गवळण - ३१ ते ३४

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३१.
चिदानंदघन चिन्मय बाळकृष्ण । खेळवितां मन होय उन्मन ॥१॥
सुख अनुभवी अनुवाद खुंटला । विश्वंभरीं तोचि अनुवाद गोठला ॥२॥
दुजें न दिसे उपमेसी द्यावया । मन न मिळे आन सुख घ्यावया ॥३॥
ज्ञाता हेंचि अद्वय । ध्याता ध्यान ध्येय हेंचि निरामय ॥४॥
जन्मोजन्मींचें पुण्य संचित । झालें गौळियांचें काय मुर्तिंमंत ॥५॥
नामया स्वामीची अनुपम्य आवडी चित्तें दिधली प्रेमरसी ॥६॥
३२.
गोपाळाशीं खेळती । आनंदें डोलती । कृष्ण आमुचा सांगाती । डो डो डो डो डो ॥१॥
कान्होबाची संगती । ब्रम्हादिक इच्छिती । धन्य आम्हां म्हणविती । अ ल ल ल ल ॥२॥
कृष्णाप्रती गोपाळ । म्हणताती सकळ । अकळशी नाकळ । हा त त त त ॥३॥
मामा मारूं गेलासी । आपटिलें गजाशी । मल्लयुद्ध खेळलासी । हु तु तु तु तु ॥४॥
अजगर मारिला । वडवानळ गिळिला । गोवर्धन उचलिला । अ ब ब ब ब ॥५॥
पूतनेसी शोषिलें । नारदासी । मोहिलें । गाणिकेसी उद्धरिलें । अ रे रे रे रे ॥६॥
गौळियांचे घरां जाशीं । दहीं दुध लोणी खाशी । त्यांच्या सुना भोगिसी । छि छी छी छी छी ॥७॥
सोळा सह्स्र भोगिशी । ब्रम्हचारी म्हणविशी । लटिकेंचि ठकविशी । कु लु लु लु लु ॥८॥
सोडूनियां मीपण । आम्हां घाली लोटंगण । परब्रम्हा नारायण । आ हा हा हा हा ॥९॥
ऐसे तुझे पवाडे । वर्णिताती वाडेंकोडं । विष्णुदास नामा म्हणे । यु यु यु यु यु यु ॥१०॥
३३.
प्रात:काळीं प्रहार रात्रीं गोणी बाळा । घुसळण मांडियेलें घरोघरीं सकळां । नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥
घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदें छंदें डोलती ॥ध्रु०॥
एक म्हणती साजणी तुम्हीं लपवागे लोणी । नकळे हो बाई कृष्णाची करणी ।
कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्हीं आतां लपवा दुधाणी ॥२॥
बोलतां चालतां इतुक्यामध्यें हरी आला । कवणेंहीं नाहीं देव द्दष्टि देखिला ।
सूक्ष्म रूप धरूनि डेर्‍यामध्यें प्रवेशला । वरच्यावरी देव  लोणी खाऊनियां गेला ॥३॥
उन्हवणी शिळवणी घालिती परतें लोणी येईना । काय झालें ढोणे सासूबाई कळेना ॥४॥
हा हा गे बायांनो तुमचे जाणतें चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसां गोळे ।
उगोंचि मग पाहतां आतां फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥
डेर्‍यामधून मार माझा जगजीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णूं मी काये ॥६॥
३४.
मस्तकीं ठेवुनियां डेरा । करूं निघाली विकरा । साच करितसे पुकारा । म्हणे गोविंद घ्या वो ॥१॥
बोल बोलती आबळा । तंव त्या हांसती सकळा । मुखीं पडियेला चाळा । या गोपाळाचा ॥२॥
दहीं म्हणावासे ठेले । वाचे गोविंद पैं आलें । चित्त चैतन्य रंगलें । कान्हु चरणीं बाई वो ॥३॥
उन्नतीये बोलती नेती । चालता गज गती । कान्हु वांचुनी चित्तीं । आणीक नेणें बाई वो ॥४॥
जाऊनियां बळीच्या द्वारां । त्रिपांड केली वसुंधरा । कैसा सावाला तुमच्या डेरा । दाखवी बाई वो ॥५॥
वृद्ध गौळणी पाचारिती । आणी वो अरुता श्रीपती । कोठें गोविंदु विकिती । नाहीं देखियला बाई वो ॥६॥
श्रीरंगी रंगला जीवु । म्हणे घ्यावो हा माधवु । बरवा रमापती गौरवु । साच आणियला कैसा ॥७॥
बाळा भरूनियां बाळा । देखे श्रीरंगु साव्ळा । बेधीं वेधल्या सकळां । गोपी गोविंदासवें ॥८॥
गोविंद म्हणा वाचे । गोविंद स्मरण करा साचे । दोष हरती जन्माचे । छंद लागला तयाचा ॥९॥
नामया स्वामी हो मुरारी । मज पाहतां अभ्यंतरी. । शेकी वापिलें निर्धारीं । मनुष्य्पण ॥१०॥


Last Updated : January 17, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP