ध्रुवचरित्र - भाग २१ ते २५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१.
बाळकाच्या बोला राजा भांबावला । म्हणे झालें याला ज्ञानगम्य ॥१॥
शांती याचे अंगीं बाणलीसे नीट । तेणें नेटेपाटे पुढारला ॥२॥
मी तों झालों वांयां कामाचा किंकर । केला म्यां अव्हेर बाळकाचा ॥३॥
कीर्ति हे त्यागोनी दुर्दशा आणिली । ऐसी होऊं सरली बुद्धि फिकी ॥४॥
नामा म्हणे राजा लाजला चित्तांत । प्राणावीण प्रेत तयापरी ॥५॥
२२.
ठेवुनी भोंवताले रक्षणाला दूत । सांगतो तयातें सत्तारूपें ॥१॥
तुम्ही आतां याचें करावें रक्षण । व्याघ्र सिंह येणें बाधा नव्हे ॥२॥
क्षणाक्षणा मातें सांगावा वृत्तांत । वनीं भूत प्रेत हिंडताती ॥३॥
चोर हेर खळ रात्निचीये वेळे । रहावें भोंवताले सावधान ॥४॥
नामा म्हणे ऐसें सांगे त्या दुतांसी । आपण घरासी येता झाला ॥५॥
२३.
येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला ॥१॥
न कळे भक्तिभाव घ्यावें कैसें त्यासी । देव कोण त्यासी ठावें नाहीं ॥२॥
भावार्थानें सर्व इंद्रियें खुंटलीं । प्रारब्धानें दिल्ही वाट तया ॥३॥
साध्यसाधनाचा उपाव कळेना । घ्यान तो धारणा कौंचि तेथें ॥४॥
नामा म्हणे गुरु करावा तें नेणे । अद्‌भुत विंदान मांडियेलें ॥५॥
२४.
वाचितां अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांहीं ॥१॥
करावा तो आधीं सद्‌गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेनें सर्व साधे ॥२॥
योग याग तपें चित्त शुद्ध होय । गुरुवीण नये मोक्ष हातां ॥३॥
निर्मळ जीवन तीर्थावीण पावन । तैसा गुरु जाण साधकांसी ॥४॥
नामा म्हणे गुरु कृपेचिया बळें । मूर्खहा तरेल भाक माझी ॥५॥
२५.
एकाएकीं दैव उदेलें ध्रुवाचें । येणें नारदाचें झालें तेथें ॥१॥
देखियेलें पोर टाकलेंसे वनीं । भावना धरोनी अपसया ॥२॥
साधूचा भाव उदकाचिया परी । लव तेथें भरी उणें नाहीं ॥३॥
आर्तींचा हे आर्त पुरवावा हा नेम । साधूचा नि:सीम स्वभाव कीं ॥४॥
गिरी देखे मेघ मग तो कैसा थोर । तैसे ते उदार साधुसंत ॥५॥
आतां या बाळाचा योग क्षेम कैसा । पुसावया धिंवसा नामा म्हणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP