अंक दुसरा - प्रवेश दुसरा

डॉ . पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे


( स्थळ - बिभीतक वृक्षाजवळील ओसाड रान . कलि एकटाच उभा आहे . )

कलि - हा द्वापार वेळेवर येतोय कि नाही ? त्याला विलंब झाला तर फार वाईट , कारण मला आता नलापासून फार वेळ दूर राहता येणार नाही . पुष्करच्या बाबतीत तो दमनक रुपातला चार्वाक चांगली कामगिरी बजावतो आहे . त्यानं पुष्कराशी चांगली जवळिक साधली हे उत्तम घडलं . नाही तर मलाच त्या पुष्करावरहि लक्ष्य ठेवावं लागलं असतं . चार्वाक कसा माझा पट्टशिष्य शोभतो बरं ! ( दूर पाहून ) आलाच वाटतं द्वापर . चला . आता नलाला पूर्ण ग्रासून टाकायला वेळ नाही लागायचा . ( द्वापर येतो . ) ये , द्वापारा ये . काय नवीन बातमी ?

द्वापर - तसं काही विशेष नाही महाराज . पण दमयंतीनं आपल्या पोरांना आजोळी पाठवून दिलं आहे , विदर्भाला .

कलि - असं ? कोणाबरोबर ?

द्वापर - तो लुडबुडया कुत्रा , वार्ष्णेय , तोच घेऊन गेला रथात घालून . काय भयंकर वेगानं रथ गेला म्हणता ! हां हां म्हणता दिसेनासा झाला . ती पोरं मारे गमतीत चालली होती . त्यांना काय माहीत पुढे काय वाढून ठेवलं आहे ते ? महाराज , त्यांची काय वासलात लावायची ते मला सांगा . तुम्ही मात्र जातीनं नलावर लक्ष्य ठेवा .

कलि - ते बघतो मी . पण तूं मात्र त्या पोरांच्या वाटेला जाऊ नकोस . अरे , काही झालं तरी अजाण बालकं ती ! त्यांना छळण्यात काय पुरुषार्थ ? हा कलि इतका दृष्टह्रदयी नाही . माझ्या मनात तर दमयंतीलाहि त्रास देण्याचं नाही . खरोखरच माझं तिच्यावर प्रेम होतं आणि अजूनहि आहे . पण माझा प्रतिस्पर्धी जो नल त्याला हतबल करतांना तिला थोडासा त्रास होणारच ! सुक्याबरोबर ओलंहि जळायचंच !

द्वापर - गाडयाबरोबर नळयालाहि यात्रा घडायचीच की !

कलि - आता तिला दुःख देतोय खरा ; पण नंतर तिला अशी सुखात ठेवीन कि वा !

द्वापर - म्हणजे ? काय म्हणताय काय महाराज हे ?

कलि - गाढव आहेस , द्वापारा , तूं अगदी ! इतकी वर्षे या कलीपाशी असूनहि तुला अजून या गोष्टी कळू नयेत ? अरे , मी एकदा नलाला नामशेष केलं की दमयंती कसं आयुष्य कंठणार ? तिच्यासारखी तरुण विलासिनी काय नलाच्या पश्चात् ‍ एखाद्या तपस्विनीप्रमाणे देहदण्ड सोशीत राहील ? शक्यच नाही ! ऐन तारुण्यात वैराग्यानं राहाणं महा कठीण आहे . मोठमोठे ऋषिमुनी जिथे पालथे पडले तिथे ही चिमणी पोर काय टिकाव धरणार ? अरे , ती दुसरं लग्न करणारच . आणि तेहि माझ्याशीच !

द्वापर - आपल्याशीच कशावरुन ?

कलि - मी नलाची अशी दुर्दशा केली हे जगाला कळल्यावर दुसरा कोण वीर दमयंतीशी स्वयंवराला उभा राहील ?

द्वापर - पण महाराज , दिक्पालांच्याहि मनात दमयंतीला वरायचं होतं ना ?

कलि - त्यांनी काय माझ्याशी स्पर्धा करावी ? अरे , बापाला बाप न म्हणणारा हा कलि काय त्या भ्याड लोकांपुढे मान तुकवेल ? इंद्र जर इतका पराक्रमी असता तर त्याने राक्षसांशी दोन हात केले नसते कां ? कशाला इंद्रपद सोडून पळून गेला दर वेळी ?

द्वापर - आपण पराक्रमी आहाता यात कोण संशय घेणार ?

कलि - म्हणून म्हणतो की आत्ता जरी तिला मी यातना दिल्या तरी एकदा ती माझी झाली की तिला मी अगदी फुलासारखी जपीन . आत्ताच्या या यातनांची तिला आठवणसुद्धा होऊ देणार नाही . तिच्याशी इतका चांगला वागीन की नलाशी विवाह करण्यात आपण खरंच मूर्खपणा केला असं तिचं तिलाच वाटेल . मला स्वयंवराला न बोलावून माझा तिनं जो अपमान केला त्याबद्दल तिला मी अशा तर्‍हेने पश्चात्ताप करायला लावीन .

द्वापर - म्हणजे एकंदरीत आपण प्रेमानं शत्रूला जिंकणार तर ?

कलि - छे , छे , तसला मूर्ख मी नाही हं ! तसला मूर्खपणा मी कधीहि करणार नाही . प्रेमानं प्रियेला जिंकणार असं म्हण . दमयंती माझी शत्रू कशी ? शक्यच नाही .

द्वापर - पण ती तसं मानते ना !

कलि - हुं ! त्यात काही अर्थ नाही . नल आहे तोपर्यन्त सगळया गमजा ! पुढे पाहू . मी आजपर्यन्त दुष्टपणानं लोकांना पश्चात्ताप करायला लावलं आहे ; पण माझ्या प्रियेच्या बाबतीत मात्र तसं करणार नाही . यावेळी सर्व जगाला पटवून देईन की हा कलि जितका दुष्ट तितकाच तो वेळप्रसंगी चांगलाहि होतो .

द्वापर - पण महाराज , इंद्र काय म्हणतो माहीत आहे कां ? तो म्हणतो ज्याप्रमाणे गजस्त्री क्षुद्र कोल्ह्यावर मन ठेवत नाही त्याप्रमाणे दमयंती कलीवर कधीच प्रेम करणार नाही .

कलि - इंद्र मला नांवं ठेवतो आहे , पण म्हणावं तूं अहिल्येशी जितका नीचपणे वागलास तितका नीचपणा हा कलि सामर्थ्य असूनहि कदापि करणार नाही . इंद्रा , सहस्राक्ष म्हणून तूं अज्ञ लोकांसमोर टेंभा मिरव , पण मला माहीत आहे सगळा इतिहास !

द्वापर - कसला इतिहास ?

कलि - अहिल्येची विटंबना करण्याबद्दल सहस्र क्षतं पडली होती इंद्राच्या अंगावर ! पण मग रडून भेकून त्यांचे नेत्र करुन घेतले इंद्रानं ! इंद्रा , यात तुला भूषण वाटत असले तरी मला ते दूषणच वाटते . म्हणूनच या कलीला नांवं ठेवू नकोस . कलि एक तर असा हलकटपणा कधी करत नाही आणि केलाच तर त्याची फळं भोगायला तो छातीठोकपणे तयार होईल . पाया पडून , उःशाप मागून घेणार नाही . दमयंतीला फसवून तिचा बळी मला घेता येणार नाही कां ?

द्वापर - कां नाही येणार ? पण तसा नीचपणा आमचे महाराज कधीच करणार नाहीत असा मला पूर्ण विश्वास वाटतो .

कलि - तसला अधमपणा इंद्रच करु जाणे ! देवांचाच तो राखीव अधिकार आहे . ‘ देव ’ म्हणवतात स्वतःला ! आणि असतात नेहमी पापपंकात निमग्न ! धिक्कार असो असल्या देवपणाला ! देव म्हणजे कसा सगळया सदगुणांचा पुतळा पाहीजे . पण यांच्यात दुर्गुणच अधिक !

द्वापर - पण देव म्हणतात कलीसारख्या पाप्याने आम्हाला दोष देऊ नये , धडे शिकवू नयेत .

कलि - छान ! म्हणजे मी पापी असलो तर इतर पापी लोकांना मी पापी म्हणू नये वाटतं ? नकटया माणसानं दुसर्‍या नकट्यांना नकटं म्हणायचं नाही म्हणजे जुलूमच झाला !

द्वापर - नाही तर काय ! डुकरं जशी सतत चिखलात लोळत राहतात तसे हे देव पापांच्या खातेर्‍यात खेळत असतात .

कलि - खेळा म्हणावं खुशाल पापांच्या खातेर्‍यात ! पण मग कलीला शिव्या कां देता ? मी अशी पापं कधी केलेली आहेत ? ब्रह्मदेवाप्रमाणे स्वतःच्या मुलीविषयी पापवासना मी कधी मनात आणली ? विष्णुप्रमाणे एखाद्या निष्पाप बलिराजाचा बळी मी कधी घेतला आहे ? तरी मी पापी कसा ? विष्णुअ आणि ब्रह्मदेव हे तर बडे देव की ! आणि असली पापं करतात ? यात देवपण कुठे दिसतं ? समुद्रमंथातून लक्ष्मी बाहेर आल्याबरोबर विष्णुनं ती पळविली ; पण हालाहल विष निघाल्यावर ? मग कशाला फिरकतो आहे तिकडे विष्णु ? मग भोळा सांब आहेच , जगाचं कल्याण करायला उभा ! यात काय विष्णुचा स्वार्थीपणा दिसत नाही ? पण प्रत्येक वेळी कलि तेवढा स्वार्थी , कलि तेवढा पापी , कलि तेवढा नीच मनोवृत्तीचा ! जगातली जेवढी वाईट विशेषणं तेवढी सगळी कलीच्या वांटयाला ! कां रे बाबांनो ? स्वतःच्या पायांखाली काय जळतंय ते आधी पहा की ! मग दुसर्‍यांच्या भानगडीत नाकं खुपसा .

द्वापर - पाहून पाहून छाटून टाका सर्वांची नाकं एखाद दिवशी !

कलि - तेच करायला पाहीजे . बरं राहू दे ते ! उगाच काय तुझ्याजवळ चर्‍हाट वळत बसू ? सामर्थ्यसंपन्न माणूस वायफळ वटवट करीत नसतो , करायचे ते करुन दाखवतो . मनात सांठलं होतं फार म्हणून बोलावसं वाटलं तुझ्यापाशी . - बरं , पण इतका वेळ तूं होतास कुठे ? तिकडे नल पुष्कर द्यूत खेळताहेत ते कळलं कां तुला ?

द्वापर - होय महाराज ! आताच ऐकलं खरं !

कलि - चार्वाक पुष्करला मदत करतोय कपट लढवण्यात . तूं चार्वाकाला सहाय कर . लक्ष्यात ठेव नल हरला पाहीजे . मी स्वतः नलाचे बाजूला राहीन . त्याचं मन भारुन खेळाकडे दुर्लक्ष्य करवीन . तुम्ही काय चलाखी करायची ती करा .

द्वापर - ठीक आहे . तुम्ही काही काळजी करु नका . सर्व यथासांग पार पाडीन . पण सरकार खेळ कुठपर्यन्त आला आहे ?

कलि - खेळ आपल्यासारखाच चालला आहे . लहानसहान पण नल हरतोय आणि पुष्कर दुःखावर डागण्या देतोय . वास्तविक फांसे खेळण्याची नलाची मुळीच इच्छा नव्हती . जुलमाचा राम राम म्हणून तो खेळायला बसला आहे . त्यामुळे खेळात त्याचं लक्ष्यच नाही . म्हणून तर पुष्करचं कपट भरभर सफल होतंय .

द्वापर - पण नलाला इतकं कसं कळत नाही ?

कलि - कसं कळेल ? मन ठिकाणावर असेल तर ना ? मी तर त्याला आत्ताच पूर्ण ग्रासून टाकलंय . शिवाय कपटनीतीने धडे मीच पुष्करला शिकवले आहेत . ज्या बाजूला मी त्या बाजूला यश हटकून ठेवलेलंच असतं . जा तूं लवकर . चार्वाकाला मदतीची आवश्यकता आहे . आपल्या कामात यशस्वी व्हाल असा माझा आशीर्वाद आहे .

द्वापर - पण महाराज , देवांचा नलावर वरदहस्त आहे ना ?

कलि - पाहू ना आता , नल सुखी होतो कां माझा पट्ठा पुष्कर सुखी होतो . थोडक्यात आता देव श्रेष्ठ का कलि श्रेष्ठ याचाच निकाल लागेल नलपुष्करांच्या भांडणात . जगाला कलीची श्रेष्ठता पाहण्याचा योग आलेला दिसतोय . ठीक आहे . जा तूं .

द्वापर - तुम्हीहि येता ना महाराज ?

कलि - कलीचं वास्तव्य सगळीकडे असतं हे विसरलास वाटतं ? जा तूं द्यूताच्या जागीं तेथे नलाच्या उजव्या बाजुला मी दिसेन , वेषान्तरात ! जा , जा लवकर . वेळ दवडू नकोस . प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे आता .

( द्वापर जातो . कलि हंसत हंसत त्याच्याकडे पहात रहातो . पडदा पडतो . )

अंक २ प्रवेश २ समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP