काव्यरचना - संस्थान बडोदें यांना पत्न

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.


येऊं द्या दया मना, दया मना ॥ भटें केली दैना ॥धृ. ॥

विद्याबंदी मूळ पाया केला दैनवाणा ॥
आर्यांजींनीं शुद्रा आणिला खरा पशूपणा ॥१॥ येऊं द्या. ॥

मौजेसाठीं खर्च, स्त्नियांची करिती हेळणा ॥
तमाशांत मर्द नाचती उणें पुरुषांना ॥२॥ येऊं द्या. ॥

वेसवेचें गाणें ऐकता मळवी नीतींना ॥
मुळ पातकी होती दोष देती गरतींना ॥३॥ येऊं द्या. ॥

वसूलाचा पैसा खर्चून खिचडी ऐद्यांना ॥
कष्ट करी शेतीं खाती चटणी-भाकरींना ॥४॥ येऊं द्या ॥

वर्षासनें भटजी नेती खुल्ला खजीना ॥
शेतकरी कष्ट करुनी करिती भरणा ॥५॥ येऊं द्या. ॥

शेतांतील बैल मरतो औतीं आगोलींना ॥
गोप्रदाने भटजी खाती सोयरीं कीं माना? ॥६॥ येऊं द्या. ॥

पक्कानांचीं नित्य भोजनें आर्यभटांना ॥
जन्मांतरीं शेतकर्‍याला तुकडा मिळेना ॥७॥ येऊं द्या. ॥

हात जोडून भटास देती रोख दक्षणा ॥
सार्वजनीक सूट नाहीं कधीं कुळंब्यांना ॥८॥ येऊं द्या. ॥

नाचे पोरे भटाभिक्षुकां शालजोड्या दाना ॥
उत्तम शेती करितो त्याला बक्षिस कां द्याना ॥९॥ येऊं द्या ॥

दारुवर कर लादितां बढती दुर्गूणा ॥
परिणामीं काय होईल कैसे उमजेना ॥१०॥ येऊं द्या ॥

अक्षरशुन्य शुद्रादिकां कांहीच कळेना ॥
अशा मुक्यांचे बाप आतां तुम्हीच कां व्हाना ॥११॥ येऊं द्या. ॥

कष्टाळूंची दैना दाविली मुख्य प्रधाना ॥
दयानिधी आहां म्हणूनी लिहिलें पदांना ॥१२॥येऊं द्या.॥

गेली घडी पुन्हां येईना माहीत सर्वांना ॥
सर्वकाळ पुर वाहीना पर्वतीं दर्‍यांना ॥१३॥येऊं द्या.॥

उदकाची किंमत ती ठावी रणीं शिपायांना ॥
काशीकर तुच्छ मानितो गंगाबाईंना ॥१४॥ येऊं द्या. ॥

जोतीराव सयाजीरायाला करितो प्रार्थना ॥
वाहत्या गंगेमध्यें एकदां हात कां धुवाना ॥१५॥ येऊ द्या. ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP