रुद्रारामहंसाख्यान - रुद्रारामाचें समर्पण

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


ऐका श्रोते हो सावधान । रुद्रहंसस्वामींचें आख्यान । उभयतां मायबाप बाळास घेऊन । इंदुरा आले मुक्कामा ॥१॥

तेथें मठामाजी येऊन राहिले । तंव माधवस्वामीनें बाळ अवलोकिलें । आणि रुद्रारामें स्वामींसी देखिलें । आल्हाद मना उभयतांचे ॥२॥

परी एकमेकां किमपि न बोलती । परस्परां टकमक पाहती । असो ब्राह्मण राहून एकरातीं । दुसरे दिनीं पुढें चालिले ॥३॥

रुद्रारामासि येऊनि उठविती । तंव तो जडत्त्वें पडिला क्षितीं । डोळां पाहतसे सहजगती । परी उत्तर नेदी ॥४॥

तंव ते उचलून नेवूं म्हणतां । जड धोंडा न हाले तत्त्वतां । कष्टी होऊन मातापिता । एकमेकां बोलती ॥५॥

हा तरी जड पडिला स्वभावें । आपुला मनोगत कीं कोठें सोडावें । तरी येथेंचि यासी अर्पण करावें । माधवहंसस्वामींसी ॥६॥

मग हंसस्वामीपाशीं आले । वंदोनि उभयतां बोलूं लागले । या जडासी तुम्हां समर्पिले । तरी हा दत्तपुत्र तुमचा ॥७॥

आमुचे प्रपंचा उपेगा नये । तरी यासी नेऊन करावें काये । कोठें तरी सोडावें लागे उपाये । दुसरा नाहीं ॥८॥

जरी तुमचे उपेगा पडे । तरी यासी ग्रहण करावें कोडें । आम्ही तरी अर्पिला जैसें आवडे । तैसें करा स्वामि ॥९॥

ऐसें बोलोनि पुत्रातें त्यागिलें । उभयतां स्त्रीपुरुष काशीसी गेले । हरभटें संन्यास ग्रहण केलें । स्त्री राहे सेवा करोनी ॥१०॥

इकडे रुद्राराम पडिला होता । तेथें स्वामीनें येऊन तत्त्वतां । हस्त फिरवून अंगावरुता । उठवुनी म्हणती ॥११॥

काय गा असे तुजा हेतु । कां पडिलासी जडवत तूं । तो सांगें मजप्रति समस्तु । जरी अम्हांसी बोलावें वाटे ॥१२॥

ऐसें स्वामींचें ऐकतां उत्तर । खडबडोनि उठे अतिसत्त्वर । साष्टांग घातिलें चरणांवर । तेव्हां आलिंगिला स्वामीनें ॥१३॥

खदरवदां हांसे अथवा रडे । कंठी मिठी घालितसे कोडें । वारंवार चरणावरी पडे । बरें जालें म्हणे मुखें ॥१४॥

स्वामीनें मजसी आज्ञापिलें । कीं काय तुझा मनोगत तो बोलें । तरी स्वामि ! सर्व पाहिजे ऐकिलें । चरणीं निवेदूं गुरुचे ॥१५॥

स्वामि ! मी नरदेहास आलों । बहुत सुकृताच्या बळें जन्मलों । येथून उध्दरा गती जरी पावलों । तरी सार्थक ॥१६॥

नातरी वारंवार किती जन्मावें । जन्मुनी मागुतीं कीं मरावें । उगेंच उच्चनीच योनीं फिरावें । देवादि कीटकांत ॥१७॥

आहार निद्रा आणि मैथुन । हे पश्वादिदेहीं असती तीन । येथें नरदेहींहि तेंचि घडे भोगण । तरी विशेष काई ॥१८॥

अति दुर्लभ जो नरदेह असे । तेथें विषयसंगे आयुष्य नासे । तरी मग पशुपरीस निपटारा दिसे । मी माझें म्हणतां ॥१९॥

पशूचा आहार तरी संचयाविन । यथालाभेंचि संतुष्ट मन । हा संचय करी प्रतिदिन । तरी तृप्ति नव्हे कदा ॥२०॥

प्राणाची भूक तीन पावशेर । परी मनाची भूक ते अपार । संचय करितां शिणें दिनरात्र । परी पुरें न म्हणे ॥२१॥

धनकनक मिळवितां आटाअटी । रक्षण करितांहि होत कष्टी । नासून जातांही शेवटीं । दु :खकारक जीवा ॥२२॥

पशूची निद्रा पडेल तेथें । यासी पाहिजे सुखस्वार्थें । वस्त्रपात्र नसतां उगाचि कुंथे । मज नाहीं तुज न साजे ॥२३॥

पशूसी ऋतुकाळीं गमन । हा सदा करी चर्मकंडण । आणि तया दुर्गंधीमाजी मन । सदा बांधून ठेवितसे ॥२४॥

तरी काय पशुहून नव्हे निपतारा । कासया नरदेहा आला आत्महत्यारा । येथेंही विषय भोगून जातसे माघारा । नीच योनी भोगावया ॥२५॥

या नरदेहासी येऊन । चुकविलें नाहीं जन्ममरण । तया आत्महत्त्या घडल्या गणन । नव्हे त्यांचें ॥२६॥

जितुके मागें जाले असती । आणि पुढें जितुके जन्म होती । तितुक्याहि हत्त्या नरदेहाप्रति । येवोनियां जोडिल्या ॥२७॥

असो इतरांसी काय म्हणावें । आपुलें मना शिकवावें । हे विषय भोगितां तृप्ती पावावें । हे न घडे कदा ॥२८॥

जरी विषयभोगें तृप्ति होती । तरी इतुक्या जन्में कां नव्हे शांति । यास्तव चिळसी आली मजप्रति । परी कवणा न ये सांगता ॥२९॥

मायबापां जरी म्हणावें । तरी तेणें विषयींच गुंतवावें । म्हणोनि त्यांसि म्यां जिवेंभावें । बोलणेंचि सोडिलें ॥३०॥

जितुके जन्म मज जाले असती । तितुके मायबापांची कोण करील गणती । हे नव्हेति कदा मज मोक्षदाती । यास्तव संग मज न आवडे ॥३१॥

यांसी जन्मजन्मीं माझे म्हणतां । अतिशय गोवा पडिला होता । तयाचें स्मरण होतां चित्ता । मज रडें येतसे ॥३२॥

प्रस्तुत माझें दैव उदेलें । मायबाप त्यागून गेले । स्वामींच्या चरणीं देह पडिले । तेणें हर्षे मी हसतसें ॥३३॥

तरी स्वामि मज उपेक्षूं नये । चरणदास्यत्त्व द्यावें निश्चयें । चिमणें बाळ अपुलें म्हणे काय । बहु विज्ञप्ति करुं ॥३४॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । द्वितीय प्रकरणीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP