महावाक्यपंचीकरण - शतक तिसरे

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


॥ श्रीराम ॥

निर्गुण निर्विकारी तें पंरब्रह्म । निश्चळ जाणीव रूप त्याचें ॥१॥
अलक्ष प्रत्ययें स्वरूप जाणनें । लक्षी दरुषण अवकाश ॥२॥
अवकाशा नाम आत्ममाया ऐसें । सोहें स्फुरण तेथें विकासलें ॥३॥
स्फूर्ति ते चि अर्धनारीनटेश्वर । सर्वांचा आधार जाणपणें ॥४॥
जीवेश्वर तेथें दृश्य योगें भेद । नांमें अनुवाद बहुसाल ॥५॥
सर्वात्मा चि स्वात्मा देव तो जगदात्मा । तो चि तो परमात्मा आदिमूर्ती ॥६॥
अनंत ब्रह्मांडें इच्छामात्रें होतें । आपण निवांत सस्वरूपीं ॥७॥
सर्व सूत्रधारी दुजा कोण करी । करुनिया परी अकर्ता तो ॥८॥
सर्व द्रष्टा तो चि जाणता बोलिजे । जाणिवेविण जें सार कैसें ॥९॥
मुळीं मूळमाया ऊर्ध्व ब्रह्माकार । तरी हा विचार जीवालागी ॥१०॥


साच आदि अंतीम स्थानक जयाचें । जाणावें शब्दाचेम अर्थांतर ॥११॥
उपासना सत्य हे रामदासाची । परंपरा साची मूळान्वयें ॥१२॥
सर्वज्ञ चिंतितां कृपा त्याची होते । आपुलें सुख ते देत जीवा ॥१३॥
द्रष्टा हा तंववरी दृश्य मायोपाधी । लयांतीं ते शुद्धि कोण सांगे ॥१४॥
वायुगुणें माया जड ते अविद्या । ब्रह्मांडाची विद्या जाणा ऐसी ॥१५॥
विवेकें हें जडचंचळ सांडितां । स्फूर्ती हे तत्वता ब्रह्माकार ॥१६॥
ब्रह्म सदसंत चळ अधो + थ । संधी ते सतंत मूळ स्फूर्तीं ॥१७॥
तयेलागी मूळमायासें बोलती । परंतु ते स्थिती ऐसी असे ॥१८॥
नामरूप भानु तंववरी स्मरण । परतल्या पूर्ण जैसें तैसें ॥१९॥
ऐसें आहे रूप ये मूळमायेचें । विचारें येथीचें कळे वर्म ॥२०॥
जाणीव ते मूळरूप स्वत: सिद्ध । जुनाट हा भेद येकरूपें ॥२१॥
ढिसाळ चंचळ जाणिवेचें रूप । नसतां स्वरूप कोण जाणे ॥२२॥
असो हें जाणावें जेणें अनुभवें । होईजे स्वभावें निरोत्तर ॥२३॥
दृश्य साच जालें वाटे ब्रह्में केलें । विचारितां जालें नाहीं मूळीं ॥२४॥
माईक धरीलें ब्रह्म आच्छादलें । विवेकानें केलें जैसें तैसें ॥२५॥
तंव शिष्य म्हणे फिटली आशंका। मूळींच्या विवेका जाणीतलें ॥२६॥
पुढें हा आकार सर्व ही प्रासार । जाहलें जगत्र कोणे परी ॥२७॥
कैसें तें ब्रह्मांड कैसें जालें पिंड । जीवशिव बंडरूपा आले ॥२८॥
त्वंपद तत्पद याचा कैसा भेद । सांगणें विशद करूनिया॥२९॥
वक्ता म्हणे वृत्ति न व्हावी चांचल्यें । बोलिलें साकल्यें निरूपण ॥३०॥
सूक्ष्म कर्दम मूळीं अष्टधेचा । सांगितला याचा अर्थ पूर्वी ॥३१॥
देव विश्र्वंभर विश्व बीजाधार । व्यापुनी सतंत्र आदि अंतीं ॥३२॥
दृश्याचें स्फुरण तें चि विस्मरण । इच्छा ऐसी खूण जाण माया ॥३३॥
ऊर्ध निरावेव अर्ध तो प्रणव । महतत्वठाव गुणालागी ॥३४॥
अर्ध ते चि माया मुळाचिये पोटीं । देवगुणाधिष्टी सृष्टिभावें ॥३५॥
मुळीं तें अव्यक्त गुण आणि भुतें । सृष्टीलागी व्यक्तें पुढें तें चि ॥३६॥
अर्धमात्रापर स्मरण साचार । सर्वीं सर्वेश्वर सोहं ब्रह्म ॥३७॥
ईया चि भेदें कीं योगिये जाणती । प्रणवाची गती येथुनीयां ॥३८॥
माया अर्धमात्रा त्रिगुण उद्भव । ॐ कार प्रणव बोलिजेतो ॥३९॥
येक सूत्र तें चि विविध जाणावें । भिन्न भिन्न नांवें क्रियायोगें ॥४०॥
आदि मध्ये अंत येक चि शेवटीं । परी शास्त्रगोठी बोलिजेत ॥४१॥
देव आदिमूर्ती चिदानंदघन । लीला त्याची पूर्ण तो चि जाणे ॥४२॥
स्वइच्छेचा खेळ करी नानापरी । सामर्थ्याची थोरी वेद नेणे ॥४३॥
इच्छेच्या सामर्थ्ये निर्मिलेम सृष्टीतें । निर्माण मायेतेम तेणें केलें ॥४४॥
दिसे आणि भासे सर्व हि पाहतां । हे तयाची सत्ता कळारूपें ॥४५॥
ऐसी माया केली गुणा प्रसवली । औट ऐसी बोली जाणिजे पैं ॥४६॥
क्षोभली त्रिगुणी माया अर्धमात्रा । त्या चि औट मात्रा प्रणवाच्या ॥४७॥
त्रिगुण ते चि तें त्रिपदा गाईत्री । वेदशब्दोच्चारीं मात्र त्रई॥४८॥
येकानळी पुष्प तीन पाकोळिका । किंवा त्रिकाळिका शूळदंडा ॥४९॥
येका चि शिखरें जेवि तीन शृंगें । त्रिगुण येकांगें सम तैसें ॥५०॥
उद्भव त्रिगुणी ते गुणक्षोभिणी । विस्तारालागुनी पष्ट रूपें ॥५१॥
प्रथम उच्चार वेद शब्दांकुर । मात्रा मूळ स्वर पन्नासाचा ॥५२॥
सत्वगुण येक रजोगुण दुजा । तमोगुण तिजा नामें ऐसीं ॥५३॥
रूपें स्थानें मानें चौप्रकारें पाहीं । अकारी सर्व ही बोलिजेती ॥५४॥
त्रिगुण त्रिवली समत्वें बोलिली । तत्त्वें विस्तारलीं पष्ट पुढें ॥५५॥
तंव शिष्य म्हणे त्रिगुण समान । हें कैसें वचन जाणावें पै ॥५६॥
मायेपोटीं सत्व सत्वापोटीं रज । रजांगीं निपज तमालागी ॥५७॥
बहु ठाईं ऐसें बोलणें ऐकिलें । संशयीं पडिलें मन येथें ॥५८॥
याचा कैसा भाव निवडूनी सर्व । सांगा अभिप्राव कळे ऐसा ॥५९॥
ऐसी हे आशंका वाटली प्रशिनका । वक्ता म्हणे ऐका हें चि आतां ॥६०॥
शास्त्रीं बहु भेद बोलिले असती । वेवादाती युक्ती याचिलागी ॥६१॥
शास्त्रकारें ठाईं ठाईं निरोपिले । पाहिजे घेतलें प्रचीतीनें ॥६२॥
सर्वेश्वराची हे इच्छारूप सृष्टी । कल्पितां चि उठी साकारत्व ॥६३॥
तेथें आदि मग गुण कैसे होती । ऐसी हे प्रचीती विचाराची ॥६४॥
त्रिगुण कर्दम पाही मुळाकडे । तो कैसा निवडे मागें पुढें ॥६५॥
कारण थोर तें प्रचीतीचें काम । दीर्घ दृष्टी वर्म जाणिजेतें ॥६६॥
परीपाठ युक्ती ग्रंथाची संमती । बोलायाची गती ऐक्यत्वाची ॥६७॥
सांगितलें ऐका महावाक्यामाजीं । ऐकतां सहजीं जाणवेल ॥६८॥
महामाया इच्छा तेथें शुद्ध सत्व । तें चि महत्तत्व ज्ञानशक्ती ॥६९॥
तया गर्थी वर्ते रज आणि तम । ऐसें येक वर्म बोलण्याचें ॥७०॥
इच्छारूप शक्ती त्रिगुणाची गती । त्रिगुणीम त्रि शक्ती वर्तताती ॥७१॥
त्रिगुणी जनीलीं तत्वें रूपा आलीं । कोणोपरी जाली रचना हे ॥७२॥
पांच हि पंचकें पंच महाभूतें । त्रिगुणीं समस्तें देखियेली ॥७३॥
देव इच्छागुणें सृष्टि आरंभणें । चालायाकारणें तिनी देव ॥७४॥
ब्रह्मा विष्णु रुद्र देवाचे औतार । जाणा आज्ञाधार परेशाचे ॥७५॥
उत्पत्ति पाळण आणि तो संव्हार । तिनी अधिकार अभीमानें ॥७६॥
गुणीं तत्वव्येक्ति महावाक्यीं युक्ती । ऐकावी पद्धती साक्षरूपें ॥७७॥
तमोगुण द्रव्ये शक्ती समवेत । पंच प्रसवत महाभूतें ॥७८॥
तामसी गगन गगनीं पवन । पवनीं दहन उद्‍भवलें ॥७९॥
दहनीं जीवन जीवनीं भूमिका । पष्ट दशा ऐका पंचभूतें ॥८०॥
विषयोपंचक पंचभूतीं जाण । शब्दवोळखण आकाशाची ॥८१॥
स्पर्श तो पवनीं रूप जाण वन्ही । रस तो जीवनीं गंध पृथ्वी ॥८२॥
तमीं तत्व सृष्टी येकें येक दाटी । भोग्य सद्य गोष्टी कार्यभोग्य ॥८३॥
राजसाहंकारी क्रिया शक्तीयुक्त । तत्वें हें जनीत पंचदशा ॥८४॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण । ज्ञानेंद्रिय जाण पंचक हे ॥८५॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद । पंचक विशद कर्मेंद्रिय ॥८६॥
व्यान समान जो उदान अपान । पांचवा तो प्राण पंचक हे ॥८७॥
ऐसी रजोगुणीं तत्ववृद्धि जाली । साधने हे बोली सकळीकीं ॥८८॥
सत्वगुणें ज्ञानशक्ति समवेत । अंत: करण हेत पंचरूपे ॥८९॥
अंत: करण मन बुद्धि चित्त चौथें । अहंकार येथें पांच जाली ॥९०॥
येक चित्त चतुष्ट नामी तें भिन्नत्व । उपाधी कर्तृत्व योगें जाणा ॥९१॥
भोक्ता साधक हे कर्ता भोक्ता ऐसें । सत्वीं बोलिलेसें तत्वज्ञानीं ॥९२॥
त्रिविधा अहंकार शक्तीचा विस्तार । कर्ता सर्वेश्वर इच्छामात्र ॥९३॥
त्रिगुणाचा खेळ तत्वें हें सकळ । निर्मिला पाल्हाळ येकदां चि ॥९४॥
ज्ञाता ज्ञा न ज्ञेय कर्ता कारण कार्य । भोक्ता भोग भोग्य त्रिपुटी हे ॥९५॥
अंत: करण भोकता इंद्रियासी भोग । भुतीं भोग्य योग विषयरूपें ॥९६॥
भोक्ता तो साधकु तिनी साधनेसीं । मिश्रीत तामसीं मेळे पांच ॥९७॥
सत्वरजीं तत्वें सूक्ष्म भूतांचीं । कर्दमासी तें चि महाभूतीं ॥९८॥
तामस जनितें पंच महाभूतें । तदंशें समस्तें मिळाली तें ॥९९॥
पूर्वीं होतीं गुप्त त्रिगुणीं विख्यात । तरी येकत्रें तें प्रगटली ॥१००॥
नदी येकी तीन वोघ प्रासारले । पुन्हा येकी जाले तेवि भूतें ॥१०१॥
येक पय जैसें त्रियांजुळीं द्रवे । येकत्वें सांटवे पात्राधारें ॥१०२॥
पांचाची च तैसीं जाणा पंचवीस । येकत्र साभास कर्दमाचा ॥१०३॥
ऐसीं सर्वै तत्वें कैसी ते मिळणी । कल्याण वचनीं सांगे पुढें ॥१०४॥

इति श्री महावाक्ये प्रणवत्रिगुण विवरणं नाम शत तृतीये ॥३॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP