अंक पहिला - प्रवेश पहिला

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यंत्राजवळ बसला आहे.)

सुधाकर - कोण तीनतीनदा घंटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलतं आहे कोण? रामलाल! (पुन्हा ऐकून) हो. तिच्याकडून सर्व तयारी आहे. तू लवकरच चल. सिंधू, जरा इकडे ये पाहू! सिंधू!

सिंधू - हे काय भलतंच? आपलं नावानंच हाक मारीत सुटायचं?

सुधाकर - तर काय तुझं नाव टाकू? मग तूच उलटी माझ्या नावानं हाका मारीत सुटशील! हे पाहा, भाईसाहेबांनी आता विचारलं आहे त्याच्या निघण्याची सर्व तयारी आहे का म्हणून? तो येईलच इतक्यात.

सिंधू - तयारी सर्व आहे; पण भाई जाणार म्हणून कुठल्या कामाला उत्साह कसा तो वाटत नाही.

(राग: यमन; ताल: त्रिवट. चाल - येरी आली पिया बिन.)
लागे हृदयी हुरहुर । अजि । सुखविषय गमति नच मज सुखकर ॥धृ०॥
काही सुचेना । काही रुचेना । राही कुठे स्थिर मति नच पळभर ॥१॥

सुधाकर - वृष्टीपूर्वीची अभ्रे जमू लागली का? सिंधू, असं म्हणून कसं चालेल? ज्या जगात आपण आलो आहो, ते इतके चमत्कारिक आहे की, त्यातल्या नुसत्या चांगल्या गोष्टीचीच अपेक्षा करायला निरंतर नुसत्या दु:खात दिवस काढावे लागतील!

(राग: छायानट; ताल: त्रिवट. चाल: नाचत धी धी.) सुखचि सदा कधि मिळत न कवणा । मिश्ररूप जग । सुखचि रिघे अघ । दु:खातुनि हो जन्म सुखांना॥ धृ०॥ हो जरि आशा मात्र सुखवशा । करित विधि तरी अंति निराशा॥ रमत मतिही नच प्राप्त सुखीही मग  । करि अवमाना ॥१॥

केव्हाही उत्साह सोडून चालायचं नाही. शिवाय रामलालभाई जातो आहे तो केवढया महत्त्वाच्या कामासाठी! या प्रसंगी आपण त्याला आपल्या निरुत्साहानं असं तद्रूप करायचं! वा:, आपण तर उलट त्याचा उत्साह द्विगुणित केला पाहिजे.

सिंधू - भलतंच सोंग कसं आणता येईल असं? पुरुषांना पाषाणहृदयाचे म्हणून म्हणतात. ते असं एखादे वेळी खरं वाटायला लागतं! आपल्याला नाही वाईट वाटत?

सुधाकर - माझ्या पाषाणहृदयावर रामलालच्या गत-उपकारांचे शिलालेखच तुला पाहायला मिळतील. तुझ्या माहेरच्या माणसांचा आणि भाईचा नुसता स्नेहसंबंधच असेल; पण मला तर तो वडिलांच्या ठिकाणी आहे. रस्त्यानं चालता चालता रामलालचं नाव लक्ष्यात आलं म्हणजे मला एक ब्रह्मांडच्या ब्रह्मांड आठवतं. मी सोळा वर्षांचा असेन नसेन, माझी प्रवेश परीक्षा उतरण्याच्या आधीच बाबांनी स्वर्गप्रवेश केला; आपला वृध्दापकाळ झाला असं पाहून आपल्या पश्चात् शरदच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर पडू नये म्हणून बाबांनी तिच्या आठव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं. परंतु लग्नाच्या सोळाव्या दिवशीच तिचं दुर्दैव तिच्या पुढं उभं राहिलं; नवर्याच्या मुळावर आलेली मुलगी, म्हणून तिच्या सासर्यानं तिला आमच्या घरी कायमची परत लावून दिली! आईबापावेगळी आम्ही दोन परकी मुलं! पैशाचं पाठबळ नाही आणि आप्तेष्टांचा आधार नाही! त्या वेळी रामलाल देवासारखा माझ्या पुढं उभा राहिला! माझ्या मानी स्वभावामुळं माझ्या शिक्षणासाठी मी त्याची प्रत्यक्ष मदत कधी घेतली नाही हे खरं; परंतु शरदला सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्यानं माझ्यावर फारशी पडू दिली नाही; पुढं शिकवण्या वगैरे पत्करून माझ्या शिक्षणक्रमातून शेवटपर्यंत मी यशस्वी रीतीनं पार पडलो; पुढं तुझ्या वडिलांना भाईनंच आग्रह करून आपला हा भाग्यशाली योग घडवून आणला. हे सोन्याचे दिवस आज आपण पाहतो आहोत, याचे कारण एक रामलालची कृपा! सिंधू, आज सकाळपासून ही सारी गोष्ट हृदयात सारखी उचंबळत आहे! कोणापाशी बोलल्याखेरीज राहवेना, म्हणून तुला ती जणू काय अगदी नव्यानंच म्हणून विस्तारानं सांगत सुटलो! रामलाल जाणार म्हणून मला वाईट वाटल्याशिवाय कसं राहील? परंतु या संसारात नेहमी परिणामाकडे दृष्टी ठेवून चालावं लागतं! आपण अशी दुर्मुखल्यासारखी बसलो आणि समज, एकदम रामलाल आला- (रामलाल येतो.)

सिंधू - भाई, तुला शंभर वर्षांचं आयुष्य आहे!

सुधाकर - हे खरं ना? मग शांत मनानं त्याला जायला आनंदानं निरोप दे पाहू! भाई, हिचं समाधान करता करता मला पुरेसं झालं आहे. मला वाटतं, यापुढं मला वकिलीची सनद सोडून देऊन हा एवढाच उद्योग करीत बसावं लागणार! बरं, भाई, इथून जायचं कधी?

सिंधू - थांब, भाई, इथून जायचं कधी हे सांगण्यापेक्षा पुन्हा इथं यायचं कधी, हे नक्की सांग पाहू एकदा- खरं सांग हो अगदी!

रामलाल - मग इतके दिवस सांगत आलो ते खोटेच का? ताई, मी पुष्कळ म्हटलं की, अमुकच दिवशी येईन म्हणून- दोन वर्षांनी येईन म्हणून म्हणतो; पण संकल्प आणखी सिध्दी यांच्यामध्ये परमेश्वराची इच्छा उभी असते. कुणाला ठाऊक, दोन वर्षांनी येईन की दोन महिन्यांनी येईन! इतकं होऊन कदाचित जाणारही नाही, कदाचित येणारही नाही; कदाचित ही आपण सर्वांची शेवटची भेट असेल.

(राग: भूप; ताल- एकताला. चाल- रतन रजक कनक.)
परम गहन ईशकाम । विश्वा जरि पुण्यधाम । मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे ॥धृ०॥
क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यात । मानुषी मनीषा! । गणन काय त्यांचे? ॥१॥

सुधाकर - भाई, तू अगदी पढतमूर्ख आहेस. इकडच्या तिकडच्या गोष्टींची धरणं बांधून इतका वेळ मी या गंगायमुना थोपवून धरल्या होत्या; तुझ्या आशीर्वादानं त्यांचा वाहता संसार मनासारखा सुरू झाला बघ! वेडया, तुला माहीत नाही की, शास्त्रांची अटक झुगारून, सिंधू नदी अटकपार होणं हे एक वेळ सोपं आहे. बाष्पशक्तीच्या जोरावर महासागराच्या तोडीचे काळा समुद्र, पिवळा समुद्र किंवा तांबडा समुद्र ओलांडणं हे तर त्यापेक्षाही सोपं आहे; पण मानससरोवरात उत्पन्न झालेल्या, डोळयांतून बाहेर येणार्या, आणि गालांवरच्या गुलाबी समुद्राला मिळणार्या या टीचभर गंगायमुना तुडवून जाणं, हे अजून कोणाही पुरुषाला साध्य झालं नाही!

(राग- मुलतानी; ताल- त्रिवट. चाल- हमसे तुम रार.)
सरिता जनि या प्रबला भारी । जरि दिसती शीर्ण नयनांती अविकारी ॥धृ०॥
उत्तान गमति दर्शनी जरी । गंभीर अति तरी । भवजलधीहुनी दुस्तर संसारी ॥१॥

रामलाल - मनाची भलती फसवणूक कधीही करून घ्यायची नाही, हा माझा एक कृतसंकल्प आहे. सिंधूताई, या चंचल संसारात असल्या कडू सत्यांची मनुष्यानं निदान तोंडओळख तरी करून ठेवलेली असावीच.
(राग- शंकरा; ताल- त्रिवट. चाल- सोजानी नारी.)
संसारी विषारी । तीव्र सत्ये । अमृत होती । कृतिने कान्त ॥धृ०॥
दिव्य रसायन । संकटांतकी । सत्यपरिचये । क्षणि असुखान्त ॥१॥
ईश्वराच्या दयेनं आपल्या दुर्दैवी ती अनुभवानं भोगण्याचा प्रसंग आलाच, तर त्यांच्या पहिल्या दर्शनानं अशा वेळी आपण गांगरून तरी जात नाही.

सुधाकर - तुझा सुध्दा कंठ सद्गदित झाला आहे. मानलेला का होईना, पण तिचा भाऊ शोभतोस खरा! सिंधूताई, आता तू दादाच्या गळयाला मिठी मार! भाई, तुला जायचं असेल, तर Don't say such a silly nonsense; you are a regular messeah of nonsense! अशानं होईल काय? इतक्यात शरद येईल, तिच्या गंगायमुनांची जोडी चालायला लागेल. ती तळीरामाची गीता येईल- त्या भोळया जिवाला तर हसण्या-रडण्याला आपलं स्वत:चं सुध्दा सुखदु:ख लागत नाही! हा हा म्हणता इथं एका भूगोलपत्रकाच्या भरतीइतक्या नद्या जमून आपल्या महाराष्ट्राला पंजाबी पवित्र्यात उभं करतील! अशानं तुझ्या प्रवासाला किती त्रास होईल याचा नीट विचार कर. दगदग आणखी त्रास चुकविण्यासाठी पुरुष चातुर्मास टाळून प्रवासासाठी हिवाळा किंवा उन्हाळा योजून ठेवतात, पण ऐन प्रस्थानाच्या वेळी बायका पावसाळा पुढे आणून उभा करतात! तू संसार सोडून भटकणारा वैरागी आहेस; म्हणून तुला माहीत नाही, की स्त्री-पुरुषांच्या संबंधात ऋतुमान नियमानं सारखंच टिकून राहील असं नाही!

सिंधू - आमच्या इथे थट्टेला काळ वेळ नाही आणि सुमारही राहात नाही. एक गंगायमुना सापडायची खोटी, सर्वांसकट वाहून जायची तयारी!

सुधाकर - सिंधू, तुझ्या गंभीर उपदेशानं मला असा सतावून सोडू नकोस. आणखी दोन-चार महिन्यांनी एकदा मूल झालं, म्हणजे त्याला काय सांगायचं ते सांग.

रामलाल - आणि मुलाला दटावण्याचेच तिला डोहाळे होत असले तर मग?

सिंधू - भाई, तुलाही असंच गमत राहायचं आहे वाटतं? इकडचा स्वभाव तुला लहानपणापासून माहीत आहे ना?

रामलाल - ताई, नीट बैस अशी. सुधा, तू पण बैस, सुधा, तुझ्या देखत ताई, तुला दोन शब्द सांगायचे आहेत. आता तू म्हणालीस की, सुधाचा स्वभाव मला लहानपणापासून माहीत आहे, ते खरं आहे, आणि त्याबद्दलच तुला मला सांगायचं आहे. ताई, हा सुधाकर म्हणजे या जनसमुद्राच्या गरीब तळाशी सापडलेले एक अमूल्य रत्न आहे. पण ताई, अशी रत्नं लाभणं कठीण आणि लाभल्यावर त्यांना हाती ठेवणं तर फारच कठीण. सुधाकर बुध्दिवान आहे. फार काय सांगावं- खरोखरीच अलौकिक बुध्दिवान आहे. तो जात्याच मानी आहे आणि केवळ स्वावलंबनानं नावलौकिकाला चढल्यामुळं मूळचा मानीपणा हल्ली इतका उग्र स्वरूपाचा झाला आहे की, तो त्याच्या चांगल्या मित्रांनासुध्दा असह्य होईल. त्यातून व्यवहारी आयुष्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतून तो मार्गक्रमण करीत आहे. प्रतिस्पर्ध्येच्या गर्दीतून आपल्या बुध्दिमत्तेला शोभण्याजोग्या स्थळी त्याला अजून पोहोचायचं आहे. एक गावंढळ उदाहरण घेऊन सांगतो; आपल्या कळपातून बदकाचं पिलू आपल्या जातिधर्माप्रमाणं पाण्यात पोहणीला पडलं म्हणजे त्याच्याभोवती असलेल्या आणि त्याबरोबर वाढलेल्या कोंबडीच्या पिल्लाचा आश्चर्यानं आणि भीतीनं सारखा किलकिलाट सुरू होतो. जगाच्या व्यवहारात, पशूंच्या उदाहरणातल्या आश्चर्य आणखी भीती या विकारांऐवजी केवळ मनुष्यप्राण्यालाच मिळालेले द्वेष आणखी मत्सर हे विकार दिसून येतात. वकिलीच्या धंद्यात सुधाकर हल्ली या स्थितीत आहे. सर्वांनी एकच परीक्षा दिली असल्या कारणानं त्याच्या जोडीला वकिलांना तो आपल्यापैकीच एक वाटत आहे. त्याच्या बुध्दिमत्तेच्या जोरानं हा सामान्य वर्गातून पुढं जात असल्यामुळं याच्या बरोबरीचे लोक द्वेषाने आणि मत्सरानं त्याला मागं ओढीत आहेत. धंद्यात नामांकित म्हणून प्रस्थापित झालेले थोडेसे लोकही नव्या उमेदवाराला आपल्या भाग्यशाली यशाचा सुखासुखी वाटेकरू होऊ देत नाहीत. तरुण बुध्दिमत्तेची, आत्मविश्वासाची उग्रता या जुन्या लोकांना उर्मटपणाची आणखी अहंपणाची वाटून ते त्याचा उपमर्द आणखी तिरस्कार करीत असतात. मागच्याला मागं ढकलून बरोबरीच्याला बाजूला सारून आणि पुढच्यांना पुढं ढकलून सुधाकर या वेळी जीवनकलहाच्या गर्दीतून रस्ता काढीत आहे. धंद्याच्या पटांगणात त्याचं कौतुक करणारा, त्याला धीर देणारा, त्याचं समाधान करणारा, आणि रागाच्या ऐन भरात त्याचा तोल सांभाळणारा कोणी तरी जिव्हाळयाचा मनुष्य सध्या त्याच्या नेहमी जवळ असणं आवश्यक आहे. त्याच्या लहानपणापासून माझ्या पामरशक्तीप्रमाणं ही त्याची सेवा आजवर मी करीत आलो आहे. सिंधू, आज विलायतेला जाण्यापूर्वी- तसा तो तुझा प्राणच आहे- मी बोलून चालून एक परदेशी ति-हाईत आहे- माझा पाठचा भाऊ आज मी तुझ्या हवाली केला आहे. सिंधू, त्याच्या अफाट बुध्दिमत्तेला पुरून उरण्याजोग्या कामगिरीमध्ये त्याला नेहमी गुंतवून ठेव. कधीकाळी त्याचा मनोभंग झाला तरच- चतुर मुली, तू सर्वगुणसंपन्न आहेस. तुमच्यासारखी अनुरूप वधूवरं संसाराच्या अशा सुखपूर्ण आरंभात पाहून कोणताही मनुष्य त्या सुखाचा चिरकाल लाभ व्हावा म्हणून तुमच्यासाठी परमेश्वराजवळ आशीर्वाद मागेल- मग मला तर जवळजवळ तुमचा अनुरूप योग घडून आणण्याचा प्रत्यक्ष मानच मिळाला आहे

सुधाकर - शाबास, रामलाल, तू आपल्या डॉक्टरांच्या जातीवर गेलास अखेर! माझ्या मनाला औषध काय चारायचं ते राहील तिच्या लक्षात! असंच एकदा पथ्याचं सांगून टाक म्हणजे झालं! एकदा पढतमूर्ख म्हटल्यानं तुझं समाधान झालं नाही. भलतंच बोलून तिच्या मागं ही एक दुसरी काळजी उत्पन्न करून ठेवलीस? दोन वर्षांनी तू परत येईपर्यंत तुझ्याबद्दलची काळजी आणि माझ्याबद्दलची काळजी !

सिंधू - दोन वर्षे? इतके दिवस आणखी इतक्या लांब तू परदेशी जाऊन राहणार? आपलं म्हणायला ओळखीचं माणूससुध्दा कोणी नाही. त्यातून तुझी प्रकृती अशी झालेली!

(राग: जिल्हा-मांड; ताल- दादरा. चाल: हे मनमोहन सावरो.)
या जाळी चिंता मना । तयासि शांति येईना ॥धृ०॥
विरहा न दया । भेदीत हृदया॥ मानी मुळी नच । सांत्वन मोहाना ॥१॥

सुधाकर - आणि तो इथं राहिला, तर तू काय त्याला चिरंजीव करशील?

रामलाल - सुधा, तुला मनुष्यस्वभावाची- त्यातून स्त्रीस्वभावाची चांगलीशी कल्पना नाही. आपल्या प्रियजनाचं आपल्या नजरेआड बरंवाईट झालं, म्हणजे परक्या माणसाच्या हलगर्जीपणामुळंच हे झालं असावं, अशी त्यांच्या मनात शेवटपर्यंत रुखरुख राहते. बायकांच्याच अंगी असलेल्या आपलेपणाच्या कळकळीनं बघायला कुणी असतं, तर हा प्रसंग टळला असता, असं प्रत्येक Fatal केसमध्ये त्यांना वाटत असतं.

(राग: तिलंग; ताल: पंजाबी. चाल: बसे किना वाट चालत.)
मृदुलताधाम जगि ललनाहृदय । सकलशुभनिलय । धरित गुण ललित । मधुरता ॥धृ०॥
स्वार्थलव तया । कधी नच ठावा । सतत असुगणित परहिता ॥१॥

सुधाकर - सर्वांचं सर्वतोपरी रक्षण करण्याची जबाबदारी सर्वसमर्थ परमेश्वरावर आहे. सिंधू, तो परमेश्वर अनुकूल असला म्हणजे हजारो कोसांवरच्या खवळलेल्या महासागरात सुध्दा तुझ्या प्रयत्नांवाचून रामलाल सुरक्षित राहील आणि प्रभूची कृपा एकदा फिरली म्हणजे तुझ्या डोळयांदेखत, इथल्या इथं, तुझं आटोकाट प्रयत्न चालू असता, महासागर नको, तलावसुध्दा नको, तो अतर्क्यसामर्थ्यवान् प्रभू मला एखाद्या लहानशा पेल्यातसुध्दा बुडवून टाकील! (तळीराम येतो.) काय रे? फैटणी आणल्यास का?

तळीराम - एव्हापासून फैटणी कशाला? जेवणं झाल्यावर इथल्या इथं आणता येतील.

सुधाकर - (घडयाळ पाहून) वेळ थोडा उरला आहे अगदी! सिंधू, लौकर पाट मांडण्याची व्यवस्था कर! तळीराम फैटणी दोनतीन आण! आपण सगळीच भाईला पोचवायला जाणार आहोत; सिंधू जा लौकर. (सिंधू व तळीराम जातात.) भाई, तू असा सचिंत का?

रामलाल - वैद्यविद्येचा अभ्यास पुरा करण्यासाठी मी आज हिंदुस्थानदेश सोडून युरोपात जाणार आहे. सुधाकर! मनुष्याच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादं मोठं स्थित्यंतर होतं, तेव्हा तेव्हा गतकालाची स्मृती आणि भावी कालाची कल्पना यांच्या तर्कातीत संमिश्रणानं चित्तवृत्ती अगदी व्याकुळ होते. विद्यार्जनाचा समाप्तिकाल, विवाहाचा प्रसंग, रोजगाराची सुरुवात, जबाबदार वडील माणसांचा मृत्यू, या प्रसंगांनी ही स्थित्यंतरं प्रत्येकाच्या आयुष्यात घडून येत असतात. मला या वेळी आज नजरेपुढून जात असलेलं हिंदुस्थानचं दारिद्रय आणि उद्या दिसणारं इंग्लंड देशाचं वैभव, दोन्ही दिसताहेत. अशा वेळी मनात कालवाकालव झाली, तर आश्चर्य ते कोणतं? उद्या मी माझ्या जन्मभूमीला अंतरणार! बापाच्या मिळकतीचा वारसा मुलांकडे जाताना वडील धाकटयाचा जसा विचार करतो, तसाच गुणांचा भेदाभेद करण्याची एकंदर जगाची प्रवृत्ती असते. लायकी-नालायकीचा प्रश्न फक्त जननी आणि जन्मभूमी यांच्या प्रेमाचा वारसा मिळवितानाच काय तो पुढे येत नाही. एक पुत्र बेचाळीस कुळं उध्दरणारा असतो, आणि एक पुत्र बेचाळीस कुळं बुडविणारा असतो. पण जन्मदात्रीकडे बोट करून दोघांनाही सारख्याच हक्कानं म्हणता येतं की, ही माझी! तीच गोष्ट जन्मभूमीची आहे! आणि म्हणूनच म्हटलं आहे की, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी. माझी आई वारली त्या वेळी मला जो तीव्र शोकावेग झाला; त्याचा आज मी पुन्हा अनुभव घेतो आहे-

(रागिणी: हंसकिंकिणी; ताल: झपताल. चाल: नैना सुराग सखि.)
माता वियोगि मज । लोटी दुज्याने ॥धृ०॥
क्रीडन मधुर तदंकी । लाभेल ना फिरुनि । शंका भेदोनि । सुखा ने ॥१॥

या भूमीवर तुझा, माझा, त्याचा, याचा, कोणाचाही प्रेमाचा हक्क अगदी सारखा आहे. ऋषीश्वरांच्या यज्ञकर्माची योगभूमी, शिबिगौतमांसारख्या महात्म्यांची त्यागभूमी, प्रतापशाली वीरांची जी कर्मभूमी, युधिष्ठिर- अशोक यांसारख्या पुण्यश्लोकांची जी धर्मभूमी, तीच आपली ही जन्मभूमी! तिच्याकडे पाहून श्रीशिवछत्रपतींनी मागं जितक्या अधिकारानं म्हटलं असेल की, ही माझी जन्मभूमी- तिच्याकडे पाहून लोकमान्य टिळक जितक्या अधिकारानं आज म्हणत आहेत की, ही माझी जन्मभूमी- उद्या इंग्लंडहून परत आल्यावर तिच्याकडे पाहून माझ्यासारख्या पामरालाही तितक्याच अधिकारानं म्हणता येईल की, ही माझी जन्मभूमी!

(दोघे जातात.)

N/A

References : N/A
Last Updated : December 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP