उत्तरार्ध - अभंग १ ते १००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


पारमेश्वरी परम कृपा म्हणुन । नरदेह लाभे मूल्यवान । मानवा करी ध्यान साधन । नुपेक्षुनी ॥१॥
अमृतरसानन्द । प्राप्त तेणें मुक्तानन्द । पूर्णपरशिवपद तुझें तुझ्यांत ॥२॥
करी मानव मंदीराचा सन्मान । पूर्ण नीलेश्वरीचें निवासस्थान । मानवशरीरांतच मुक्तानंदानं । परमात्मा मेळविला ॥३॥
नाडीसमुदाय बहात्तर हजार । युक्त असें हें शरीर । शरीरमय होऊनि शरीराभर । जो राही ॥४॥
शरीरातें पुरा जाणतो । अंतरज्ञाता जो असतो । तव स्वरूप असे तो । मुक्तानंदा ॥५॥
जागृती-प्रपंच-निरीक्षक । स्वप्नप्रपंच-प्रेक्षक । मुक्तानंदा, आनंद-भोक्ता-भौक्तिक । तव अंतरात्माही ॥६॥
राहुनिही शरीरी । भिन्न शरीराहुनि परी । इंद्रीयांमध्यें जरी । विभिन्न तरीही ॥७॥
अंतरजगत जाणीव । पावे जेथुन उदयोद्भव । मुक्तानंदा, तो महादेव । तो महादेव । देवांचा देव ॥८॥
जलाशयपंकीं । पवित्र कमल निःशंकी । पुष्पपरागमध्यंकी मधु ही मधुर ॥९॥
सुगंधीत कस्तुरी । मृगनाभीं वितरी । मुक्तानन्दा मानवशरीरीं । परमेश्वरही ऐसा ॥१०॥
मानवशरीर उत्तम । परमेश्वर धाम परम । केवळ खा, पी, वृत्ती अधम । मुक्तानंदा, फसुं नको तींत ॥११॥
वस्त्र तन्तु व्याप्त सर्वत्र । शरीरीं चिति कुण्डलिनी मात्र । मुक्तानन्दा, शरीर स्वच्छ पवित्र । म्हणुनि ठेवी ॥१२॥
पंचमहाभूतांचें शरीर । छोटें मोठें जुनें फार । अन्तरात्मा तरी अजर अमर । तुझ तुझ्यांत ॥१३॥
बाल्य़काल होय । विद्याप्राप्तीचा श्रेष्ठ समय । मुक्तानन्दा ध्यानयोगाचा सुसमय । बाल्यकाळच ॥१४॥
सान, न, किशोर किशोरी । महानता वसे तुमच्या अंतरीं । बनाल जियेचिनें कालान्तारीं । सारेही महान ॥१५॥
कशास म्हणुं तुम्हा लहान । शरीर महाभुतांचें पुरातन । आत्मा तव परमअनादि म्हणून । अद्यावत ना तुम्ही ॥१६॥
बाह्य जगत पंचभूतांचें । शरीरही बनलें असेच तुमचें । पिंडब्रह्मांड तादात्म्य भावाचें । अनुभव ध्या म्हणोनि ॥१७॥
नाडीसमुदाय बहात्तर हजार । संधातरूप मानवशरीर । अती मूल्यवान समज बरं । नरदेहाला ॥१८॥
सत्वर शोध कर । ह्या शरीरभर । काय काय असे निर्भर । भरूनि राही ॥१९॥
बहात्तर हजार नाडी मध्यम । मध्यनाडी सर्वोत्तम । तेंच परम धाम । मुक्तानन्दा ॥२०॥
मध्यनाडी सुषुम्नेंत । सुवर्ण कान्तीमय महातेजांत । मुक्तानंदा महात्मे सुखनिद्रेंत । तूंही जा, रहा तेथ ॥२१॥
मध्यनाडी-महिमा पाही । तसेंच गति नियम जें कांहीं । विश्वोदय अस्त जेथ राही । तें उच्च स्थान जाणी ॥२२॥
मुक्तानंदा, तेथ बघ जरा । जेथ पाह्तां बघणारा । दिसे आत्मरमण करणारा । न अमे दुसरा ॥२३॥
असे मानवशरीर । परमेश्वराचें सत्य मंदिर । शोक मुळींही न कर । ना संदेह घर ॥२४॥
मंदिरांत बसे आत्मेश । अंतरीं करुनि प्रवेश । मुक्तानंदा पाही उन्मेष । लवलाही ॥२५॥
बहिरंग देशाहुनि । अतिसूक्ष्म अंतरदेश असोनि । मुक्तानंदा बाहेर न भटकोनि । राहीं अंतरदेशीं ॥२६॥
तूझा तूंच सर्व कांहीं । अंतरमुखी बनुनी राही । मुक्तानंदा मानवसभ्यता पाही । अंतर-जगतीं ॥२७॥
अंतरलोक महालोक । साधरणच बाह्यलोक । नकोस ढुंढु तो लोक । अनर्थकारी ॥२८॥
ह्रदयमंदिर मनोमाला । सोऽहम् जपध्यान यज्ञ भला । सोडुनि मुक्तानंदा व्यर्थ कशाला । इकडे तिकडे भटकसी ॥२९॥
ह्रदयीं झळकणारी । दिव्य ज्योति सुंदरी । त्यागुनी मुक्तानंदा खरोखरी । कोण भटके वनोवनीं ॥३०॥
ह्रदयनिवासी । स्फटिकसमानशी । स्मितयुक्त नीलराशी । रश्मींतून ॥३१॥
परम सौंदर्य सम्पदेंत । रमण्याचें सोडून देत । मुक्तानन्दा भिकारी जीवित । कंठीशी कशाला ॥३२॥
बाहेर भटके राजा रंक । बाहेरच छोटा मोठा फरक । बाह्माचेच सारे लोक । पुजारी असले ॥३३॥
मुक्तानन्दा जो अभ्यंतरीं । शोध घे भीतरी । मानव अस्सल खरोखरी । तोच एक ॥३४॥
अंतःकरणाचें अंतःस्फुरण । मुक्तानन्दा तेंच तुझें ठिकाण । चिद्विलासिनी मस्ती पवन । जेथ वाही ॥३५॥
षट्‍चक्रांची बघ चक्रीयता । चक्रस्थित देवी देवता । अक्षरांची शक्ति समर्थता । तेथली पाही ॥३६॥
मुक्तानंदा सम्पत्ती ती सारी । तुझीच असतां खरी । मगा कशास बहिरंग भिकारी । बनुनी राहसी ॥३७॥
मस्तक-आकाश-महातेज । करी बाह्य सूर्य निस्तेज । मुक्तानंदा नमस्कारोनि भज । आत्मसूर्या महान ॥३८॥
परेहुनी पलीकडे । परमात्म्याचें परम प्रकाशरूपडें । प्राप्त होई ह्रदयाकडे । ना बाहरे ॥३९॥
ह्रदयमध्यंतरीं । अंगुष्ट प्रमाण आकारीं । ज्योति झलके अंतरीं । चमचम ॥४०॥
तीच विश्वात्मक । मुक्तानंदा ह्रदयीं प्रत्येक । सर्वांत निकटवर्ती एक । दूर ना मुळीं ॥४१॥
ह्रदयांतरीं स्नेह परम । उमंग प्रयोत्तम । चिरशांती रसमय करुणाघाम । तेथ जा, राही ॥४२॥
स्वतःचें विस्मरण । परप्रेमस्मरण । हेंच खरें मरण । जाणुनि घेई ॥४३॥
स्वतःतें विसरीशी । भ्रमुनि फिरसी । मुक्तानंदा, तुज जर पाहसी । नित्यानंद दिसे अंतरीं ॥४४॥
आपुल्यांत आपण । मुक्तानंदा तूं पण । राही मस्त पण । पुरापुरा ॥४४अ॥
तुझ्यांतच नित्यानंद पूर्ण । कांहींही म्हणो कोण कोण । अंतरअनुभवच जाण । पूर्ण साक्षी ॥४५॥
अंतरात्मा अनंत । राही स्फूर्तियुक्ता । ह्रदय खोलुनि घेत । पाही बरवा ॥४६॥
मुक्तानंदा बाहेरून । परीक्षा घेऊन । मानवाला ओळखून । न घेतां ये ॥४७॥
स्वमस्तीविना । परमस्तीला अर्थ ना । मुक्तानंदा केवळ क्षीणताच ती ना । मस्त राही आपुल्यांत ॥४८॥
ह्त्तीची मस्ती । श्वान न जाणती ॥ मुंकण्यास सज्जती । भुंकु दे त्यांना ॥४९॥
मुक्तानंदा तूं आपुल्यांत । मस्त रहा मजेंत । हत्ती श्वान न बनत । कधीं कोण्या काळीं ॥५०॥
लाभुं दे तृप्ती । आपुल्या आपणांती । प्राप्त करी शांती । आपणामध्येंच ॥५१॥
तसेंच प्रेमही कर । मुक्तानंदा स्वतःवर । आपणाम परतृप्तीचें खरोखर । प्रयोजन काय ॥५२॥
तूच वसे तुझ्यांत । तूंच असे सर्वांत । मुक्तानंदा तुझ्याविना अन्य नसत । स्वांतरीं राही मग्न ॥५३॥
तूं तुझ्यांत । पूर्ण राही स्वस्थ । सांगाती सारे येत जातात । नित्याचे ना कोणी ॥५४॥
मुक्तानंदा अंक मागें म्हणून । अर्थ ये शून्यालागून । टाकितां अंक पुसून । सारें शून्यही शून्य ॥५५॥
आजपर्यंत । काळ गेला बहुता । बहुजनांना भेटण्यांत । समय पूरा व्यर्थ ॥५६॥
तरीही तुला । न कोणी भेटला । प्रेम देण्याघेण्याला । एकही परंतु ॥५७॥
सर्वां दर्शन देण्यांत । दुसर्‍यांना तें करविण्यांत । समय घालविला बहुत । निरर्थक ॥५८॥
मुक्तानंदा न केलें ध्यान साधन । न साधलें आत्मरमण । परमशांतीकर असे पण । आत्मदर्शन ॥५९॥
ह्या जगतांत । मानवाची समजुत । महा आश्चर्यकारक होत । खरोखरी ॥६०॥
मुक्तानंदा, विवेक असतांही । आत्म्याचें ध्यान न करी पाही । ध्यानीं घे दुसरें सर्वही । निष्कारण ॥६१॥
तुझा तूंचा  साथी ह्या संसारीं । पतिपत्नीही पुत्रपुत्री सारीं । ’स्व’ ही असे सुखकारी मुक्तानंदा ॥६२॥
परपती परनारी । परपुत्र परपुत्री । मुक्तानन्दा, परका जो खरोखरी । स्वजन कसा ठरावा ॥६३॥
मुक्तानन्दा तूंच स्वपती । तूंच सारीं नातीं गोतीं । होतां आपणास आपुली प्राप्ती । अमर होशील ॥६४॥
खा, पी, नशीबानें उपभोगीही । अलिप्त आत्मा परी शुद्ध पाही । मग आपुल्यांत मस्त राही । मुक्तानन्दा ॥६५॥
गात जा । खात पीत जा । करी मजा । मस्त रहा ॥६६॥
सर्वांत मिसळुनि । सर्वांचा रहा बनुनी । मुक्तानन्दा आपणा बघ ध्याऊनी । तूंच सर्वांत दुजा न कोणी ॥६७॥
प्रवृत्ती असो वा निवृत्ती । एकच गोचर वा अगोचर तृप्ती । मग कां न लाभे आत्मतृप्ती । मुक्तानन्दा ॥६८॥
इंद्रिय-क्रियाशीलता वा निष्कीयता । तृप्तीची तर एक सजातीयता । मुक्तानंदा, निवृत्तीमय तृप्तता । मग कां न अनुभवी ॥६९॥
समरस होऊनि इंद्रियांशीं । मुक्तानंदा तादात्म्य पावुनि देहाशीं । सुखदुःखांच धनी होशी । शरीरातीत न होण्यानें ॥७०॥
लवण सिंधुंत विरतां । त्यागुनि निज लवणता । व्यापकता अन् महानता । प्राप्त सिंधुची होई ॥७१॥
असाच मुक्तानंदा देहाभिमान । जधीं जाइ पूरा गळून । आत्मा परमात्मा बनून । जाइ मग ॥७२॥
कामवासनेंत रुचि । म्हणुनि रामांत अरुचि । मुक्तानंदा, जर रामीं सुरुची । कामच होतो राम ॥७३॥
सरिताजल सागरांत । सहज होते अर्पित । मुक्तानंदा सर्व सुख आत्मशांतींत । असेंच सामावे ॥७४॥
द्दष्टी जेथ जेथ जात । तें तें आपुलें जा मानत ।  जें जें भेटे भूत । तें मानी भगवंत ॥७५॥
चित्त जेथें जडे । आत्मीयतेनें तें जोडे । मुक्तानन्दा, बंधन कसलें न घडे । भय मात्र पडे ॥७६॥
देवदेवता पूजन । तीर्थव्रत यज्ञसाधन । जपतप अनुष्ठान । केवळ श्रम ॥७७॥
मुक्तानंदा ’स्व’ला ओळखतां । ह्रदयीं भरे शांतता । आनंदा ये पूर्णता । आत्मदर्शनानें ॥७८॥
आत्मा पूर्ण निर्विकारी । राही तसाच सर्व अवस्थांतरीं । व्यापुनि जरी चराचरी । सविकारी नसे मुळीं ॥७९॥
आत्मा परिशुद्ध पूर्ण । अशरीरी अलिंग जाण । खाईल पिईलही काय पण । भोगेलही कसा काय ॥८०॥
करणें शुद्धाला सोज्ज्वळ । अन् निर्मलाला निर्मळ । प्राप्ताचाच घालणें मेळ । मुक्तानंदा साराच पोरखेळ ॥८१॥
सर्वथा जो परमशुद्ध पण । त्याचें कशास शुद्धीकरण । कशास कोठें ढंढण । जो व्यापक सर्वत्र ॥८२॥
नित्यप्रती काय कोठें बघावें । स्वतःतें सर्वत्र पुरे समजावे । मुक्तानंदा अन् मस्त रहावें । मजेंत स्वानंदीं ॥८३॥
गृहस्थ तरी कसा म्हणावा । संन्यासी तरी कसा वदावा । जाणुनी कठपुतलींतल्या पंचतत्त्वा । कोणी न नर वा नारी ॥८४॥
सूर्य भासे खतेजानें । चंद्र प्रकाशे चांदण्यानें । तारे चमकती चमचमण्यानें । जसे ॥८५॥
तसेंच मुक्तानंदा अशी । आत्मानंदाची मस्ती कशी । ठरे स्वयंप्रकाशी । स्वानुभवें जाणी ॥८६॥
आप-पर-रहित । जाती-व्यक्ति विरहित । द्वैत-अद्वैत भेदातीत । जें असे ॥८७॥
तें अंतरसुखस्फुरण । मुक्तानंदा हीच जाण । स्व ची ओळख पूर्ण । आत्मबोधही ॥८८॥
पाहतां अधिक काय दिसे । घेतां हातीं काय येतसे । आत्म्याविना देणारा कोण असे । पाही मुक्तानन्दा ॥८९॥
निर्विकल्प आत्मा नित्य । परि शुद्ध समज सत्य । सारी खटपट त्याज्य । आत्मरूपीं मस्त राही ॥९०॥
मुक्तानंदा निगामांची नियुक्ती । सज्जनांच्या समजुती । साधनांची सफलता ती । पाही परिपूर्ण अंतरीं ॥९१॥
विद्या अलंकार वादविवाद । कविता आदि व्यसन मद । त्यजुनी, अहेतुक स्फुरणीं सुखद । मस्त रम आत्मारामीं ॥९२॥
मी तूं पणें सारी सृष्टी । मी पणा विरहीत स्वच्छ द्दष्टी । मुक्तानंदा, होण्या आत्मकृपावृष्टी । आत्मबोध उपाय ॥९३॥
तूं असल्यानें जगजीवन राम । शिवशक्ती हीही तुझाच परिणाम । मुक्तानन्दा, सार्‍या अस्तित्वा यासम । तूं कारण परम ॥९४॥
होतां आत्म्याची जाण । उमजे जगाचें कारण । मुक्तानन्दा, तुझें पुरुषार्थपण । आत्मप्राप्तींत ॥९५॥
अहंनें सृष्टि निर्मिती । अहं विना सारे लोपती । अहं ब्रह्मास्मि वदे श्रुति । मुक्तानन्दा, अहं मुख्य इति ॥९६॥
काय धुडीशी पूर्व पश्चिम उत्तर । मुक्तानंदा दक्षिणेस खालीं वर । तूं अद्वितीय हें सत्य त्रिवारा । तूंच असे एक ॥९७॥
रामकृष्ण शिवगणेश । दुर्ग दिनेश जनेश ज्ञानेश । मुक्तानंदा तूंच असे सर्वेश । तूंही तूंही तूंही ॥९८॥
बदरीकेदार काशी रामेश्वर । द्वारका ह्रषिकेश मथुरा मधुर । क्षेत्रें मुक्तानन्दा थोर थोर । तूंही तूंही तूंही ॥९९॥
गंगायमुना सरस्वती नर्मदा । सिंधु काशी पुष्कर अलकनंदा । सारींही पवित्र मुक्तानन्दार । तूंही तूंही तूंही ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP