अंक पहिला - प्रवेश दुसरा

डॉ . पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे


( निर्मनुष्य रानात बिभीतक वृक्षाजवळ कलि उभा आहे . थोडयाच वेळात द्वापर प्रवेशतो )

कलि - ये , द्वापारा , ये . लवकर आलास हे किती चांगलं झालं ! तुझी अतिशय उत्सुकतेनं वाट बघत होतो मी .

द्वापर - अहो , पण कलिराज , येवढं काम तरी कसलं काढलं आहेत आपण ? आणि तुमच्या सारख्या थोरांनी माझ्यासारख्याच्या मदतीची अपेक्षा धरायची म्हणजे जरा विचित्रच नाही कां ?

कलि - अरे त्यात विचित्रपणा कसला ? आपण कितीहि मुत्सद्दी आणि कपटी असलों तरी कोणचंहि महत्त्वाचं काम करतांना दुसर्‍या कुणाचा तरी विचार घ्यावा हे उत्तम !

द्वापर - अगदी बरोबर ! कारण अगदी तत्त्वार्थवेत्ता , मोठा विद्वान जरी झाला तरी त्याच्या मताला जर दुसर्‍या कोणाचा दुजोरा नसला तर त्याला कार्याची निश्चित आंखणी करतांना संशय वाटू लागतो .

कलि - म्हणूनच ! अशी आंखणी करण्याकरताच तुला मी बोलावलेलं आहे . कारण येऊन जाऊन मला पाठिंबा मिळणार तुझा , नाही तर चार्वाकाचा ! मी चार्वाकाला पहिल्यापासूनच हाताशी धरलेला आहे या कामात ! पण तो आहे नुसता सांगकाम्या ! तेव्हा चांगला सल्ला हवा असेल तर तो तुझाच घेतला पाहीजे .

द्वापर - पण कलिराज , येवढं काम तरी कसलं आहे ? ते तर अजून सांगितलंच नाहीत . मला वाटतं नलराजाच्या बाबतीत तर काही करण्याचा आपला विचार नाही ना ?

कलि - बरोब्बर ओळखलंस ! माझा शिष्य शोभतोस खरा ! नलदमयंतीचाच सूड घ्यायचाय मला . दमयंतीच्या स्वयंवराचं निमंत्रण सुद्धा मला नाही . आणि मी आपणहून येत होतो तर मी तिथं जायच्या आंत दमयंतीनं नलाला वरलं सुद्धा ! हा धडधडीत अपमान मी बरा सहन करीन ?

पद ५

केला मानभंग हा

पाय देऊनि भुजंग डिवचिला महा

भोगा शासन आता ॥१॥

आमंत्रण नाही मला

वरिले त्या दुष्ट नला

मत्कोपाच्या चेतविल्या ज्वाला

ज्या जाळिती आता सकला ॥२॥

द्वापर - पण महाराज , देवांनासुद्धा जिथं तिनं वरलं नाही , तिथं -

कलि - देव आहेत एकजात सगळे भ्याड अन् ‍ निर्लज्ज ! स्वाभिमान मला वाटतं त्यांच्या गांवीहि नसेल . येवढे हे चार दिक्पाल ! यांना टाकून दमयंतीनं नलाला पत्करलं आणि हे चार दीडशहाणे चुरमुरे खात स्वस्थ बसले ? स्वर्गाची ही बेअब्रु यांना सहन तरी कशी होते ?

द्वापर - पण महाराज , अशा वेळी करणार तरी काय ?

कलि - करणार काय ? असे , हा कलि तिथं असता तर त्या नलदमयंतीला तिथल्या तिथे उभे जाळले असते . पण हे देव म्हणजे अगदी - - अरे , मी देवांना म्हटलं की मी दमयंतीला वश करतो , मग आपण पांचहि जण तिचा उपभोग घेऊ . फक्त मला जरा सहाय्य करा . पण तेहि या मूर्खाला रुचलं नाही .

द्वापर - पण ते याला कसे कबूल होतील ? कारण सरस्वतीच्या म्हणण्याप्रमाणे धीरोदात्त नलाला सती दमयंती मिळवून देण्यासाठी आणि त्यांची केवळ परीक्षा पाहून त्यांना अक्षय कीर्ति आणि वर देण्यासाठीच इंद्रदि देव तिच्या स्वयंवराला गेले होते .

कलि - अ हॅ हॅ ! थोबाड बघा त्या देवांचं ! म्हणे दमयंतीला वरण्यासाठी गेले नव्हते , तर नलाला ती देण्यासाठी गेले होते . मग आधी नलाला आडविण्याचा कां प्रयत्न केला ? आणि ते जमलं नाही तेव्हा कपटाने त्याला फसवून आपला भाट कां बनवलं ? आणि त्यातूनहि त्या दोघांनी तोड काढली तेव्हा नलाचं रुप घेऊन दमयंतीला फसवण्याचा कां प्रयत्न केला ?

द्वापर - कोणास ठावूक बुवा ! आपल्याला काही खरं माहीत नाही .

कलि - अरे , काय सांगू तुला ? कोल्ह्याला द्राक्ष मिळाली नाहीत तर आंबट म्हणून त्यांना नांवं तरी ठेवतो तो कोल्हा ! पण हे निर्लज्ज , वर त्या नलदमयंतीचीच स्तुति करत आहेत .

द्वापर - मग आपण काय करणार आहात आता ?

कलि - अरे , स्वयंवर फसलं तर फसू द्या . पण त्याचा सूड म्हणून नलाचा दमयंतीशी आणि पृथ्वीशीहि वियोग घडवून आणीन हीच या कलीची प्रतिज्ञा ! खवळलेल्या कलीनं इंद्राचा पराभव करणार्‍या नलाशी दोन हात करुन त्याला बेजार केलं अशी माझी कीर्ति भावी युगं गातील .

द्वापर - ही प्रतिज्ञा आपण देवांसमोर केली होती कां ?

कलि - हो तर ! काय भितो कि काय मी देवांना ?

द्वापर - मग ? देव काय म्हणाले ?

कलि - काय म्हणताहेत ? एकेकानं अकलेचे तारे तोडले . इंद्र म्हणतो कसा ? म्हणे , नलासारख्या सुचरित आणि पुण्यश्लोक पुरुषाशी केलेलं वैर तुला कधी फलप्रद होणार नाही . उलट तूं नलसभेत हास्यास्पद मात्र ठरशील .

द्वापर - वा रे वा इंद्र ! हास्यास्पद व्हायला कलिमहाराज म्हणजे काय इंद्र आहेत ? कि इतर दिक्पाल आहेत ?

कलि - बघ ना ! आणखीन् त्यानं मला सांगितलं की तूं दमयंतीसारख्या साध्वीलाहि दुःख देऊ नकोस . तुझा तिथं पाड लागणार नाही . आता यातला धमकीचा भाग राहू दे . पण हे मी मान्य करीन . कारण आता स्वयंवर झालं म्हणून मी दमयंतीचा अभिलाष सोडला . त्या पोरीवर एक वेळ मी दयाहि करीन . पण नलाला क्षमा करण्याचं काय कारण ?

द्वापर - बरोबर आहे . आणखी इतर देव काय म्हणाले ?

कलि - सगळे एकजात म्हणाले की कलीचा प्रवेशच मुळी नलराज्यामधे अशक्य आहे .

द्वापर - मला तर नलराज्यात येणं जमत नव्हत बुवा ! तुमच्या कृपेनंच मी येथवर येऊ शकलो .

कलि - मलाहि विघ्न आली ; नाही म्हणत नाही मी ! त्या यज्ञयागांच्या धुरामुळं प्राण कासावीस झाले अगदी . गायत्री जप तर हालाहलाप्रमाणे माझ्या अंगांत भिनत होते . पण अस्मादिकांची चिकाटीच विलक्षण ! शेवटी हा मला योग्य असा बिभीतक वृक्ष काढलाच कि नाही शोधून ? हा माझा कल्पवृक्ष आहे .

द्वापर - इथूनच आपण नलावर नजर ठेवून असता वाटतं ?

कलि - हो . पण अजून तो पट्ठ्या सांपडत नाही माझ्या कचाटयात . मला तर असं होऊन गेलंय कि कुठे तो ठेंचाळतो आणि केव्हा मी त्याच्या मानगुटीवर बसतो .

द्वापर - मग अजून काहीच प्रगती नाही कां ?

कलि - नाही कशी ? नलाच्या भोवती फांस तर आंवळत आणला आहे .

द्वापर - तो कसा काय ?

कलि - अरे , त्या बेकार पुष्कराला हाताशी धरलंय मी . रिकाम्या माणसाचं डोकं म्हणजे सैतानाचं खोकं असं म्हणतात ना ? ते काही खोटं नाही . पुष्कराच्या मनात मी नलाविषयी भयंकर अपसमज पेरलेला आहे . आणि द्यूताचं विलक्षण वेडहि भरलंय त्याच्या मनात . शिवाय जगातलं सारं कपटहि कोंबलंय त्याच्या टाळक्यात ! पहाच आता कशी गंमत होते ती .

द्वापर - काय होणार पुष्कराचा उपयोग ?

कलि - वेडाच आहेस अगदी ! अरे पुष्कर नक्कीच शहाणा आहे . मी दिलेल्या कपटबुद्धीचा तो अगदी योग्य तर्‍हेनं उपयोग करुन घेईल . द्यूतामध्ये तो नलाला जिंकून घेईल .

द्वापर - पण नल कसा द्यूताला प्रवृत्त होईल ?

कलि - अरे , तीच तर माझी करामत ! आणि एकदा का नल फांसे खेळायला बसला की माझ्या फांसांत अडकलाच म्हणून समजा . आणि मी तरी असं कां करु नये ? माझा त्या दोघांनी अपमान केलेला आहे . तेव्हा त्यांची दैना करण्यासाठी माझ्या अंगीं असेल नसेल तेवढा दुष्टपणा मी खर्च करणार .

द्वापर - अगदी बरोबर आहे . तसंच केलं पाहीजे .

कलि - हेच मला पाहिजे . तुझा होकारच मला हवा होता . अरे एकदा नांव कानफाटया पडलं की पडलं ! तसंच आहे हे ! सगळेच नेहमी मला दुष्ट , हलकट , नीच , पापी , व्यभिचारी म्हणत असतात . त्यामुळे मी काहीहि चांगलं सत्कृत्य केलं तरी ते जगाच्या डोळयांना वाईटच दिसतं . मग वाईट काम केलेलंच काय वाईट ?

द्वापर - हो ना ! आपण आपल्यापुरतं पहावं . जग काय वाटेल ते म्हणो .

कलि - माझा अपमान काय ? या कलीची अवहेलना ? हालाहल विषाचा भरणा शेषाच्या सहस्र मस्तकात केल्यावर तो जसा महाभयंकर होईल तसा आहे हा कलि ! त्यात पुन्हा नलदमयंतीनं त्याला डिवचलं आहे . आणि त्या जखमांवर देवांनी मीठ चोळलं आहे . आता कसं होतं ते पाहाच ! माझ्यासारखा कपटी सार्‍या विश्वात दुसरा कुणीहि नाही . उलट , हा नल तर अगदीच भाबडा आहे . त्यानं काय माझ्याशी कपट लढवावं ? आणि जे कपटाला कपट लढवत नाहीत ते व्यवहारशून्य पढतमूर्ख नेहमी पराभूतच होतात .

द्वापर - बरं , पण मी आता आपल्याला काय मदत करु ?

कलि - तूं सध्या जाऊन विश्रान्ती घे . मी थोडया वेळानं चार्वाकाला तुझ्याकडे पाठवीन . त्यावेळी तूं इकडे ये . मग पाहू तुमच्या कामगिरीचं .

द्वापर - जशी आज्ञा महाराज ! ( जातो . )

कलि - ( दूरवर पाहून ) हा कोण बरं येतोय ? आं ? चार्वाकच कि काय ? अरे हो चार्वाकच ! बेमालूम वेशान्तर केलेलं दिसतंय . ( चार्वाक येतो ) ये ये चार्वाका ये . तुला अगदी शंभर वर्ष आयुष्य आहे बघ ! मी आता तुझीच आठवण काढत होतो . बरं काय हालहवाल ?

चार्वाक - काही विशेष नाही , महाराज , नल येवढंसुद्धा पापाचरण करत नाही . डोळयात तेल घालून बघतोय मी ; पण कुठेहि छिद्र दिसत नाही . पुण्यकर्म घडत नाही अशी नखायेवढीहि जागा नलराज्यात कुठे दिसत नाही .

कलि - तुम्हाला योग्य स्थानं मिळाली नाहीत खरी , पण मला मात्र हा बिभीतक वृक्ष सांपडला . येथूनच मी नलावर करडी नजर ठेवून आहे .

चार्वाक - नल तर येवढा पुण्यशील आहे की आम्हाला त्याचेकडे बघवतसुद्धा नाही . तो सदैव धर्मकार्यातच निमग्न असतो . आणि इतर वेळी दमयंतीबरोबर शृंगारचेष्टा करण्यात रममाण झालेला असतो . आणि सर्वात मोठं आश्चर्य असं की दमयंतीशी क्रीडा करीत असूनहि तो धर्मकृत्य मुळीच विसरत नाही . धर्मकार्याची वेळ झाल्याबरोबर तो उठून जातो .

कलि - आणि मग दमयंतीची जी काही अवस्था होते ती मी बघतोच आहे रोज ! वेडे दमयंती , माझ्याशी जर विवाह केला असतास तर तुझा असा विरस कधीच झाला नसता . असा धर्मकार्याचा अडथळा कधीच आला नसता .

चार्वाक - किती तरी वेळा सकाळी भाट यायच्या आधीच नल स्वर्गात मंदाकिनीच्या कांठी स्नानसंध्या करायला गेलेला असतो . दोघांनीहि एकमेकांना अगदी वेडं केलेलं आहे . दमयंती तर नलासाठी फारच वेडावली आहे . मधेच नल जाऊ लागला तर तिला कोण राग येतो ! आणि मग तिची समजूत काढता काढता नलाची पुरेवाट होते .

कलि - ( स्वगत ) दमयंती , तुला नलाचा येवढासुद्धा विरह सहन होत नाही काय ? थांब , तुला आता विरहाचा चांगलाच भयंकर चटका देतो . ( उघड ) बरं , चार्वाका , देवांची , त्या चार दिक्पालांची काय हालहवाल ?

चार्वाक - त्यांची काय हालहवाल असणार ? अप्सरांच्या तांड्यामधे शृंगारचेष्टा करीत दिवसचे दिवस घालवायचे आणि लहर आली की नलाचा उदो उदो करुन आपल्याला शिव्याशाप द्यायचे ; दुसरं काय ?

कलि - द्या म्हणावं शिव्याशाप ! आता नांवं ठेवताहेत खरं पण पुढे माझ्याच पावलावर पाऊल ठेवून येतील . कोणी तरी एकानं पुढाकार घेऊन एखादा मार्ग चोखाळला की त्याच्या मागून जाणार्‍यांची वाण कधीच पडत नाही . आता मी पुढाकार घेतलाच आहे , तेव्हा मला यश येतंसं दिसलं की येतील सगळे गोंडा घोळत माझ्या मागे . बरं , चार्वाका , शिव्या देतात म्हणजे म्हणतात तरी काय रे ते मला ?

चार्वाक - ते ना ? ते म्हणतात की दमयंतीनं या कुत्र्याला - म्हणजे आपल्याला सोडून नलाला वरलं म्हणून कलीला मत्सर वाटतो .

कलि - मूर्ख आहेत हे देव अगदी ! आता यांना गुणावगुणहि कळेनासे झाले आहेत . वरचढ झालेल्यांचा उत्कर्ष सहन होऊ नये हा तर मुळी तेजस्वी लोकांचा स्वभावच असतो . आणि हे मूर्ख त्याला मत्सर म्हणतात ? स्वतः तर अगदी मढ्यापेक्षा मढी बनलेली आहेत .

चार्वाक - नाही तर काय ? दमयंतीनं केलेल्या अपमानाची काही खंत आहे कां यांना ? तुम्हाला काय आहे त्या षंढांच्या मदतीची आवश्यकता ?

कलि - मुळीच नाही . ज्यांना चीडच नाही असले पुळचट , नेभळे प्राणी आपले मित्र झाले काय आणि शत्रू झाले काय , त्याची विद्वान वीरांना मुळीच पर्वा नसते . मी कशाला त्या देवांशी मैत्री राखू ? क्षुद्र अशा कोल्ह्याशी गजराज मैत्री करीत नसतो . मी माझ्या मनगटाच्या जोरावर , बुद्धिमत्तेच्या तीव्र कुटिलतेवर माझी प्रतिज्ञा खरी करीन . नलाचा सूड घेईन . फांस आवळत सुद्धा आणला आहे . बसू देत शिव्या देत ते देव ! कुत्र्यांच्या भुंकण्याकडे हत्ती कधी लक्ष्य देत नसतो .

चार्वाक - महाराज , मधेच विचारतो त्याबद्दल क्षमा असावी . पण आपण आता म्हणालात की फांस आंवळत सुद्धा आणला , तो कसला फांस ? काय योजना आंखली आहेत आपण ?

कलि - मी पुष्कराकरवी द्यूतामध्ये नलाचे राज्य छिनावून घेणार आहे . नल एकदा त्याच्या राज्याबाहेर पडला की माझ्याच हातात ! मग त्याला कसा होरपाळून काढायचा ते पाहू पुढे . येवढं सगळं होईपर्यन्त नलाच्या अंगात शिरण्याची संधी मात्र मला मिळाली पाहीजे . देव करो आणि तशी संधी मला लवकर मिळो . ( जीभ चावून ) देव काय करणार म्हणा ! शिवाय मला त्यांचं सहाय्यहि नकोच आहे .

चार्वाक - बरं . पण महाराज , मी आता काय करु ?

कलि - तूं आता असं कर - -

चार्वाक - कसं ?

कलि - तूं द्वापारला बोलवून आण . जा लवकर . ( चार्वाक जाऊ लागतो ) अरे ए चार्वाका , पण तूं सध्या असतोस तरी कुठे ?

चार्वाक - मी ना ? राजवाडयातच असतो दमनकाचं सोंग घेऊन ! तो वार्ष्णेय आहे ना - नलाचा सारथी - त्याचीहि ओळख करुन घेतली आहे मी थोडी फार .

कलि - वा , छान , उत्तम ! बरं , जा तूं आता लवकर . ( चार्वाक जातो . ) ( स्वगत ) बरीच अक्कल मिळवलेली आहे की लेकानं ! नाही तर आधी , नुसता बैलोबा होता , बैलोबा ! बरोबरच आहे . इतके दिवसांच्या माझ्या सहवासानंतर त्यानं इतकी हुशारी संपादन केली नसती तरच आश्चर्य होतं ! सुवासिक सुमनाच्या सान्निध्यात येणार्‍या मातीलाहि सुगंध लागतोच की ! - - बरं . आता काय करावं ? - - असंच ! द्वापारालाहि चार्वाकाप्रमाणेच राजवाडयातच रहायला सांगावं . आणि राजवाडयातच अधर्म माजवावा . ठीक बेत जमला . द्वापर पुष्कराच्या मागे लागेल , मी नलावर डोळा ठेवून राहीन आणि हा चावट चार्वाक असू दे लुडबुडत मधे ! ( दूरवर पाहून ) आले वाटतं हे दोघं . आता जरा गंमत करु हं ! पाहूं यांच्या धैर्याची परीक्षा . नाही तरी हे झाड भूताचं म्हणून प्रख्यात आहेच . यावरच बसून भेडसावू यांना ( कलि कक्षात जातो . द्वापर व चार्वाक प्रवेशतात . )

द्वापर - ( प्रवेशतांना ) मी म्हणतो की - -

कलि - ( कक्षेतून ) कोण आहे ? माझ्या सीमेमधे तुम्ही काय म्हणून शिरला आहात ? आता एक पाऊल पुढे टाकाल तर प्राणाला मुकाल .

चार्वाक - ब ब भ भूत ! भूऽ त ! द्वापारा , ( मटकन् ‍ खाली बसतो . )

द्वापर - चार्वका , मूर्खा , घाबरतोस काय असा ? मी आहे ना ?

चार्वाक - अरे , तुला माहीत नाही तर ! इथं भूतं राहतात , महादेवाची , असं कलिराजांनीच मला सांगितलेलं होतं . नल शंकरभक्त असल्यानं ही भूतं नलाचीच बाजू घेणार . आता आपली धडगत नाही रे बाबा ! ( कपाळाला हात लावतो . )

द्वापर - अग आई गं ऽ ऽ ! मूर्खा चार्वाका , आधीच कां नाही रे सांगितलंस ? पळ आता ! एक क्षण दवडू नकोस !

चार्वाक - पळतो कसला आता ? माझ्या पायांमध्ये तर अगदी त्राण राहिलं नाही .

कलि - ( कक्षातूनच ) षंढांनो , अजूनहि तुम्ही इथंच ? तुम्ही कोण हे मला माहित आहे . मी या भागातील भूतांचा प्रमुख असून श्री शंकरांचा परमप्रिय सेवक आहे . नलराजांचं रक्षण मी आपणहून गुप्तपणे करीत असतो . तुमच्या कलीच्या मांसाचे लुसलुशीत तुकडे आताच मी माझ्या मुलांना दिले . पण तेवढयाने त्यांची भूक भागलेली नाही , तृप्ति झालेली नाही . मीहि अजून उपाशीच आहे . बरं झालं तुम्ही वेळेवर आलात . मी आपला स्वभावानं चांगला म्हणून पूर्वसूचना दिली . तरी तुम्ही हलत नाही . त्या अर्थी जिवावर उदार झालेले दिसता . ठीक आहे . आलोंच मी .

( द्वापर व चार्वाक किंचाळून पळून जातात . मग मोठयाने हंसत कलि प्रवेशतो . )

कलि - ( स्वगत ) किती भ्याड आहेत रे हे बेटे ! पाय लावून पळताहेत पहा . ( हांका मारतो ) ए मूर्खांनो , परत फिरा . मी , मी कलि हांका मारतोय तुम्हाला . फिरले लेकाचे ! किती घामाघूम झाले आहेत पहा . पांढरे फटक पडले आहेत अगदी ! आता यांना पाहून हे काळे आहेत असं कोण म्हणेल ?

( धापा टाकत द्वापर व चार्वाक प्रवेशतात )

कलि - हात् ‍ भ्याडांनो , भुताटकीला घाबरुन पळता आणि म्हणे नलाशी सामना देणार ! मघाशीच सांगितलं होतं ना मी की मीच या झाडावर आहे म्हणून ?

चार्वाक - प - पण महाराज , त त्या ब ब भूतानी सांगितलं की म मी क कलीला मारुन - भक्षण -

कलि - हं हं मला अरे तुरे म्हणून घे तेवढयात ! शाब्बास आहे तुझी !

चार्वाक : क्षमा झाली महाराज , चुकी करावी ! मी त्या भूताचं बोलणं सांगितलं . आपला अपमान करण्याचं नव्हतं माझ्या मनात .

कलि - अरे बैला , आता तरी भीति काढून टाक मनातून . क्षमा झाली काय ? चुकी करावी काय ? शुद्धीवर तरी आहेस काय ? अन् ‍ काय रे द्वापारा , आवाजावरुन तरी ओळखायचंस कि नाही मला ?

द्वापर - महाराज , पण चार्वाक -

कलि - काही बोलू नकोस ! तो एक गाढव आणि तूं सात गाढव ! बरं आता मी सांगतो ते नीट ऐका ! त्याप्रमाणे वागण्यात चूक केलीत तर , ध्यानी ठेवा , माझ्याशी गांठ आहे .

द्वापर व चार्वाक दोघेहि एकदम - आज्ञा द्यावी महाराज .

कलि - तुम्ही दोघांनीहि राजवाड्यात राहायचं वेशान्तर करुन . चार्वाकानं प्रवेश मिळवलेलाच आहे . द्वापारा , तूंहि मिळव प्रवेश राजवाडयात . हे पहा , द्वापारा , त्या पुष्कराच्या मनावर ताबा मिळवायचा . अगदी अन्तरंगात शिरायचं त्याच्या . आणि त्याचा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला की माझं तत्त्वज्ञान त्याच्या डोक्यात कोंबायला आरंभ करायचा . मी सगळी पार्श्वभूमी तयार करुन ठेवलेलीच आहे . त्यामुळे तुझं काम अगदी सोपं झालेलं आहे .

द्वापर - मग तर मी हे काम चुटकीसारखं करुन टाकीन .

कलि - मात्र जपून हं ! त्याला काय किंवा दुसर्‍या कोणाला काय आपल्याविषयी यत्किंचितहि संशय येऊ देऊ नका .

द्वापर - त्याची काही काळजी नको . या कानाचं त्या कानाला कळणार नाही .

चार्वाक - महाराज , मला काही कामगिरी ?

कलि - तुझे उद्योग चालू देत नेहमीसारखेच ! शिवाय द्वापराला मदत कर हवी ती .

चार्वाक - जशी आज्ञा महाराज .

कलि - ठीक आहे . जा आता तुम्ही . कामाला लागा . मात्र हयगय किंचितहि खपणार नाही . पुन्हा एकदा सांगतो माझ्याशी गांठ आहे . सगळं नीट लक्ष्यांत ठेवून , जपून वागा . जा . यशस्वी व्हा . ( दोघेहि जातात . ) मलाहि आता पुढल्या उद्योगाला लागलंच पाहीजे . शक्य तितक्या लवकर नलाचं मन बिघडवलं पाहीजे . पुष्कराच्या मनात ठिणगी पाडून ठेवलीच आहे मी . त्यावर तेल ओतण्याचं काम द्वापर करेलच . आता मात्र नलाची शंभर वर्षे भरलेली दिसताहेत . कलीरुप सूर्यापुढे नलरुपी काजव्याचं तेज किती पडणार ? त्या नलाला मी काय म्हणून सोडून द्यावं ? दुर्जनावर उपकार केल्यानं तो कधी शांत होत नसतो . त्याला जबरदस्त फटकाच मारावा लागतो . नलाकडे मी जर दुर्लक्ष्य केलं तर तोच मला फाडून खाईल . तेव्हा त्याला तशी संधीच देता कामा नये . त्याची ससेहोलपट करुन टाकेपर्यन्त माझा डोळयाला डोळा लागणं शक्य नाही .

( पडदा ) ( अंक १ - प्रवेश दुसरा समाप्त )

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP