TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अंक पहिला - प्रवेश दुसरा

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


प्रवेश दुसरा
(स्थळ - तळीरामाचे घर. पात्रें - तळीराम व भगीरथ)

तळीराम - (दोन्ही पायात बाटली धरून ओणव्याने बूच काढीत आहे.) म्हणे दारू सुटत नाही! एकदा घेतली म्हणजे सुटत नाही म्हणे! अन् तेवढयानं दारू वाईट! सुटत नाही म्हणजे बिशाद काय? घ्या! (दोघे पितात.) भगीरथ, दारूबद्दल बडबडणारांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळी माहीत नसतं! बरं, मी म्हणतो, सुटत नाही, असंच गृहीत धरून चाला की, खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही! पण तेवढयानं दारू वाईट कशी ठरते? भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळविता, आणि ती जन्माची चिकटते खरी! म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलं आहे का? तशीच बायको! एकदा नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलगतो ना? म्हणून बायका करायचं टाकलं का आहे? पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का?

भगीरथ - तळीराम, या तीन गोष्टींचं एवढं साम्य जमलं म्हणून सर्वांशी तुलना कशी होईल? पदवी आणखी बायको यांचे परिणाम असे वाईट होतात का?

तळीराम - यांचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. असे कैक पदवीधर हात धरून मी दाखवून देईन की, पदवीचा नावापुरता पोकळ आधार नसता, तर त्यांना आपला मूर्खपणा जगापुढं मांडण्याची छातीच झाली नसती. दारूबाजाचं बरळणं दुस-याला उमजत नाही हे खरं; पण पदवीधराची बाष्फळ बडबड तर त्याची त्यालासुध्दा कळत नाही! इंग्रजी अंमल सुरू झाल्यामुळं आमच्या हतभागी देशात ज्या अनेक आपत्ती आल्या, त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत. पाठशाळेत पाऊल टाकून पदवीचा वेळ लागण्याबरोबर मुलाला मतं आणि मिशा फुटू लागतात. मताच्या मंडपीवर मूर्खपणाला मनमोकळेपणानं मिरास मिळते आणखी मिशांचा मोर्चा आकडयांच्या वळणावळणानं पोरीबाळींच्या प्रेमाकडे वळतो.

भगीरथ - उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबनाच मांडली आहे म्हणायची!

तळीराम - भगीरथ, तुम्ही एक प्याला घ्या आणखी. म्हणजे तुमच्या जिभेवरून हे 'उदात्त' वगैरे शब्द धुवून जातील. प्रेम हे हास्यास्पद नाही वाटतं? अहो, काव्यात कमल, नाटकात सूड, कादंबरीत भुयार, मासिक पुस्तकांत खास अंक, वर्तमानपत्रांत खास बातमीदार, संसारात प्रेम, औद्योगिक चळवळीत सहकारिता, सुधारणेत देशभक्तीत स्वार्थत्याग आणि वेदान्तात परब्रह्म यांचा धुमाकूळ माजला नसता, तर त्या त्या गोष्टींची थट्टा करायला जागाच उरली नसती.

भगीरथ - हे राहू द्या. प्रेमाचे परिणाम दारूपेक्षा वाईट कसे होतात ते सांगा पाहू! सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढं या मदिरेची काय किंमत आहे?

तळीराम - हं, प्रेमात काय जीव आहे? प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळया जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वत:लाच मदिराक्ष बनता येतं! बोला-

भगीरथ - खरं आहे. या गोष्टी नव्हत्या माझ्या लक्षात आल्या. आणखी प्रेमाच्या नादात सापडलं, म्हणजे रात्रीच्या रात्री झोपेवाचून काढाव्या लागतात आणि मदिरेमुळे रात्रीच काय, पण दिवससुध्दा झोपेत जातात. बरं, मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो तुम्हाला?

तळीराम - मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

भगीरथ - बरं पुढं?

तळीराम - चोरीच्या बाबतीत तर तो बेटा अगदी अजाण असतो! एखादी लहानशी गोष्टसुध्दा त्याला दुस-याजवळून चोरून ठेवता येत नाही- फट्दिशी तो ती बोलून टाकतो.

भगीरथ - खरंच, चोरून प्यालेली दारूसुध्दा त्याला जिरवता येत नाही.

तळीराम - अशी थट्टेवर गोष्ट नेऊ नका! एकदा आमच्या मद्यपानाच्या बैठकीत आमच्या एका मित्राला चोरी करायची इच्छा झाली. तेव्हा त्यानं मोठया शर्थीनं माझ्या बोटातली अंगठी पळविली; पण शेवटी दारूच्या धुंदीत त्यानं ती पुन्हा माझ्याजवळ ठेवावयाला दिली. मात्र हा माल चोरीचा आहे, कोणाला दाखवू नकोस, असं त्यानं मला गंभीरपणानं बजावलं!

भगीरथ - छान! यात दोघांनाही समाधान! फळ एकाला चोरी केल्याचं आणि दुस-याला चोरी सापडल्याचं!

तळीराम - तेच तुमच्या प्रेमाच्या बाबतीत पाहा! कुणी कुणाचं मन चोरतो, तर कुणी चोरून भेटी घेतात! एकमेकांकडे पाहायचं ते सुध्दा चोरून! इथून तिथून सारा चोरांचा बाजार!

भगीरथ - प्रेमाचा पाशच तसा आहे. प्रेमानं दोन जिवांचा अगदी एकजीव होतो.

तळीराम - दोन जिवांचा एकजीव होत नाही, पण एका जोडप्याच्या दोन जिवांपासून दहा-पंधरा जिवांचं लटांबर मात्र उत्पन्न होतं! हिंदुस्थानच्या हवेत अव्वल आर्यांचा वंशवृक्ष तेहतीस कोटी फळांनी लादून निघाला, तो काही त्याच्या मुळाशी दारूचं शिंपणं झालं म्हणून नव्हे. प्रेमजलाच्या सिंचनानेच तो फोफावला आहे. तसं म्हणाल तर जीव कमी करण्याच्या बाबतीतसुध्दा मदिराच जास्त ठरेल. असं दोन जिवांचा एकजीव करण्यासारखं अर्धवट काम नाही करीत ती! मदिरेने आजपर्यंत असे कैक जीव अजिबात नाहीसे केले आहेत.

भगीरथ - मग प्रेमामुळं हल्ली जो प्रीतिविवाहाचा प्रघात पडतो आहे, त्याला तुम्ही प्रतिकूलच असाल?

तळीराम - रंगभूमीच्या आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीत उतरला, म्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात, नाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो की, हल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे! प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडीइतकाही संबंध नसतो; किंवा काडीइतकाच संबंध असतो. प्रीतिविवाह हा द्वंद्वसमास असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो. लग्नाच्यापूर्वी प्रेमाची आषुकमाषुकं हातात हात घालून भटकण्यासाठी जी तळमळत असतात, नुसती पायधूळ दृष्टीस पडण्यासाठी ज्या उत्कंठतेने एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात, तीच पुढं एकमेकांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठी संधी पाहात असतात! चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडवणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंडं पाहताच चावू की गिळू, असं करायला लागतात. आणि दुस-याच्या अधराचं आपल्या दातांनी खंडण करण्याचं पर्यवसान आपल्याच ठिकाणी दातओठ खाण्यात होत जातं.

भगीरथ - मला वाटतं एकंदर सुधारणेच्या बाबतीत तुमचं मन बरंच कलुषित आहे. जुन्या थाटाच्या लग्नांना तुमचा तितका विरोध नसेल?

तळीराम - अलीकडे त्याही गोष्टीच्या विरुध्द माझं मन होत चाललं आहे. पुढले सात जन्म सलोख्यानं काढण्यासाठी एकमेकांसमोर आणलेली वधुवरं अनुभवांती असं वाटायला लावतात की, मागल्या सात जन्मांचं वैर साधण्यासाठी ही एकमेकांच्या समोर आलेली आहेत. बालबोध थाटाच्या लग्नाच्या बारशाला जशी भटाभिक्षुकांची जरुरी असते, तशी अलीकडे त्यांच्या उत्तरक्रियेला वकील-मुनसफांची जरूर भासू लागली आहे. आम्ही अलीकडे नेहमी पाहतो, नवरा-बायकोच्या बेबनावाचे खटले प्रमाणाबाहेर वाढत चालले आहेत. बोहल्यावर नवराबायकोभोवती भटाभिक्षुकांनी गुंडाळलेल्या सुताच्या गुंतागुंतीसुध्दा दिवाणी दरबारात उकलाव्या लागतात आणि धर्माच्या मंत्र्यांनी केलेली पातकं कायद्याच्या कलमांनी निस्तरावी लागतात. एकंदरीतच बघा. स्वत:च्या बायकोकडे पाहण्याची नव-याची नजर इतकी फिरली आहेशी दिसते की, आता परस्त्रीकडेसुध्दा स्वत:च्या स्त्रीच्या दृष्टीनंच पाहणाराला देखील पुण्यश्लोक म्हणण्याची पाळी येत चालली आहे आणि परस्त्रीच्या ऐवजी स्वस्त्रीच मातेसमान होत चालली आहे!

भगीरथ - तुम्ही केवळ थट्टेनंच बोलत आहात म्हणून तुम्हाला तितक्या तीव्रतेनं उत्तर देण्याची गरज नाही. बाकी खरं म्हटलं तर तसल्या दुनियेत ही जी हल्ली बेदिली दिसून येऊ लागली आहे तिच्याबद्दल वाडवडिलांना जबाबदार धरलं पाहिजे. बदलत्या परिस्थितीचा लग्नसंबंधांतून मुळीच विचार न करण्याचा आमच्या वडील पिढीचा कृतनिश्चय दिसतो.

तळीराम - ते काही म्हणा, बाकी लग्नाच्या बाबतीतला एकंदर बोजवारा पाहून शेवटी असं वाटायला लागतं की, संसारमार्गावरच्या प्रवाशानं लग्नाची बोजड बेडी पायात अडकवून घेण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक मार्गाला लागावं हे बरं.

भगीरथ - वा! वेश्यागमनाइतकी अनीति दुसरी कोणती असेल असं मला वाटत नाही.

तळीराम - तुम्ही अजून अजाण आहात. अहो, असल्या बाहेरख्याली संबंधांत पोराबाळाच्या खिल्लाराशी नुसता नावापुरतासुध्दा संबंध ठेवायचं कारण नाही. शिवाय बेइमानी दिसलीच तर बाहेरच्या रस्त्याकडे बोट करायला मोकळाच. मायबाप सरकारांनी बाहेरच्या बायकांच्या पोटापाण्याकडे अजून आपली कायदेशीर कृपादृष्टी वळविली नाही. बदचाल दिसली तरी तिची हकालपट्टी करताना पोटगी खर्चाचा तिला अहेर करण्याचं कारण नसतं.

भगीरथ - जाऊ द्या! चार घटका मजेनं जगण्यासाठी जगायचं, तिथं ही असली किळसवाणी कटकट कशाला हवी? मी मद्यपानाच्या विरुध्द बोलतो असं नाही. पण दारूमुळं मनुष्याची कर्तबगारी कमी होते, हे तर खरं आहे ना?

तळीराम - हा प्रश्न साहेब लोकांना विचारा. कोटयान्कोटी अस्सल आर्यांची कर्तबगारी कारकुनी पेशानं साहेबांच्या भेटीसाठी बंगल्याबाहेर उभी आहे व बंगल्याच्या आत पेल्यावर पेले घेणा-या कामामुळं सत्ताधारी साहेबांना बाहेर येण्याची फुरसत नाही! भगीरथ, असले वेडेवाकडे प्रश्न विचारता याचं कारण एवढंच की, मघापासून तुम्ही हात राखून काम चालविलं आहे. तुम्ही आता काही तितके नवीन नाही. हे बघा, भगीरथ, या घरी नवशिक्याला स्वत:च्या अब्रूबद्दल भिण्याचं काही कारण नाही. नवीन घेणा-याच्या अब्रूला आम्ही चारसहा महिने जपत असतो.

भगीरथ - आणि पुढे मग?

तळीराम - पुढं मग ज्याचा त्यालाच अब्रूबद्दल विधिनिषेध वाटत नाही.

भगीरथ - तळीराम, अब्रू, कीर्ती यांसारख्या गोष्टींची मला मुळीच चाड नाही. ज्यानं सार्या जगाचा जितेपणीच कायमचा निरोप घेतला, त्याला या असल्या गोष्टींची काय पर्वा वाटणार? भर चौकात जाऊन पीत बसायला मला सांगितलं, तरीसुध्दा माझी तयारी आहे.

तळीराम - शाबास भगीरथ, तुमच्यासारखी उत्साही माणसं मिळाली पाहिजेत. ही मोकळेपणानं खाण्यापिण्याची अडचण कायमची दूर करण्याकरता आम्ही आता लवकरच मद्यपानाची संस्था काढणार आहोत. मद्यपान हे बहुतांशी हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळं संभावित समाजाकडून दारूची जी हेटाळणी होते, ती बंद व्हावी, मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं, हाच या मंडळींचा मुख्य उद्देश आहे. सर्व धर्माचे, सर्व पंथांचे, सर्व जातींचे- पोटजातींचे दारू पिणारे लोक यात सामील असल्यामुळे त्याला आम्ही 'आर्यमदिरामंडळ' हे नाव दिले आहे. त्याचे सर्व उद्देश विस्तारानं प्रसिध्द करून टोलेजंग पायावर लवकरच त्याची उभारणी करावयाची आहे. योग्य वेळी मी तुम्हाला सांगेनच.

भगीरथ - बरं तळीराम, वेळ बराच झाला असं वाटतं, जातो मी आता.

तळीराम - हे एवढं उरलं आहे, तेवढं उरकून टाका आणि मग चला.

भगीरथ - वाटेनं जाताना या वासानं कारणाशिवाय घोटाळा होतो.

तळीराम - थांबा, एक मंत्र सांगून ठेवतो. अगं ए, जरा बाहेर ये पाहू (गीता येते.)

गीता - (स्वगत) आज माझ्या नावानं 'गीते' म्हणून काही हाक मारली नाही. अजून रागरंग नीटसा जमला नाही वाटतं!

तळीराम - गीते, यांना थोडी बडीशेप आणून दे पाहू! भगीरथ, तोंडाचा वास मारायला हे अगदी रामबाण औषध आहे. (गीता जाते.) मग काय? 'आर्यमदिरामंडळा'ला तुम्ही पाठिंबा देणार ना? आम्हाला सर्व लोकांची मदत पाहिजे आहे.

भगीरथ - या संसारात मला पाशबंध असा राहिलाच नाही. (गीता येते. तळीराम तिजजवळून बडीशेप घेऊन भगीरथाला देतो; भगीरथ जातो.)

गीता - आज रावसाहेबांच्याकडे गेला होता का? बाईसाहेबांचे भाऊ ते पद्माकरदादा त्यांना न्यायला आले आहेत माहेरी. बाईसाहेबांच्या बरोबर शरदिनीबाईही जाणार आहेत.

तळीराम - त्या जाणार आहेत उद्या, आणि आज कशाला उगीच गडबड? बरं, उद्या परवा क्लबची स्थापना करायची आहे, त्यासाठी शक्य तितकी वर्गणी मला भरायची आहे; तर घरात काही आहे का?

गीता - घरात आता तुम्ही नी मी, दोघं बाकी आहोत! दागदागिने, सामानसुमान मावत नव्हतं घरात! सोन्याच्या राशी रचून वडिलांनी घराची सोन्याची लंका करून ठेविली होती; पण तुमच्या आशीर्वादानं सावकारांनी भरल्या घरात रामराज्य लुटलं! ते मेलं असो, पण मी म्हणते सगळं सगळं सामान कसं विकलंत?

तळीराम - त्यात काय अवघड होतं एवढं! निम्मं सामान विकलं म्हणून गरीब होत चाललो, आणि पुढं गरीब होत चाललो म्हणून बाकीचं निम्मं सामान विकलं!

गीता - चांगला लिहा-वाचायचा नाद होता; पण सारी पुस्तकंसुध्दा विकलीत!

तळीराम - तुला दूरदर्शित्व नाही! हल्लीचं युग विद्यादानाचं आहे, समजलीस? दुष्काळाच्या दिवसांत दानशूर श्रीमंत बाजारभावानं दाणागोटा खरेदी करून गोरगरिबांना स्वस्त्या भावानं विकून टाकतात, त्याबद्दल नाही कुठं हाकाटी होत? त्याचप्रमाणे भरकिमतीला घेतलेली पुस्तकं गरजवंत वाचकांना पडत्या भावानं देणं, याला वाईट कोण म्हणेल? विद्यार्थ्यांना निम्मे दरानं नाटकाला सोडण्यापेक्षा निम्मे दरानं पुस्तकं देणं हेच पुण्याईचं आहे, समजलीस?

गीता - तोंडावर तर सरस्वती बसली आहे तुमच्या! तसबिरासुध्दा घरात ठेवल्या नाहीत. अहो, जन्मदात्या वडिलांची तसबीर, पण तीसुध्दा चार आण्याला विकलीत!

तळीराम - मग यात वडिलांचा नावलौकिक वाढला की कमी झाला? अगं, आजकाल बाजारात शिवाजी,बाजीरावांसारख्या महात्म्यांच्या, फार काय, देवादिकांच्यासुध्दा तसबिरा दोन आण्याला मिळतात. त्याच्यापेक्षा आमचे वडील जास्त होते वाटतं?

गीता - माणसाच्या जन्माला आपले आले आहात एवढंच! सकाळी उठून तुमचं तोंडसुध्दा बघू नये कोणी!

तळीराम - हा, तोंड जास्त चालायला लागलं बरं-

गीता - हो बरं! पुष्कळ भीडमुर्वत धरली तुमची! वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच! अशी मी बोलणारच! करून करून करणार तरी काय तुम्ही?

तळीराम - काय करणार? मजजवळ अशी उधारीची बात नाही! तोंडाला तोंड दिलंस तर तिथल्यातिथं एका तोंडाची दोन तोंडं करून देऊन दामदुपटीनं उसनं फेडीन! अवांतर वाटाघाट ठेव बाजूला आणि चुकूनमाकून एखादा दागिना राहिला असेल तो ठेव आणून पुढं-

गीता - हे एवढं एक मणिमंगळसूत्र राहिलं आहे!

तळीराम - मग तेच दे इकडे. एकटयादुकटया दागिन्याची मिरवणूक काढली म्हणजे आपल्या गरिबीबरोबरच मनाचा हलकेपणाही लोकांच्या नजरेला येतो. सर्वांग सजलेल्या श्रीमंतांच्या ठिकाणी एखाद्या दागिन्याची उणीव चंद्राच्या कलंकाप्रमाणे शोभिवंत दिसते. पण उघडयाबागडया गरिबांना एकच दागिना घातला म्हणजे तो काळया कुळकुळीत अंगावरील पांढ-या कोडासारखा किळसवाणा दिसतो. हे लक्ष्मीचं असलं कोडकौतुक करण्यात काय अर्थ आहे? आण ते मंगळसूत्र इकडे.

गीता - अहो, चारचौघांची, देवाधर्माची, काही तरी चाड ठेवा! तुमच्या नावानं म्हणूनचना हे मंगळसूत्र गळयाशी बांधायचं ते?

तळीराम - सौभाग्यचिन्हासाठी सोन्याचे मणी काही लागत नाहीत. पोत गळयात असली म्हणजे झालं! सौभाग्या, तुझ्या सौभाग्याला मी धक्का लावतो आहे! पोत मागितली? बरं दोर मागितला? तेवढे मणी कुरतडून नेतो म्हणजे झालं! बायकांच्या मंगळसूत्राचा मणी म्हणजे काही जानव्याची ब्रह्मगाठ नव्हे की ती गळयात असलीच पाहिजे अगदी!

गीता - हो एवढं बरीक खरं. तितकं कुठं आहे बायकांचं दैव! जानव्याची ब्रह्मगाठ दाखविली म्हणजे तुमच्यासारखे ब्रह्मराक्षस मानगूट सोडून पळत सुटतात.

तळीराम - हो, बरोबर आहे! मंगळसूत्राचा सोन्याचा मणी दाखविला म्हणजे तोच ब्रह्मराक्षस अशी मानगूट धरतो. (तळीराम मान धरतो व मणी काढू लागतो.)

गीता - देवा! धाव रे धाव!

तळीराम - नवराबायकोच्या एकांतात येण्याची देवाचीसुध्दा ताकद नाही! (मंगळसूत्र तोडून मणी काढू लागतो, गीता रडू लागते.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-08T22:25:50.6430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

snagging

  • न. पेषण स्वच्छन 
RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.