मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वरी पोथी|उत्तरार्ध| अभंग ६०१ ते ६७२ उत्तरार्ध अभंग १ ते १०० अभंग १०१ ते २०० अभंग २०१ ते ३०० अभंग ३०१ ते ४०० अभंग ४०१ ते ५०० अभंग ५०१ ते ६०० अभंग ६०१ ते ६७२ उत्तरार्ध - अभंग ६०१ ते ६७२ श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते. Tags : mukteshvaripothipuranपुराणपोथीमुक्तेश्वरी अभंग ६०१ ते ६७२ Translation - भाषांतर भूवैकुण्ठसम गणेशपुरी । प्रकट ज्या नगरीं । चिती शक्ति विलसे परोपरी । सदा सर्वत्र ॥१॥मुक्तानंदा नको पाहुं कुद्दष्टीनें । नित्यानंद प्रसादरूप असण्यानें । अन्तर चितीशक्ति सामर्थ्यानें । तिजकडे पाही ॥२॥संसार बीज असे काय । मुक्तानन्दा वासना होय । बनव नित्यानंदमय । निय वासनेला ॥३॥जगत मानव अंतःकरण । भावमय परिणामाचें कारण । मुक्तानन्दा नित्यानंदमयपूर्ण । बनव त्यासी ॥४॥गुरुभकी खरी । कल्पलता इच्छित फलदात्री । मुक्तानंदा नित्यानंद ध्यान करी । अहर्निश ॥५॥जेवढा स्नेह व्यवहाराप्रती । तेवढी राही सप्रेम गुरुभक्ती । मुक्तानंदा सारी संसारपूर्ती । नित्यानंदमय ते वेळीं ॥६॥जीवाहुनी शिव पूर्ण । नरापेक्षां नारायण । परपेक्षां बरा स्वयंपूर्ण । नित्यानंद लौकीकी संपूर्ण ॥७॥स्वतें शोधी । स्वची पूजा, वंदन आधी । मुक्तानंद स्वच निधी । पूर्ण नित्यानंदमयी ॥८॥प्राणीं राहुनी । क्रियान्वित प्राणा करूनि । ज्यास ने वाहुनी । प्राणच ॥९॥प्राणाचा महाप्राण । मुक्तानंद जो तटस्थ पूर्ण । तो जगताचा संपूर्ण परमेश्वर होय ॥६१०॥अग्नींत राहुनी । दग्ध करूनी । ज्याचा असे वन्ही । आसन ॥११॥अग्नीचें तेज । तोच निज । आत्माराम समय । मुक्तानंदा ॥१२॥मनीं वसे मनन करी । मनोरथा स्वीकारी । अमनें देखे मन-भरारी । पूर्ण सच्चिदानंद हा ॥१३॥मनीं वसे । मनन करीतसे । मनोरथा हाकीतसे । जो स्वतः ॥१४॥अमनें देख, मुक्तानंद । मन भरारी, पूर्ण सच्चिदानन्द । तव गुरु नित्यानंद । जाण ॥१५॥चक्षुवासी रूप पाही । चक्षु ज्याचा सहजपीठ राही । चक्षुमहातेज सर्वांचेंही । चैतन्य आत्मा होय ॥१६॥नेत्राविना पाही । श्रवणविना ऐकेही । जिव्हेविना बोलत राही । अगोचरासी अंतरीं जाणी ॥१७॥रूप देखे नयनांनीं । गन्धाचा वास घाणेन्द्रियांनीं । श्रवण करी कर्णांनीं । तो जरी ॥१८॥आत्मबोधन जोंवरी । मी मी करीतसे तोंवरी । मुक्तानंदा तोच अंतरीं । वसे नारायण ॥१९॥ज्ञान दे गुरु बनुनी । ज्ञान घे शिष्य समजुनी । पाळी रक्षी माबाप होउनी । मुक्तानंदा तोच एक ॥६२०॥मन करी ज्याचें मनन । तो नसे नारायण । नारायण । नमवितो जो मन । मनन करवुनी ॥२१॥तो मनाचा अमन । तव आत्माराम जाण । करी त्यासी नमन । मुक्तानंदा ॥२२॥अन्तरात्म्याचा प्राण । तसेंच परम धन । परम संग्रहणीयही पण । गुरूच केवळ ॥२३॥गुरु आणि भगवान । नसती मुळींही भिन्न । परमेश्वरच प्रगट होऊन । बने गुरुरूप ॥२४॥सद्नुरु संतोष सुखद । सर्व देवा वरप्रदा । सर्व मंत्र फलप्रद । सदगुरु प्रसन्नता ॥२५॥ठेवुनि निजात्मनिष्ठा । करी प्रयत्नांची पराकाष्ठा । भजी त्या सर्वश्रेष्ठा । गुरु-आत्म्यास ॥२६॥अनेकांत एक । एकामध्यें बहुतेक । सामावुं दे स्वतः अनेक । स्व तें गुरु नित्यानंदीं ॥२७॥गुरुवाद, देववाद । गुरुपाद, देवपाद । विश्वपूजिता नित्यानन्द । गुरुस्मरण आत्मपूजन ॥२८॥श्रीगुरुध्यान श्रीगुरुपूजन । श्रीगुरुस्मरण श्रीगुरुचिन्तना । मुक्तानन्दा नित्यानंदपद मिळवुन । देती सारीं हीं साधनं ॥२९॥श्रीगुरुपूजा परमात्मापूजा । श्रीगुरुपूजा कृष्णपूजा । श्रीगुरुपूजा विश्वपूजा । मुक्तानंदा गुरुविना नसे कांहीं ॥६३०॥हवें तर बन त्यागी । अथवा हो योगी । वा भक्ती करी उपयोगी । मुक्तानंदा ॥३१॥वाटल्यास करी ज्ञानार्जन । तरी सर्वांमधुन । गुरुकृपाच मुख्य साधन । स्मरणीं राहुं दे ॥३२॥परमार्थीं वा शांतिमार्गीं । गुरु मुख्य उत्सर्गीं । गुरूविना सफलता न कर्मीं । वंध्य बीजासमान ॥३३॥मानवध्यान रता । अनुसरतो अन्तरजगत । अंतरंगा साधनीं रमत । सदोदित ॥३४॥बहिरंग अशुचि स्नान । न प्रभावी साधन । गुरुप्रेमामृत गंगीं नहाणं । साधना खरी ॥३५॥परमेश्वरघरची अन्तारमस्ती । नको समजूं साधारण ती । गुरुकृपा प्रसाद-स्फुरण स्फूर्ती । ना मानवाची कृती ॥३६॥आधाराविना मनाचा अबोध । न देखतां नेत्रावरोध । प्राणाचाही कुंभकविना निरोध । गुरुकृपाजन्य मुद्रा सार्या ॥३७॥खेचरी शांम्मवी परशक्ति मुद्रा । होती सहज ह्या महामुद्रा । येतां भरती गुरुकृपासमुद्रा । प्राप्त करी गुरुमुखी प्रसाद ॥३८॥होतां गुरुकृपा मुद्राप्राप्ती । सहज लाभते शांती । गुरुचक्षु हवा पाहण्या ती । गुरुमुखी मुद्रा सर्वांत ॥३९॥गुरुकृपा महाकृपा राही । गुरुमुद्रा महामुद्रा पाही । गुरुप्राप्ती सर्व प्राप्तीही । भाग्यवंता क्कचित लाभ ॥६४०॥अंतरीं एक स्वतंत्र खचिअत । पूर्ण रसमय शांती वसत । न कोणा हो ती प्राप्त । गुरुप्रसादाविना ॥४१॥परमेश्वराचें अपार देणें । मानवाचें इवलेसें घेणें । देणारा गुरु समर्थ पूर्णपणें । मग अल्प घेणें कशास ॥४२॥गुरुदेवाची सहजकृपा ती । कुंडलिनीची हो जागृती । पूरी पळाली अल्पता भय भीती । मुक्तानंदाच्या आत्मभाग्योदयानें ॥४३॥अंतरशक्तितेजानें । अंतरशुद्धी पूर्णपणें । चिन्मय चितीकला प्रकाशणें । ह्याचि देहीं कृपाप्रसादानें ॥४४॥श्रीगुरुप्रसादप्राप्ती । तेणें पावशील सुखशांती । होते सहज चितीमय द्दष्टि ती । गुरुप्रसादें ॥४५॥परदोष बघतां बघतां । निजद्दष्टीस ये अंधता । स्वतःतें परी जाणतां । अंतरद्दष्टी प्राप्तता ॥४६॥निजद्दष्टीच ब्रह्म दिठी । जेणें हरीची पडे मिठी । मुक्तानंदानें मिळविली गुरुज्ञानद्दष्टी । जगतीं प्राप्तव्य योग्यद्दष्टी ॥४७॥विना चिती प्रसाद । श्रीगुरुज्ञानद्दष्टीरहित । सर्व राहती अंध । या जगतीं ॥४८॥तोच एक द्दष्टीवान । आपाणास पाही आपण । स्वतें ईश्वर म्हणुन । मुक्तानंदा ॥४९॥रसमय सुंदर नाद । अंतरींचा अनहत नाद । ऐकतां सुटला बाह्य नाद । सहजपणें ॥६५०॥अंतरनादाचे प्रकार बहुत । करिती मन सदा मस्त तेणें बाह्य मस्ती प्राप्त । अंतरांतूनही ॥५१॥जगमग जगामगती । दिव्य तेजस्वी ज्योती । दिव्या संगीतही सांगाती । गुरुकृपेची पूर्ण सरस तृप्ती ॥५२॥षट्चक्रें समजलीं । सर्व नाडी चमक चमकली । मध्यनाडी ओळखली । रूप तिचें पाहूनी ॥५३॥मुक्तानंदा संपूर्ण भार्ग्यादय । निजात्मींच होय । जाणुनी ही सोय । स्वतें पाही ॥५४॥पुरा पाहिला स्वर्ग नरक । पितर सिद्धही लोक । अंतर नीलामध्येंही आणिक । श्रीनित्यानंद पाहिला ॥५५॥पुण्यकर्म प्रमेनें । वाडवडिलांच्या आशीर्वादानें । तसेंच पूर्व अद्दष्टानें । मुक्तानंदा ॥५६॥ह्याची देहीं । ह्याच जन्मीं पाही । नित्यानंद फलप्राप्तीही । लाभली ॥५७॥मस्तकाच्या मध्यभागीं । सहस्त्राराच्या मध्यांगीं । देव विराजमान सर्वांगीं । मुक्तानंदा ॥५८॥श्रीगुरुकृपनें । निज आत्मनीं मीनें । श्रीराधेश्याम दर्शनानें । झालों पावन ॥५९॥स्वतःची राजीखुषी । स्वप्रेम स्वधन राशी । स्वसौंदर्य आत्मरसी । मुक्तानंदा ॥६६०॥गुरुकृपा प्राप्ता होतां । ह्या सार्या गोष्टी तत्त्वतां । पावल्या स्वरूपता । आपोआप ॥६१॥अहंचें कारण । बाणलें मूर्खपण । चिती विलास पूर्ण । नाहीं जाणला ॥६२॥जगा समजलों । रडूं लागलों । दुःख पावलों । अतीशय ॥६३॥जेव्हां अहं ला । नित्यानन्दांनीं बनविला । सोऽहं सगळा । तेव्हांच ॥६४॥संवित विलासयुक्त । अवघें हें जगत । चिती भगवती जाणत । सहर्ष नाचुं गाऊं लागलें ॥६५॥थांबली सारी रड । हसण्यानें संपली ओरड । ऋण हें सारें फेड । कृपाळु गुरु नित्यानंदांचें ॥६६॥संतोषलें मन । हासूंनाचूं लागलें तन । परामस्तींत राहुन । पूर्ण मस्त ॥६७॥ह्रदयीं जेव्हां मुक्तानंद । प्रगटला असा नित्यानंद । तेव्हां झाला आनंदी आनंदा । अशा रीतीनें ॥६८॥इति समाप्त श्री मुक्तेश्वरी । वानुं किती तिची थोरी । पारायण करिती जे नरनारी । उद्धरूनी जातील ॥६९॥चौदाशें पंचाण्णव ओव्या । सप्ताह करूनी गाव्या । आपुल्या सोयीनें म्हणाव्या । अर्थासहित ॥६७०॥नको आसन । नको ध्यानस्थान । एक पुरे निर्मळ मन । गाण्या श्रीमुक्तेश्वरी ॥७१॥गुरुकृपेची ही देन । माझें असें त्यांत कांहीं न । गुरुचेंच गुरूला अर्पून । कुसुमेश्वरी करी समर्पण ॥७२॥ N/A References : N/A Last Updated : July 01, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP