्वांचें नांव सुनी मुसलमान। तें लपवोन वैश्य क्षत्रिय ब्राह्मण। अनेक उपनाम लक्षण। बरळती असत्‍यासंगें ॥१४॥
ब्राह्मणास म्‍हणतां सुनी मुसलमान। तरी तो होईल महा क्रोधायमान। ऐसें पहा सत्‍यार्थासी लपवून। असत्‍य मिरवितील ॥१५॥
जैसे अंग लपवोनि दाविजें वस्त्र। आणि म्‍यान दावोनि लपविजें शस्त्र। तैसा वेदांनीं केला विधि आचार। मूळ कूळ लपवोनियां ॥१६॥
ऐसें खरें लोपावें खोट्यामाजारीं। न्याहाळितां खोटें खर्‍याभितारीं। नांवें वेष धरूनियां परोपरी। स्‍वादा पातले असे ॥१७॥’’.

सारांश, जन्मयातीचा शिष्‍यत्‍वाला आडफाटा नसून सद्‌गुरु सर्वांसच उद्धरतो, मात्र मुमुक्षु सच्छिष्‍य असला पाहिजे. तसाच सद्‌गुरु कोणीहि असला तरी चालतो. नवरा, माता, बायको गुरु होऊन बायको, पुत्र व नवर्‍याला उद्धरूं शकतात. याची उदाहरणें देतांना शेख महंमदांनीं शिव, मदालसा व मैनावती यांचे वर्णन केले आहे. त्‍याचप्रमाणें ईश्र्वर जन्मकुळगोत पाहात नाहीं हे दर्शवितांना ते लिहितात की,

‘‘अविंध यातीस निपजलो। कुराण पुराण बोलो लागलो। वल्‍ली साधुसिद्धांस मानलों। स्‍वहित परहितागुणें ॥६६॥
ज्‍याला नवाजिता ईश्र्वर। त्‍याचा शोधूं नये कुळाचार। पहा दुर्गंधा केली सुंदर। व्यास निपजले तेथें ॥६७॥
दुर्गंधा होती ते सुगंधा नांव पावली। कुशीस उपजोनि व्यासें कीर्ति केली। ते सिंदळकी न पाहिजे म्‍हणीतली। ईश्र्वरलीलाच ऐसी ॥६८॥
हनुमंत पहा यातीचा वानर। त्‍यास गुज बोले तो रामचंद्र। संपल्‍या देहाचा अवतार। द्वापारीं भेट दिधली ॥६९॥
रामाचे गुरू वशिष्‍ठॠषि । त्‍याला प्रसवली उर्वशी । गर्गाचार्य गंधर्वीचे कुशी । ते कृष्‍णाचें गुरू ॥७०॥
गाईचे पोटीं गौतमॠषि। मार्कंडेय झाले मार्कंडीसी। साठ पुत्र झाले नारदासी। स्त्रिकल्‍पें स्त्री झाला ॥७१॥
हरणीचे पोटी शृंगॠषी। दहा अवतार घेणें त्‍यासी। गर्भदुःखें भोगी अंबॠषी। म्‍हणोनि करूणा केली ॥७२॥’’.

सारांश, पराविद्येच्या अभ्‍यासाला, भक्तीला किंवा पराप्राप्तीला जन्मयातिगोताचा अडथळा नाहीं हें शेख महंमदांनीं साधार दाखविलें आहे. मात्र सच्छिष्‍य होऊन सद्‌गुरुप्राप्ती होणें हें आपापल्‍या. गुणांवगुणांवर अवलंबून राहाते. तसेंच सद्‌गुरूची योग्‍यता लाधण्यासाठी व पराप्राप्ती करून घेण्यासाठी अभ्‍यास व शुद्ध आचरण हीच कामास येतात. शेख महंमदांनी आपल्‍या गुणांवरच यातीचे श्रेष्‍ठ सद्‌गुरु जे चांद बोधले याचे सच्छिष्‍यत्‍व मिळविलें आणि आपल्‍या अभ्‍यासाचरणांनी ते संतश्रोत्‍यांस मान्य झाले.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP