रुद्रारामहंसाख्यान - आनंदमयकोशाचा विवेक

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


सद्वरु म्हणता सावधान । तुवां चारी कोश विचारें त्यागून । सत्य ब्रह्म पुससी आपण । तें अपरोक्ष सांगूं ॥१॥

विचारें अब्रह्मत्त्व सर्वां यावें । अपुलें निजरुप यथार्थ कळावें । याचि हेतू लागे बोलावें । ब्रह्म म्हणोनि प्रतिकोश ॥२॥

अन्न ब्रह्म जेव्हां कळलें । सर्व भौतिकां मिथ्यत्त्व आलें । प्राण ब्रह्म ओळखितां जालें । अन्न ब्रह्म मायिक ॥३॥

मन ब्रह्म कळतां । प्राणासी आली अनात्मता । विज्ञान ब्रह्म विचारितां । मन ब्रह्म खोटें ॥४॥

आनंद ब्रह्म जाणता क्षणीं । विज्ञानब्रह्मत्त्वाची हानी । तरी अवधारी आनंदमयालागुनी । कोश हा पांचवा ॥५॥

विज्ञानाहुनी अन्य आत्मा । आनंदमय मुख्य परमात्मा । येणेंचि पूर्ण विज्ञान नामा । तिहींही अवस्थेसी क्रीडे ॥६॥

आनंदापासूनि सर्व भूतें जालीं । होवोनि आनंदमयींच वर्तलीं । आनंदामाजीं लया गेलीं । तस्मात आनंद ब्रह्म सत्य ॥७॥

या आनंदमयकोशालागुनी । पांचचि अंगें पक्षियावाणी । शिर आणि पक्ष दोनी । आत्मा पुच्छ पांचवें ॥८॥

प्रियचि असें याचें शिर । मोद दक्षिण पक्ष सुंदर । प्रमोद तो पक्ष असे उत्तर । आनंद आत्मा ॥९॥

ब्रह्म तेंचि पुच्छत्त्वें प्रतिष्ठिलें । एवं पांच अंगें निरुपिलें । या आनंदमया पाहिजे विचारिलें । आतां दुजी कल्पना नाहीं ॥१०॥

या रीती स्वामीचें ऐकतां वचन । रुद्राराम करिता होय नमन । आनंदमय बुध्दीसी कारण । सर्व तें पूर्ण आनंदें ॥११॥

सच्चिदानंद ब्रह्मलक्षण । त्यावरी वृथा आरोपिलें अज्ञान । कीं भ्रम व्हावया पाहिजे अधिष्ठान । कार्य जालें म्हणोनी ॥१२॥

ऐसिया साधिष्ठाना ज्ञानापासाव । विक्षेपवृत्तीसी आधीं जाला प्रसव । तयासीच विज्ञानकोश आलें नांव । त्यापासुनी सर्व जालें ॥१३॥

जालें परी आनंदेकडून । वांचलें असे जग संपूर्ण । आणि लय होतांहि होय विस्मरण । तेंचि मीलन आनंदी ॥१४॥

अथवा या मैथुनसृष्टीप्रति । रतिसुखापासूनि उत्पत्ति । पंचभूतेंहि उत्पन्न होती । प्रकृति पुरुष मीनतां ॥१५॥

अथवा व्यापारीं सुखदु :खें मीनती । सुषुप्तिकाळीं विश्रांती येती । तेणें करितां सर्व जीव वांचती । शेवटीं लयही आनंदी ॥१६॥

सर्व वांचती रतिसुखेंकरुन । प्रकृतिपुरुषरुप सृष्टि संपूर्ण । दोहोवीण तिसरें आन । अणु नाहीं ॥१७॥

एवं उत्पत्तिस्थितिसंहारा । आनंदमयचि सर्वांसी थारा । तस्मात कारण असे आत्मा खरा । आनंमय कोश ॥१८॥

सत्य जें असंग परिपूर्ण । तें न कळे या नांव अज्ञान । परी स्वरुपासी नव्हे न कळण । जीवासी जालें ॥१९॥

तयाचि अज्ञानास्तव । कोश ऐसें आलें नांव । परी विचारें पहावा स्वानुभव । निखळ ब्रह्म तेंचि ॥२०॥

बुध्दि मन प्राण देहे । त्याचें अस्तित्त्व वाटे आहे । विचारें निवडितां लवलाहें । आनंद सत्य परी मिथ्या ॥२१॥

बुध्दिवृत्ति तिहीं अवस्थेसी । क्रीडत असे अनुभवेंसी । परी आनंद आत्मा याचे प्रकाशीं । वर्ते व्यापारीं ॥२२॥

जागृतिस्वप्नीं वृत्ति सविकार । ते समयी जाणतसे साक्षी मात्र । सुषुप्तीत लीन होतां निर्विकार । लयसाक्षी आत्मा ॥२३॥

जे लय होतांही बुध्दीचा । तरी लय नव्हे चिद्रूपत्त्वाचा । आत्मा साक्षी बुध्दिलयाचा । परी ज्ञानाचा लय कोण देखे ॥२४॥

एवं चिद्रूपात्मा परिपूर्ण । सद्रुपहि अखंड दंडायमान । तोचि आनंदरुप सघन । त्रिकाळीं अबाधित ॥२५॥

तिहीं अवस्थेंत एकला असे । अवस्था नासती तो न नासे । तस्मात असद्रूप कदाही नसे । असे तैसा अखंड ॥२६॥

सदा लयसाक्षी जो आपण । तयासी जड कल्पना करी कोण । जेथें सुखदु :खें होती उत्पन्न । सुखमात्र असे ॥२७॥

एवं असज्जडदु :खाचे निरासीं । सच्चिदानंद आत्मा एकसी । हाचि प्रत्यगात्मा अविनाशी । निषेधअवधी ॥२८॥

येथेंहि जे पांच अंगें बोलिले । तेही कल्पून संकेतें दाविले । अभिन्न होतांचि होती फोले । अणु कोशनामही नुरे ॥२९॥

सर्वांसी आत्मा आवडता । आत्मार्थ सर्वांविषयीं ममता । या हेत्त्वर्थे नाम प्रियता । शिर असें बोलिले ॥३०॥

न कळे तोंवरी सीमा आवडी । सर्वांसी अकृत्रिम आपुली गोडी । या हेतूस्तव नाम परवडी । प्रिय अंग पहिलें ॥३१॥

तो साधक गुरुमुखें कडून । अपुली प्रियता जाणे आपण । त्या आवडीसी आलें नामाभिधान । मोद पक्ष उजवा ॥३२॥

जन्ममरण सुखदु :ख सरलें । विस्मय स्वसुखें पुजूं लागले । तयासीच प्रमोद नाम ठेविलें । उत्तर पक्ष अंग तिजें ॥३३॥

जेधवां त्रिपुटीहि ओसरुन । अपरोक्ष आत्मा ब्रह्म अभिन्न । सुखदु :खेंवीण जें समाधान । तेंचि आनंदात्मा चौथा ॥३४॥

जेथें ज्ञान ना अज्ञान । प्रकृति ना पुरष निर्माण । ऐसी जें सच्चिदानंद घन । ब्रह्म पुच्छ प्रतिष्ठा ॥३५॥

मायाचि जेथें नाहीं जालीं । तेथें अज्ञानदशा कोठें आली । अज्ञानेंविण जाणावया गेली । साधकता कोठें ॥३६॥

कवणाचें अज्ञान गेलें । कवणासी कवणाचे ज्ञान जालें । त्रिपुटीरहित सहज संचलें । तरी आनंदात्मा कवण ॥३७॥

कैचें शिर पक्ष दोनी । आत्मा तरी आला कोठोनी । ब्रह्म पुच्छ तरी कवणा लागुनी । चारींच्या अभावीं ॥३८॥

तस्मात प्रिय नाशे मोद । प्रमोद ना नाम आनंद । ब्रह्म प्रत्यगात्मा अभेद । नामरुपेंवीण ॥३९॥

ऐसें विचारुनि रुद्राराम । समाधान पावला परम । भेदचि अवघा जाला भस्म । द्वैताद्वैत शब्द गेले ॥४०॥

अन्नमय ज्या क्षणीं विचारिलें । त्या क्षणीं पिंदब्रह्मांड मिथ्या जाले । देहबुध्दीचें पाप ओसरलें । मीमाझियासहित ॥४१॥

प्राणमय कोशासी । जेधवां विचारिलें मानसीं । तेव्हांचि हिरण्यगर्भलिंगदेहासी । मिथ्यत्त्व आले ॥४२॥

आनंदमयासी विचारितां । प्रकृतिअज्ञानासी होय घाता । त्रिपुटीहि पावलीसे अंता । ब्रह्म निजांगें जाला ॥४३॥

आतां देह वर्तो भलतैसा । संशयचि नुरे मानसा । जे जे क्रीडा होतसे अपैसा । ते ते समाधि ॥४४॥

एवं सदगुरुप्रसादें । चिमणें बाळ वर्ते आनंदें । सदगुरुपदीं जो शिष्य नांदे । तो शिष्यत्त्वें नुरे ॥४५॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । सप्तमप्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP