समासोक्ति अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“ज्या ठिकाणीं प्रस्तुत धर्मीचा व्यवहार, दौन्हीही व्यवहारांना साधारण अशा फक्त विशेषणानींच प्रतीत होणार्‍या अप्रस्तुत धर्मीच्या व्यवहाराशीं अभिन्नपणें भासतो, ती समासोक्ति.”
(हाच अर्थ समासाच्या भाषेंत सांगायचा म्हणजें :---) साधारण अशा विशेषणांनीं उपस्थित जो अप्रस्तुतधर्मीचा व्यवहार, त्याच्याशीं अभिन्न म्हणून भासणारा प्रस्तुतधर्मीचा व्यवहार म्हणजे समासोक्ति. वरील लक्षण व हा समासार्थ एकच. शब्दशक्तिमूलध्वनीचें वारण करण्याकरतां ‘विशेषणाचीच केवळ उपस्थिति’ असें म्हटलें आहे. शब्दशक्तिमूलध्वनींत विशेष्यही श्लिष्ट असल्यानें (त्या श्लिष्ट विशेष्यानें) त्या अप्रकृतधर्मीची उपस्थिति होऊन त्या धर्मीचे द्वारा त्या अप्रकृतधर्मीच्या व्यवहाराचीही उपस्थिति होते. तरीसुद्धां ह्या समासोक्तीच्या लक्षणाची,
“अलकानगरीवर चाल करून तिला वेढून (आवळून) टाकतोस; (स्त्रियांकडे - केस बांधतोस) वीररसानें प्रेरित होऊन (स्त्रियांकडे - शृंगाराच्या इच्छेनें) चोल देशाला (त्यांतील राजाला) हाकलून काढतोस; (स्त्रियांकडे - चोळी काढून टाकतोस) लंका पूर्ण ताब्यांत घेतोस (स्त्रियांकडेअलं कायस्य वशतां तनोषि - त्यांच्या शरीराला पूर्ण अवश करून टाकतोस); जंघाल व लाटा देश यांचा धुव्वा उडवतोस (स्त्रियांकडें - मांडया व कपाळ यांच्यावर नखांचीं चिन्हें करतोस) अंगदेशाचे बाबतींत (पाहतां) त्याला तुडवून टाकण्याविषयीं आपलें मन निष्ठुर करतोस (स्त्रियांकडे - स्त्रियांचे प्रत्येक अंगाचा उद्दामरतिक्रीडेंत, चोळामोळा करण्यांत, तुझें मन निष्ठुर करतोस) अशा रीतीनें हे राजा तुज्याविरुद्धा (वाम) वागणार्‍या राजांच्या बाबतींत (सुंदर स्त्रियांच्या बाबतींत) तुझा कठोरपणा (धीटपणा) कांहीं अजबच आहे.”
ह्या ठिकाणीं, प्रकृतधर्मी जो राजा त्याच्या द्वारा प्रकृत (संग्रामविषयक) व्यवहार व अप्रकृत (स्त्रीविषयक) व्यवहार अशा दोन्ही व्यवहारांना विषय करण्यार्‍या श्लेषांत, अतिव्याप्ति होऊ लागेल म्हणून, त्याचें निवारण करण्य़ाकरतां, ‘प्रस्तुत व अप्रस्तुत’ या दोन्ही धर्मींचीं विशेषणें येथें लक्षणांत सांगितलीं आहेत लक्षणांतील प्रस्तुत व अप्रस्तुत हीं दोन विशेषणें व्यवहारांची विशेषणें आहेत असें मानलें तर, प्रस्तुत श्लोकांत (‘आबघ्नास्यलकाम्०’ यांत) आलेल्या केवळ श्लिष्ट विशेषणांनीं उपस्थित करून दिलेला जो अप्रकृत शृंगारव्यवहार त्याच्याशीं अभिन्न असा प्रकृत वीरव्यवहार असल्यानें, यांतील श्लेषाशीं समासोक्ति लक्षणाची अतिव्याप्ति होऊ लागेल. कुणी म्हणतील, “या श्लोकांत राजाचें वर्णन प्रस्तुत असल्यानें त्याचें दोन्हीही (वीर व शृंगारयुक्त) व्यवहार प्रस्तुतच म्हटले पाहिजेत; मग प्रस्तुत धर्मीच्या प्रस्तुत व अप्रस्तुत व्यवहारांत समासोक्तीच्या लक्षणाच अतिप्रसंग होईल, असें कसें म्हणतां ?” यावर आम्ही म्हणतों. अतिप्रसंग नसता झाला, जर राजाचें हें वर्णन केवळ प्रस्तुत असतें तर. (म्ह० राजाच्या सामान्य वर्णनांत त्याच्या वीर व शृंगार यांच्या वर्णनाचा समावेश होऊन, तीं दोन्हींही वर्णनें प्रस्तुत झालीं असतीं तर, अतिव्याप्ति होती ना; पण) राजाच्या युद्ध वगैरेच्या संदर्भांत वीरतेचें वर्णन प्रस्तुत मानलें तर मात्र, शृंगारवर्णन अप्रस्तुत होऊन त्यांत वरील समासोक्तीचें लक्षण, अवश्य अतिव्याप्त होऊं लागेल.
“हे भुंग्या ! तूं मलिन [(१) मळकट (२) दुष्ट] असतांही तुझ्या ठिकाणीं रागानें पूर्ण [(१) लाल रंगानें युक्त (२) प्रेमपूर्ण] अशा, तूं अतिशय बडबड करीत असतांही (गुंजारव करीत असतांही) तुझ्याविषयीं जिचें मुख विकसित (आनंदित) झालें आहे अशा, तूं चंचल [(१) शरीरानें (२) मनानें चंचल] असूनही, तुझ्याविषयीं सरस [(१) आर्द्र (२) प्रेमपूर्ण] अशा या कमलिनीला तूं कसा रे टाकतोस ?” या अप्रस्तुतप्रशंसेंत (अप्रकृत व्यवहार श्लेषानें उपस्थित झाल्यानें, श्लेषानें अप्रकृतव्यवहार उपस्थित करणार्‍या समासोक्तीचा व अप्रतुतप्रशंसेचा घोटाळा होण्याचा संभव खरा; पण) तो अप्रकृतव्यवहार, विशेषणानें जसा उपस्थित झालेला आहे तसा, शब्दानें सांगितलेल्या साक्षात् विशेष्यानें (म्ह० भ्रमर या पदानें) ही उपस्थित झालेलाच आहे. (आणि समसोक्तींत तर अप्रस्तुत धर्मीं उर्फ विशेष्य प्रत्यक्ष शब्दानें केव्हांही उपस्थित नसतें) त्यामुळें, या श्लोकांतील अप्रस्तुतप्रशंसेंत समासोक्तीच्या लक्षणाची अतिव्याप्ति होत नाहीं.
आतां जलक्रीडा वगैरे चालली आहे. व त्याठिकाणीं भ्रमराचा वृत्तांतच प्रस्तुत आहे, असें मानलें तर मात्र, वरील ‘मलिनेऽपि रागपूर्णाम०’ या श्लोकांत अवश्य समासोक्ति होईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP