ललित अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“प्रस्तुत धर्मीच्या ठिकाणीं प्रस्तुत व्यवहाराचा उल्लेख न करतां, अप्रस्तुत व्यवहाराचा संबंध (सांगणें) हा ललितालंकार.”
“दुसर्‍याचें धन घेणारा तूं, खरोखरीच, विष खात आहेस” अशा प्रकारच्या वाक्यांत असणार्‍या निदर्शना अलंकाराला निराळें पाडण्याकरतां, ‘उल्लेख न करतां’ या अर्थाचा मुळांतील अनुल्लेखेन हा तृतीयाविभक्तीयुक्त संस्कृत शब्द लक्षणांत योजिला आहे. अप्रस्तुतप्रशंसालंकार निराळा पाडण्याकरतां प्रस्तुत धर्मींच्या ठिकाणीं असें म्हटलें आहे,
उदा० :--- “मदनाचा प्रतिस्पर्धी जो शंकर त्यालाही तापदायक ज्याचें बल आहे असा, राम कुठें, आणि यज्ञांतल्या आहुति खाणारे जे (देव) त्यांना रणभूमीच्या तोंडाशीं शूर वाटणारे असे, तुझे वीर कुठें ? त्रैलोक्य जाळूं पाहणार्‍या प्रलयकालिक अग्नीला, कमळांना कोळपून टाकण्याला समर्थ अशा बर्फानें, शांत करण्याचा तूं चंग बांधीत आहेत.”
ह्या ठिकाणीं प्रस्तुत धर्मी जो रावण त्याच्या ठिकाणीं, दुसर्‍यांनीं दिलेल्या आहुति खाणार्‍या देवांच्या पुढें शूर (म्हणून गाजलेले) जे कुंभकर्णादिक वीर त्यांच्या हातून ‘रामाचा पराभव करूं पाहणें’ हा इच्छारूप प्रकृतव्यवहार हा विषय, स्पष्ट शब्दानें न सांगतां, ‘तशा तर्‍हेच्य (म्ह० श्लोकांत वर्णिलेल्या) ‘बर्फानें तशा तर्‍हेचा अग्नि शांत करूं पाहणें’ हा अप्रकृतव्यवहाररूपी विषयी, येथे सांगितला आहे. पण विषयाबरोबर विषयीचाही उल्लेख केला तर, निदर्शना अलंकारचा होणार.
“या पृथ्वीतलावर दुसरी कुणी रूपवती स्त्रीच नाहीं कीं काय ? एकटी सीताच कां तुला अनुरूप आहे ? चंदनाच्या झाडाची फांदी खेचीत असतां, तूं ह्या मोठया भुजंगाला (डिवचून)  जागा केलास.”
येथें स्वपत्नीचें हरण केल्यानें जागा झालेला, रामचंद्राचा क्रोध न सांगतांच, चंदनाच्या फांदीला खेचतांना, भुजंगाला जागा करणें हीच गोष्ट सांगितली आहे. “ह्या ठिकाणीं भेद असतांही अभेद सांगण्याचा जो अतिशयोक्ति अलंकाराचा प्रकार त्यानें का भागेल (तेव्हां ललिताची गरज नाहीं)” असें म्हणतां येणार नाहीं. कारण त्या अतिशयोक्तीच्या प्रकारांत, उदा० कनकलतायां विराजते चंद्र: (सोन्याच्या लतेवर चंद्र शोभत आहे,) ह्या ठिकाणीं केवळ एकाच पदार्थाचा दुसर्‍या पदार्थाशीं अभेद होण्याचा निश्चय आहे. एका व्यवहारानें दुसर्‍या व्यवहाराशीं अभेद केल्याचा निश्चय दिसत नाहीं. तेव्हां (दोन व्यवहारांचा परस्परांशीं अभेद केल्याचा निश्चय दिसत नाहीं. तेव्हां (दोन व्यवहारांच परस्परांशीं अभेद ललितांत असल्यानें,) हा अलंकार अतिशयोक्तीचा विषयच नव्हे. साद्दश्यमूलक अप्रस्तुततप्रशंसेनेंही ललिताचें काम भागणार नाहीं, कारण धर्मी हा अंश ललितालंकारांतील अप्रस्तुत कोटींत सांपडत नाहीं (म्हणजे, ललितांत अप्रस्तुत धर्मीचा उल्लेख नसतो.)
निदर्शनेनेंही ह्या अलंकाराचें काम भागणार नाहीं. कारण एका धर्मीच्या ठिकाणीं प्रस्तुत व अप्रस्तुत असें दोन्हीही व्यवहार शब्दानें सांगितलेले असतील तेव्हांच निदर्शना होते. म्हणूनच निदर्शनेच्या लक्षणांत, ‘दोन्हीही व्यवहार शब्दानें सांगितलेले’ असें एक विशेषण (मुद्दाम) घातलें आहे. पण ह्या लितालंकारांत, प्रस्तुत व्यवहार, शब्दानें, मुळींच सांगितला नसल्यानें, हा एक निराळाच अलंकार मानला पाहिजे. असें असल्यामुळें.
“कुठें सूर्यवंश आणि कुठें माझी अडाणी बुद्धी. तरून जायला कठिण असा समुद्रा, मूर्खपणामुळें, एका होडक्यानें तरून जायची माला इच्छा झाली आहे.”
हा श्लोका, निदर्शना अलंकाराचें उदाहरण म्हणून काव्यप्रकाशकारांनीं दिला आहे; पण तें कांहीं बरोबर जुळत नाहीं. कारण (एकतर) ललित अलंकार (स्वतंत्र अलंकार म्हणून) मानणें भागच आहे, आणि (दुसरें) येथें निदर्शनालंकाराची प्राप्तीच नाहीं. येणें येणेंप्रमाणें ललित अलंकाराला निराळा अलंकार मानणारांचा आशय आहे.
पण दुसरे कांहीं म्हणतात :--- ललित हा निराळा अलंकारच नाहीं, कारण निदर्शनेनें त्याचें काम भागतें, यावर दुसरे कुणी म्हणतील कीं, ‘प्रस्तुत (एका) धर्मीच्या ठिकाणीं प्रकृत व अप्रकृत असे दोन्हीही व्यवहार स्पष्ट शब्दानें सांगणें हा तर निदर्शनेचा प्राण आहे; तेव्हां केवळ अप्रस्तुत व्यवहाराच्या स्थळीं (म्ह० जेथें प्रस्तुत धर्मीचे ठायीं अप्रस्तुत व्यवहार सांगितला जातो त्या ललितालंकाराच्या उदाहरणाच्या स्थळीं,) निदर्शना कशी येऊ शकेल ? यावर आम्ही म्हणतों :-- ‘महाशय ! ऐका, कशी येऊ शकेल तें. या अलंकारशास्त्रांत अलंकार बहुतकरून श्रौत व आर्थ असे दोन प्रकारचे असतात. पण म्हणून श्रौत अलंकाराहून आर्थ अलंकार निराळे, असें कांहीं कुणी मानीत नाहींत, तर तो (म्ह० आर्थ अलंकार निराळे, असें कांहीं कुणी मानीत नाहींत, तर तो (म्ह० आर्थ प्रकार) त्या त्या अलंकाराचाच एक पोटभेद आहे, एवढेंच मानतात. कारण हे  दोन्हींहि प्रकार (श्रौत व आर्थ) त्या त्या अलंकाराच्या सामान्य लक्षणानें पोटांत घेतले जातात.”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP