समासोक्ति अलंकार - लक्षण ६

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या सर्व (कुवलयानंदकाराच्या) म्हणण्यांत कांहींच ताळतंत्र नाहीं, (याचें कारण असें :--) (वरील उतार्‍यांत) त्यांनीं, ‘मुखं चंद्र:’ ह्या ठिकाणीं ‘मुखावर चंद्रत्वाचा आरोप आहे’ असें जें म्हटलें आहे तें चूक आहे; कारण, दोन नामार्थांचा अभेदानेंच अन्वय होतो असा (व्युत्पत्तिशास्त्राचा) नियम असल्यानें, वरील ‘मुखं चंन्द्र:’ या वाक्यांत, मुखावर चंद्राचा (म्ह० मुख या नामार्थावर चंद्र या नामार्थाचा) अभेदानें अन्वय होतो असें म्हटलें पाहिजे; मुखावर चंद्र या नामार्थाचें विशेषण जें चंद्रत्व, त्याचा आरोप होतो असें म्हणणें योग्य नाहीं. (कारण नामार्थावर निशेषणाचा आरोप होत नाहीं.) शिवाय त्यांनीं जे म्हटलें आहे कीं, “जार इत्यादि शब्द वाक्यांत चंद्राच्या बरोबर येणें हें जें आरोपाचें कारण तें येथें नसल्यानें चंद्रावर जारत्वाचा आरोप करतां येत नाहीं.” यावर आमचें म्हणणें असें कीं, ज्या ठिकाणीं श्रौत आरोप करायचा असेल त्या ठिकाणीं (तुम्ही म्हणता तसा) समाभिव्याहार (म्ह० आरोपित धर्मी प्रकृतधर्मींच्या बरोबर शब्दानें सांगणें) हा आरोपाचा हेतु मानणें योग्य आहे; पण आर्थ आरोपालाही अप्रकृतधर्मीच्या समभिव्याहाराची, हेतु म्हणून, आवश्यकता मानली तर) रूपकध्वनि नाहींसा होण्याची वेळ येईल.
तुम्ही म्हणाल, “रूपकध्वनींत, आरोप्यमाण जो अप्रकृतधर्मी (तो शब्दोपात्त नसला तरी) त्याचे असाधारणधर्म सांगितलेले असतात व ते त्या अप्रकृतधर्मीच्या तादात्म्याला (अभेदारोपाला) सूचित करतात; तसें या समासोक्तींत कांहींच नसतें; (म्ह० येथें अप्रकृतधर्मी जाराचा आरोप त्याच्या असाधारण धर्मांनीं सूचित होत नाहीं.)” पण (हेंही म्हणणें चूक आहे. कारण,) येथेंही परस्त्रीचें मुखचुंबन हे, श्लेषाच्या योगाने म्हणा किंवा व्यंजनेच्या योगानें म्हणा, प्रतीत होतें; व त्याचा प्रकृतधर्मी जो चंद्र त्याच्यावर आरोप केला असतां तें, (परस्त्रीमुखचुंबन) जाराचा असाधारण धर्म असल्यानें स्पष्टपणें जारत्वाचें व्यंजक होतें. यावरून “विद्युन्नयनै: या ठिकाणीं व ‘त्वं सेतुमन्थकृत०’ ह्या ठिकाणीं ज्याप्रमाणें (अनुक्रमें) द्रष्ट्टत्व व विष्णुत्व यांचें गमक आहे तसें, समासोक्तींत नाहीं.” ह्या म्हणण्याचेंही खंडण झालें. कुणी म्हणतील :--- “जारत्वाचा चंद्रावर (वगैरे) आरोप न करतांही, चंद्र या प्रकृतधर्मीवर जारव्यवहाराचा आरोप करणें सिद्ध होत असल्यानें तो जारव्यवहाराचा आरोप (मागाहून) चंद्राचें जारत्व दाखवील.” पण, (यावर उत्तर हें :---) गमक दोन प्रकारचें असतें :-- (१) आक्षेपक गमक व (२) व्यंजक गमक. यांपैकीं आक्षेपक गमक हें वाक्यांत पदाचा वाक्यार्थ बरोबर बसत नसेल (म्ह० नीट जुळतच नसेल) तरच दुसर्‍या कोणत्यातरी (बाहेरच्या) पदार्थाला (खेचून आणून) दाखविते. (व वाक्यार्थाला नीट जुळविते); पण व्यंजक गम मात्र, अनुपपत्ति होण्याची (म्ह० वाच्यार्थ जुळणें याची) मुळींच अपेक्षा करीत नाहीं, (अनुपपत्तीवर अवलंबून नसते.) ‘गतोऽस्तमर्क:’ इत्यादि व्यंजकगमकांत असेंच दिसतें. असें न मानलें तर, अर्थापत्तिप्रमाणानें व्यंजनेचें काम भागू लागेल व मग व्यंजनाव्यापार व्यर्थ होण्याचा प्रसंग येईल. शिवाय तुम्हालाही (म्ह० कुवलयानंदकारांनाही) अप्रकृतधर्मी जार वगैरेंची प्रतीति तर अवश्य मानली पाहिजे - आरोपित जारव्यवहाराला जार हें विशेषण आवश्यक आहे म्हणून (म्ह० जारविशिष्ट असा जारव्यवहार व्हावा म्हणून); नाहींतर (म्ह० जाराची प्रतीति तुम्ही अवश्य मानली नाहीं तर) नुसत्या अप्रकृत जारव्यवहारांत चमत्कारच वाट्णार नाहीं. अशारीतीनें जार वगैरे अप्रकृतधर्मीची प्रतीति जर आवश्यक आहे तर, त्या जाराला ऐन्द्रीचें चुंबन घेणार्‍या चंद्र वगैरेंच्या ठिकाणीं तादात्म्यानें विशेषण मानणें, हेंच योग्य आहे; (म्ह० जाराभिन्न चंद्र असें मानणेंच योग्य आहे.) जार या अप्रकृतधर्मीला भेदसंबंधानें अप्रकृतव्यवहाराचें विशेषण मानणें योग्य नाहीं. (शिवाय) चंद्र हा जाराहून भिन्न आहे अशी प्रतीति झाल्यास, केवळ चंद्रानें परस्त्रीचें चुंबन घेणें, यांत मजा येणार नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP