भगवंत - ऑक्टोबर २५

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही ; बायकोचा त्याग करुन होत नाही ; जनात राहून होत नाही , तसेच वनात राहिल्यानेही होत नाही . खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही , की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल . तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता . संत हे यांपैकी काय करीत नाहीत ? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात . म्हणून काय , की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही . मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते ? तर त्यासाठी एकच लागते , ते म्हणजे , ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे . ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले . ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो , त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही . आणि हे व्हायला भाग्य लागते . तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही . आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे . असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का ? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का ? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही ? तसे , आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा , म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो ; कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते . बिभीषण रामाला शरण आला , तेव्हा त्याला मारुन टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले . तरी पण रामाने सांगितले की , " जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे . " शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही , तर त्याला लंकेचे राज्य दिले . म्हणून सांगतो की , जो त्याचा होऊन राहतो , त्याची लाज रामाला असते .

माझ्याकडे इतकेजण येतात , पण एकाने तरी ‘ मला रामाची प्राप्ती करुन द्या ’ म्हणून विचारले का ? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी ? समजा , एकजण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले . तिथे जाऊन मारुतीला नवस केला की , " मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन ; " तर आता सांगा , त्याला मारुतीने काय द्यावे ? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का ? जर नाही , तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता ? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की , " मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे , आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये . "

N/A

References : N/A
Last Updated : October 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP