समाधान - ऑगस्ट २

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही . ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे . हाव संपेल तेव्हाच समाधान होईल . याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे . कशात सुख आहे , कशाची कास धरावी , इकडे लक्ष द्यावे . खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे . ‘ भगवंता , तुझ्यावाचून माझे कोणी नाही ’ हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरले , त्याच दिवशी समाधान मिळेल . जितकी विषयाची आवड धरावी , तितके दुःखच पदरात येते . विषयसुख न मागताही येते ; परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे , ते मागत कशाला राहायचे ? माझ्या मागे राम आहे म्हटले , म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही . भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत . नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग ‘ सावधच ’ राहिल्यासारखे आहे .

दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो , पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो . इतकेच नव्हे , तर आदल्या दिवसाची परिस्थिती , संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात . याचा अर्थ असा की , परिस्थितीत बदल होत नाही . दिवाळीचा दिवस , हा दिवस या नात्याने निराळा नाही . पण काल आपण जे केले , ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही , हाच मुख्य फरक होय . आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो . हे जर खरे , तर तसा तो आपण नेहमीच का करु नये ? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी ; आपण नेहमीच आनंदात असावे ; आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा . आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी -आनंद करतो . मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे ? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे . तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही . भगवंताचे स्वरुपच मुळी आनंदमय आहे . असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण , भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो . आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच , पण त्याचबरोबर ‘ मी ’ सुद्धा आहे , हा ‘ मी ’ कोण हे जाणण्याकरिता , इंद्रियांची गडबड शांत करुन आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा ; म्हणजे आपल्याला या ‘ मी ’ चे स्वरुपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल . अशी परमात्म्याची ओळख करुन घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे ; आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय .

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP