ललित अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां वाक्यार्थनिदर्शनेचें स्वरूप,  एकेका व्यवहारानें युक्त असे जे दोन धर्मी (म्ह० प्रस्तुत व अप्रस्तुत धर्मी) त्यांच्या परस्पर अभेदाचें कथन केल्यानें सूचित होणारा, त्यांच्या दोन व्यवहारांतील परस्पर अभेद हें, आतां हे जे वर सांगितलेले दोन धर्मी (एक एक व्यवहारयुक्त दोन धर्मी) त्यांचा अभेद शब्दानेंच सांगितला पाहिजे, असा कांहीं नियम नाहीं. तो कसातरी सांगितला असला म्हणजे झालें. तेव्हां ‘दुसर्‍याचें द्रव्य गिळंकृत करणारा माणूस विषाचा गोळा गिळतो.’ या ठिकाणीं आपापल्या व्यवहारांनीं विशिष्ट अशा दोन धर्मींचा अभेद शब्दानें सांगितल्यानें जशी वाक्यार्थनिदर्शना होते, तशीच ‘परद्रव्याला धिक्कार असो; तरी पण हा विषाचा गोळा गिळतो,’ या ठिकाणीं, प्रकृत व्यवहारानें (म्ह० परद्रव्याचा अपहार करणें, ह्यानें) युक्त असा आर्थ प्रकृतधर्मी (एक पुरुष), व अप्रकृत व्यवहानें (म्ह० विष खाणें ह्यानें) युक्त असा श्रौत अप्रकृतधर्मी (एष:) या दोहोंचा अभेद, आर्थ पद्धतीनें सांगितला असला तरी, ही वाक्यार्थनिदर्शना व्हायला मुळींच हरकत नाहीं. एक ठिकाणीं (परद्रव्यं हरन्मर्त्यो० ह्यांत) श्रौती निदर्शना व दुसर्‍या ठिकाणीं  (धिक परस्वं० ह्यांत) आर्थी निदर्शना असा (ह्या दोहोंत असलेला) फरक मात्र काढून टाकतां येणार नाहीं. (हें कबूल.)
आतां उपमान व उपमेय यांच्या धर्मांच्या अभेदाची कल्पना करून त्यावर (त्या अभेदकल्पनेवर) उपमेयाच्या ठिकाणीं उपमानाच्या धर्माचा संबंध (सांगणें) हें जें पदार्थनिदर्शनेचें स्वरूप तें (वर सांगितलेल्या वाक्यार्थनिदर्शनेच्या स्वरूपाहून) निराळेंच आहे, (हें उघड आहे). या दोन्हीही निदर्शनेच्या प्रकारांपैकीं कोणताही प्रकार असणें म्ह० निदर्शना, असें प्राचीनांच्या पद्धतीप्रमाणें निदर्शनेचें सामान्य लक्षण आहे. अशा रीतीनें (आर्थी वाक्यार्थनिदर्शना म्हणजेच ललित अलंकार, अशी वस्तुस्थिति असल्याने) जर ललिताला निराळा अलंकार मानलें तर लुप्तोपमा वगैरे प्रकार उपमा वगैरेहून निराळे होऊं लागतील.  कारण, तुम्ही (ललिताच्या बाबतींत) लढविलेली युक्त [म्ह० आर्थ अलंकार श्रौत अलंकाराहून निराळा मानाल पाहिजे ही युक्ति] येथेंही (उपमेंतही) तंतोतंत लागू पडते. तुम्ही म्हणाल, ‘हें तुमचें म्हणणें खरें मनालें तर, अतिशयोक्ति अलंकार रूपकांत विलीन होऊन जाईल; कारण विषय व विषयी दोन्हीही शब्दानें सांगितले  असतील तर श्रौत रूपक; व केवळ विषयी शब्दानें सांगितला असला तर तेथें आर्थरूपक, असें म्हणणेंही सोपें आहे.
यावर आमचे (ललित अलंकार निदर्शनेहून निराळा न मानणारांचें) उत्तर असें :--- होय, खरें आहे, ज्या ठिकाणीं, अलंकाराचें शरीर (अलंकाराचे सामान्य लक्षण) दोन निराळ्या भासणार्‍या अलंकारांत अगदीं एक असतें, त्या ठिकाणीं ते दोन निराळे अलंकार आहेत, असें मानणें योग्य नाहीं. उदा० ‘निष्पादमानसाद्दश्यं’ (म्ह० तयार होत असलेलें साद्दश्य) हें उपमा अलंकाराचें शरीर, तेलुप्तोपमा वगैरे उपमेच्या प्रकारांत, अगदीं एकच असल्यानें, त्या सर्व प्रकारांनाही उपमा हें नांव देणें योग्य आहे; आतां लुप्तात्व पूर्णात्व, इत्यादि उपमेच्या पोटभेदांचें आपापलें विशिष्ट लक्षण, उपमा अलंकाराच्या शरीरांत राहत नसल्यानें, तें विशिष्ट लक्षण आपापसांत एकमेकांना निराळें पाडीत असलें तरी, तें त्या पोटभेदांना (मुख्य) उपमेहून निराळे पाडू शकत  नाहीं. त्याचप्रमाणें इतर ठिकाणींही समजाबें. या द्दष्टीनें पाहतां. विषय्त्वानें युक्त (अथवा विशिष्ट) जो विषय, त्याच्याशीं विषयितेनें युक्त जो विषयी त्याचा अभेद, हें रूपकाचें स्वरूप (शरीर);  आणि विषयित्वयुक्त विषयी या रूपानें विषय भासणें हें अतिशयोक्तीचें शरीर. ही दोन्हीही शरीरें एकमेकांहून निराळीं असल्यानें, हे दोन्ही अलंकार एक मानणें योग्य नाहीं. पण निदर्शना व ललित ह्या दोहोंच्या स्वरूपांत मुळीच फरक नाहीं, हें आम्ही वर दाखविलेंच आहे; तेव्हा; हे दोन्हीही अलंकार एकच आहेत.
आतां नवीनांचें याबाबतींत म्हणणें असें :--- “विषयाच्या ठिकाणीं विषयीचा जो अभेद, तो आहार्यनिश्चयाचा विषय होणें (म्हणजे हा अभेद वास्तविक नसून बुद्धया मानलेला असणें,) हें आम्ही रूपकाचें स्वरूप मानतो. [प्राचीन आलंकारिक, विषयतावच्छेदक रूपानें भासणार्‍या विषयाच्या (उदा० मुखाच्या) ठायीं विषयितावच्छेदाकावच्छिन्न (उदाहरणार्थ, चन्द्रत्वावच्छिन्न चंद्र) जो विषयी त्याचा अभेद, हें रूफकाचें स्वरूप मानतात.] पण विषयतावच्छेदक वगैरे अंश बोजड (म्ह० लक्षणांत अनावश्यक) असल्यानें, आम्ही केलेल्या रूपकाच्या लक्षणांत आम्ही त्यांचा समावेश करीत नाहीं. आम्ही आतां सांगितलेल्या रूपकाच्या या स्वरूपाच्या द्दष्टीनें, निगीर्याध्यवसान म्ह० विषयीनें विषयाला गिळून टाकल्यानें विषयानें विषयीरूपानें राहणें हें जिवें स्वरूप आहे अशी अतिशयोक्ति, रूपकाचाच एक प्रकार होऊं लागेल (हे खरें); पण त्यांत बिघडलें कुठें ? (हें तर काय पण अशाच रीतीनें) अपहनुति देखील रूफकाचाच एक प्रकार होऊं लागेल ९पण त्यांतही काय बिघडलें ?) विषयतावच्छेदकाचा (म्ह० विषयाच्या विषयतावच्छेदकत्व या धर्माचा) निह्नव (म्ह० झाकणें) अनिह्नव (म्ह० न झाकणें) व निगरण (म्ह० विषयीनें विषयाला गिळून टाकणें) हे सर्व रूफकाच्याच पोटांतले प्रकार आहेत,” या नव्या मताप्रमाणें तर, निदर्शहून ललित हा निराळा अलंकार आहे असें मानणें म्ह० निव्वळ मनोरथाचा विलास आहे. द्दष्टीनेम, ‘तितीर्षुर्दुस्तरं०’ इत्यादि पद्यांत, निदर्शना अगदीं चपखळ बसते; कारण, ‘क्व सूर्य़०’ इ० शब्दांनीं प्रथम, स्वत:ची बुद्धि व सूर्य़वंश या दोहोंत अत्यंत विजोअपणा अहे, असें सांगुन, नंतर होडक्यानें समुद्र तरून जाण्य़ाची इच्छा ही अप्रकृत गोष्ट सांगून, त्या योगानें प्रकृत गोष्ट जी, स्वत:च्या मंदबुद्धीनें सूर्यवंशाअचें वर्णन करण्याची इच्छा, तिचे सूचन केलें असल्यानें, या ठिकाणीं निदर्शनाच आहे.
आतां याच संबंधांत कुवलयानंदकारांनीं (पुढीलप्रमाणें) म्हटलें आहे :--- “अनायि देश: कतम:०” या पद्यांत, ‘तुमच्याकडून कोणता देश सोडला गेला ?’ हा जो प्रस्तुतार्थ, तो शब्दानें न सांगतां, त्याचा प्रतिबिंबभूत “-‘वसंतानें सोडलेल्या वनाच्या दशेप्रत नेला गेला’ हा अर्थच फक्त सांगितला असल्यानें, ह्या ठिकाणीं ललित अलंकार आहे.” हें त्यांचें म्हणणें अत्यंत असंगत आहे.
एकाला दुसर्‍याच्या दशेप्रत नेणें कसें शक्य आहे ? (नाहींच); तेव्हां शेवटीं, ‘वसंतानें सोडलेल्या वनाची जी शोभाविहीन होणें ही दशा, त्या दशेप्रत देश नेला गेला.’ हा ह्या वाकयचा अर्थ. (अर्थात) ह्या ठिकाणीं, कळाहीनपणा (शोभाविहीनता) हें जें कार्य त्याच्याद्वारा, राजाकडून (देश) सोडून दिला जाणें हें जें कारण सांगणें, हा पर्यांयोक्त अलंकाराचा विषय. या दोन्हीही दशा (नवाची न देशाची दशा या दोन्ही एकच आहेत असें मानणें (एकत्वाध्यवसान) हा, कां तर पदार्थनिदर्शनेचा अथवा अतिशयोक्तीचा विषया होऊं शकेल, ही गोष्ट निराळी. याप्रमाणें पदार्थनिदर्शनेवर आधारलेल्या पर्यायोक्ताचा हा श्लोक विषय आहे, ललिताचा नाहीं. शिवाय तुम्ही केलेलें लक्षण सुद्धां या श्लोकांत संभवत नाहीं.
‘प्रस्तुत धर्मीच्या ठायीं, वर्णन करीत असलेल्या अर्थाच्या प्रतिबिंबभूत अर्थाचें वर्णन’ हें तुम्ही केलेलें ललिताचें लक्षण. ह्या तुमच्या लक्षणाचें विवेचन तुम्ही, ‘प्रस्तुत धर्मीच्या ठायीं, वर्णन करायचें असलेल्या (म्ह० प्रकृत) वाक्यार्थाचे वर्णन न करतां, त्याच्या ऐवजीं तत्सद्दश अप्रकृत वाक्यार्थाचें वर्णन करणें,” ह्या वाक्यानें केलें आहे. आतां ह्या ठिकाणीं प्रस्तुत) वाक्यार्थाचें वर्णन करणें.” ह्या वाक्यानें केलें आहे. आतां ह्या ठिकाणीं प्रस्तुत धर्मी जो विशिष्ट देश त्याचें, राजाकडून सोडून दिला जाणें या वर्ण्यरूपानें वर्णन केलें गेले नाहीं; त्याचप्रमाणें, अप्रस्तुत वनाच्या, वसंतानें केलेल्या त्यागाचेंही वर्णन केलें गेलें नाहीं; मग तुम्ही केलेलें (ललिताचें) लक्षण येथें लागू तरी कसें पडणार ? आतां जर, ‘अकारि देश: कतमस्त्वयाद्य निरस्तचंद्र: कठिनाशयेन !’ (म्ह० कठिण ह्रदयाच्या तुम्ही कोणता देश चंद्ररहित करून टाकला ?) असें कवीचें मुळांत पद्य असतें तर मात्र तुमच्या मनासारखें झालें असतें. तुम्ही म्हणाल कीं, ‘वनाची जी तशा तर्‍हेची अवस्था ती अप्रस्तुत असून, तिचें विशिष्ट देश (जो धर्मी) त्याच्या ठिकाणीं वर्णन येथें आलेंच आहे, पण तसेंही तुम्हांला म्हणतां येणार नाहीं. कारण (वनाची) दशा या शब्दानें, (वनाच्या) दशेप्रमाणें असलेली जी देशाची दशा ती येथें लक्षणेनें निर्दिष्ट केली जाते; तेव्हां ती दशा (देशाच्या बरोबरच ध्यानांत येत असल्यानें) अप्रस्तुत होऊंच शकत नाहीं. असें मानलें तर, पदार्थनिदर्शना नष्ट होऊ लागले. याचप्रमाणें ‘ज्याच्या क्रोधयुक्त पाहण्यामुळें, वणव्यानें जाळून टाकलेल्या अरण्याची शोभा, एका क्षणांत, लंका नगरीनें धारण केली, त्या रामाचा विजय आहे.”
ह्या श्लोकांत, ‘ललित अलंकार निराळा आहे’ असें मानणारांच्या मतानेंसुद्धां, ललित नसून निदर्शना आहे.’
आणि म्हणूनच :---
‘ज्यांच्या किरणरूपी दोर्‍या वरपर्यंत पसरल्या आहेत, असा सूर्य उदय पावत असतां, व चंद्र अस्त पावत असतां, हा (रैवतक) पर्वत, (दोन्ही बाजूंना) लोंबत्या दोन घंटांनीं वेष्टिलेल्या (एखाद्या) मोठया हत्तीची शोभा धारण करतो.” (शिशुपाल वध ४।२०).
हें प्राचीनांनीं दिलेलें निदर्शनेचें उदाहरण बरोबर जुळतें. किरणरूपी दोर्‍यांनीं आवळलेल्या ज्याच्या दोन्ही बाजूंना सूर्य व चंद्र लागलेले (लटकलेले) दिसत आहेत असा हा पर्वत आहे, या प्रकारें प्रकृत धर्मीं जो पर्वत त्याचे संबंधीचा प्रकृत अर्थ (चंद्र व सूर्य़ लागले आहेत या रुपानें) येथें सागितला नसल्यानें, तुमच्या मतीं येथें ललितच होऊ लागेल. ‘प्रकृत व्यवहाराचें लेशमात्र कथन न करतां, केवळ प्रकरण वगैरेंनीं त्याचें सूचन करणें ह्याला ललित म्हणावें आणि तसें नसेल तर, निदर्शना म्हणावी,” असें म्हणत असाल तर, मग, ‘क्व सूर्यप्रभवो वंश:’ या श्लोकांतून तुम्ही निदर्शनेची हकालपट्टी कां केली बरें ? (सांगा पाहूं,) एवंच काय, कीं हें तुमचें सगळें म्हणणें वेडगळपणाचेंच आहे.

येथें रसगंगाधरांतील ललित प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP