भगवंत - ऑक्टोबर ६

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


परमात्मा सच्चिदानंदस्वरुप आहे हे जरी खरे, तरी ते स्वरुप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहाता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी ‘ निर्गुण ओळखून सगुणात रहावे ’ असे म्हटले आहे. सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे; हेच भगवंताचे मूळ स्वरुप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून, तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे; अर्थात, सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. मी मूळ परमात्मस्वरुप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे, सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही; हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही; परंतु आंतमध्ये शक्ती असली, तरी ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे; ते शांत आहे, म्हणून सनातन आहे; ते शांत आणि सनातन आहे, म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे; कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरुप होय. परमात्मरुपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे. पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे. याचा अर्थ असा की, प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. शांती एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो; मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास, आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे.
भगवंताला पहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते. सत्त्वगुणात भगवंत असतो; तेव्हा आपण त्या मार्गाने जावे. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात; कुपथ्य टाळणे, पथ्य सांभाळणे, आणि औषध घेणे. त्याचप्रमाणे भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती. त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य-दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर, वगैरे-त्याचा त्याग करावा; परमात्मप्राप्तीला जे सहाय्यक, पोषक सत्संगती, सदविचार, सद्ग्रंथवाचन, आणि सदाचार-ते पथ्य; ते सांभाळावे, आणि अखंड नामस्मरण करणे हेच औषधसेवन होय.

N/A

References : N/A
Last Updated : October 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP