परसा भागवत व श्रीनामदेव यांचा संवाद

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


१.
भूवैकुंठ जागा क्षेत्र हे पंढरी । नांदे तेथें हरि द्वारकेचा ॥१॥
तेचि गांवीं असे परसा भागवत । करितसे भक्ति रुक्मिणीची ॥२॥
अदिमाया जाहली ती प्रसन्न । दिला त्या कारणें परिस एक ॥३॥
लोहासी लावूनि सुवर्ण तो करी । सुखें हा संसारीं राहतसे ॥४॥
नित्य महाद्वारीं वाची रामायण । करिती श्रवण साधुसंत ॥५॥
भजन करूनि नामा येत तेथें । पुसतसे अर्थ त्याजलागीं ॥६॥
सांगा कैसी आहे लंकेची रचना । कोण कोणत्या स्थाना राहताती ॥७॥
बाबा तेचि सांगा मजलागीं खूण । बोलत प्रमाण नामा त्यासी ॥८॥
शास्त्र पाहोनियां करितो उत्तर । आणिक विचार पुसे त्यासी ॥९॥
दोघांचा संवाद होतां महाद्वारीं । विस्मय अंतरीं करिती संत ॥१०॥
परसोबा सांगत रुक्मिनीलागून । करितो अपमान नामा माझा ॥११॥
ऐक माते माझी हेचि विज्ञापना । दावीं तूं रचना लंकेची हे ॥१२॥
पाहोनियां लंका येईन मी माये । समाधान होय नामयाचें ॥१३॥
सांगेन तयासी सकळ वृत्तांत । पुरवीं हा हेत आतां माझा ॥१४॥
लेंकुराचे कोण पुरवील लळे । घेतली म्यां आळ तुजपाशीं ॥१५॥
करीं माते माझें आतां समाधान । वंदीत चरण परसा तेव्हां ॥१६॥
अवश्य म्हणोनियां दिल्हें तें वचन । आनंदला पूर्ण भागवत ॥१७॥
बैसविलें तिणें त्यासी हातावरी । दाविली नगरी बिभीषणाची ॥१८॥
पाहे बापा आतां होऊनियां स्वस्थ । पुरवीं हा हेत आपुला तूं ॥१९॥
पाहोनियां लंका आनंदला मनीं । धन्य हे करणी करत्याची ॥२०॥
रम्य स्थळ जागा अपूर्व ते फार । होतसे गजर नामघोष ॥२१॥
घरोघरीं होय वेद पारायण । रामनामीं मन सर्वत्रांचें ॥२२॥
सर्व पाहोनियां लंकेची रचना । आला तो सदना बिभीषणाच्या ॥२३॥
पाहातो तों नामा उभा कीर्तनास । गुण गात असे देवाजीचे ॥२४॥
शरण जे गेले माझ्या पंढरीनाथा । नाहीं भय चिंता त्यांस कांहीं ॥२५॥
विस्मय तो करी परसोबा अंतरीं । फिरला माघारीं तेथूनियां ॥२६॥
बैसविला तेव्हां रुक्मिणीनें करीं । आणिला पंढरी क्षेत्रामाजी ॥२७॥
समजलें तेव्हां नामया लागुनी । पुसतसे खूण तुजलागीं ॥२८॥
परसोबा सांगत त्यासि सविस्तर । बिभीषण मंदिर कैसें असे ॥२९॥
ऐकोनियां ऐसें न करी उत्तर । वांरे अहंकार धरिलासी ॥३०॥
हातीं तुझ्या आला होता चिंतामणी । कैसा तो गोफणीं लाविलासी ॥३१॥
कल्पवृक्ष तुझ्या आंगणीं लाविला । कैसा उपडिला अभागिया ॥३२॥
अमृताचा घड हातासी लाधला । कैसा उलंडिला वेडिया तूं ॥३३॥
तैसा महाराज तोचि बिभिषण । कां नाहीं नमन केलें त्यासी ॥३४॥
सदोदित ज्याचे ह्रदयीं रामचंद्र । दुजा कां विचार धरीला तेथें ॥३५॥
अहंकारें मोठे मोठे नाडलेती । सांगसी त्या तूं युक्ती शास्त्राच्या ते ॥३६॥
तोचि अहंकार धरिलासि अझून । होईं आतां लीन संतांपायीं ॥३७॥
तेणें हा झडेल अंतरींचा मळ । दिसेल सकळ ब्रम्हारूअ ॥३८॥
समजला तेव्हां परसोबा तो मनीं । न कळे करणी नामा तुझी ॥३९॥
गळोनियां गेला त्याचा अभिमान । झाला तेव्हां लीन संतांपायीं ॥४०॥
संतांची करणी असे अघटित । करी दंडवत नामदेव ॥४१॥
२.
मातें डावा डोळा उजवा हे सारिखे । एक समतुके पाहे दोन्ही ॥१॥
नांवें वेगळालीं इतकेंचि जाण । परी काय केलें येणें सांग मातें ॥२॥
नाहीं जाणत न घडे तूं कैसी माउली । म्हणवोनी देह घाली चरणावरी ॥३॥
वांयांविण सीण धरसीरे कासया । ऐकरे परसया सांगेन तुज ॥४॥
नाम्याच्या खांद्यावरी ठेवोनियां हात । आपण पंढरिनाथ येत होते ॥५॥
नाम्यासाहे ते भ्रांति पडली चित्तीं । म्हणवोनी एकांतीं राउळीं पुशिलें ॥६॥
देव गुह्य बोलिले मी तें चित्तीं ठेविलें । दुजें वरीयलें भक्तीलागीं ॥७॥
त्यापासूनि नाम्याची शंका येतसे आम्हां । अखंड परमात्मा जया जवळी ॥८॥
नाम्यासी देखोनी लोटांगणीं जावें । दुजें न धरावें आन चित्तीं ॥९॥
इतुकें ऐकोनी परसा विनविता झाला । काय बोलियेला रुक्माईसी ॥१०॥
माते पांडुरंगीं मज भेट करावी । धरीन मी जीवीं चरण त्याचे ॥११॥
नेणेंची हें वर्म माझी मूढमती । मज करा विश्रांति विठ्ठलचरणीं ॥१२॥
तवं ते आदिमाता सांगे परसोबासी । दैवें हें आम्हासी दिधलें नाहीं ॥१३॥
भेटवावें तुज आज्ञा नसतां मज । कोपतील सहज देवराव ॥१४॥
तूं नाम्या विनवी निराभिमान होईं । तो दाखवील सोई देवाजीची ॥१५॥
मागें होतें तें अवघेंचि विसरलों । लोटांगणीं आलों नामयासी ॥१६॥
परसा म्हणे नाम्या तुझें बरवें गाणें । जैसें कां नाणें टांकसाळींचें ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP