परसा भागवताचा गर्वपरिहार

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


१.
परसा सांगे स्त्रियेपाशीं । अवो अपूर्व वर्तलें पंढरीसी । मज आणि नामयासी । झाला विवाद परस्परें ॥१॥
परसा सांगे आपुली माहिमा । आजि फजीत केला नामा । पुढती शरण आला आम्हां । सकळ जना देखतां ॥२॥
आम्हीं तयासी निर्भत्सिलें । परी ते आमच्या पायीं लागले । काकुळती शरण आले । मग सोडिलें तयातें ॥३॥
आम्हीं साक्षात्‌ विष्णुदास । त्यानें म्हणवावें विप्रदास । ऐसें असावें प्रत्यक्ष । विष्णुदास कां म्हणवी ॥४॥
तूं म्हणसी एक नामा । येर वाउगीच उपमा । त्यापाशीं असता परमात्मा । तरी कां आम्हा शरण येता ॥५॥
खालील पायरी तयाची जाण । वरी आम्हासी महिमान । आमुच्या ह्रदयीं परमात्मा आपण । सदा जागृत वसतसे ॥६॥
धन्य धन्य माझें कुळगोत्न । नाम पावलों भागवत । केलिया पुण्या नाहीं मीत । आणि वेदांत मी जाणें ॥७॥
यातिहीन विष्णुदास म्हणविती । तेणें ते नर भय पावती । तयासी न चुके पुनरावृत्ति । विष्णुदास म्हणे परसा ॥८॥
२.
यावरी काय बोलिली पतिव्रता । विनंती करितें कोपूं नका । तुम्हासी गर्व जरी नसता । तरी घरीं भेटता परमात्मा ॥१॥
तुम्ही ब्राम्हाण पवित्र धन्य । मुखीं वेद हरीचें नाम । वरी गर्व अवलक्षण । सकळही धर्म लोपले ॥२॥
अमृत घातलें पाषाणावरी । वरी वरी ओला कोरडा भीतरीं । तैसा घात तुमच्या शरीरीं । गर्वें हरि न मेटेची ॥३॥
गाय ते सर्वांठायीं पवित्न । परि तिची वासना अपवित्र । तैसें तुमचें धन्य कुळगोत्र । गर्व अपवित्र सांडा जी ॥४॥
तुम्हासी चाडा जरी हरीसी । तरी मत्सरू करूं नका नामदेवासी । तो आलिया घरासी । हरि तुम्हासी भेटेल ॥५॥
आतां आदर करोनी आणाल नामा । तयसवें येईल परमात्मा । भेट होईल तुम्हा आम्हा । त्या नामयाचेनी प्रसादें ॥६॥
आणखी एक अवधारीं । राउळा येत होते हरी । नामा होता बरोबरी । अंचळ सरसावी रखुमाई ॥७॥
आणखी एक वृत्तांत ऐकिला । कीर्तनासी नामदेव आला । द्वारकेचा भोपा पोळला । तो बुझाविला येथोनी ॥८॥
आणिक महादेवद्वारीं कीर्तन मांडिलें । हें आंवडयासी वर्तलें । देऊळ तयाकडे फिरलें । भलें नवल नामयाचें ॥९॥
ऐसें बोलली कमळजा । तुम्ही स्वामी मी तुमची भाजा । गर्व सांडाजी वोजा । तरी पंढरिराज भेटेल ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP