प्रौढोक्ती अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


अथवा हें उदाहरण :---
“तुझ्या अंगणांत उगवलेली आणि केशराच्या पाण्यांत भिजवलेली (अशी) लवली लता (रायआवळी) कदाचित् तुझ्या अंगासाअर्खी दिसेल.”
ह्या ठिकाणीं नुसती लवली नायिकेच्या अंगाचें उपमान व्हावयाचें कठिण काम करू शकत नसल्यानें, त्याकरतां तिचा नायिकेशीं सहवास व केशराच्या पाण्याशीं संबंध झाल्याचें सांगितलें आहे. ह्या ठिकाणीं एखाद्या विशिष्ट धर्मीच्या संबंधामुळें दुसर्‍या एखाद्या धर्मींत एखादा विशेष उत्पन्न झाला असें स्पष्ट शब्दानें सांगितलें असेल तर, तो समालंकाराचा विषय समजावा.
उदा० :--- “हे राजा ! चंद्रशेखर जो शंकर त्याच्या देहकान्तींत ज्याचें मन निमग्न झालें आहे, अशा तुझ्यापासून ज्याचा जन्म, दुग्धसमुद्राच्या सुंदर लाटांच्या वर्तुळाशीं ज्याचा खेळ चालतो, स्वर्गंगेच्या वाळवंटावर ज्याचें राहणें, चंद्राच्या किरणाशीं ज्याचा वाद चालतो, असें तुझें यश अत्यंत उज्ज्वल कां बरें होणार नाहीं ?”
ह्या ठिकाणीं यशाचा (अत्यंत उज्ज्वलता हा) विशेष त्या त्या विशिष्ट धर्माच्या संबंधामुळेंच उत्पन्न झाल्याचें शब्दानें सांगितल्यामुळें, तेवढया अंशांत सम अलंकारच आहे. पण किरणांनीं चंद्रांत (अत्यंत उज्ज्वलता) हा विशेष वाढला, चंद्राच्या संबंधानें तो भगवान  शंकरांत वाढला व त्याच्या संबंधानें तो राजांत वाढला, अशा रीतीनें हा विशेष उत्तरोत्तर वाढतच चालला, असें स्पष्ट शब्दांत सांगितलें नसल्यानें शेवटीं राजांतला हा अत्यंत उज्ज्वलतारूप विशेष, मात्र प्रौढोक्तीचा विषय आहे.
असें असल्यामुळें,
“सशाच्या शिंगाचीं धनुष्यें धारण केल्यानें ज्यांचे हत शोभत आहेत, आकाशांतील कमळाच्या माळा ज्यांनी धारण केल्या आहेत, असे तुझे वैरी पुढें जन्माला येणार्‍यांच्या मुलाबरोबर, हे राजा, खेळत आहेत.”
‘एखाद्याचा लटकेपणा सिद्ध करण्याकरतां दुसर्‍या लटक्या वस्तूंची कल्पना करणें हा मिथ्याध्यवसिति नांवाचा निराळा एक अलंकार मानावा’ असें (कुवलयानंदकारांना) म्हणतां येणार नाहीं; कारण प्रौढोक्तीनें या अलंकाराचें काम भागेल, (कसें तें पहा)’ ‘यमुनेच्या तीरावरील तमाल वृक्षांच्या बेटासारखे (हिचे) काळे केस दिसतात’ या प्राचीनांनीम दिलेल्या प्रौढोक्तीच्या उदाहरणांत, ज्याप्रमाणें तमालवृक्षांत अत्यंत काळेपणाचा विशेष सिद्ध करण्याकरतां, काळेपणाचें स्थान जी यमुना तिचा संबंध सांगितला आहे; त्याचप्रमाणें येथेंही शत्रूंचा लटकेपणा (म्ह० अस्तित्वातच नसणें हें) सिद्ध करण्याकरतां लटकेपणाचें स्थान जे सशाची शिंगे वगैरे पदार्थ, त्यांचा शत्रूशीं संबंध सांगितला आहे, असें ही म्हणणें सोपें आहे. तुम्ही (कुवलयानंदकार) म्हणाल. “केशा; कलिन्दजा०” या श्लोकांत अत्यंत काळेपणा सिद्ध केला आहे, हें कबूल. पण ह्या ठिकाणीं (म्ह० शशशृंग० ह्या श्लोकांत)  नुसतां लटकेपणा सिद्ध केला आहे; लटकेपणाचा अधिकपणा सिद्ध केलेला नाहीं. ह्या द्दष्टीनें या दोन्ही श्लोकां (च्या तात्पर्या) त फरक आहे.” पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाही, कारण, तमालवृक्षाच्या बेटांत, इतर प्रमाणांनीं काळेपणा सिद्धच असला तरी, यमुनेशीं त्यांचा संबंध सांगून पुन्हं त्यांचा काळेपणा साधू पाहणें, ह्यांतील व्यंग्य, ‘काळेपणाची कमाल’ हेंच आहे; पण ‘शशशृंग०’ ह्या श्लोकांत, शत्रूंचा लटकेपणा अगाऊ सिद्ध नसल्यामुळें, सशाचें शिंग वगैरेच्या अनेक आर्थ संबंधानीं साक्षात शब्दानें न सांगतां, अप्रत्यक्षपणें श्लोकांत आलेल्या मिथ्यात्वाचा अतिशय सिद्ध केला आहे. (अर्थात शत्रूंचा लटकेपणा सिद्ध केला आहे.) अशा रीतीनें, (पूर्वीं नसलेला लटकेपणा स्पष्टपणें सिद्ध करणें या द्दष्टीनें त्या वैर्‍यांत एक प्रकारचा विशेष - अतिशयच सूचित केला आहे, म्हणून) या दोन्ही ठिकाणच्या व्यंग्यांत फरक नाहीं. (कारण दोन्हीही ठिकाणीं अतिशय म्ह० विशेष अथवा प्रकर्ष हेंच व्यंग्य आहे.)
“आतां, ‘आकाशपुष्पांची माळ घालणाराच वेश्येला वश करू शकेल’ हें मिथ्याध्यवसितीचें उदाहरण कुवलयानंदकारांनीं दिलें आहे, तें निदर्शनेंतच सामावृन जातें, ‘या उदाहरणांत, निदर्शना जिच्या पोटांत आहे, अशी मिथ्याध्यवसिति आहे’ हेंही तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण मिथ्याध्यवसिति हीच मुळीं खरी नाहीं. (मग तिच्या पोटांत निदर्शना आहे हें म्हणणें दुरद राहिले.) शिवाय, मिथ्याध्यवसिति हाच निराळा अलंकार मानावा असें तुमचें म्हणणें असेल, तर मग सत्याध्यवसिति हा एक निराळा अलंकार माना कीं. उदाहरणार्थ,
‘हरिश्चंद्रानें नांव घेऊन सांगितलेले व धर्मराजानें गायिलेले असे तुझे गुण, हे गंगा माउली ! वेदांच्या मांडीवर खेळत आहेत.’
ह्या ठिकाणीं हरिश्चंद्र धर्मराज व वेद यांच्याशीं असलेल्या संबंधामुळें, गुणांचा खरेपणा सूचित होतो. याचप्रमाणें,
“अमृतसागराच्या मध्यभागीं खडीसाखरेच्या घराचे आंत व पूर्णचंद्राच्या आसनावर, हे राजा ! तुझ्या उक्ति बसायला योग्य आहेत.”
ह्या ठिकाणीं अमृतसागर वगैरेच्या संबंधामुळें राजाच्या वचनाच्या ठिकाणीं, जी माधुर्याची परम सीमा सूचित झाली आहे, ती कोणत्या अलंकाराचा विषय होणार ? तेव्हां त्या ठिकाणी दुसरा अलंकार (सत्याध्यवसिति)  तुम्हाला मानावाच लागले. माझ्या मतें या सर्व ठिकाणीं प्रौढोक्तीनें काम भागत असल्यानें, (तुमचें) हें सगळें बोलणें राहू द्या आतां.

येथें रसगंगाधरांतील प्रौढोक्ति प्रकरण संपलें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP