उद्धवहंसाख्यान - जन्म

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


सावध असा हो श्रोते समस्त । समर्थ सज्जन मनीं विचारित । कीं आपण आपुलें सुख घ्यावें निभ्रांत । दुजी व्यक्ति धरुनी ॥१॥

आपुलें स्वमुख जरी पहावें । तरी आरसिया पुढें करावें । तेवी आपण आपणा उपदेशावें । शिष्य होउनी आपण ॥२॥

तरी उमा नाम्नी सतीचें उदरीं । जन्मावें आपणचि झडकरी । तंव मारुतीही येउन त्वरी । अनुमोदन दिधलें ॥३॥

इकडे उभयतां वनीं फिरती । अन्नपना निद्रा न करिती । अहा दयाळुवा पाहसी किती । म्हणतीं अंत आमुचा ॥४॥

तंव कळवळोनि कृपाणी । भेटती उभयतांसी येवोनी । दोघें धाऊन लागती चरणीं । आणि रडती आक्रोशे ॥५॥

उमा ह्मणें जी स्वामिया । मजसी पूर्ण सौभाग्य देउनिया । आपुले वच सत्य केलें लवलाह्मा । परी दर्शनेंवीण आम्हीं दीन ॥६॥

समर्थ कृपाळुवें रामें । पुरविलीं तुमची मनकामें । दशपुत्र तुह्मां होती नेमें । आतां कां पाठी पुरविली ॥७॥

तंव ते वंदुनीं दोघे बोलती । उपदेश द्यावा आह्माप्रती । बहु बरें ह्मणोनि सांगती । तेचि क्षणीं राममंत्र ॥८॥

आणि स्वमुखें बोलती तयां वोजा । तुम्हां दहा पुत्र होतील समजा । त्यांत वडिल पुत्र असे माझा । येरे ह्मणती दहाही अपुले ॥९॥

समर्थ ह्मणती अमुचे दहाही खरे । परी एक अर्पावा आह्मांसी त्वरे । तो प्रपंचा उपयोगा न ये उत्तरें । हें माझीं सत्य माना ॥१०॥

तथास्तु ह्मणुनी चरणा वंदिती । अति आनंदें सदना जाती । तया मंत्राचें पुरश्चरण करिती । उभयतांही ॥११॥

तया पुरश्चरणासी आरंभ । त्यामाजीच उमेसी राहिला गर्भ । तो तरी हंसचि असे स्वयंभ । लीलादेहाधारी ॥१२॥

तयासी गर्भ जन्मादि विकार कैचे । हेंचि विटंबण वैखरीचें । असो डोहाळे होताती वैराग्याचे । उमासतीसी ॥१३॥

वाटे अरण्यांत स्वयें जावें । सद्‌गुरु हंसाचें पाद सेवावे । उगेंचि समाधानी असावें । निष्कर्मरूप ॥१४॥

असो नवमास भरतां पूर्ण । बाळक पावता जाला जनन । त्या समयीं सर्व जनांचे मन । आल्हादयुक्त असे ॥१५॥

बाळकाचे जन्मकाळीं । श्रीसमर्थे वाजविली टाळी । बैसली असे ब्राह्मणमंडळी । त्यांसीहि आनंद जाहला ॥१६॥

आणि म्हणती मज सांगाती मिळाला । परमार्थ माझा वाढेल वहिला । असो इकडे जो बाळ जन्मला । अति सलक्षण ॥१७॥

पुढें जातकर्म नामकर्म । पिता करिता जाला संभ्रम । तेथें समर्थ ठेविलें नाम । आदरें उद्धव ॥१८॥

एक वर्ष तयासी लोटतां । चालत असे होय बोलता । तया दर्शनासी आणी माता । समर्थचिया ॥१९॥

समर्थ तया मांडिये घेउनी । पुसती तूं कोणाचा ह्माणुनी येरू बोलें मज तुम्हांवाचोनी । कोणीच नाहीं ॥२०॥

मग आवडीनें चुंबन दिधलें । तैसेंचि मातेचे हवाली केलें । तंव तें अत्यंत रडुं लागलें । मी न ये घरा ह्मणोनी ॥२१॥

सदना बळेंचि आणि उमा । परी आठवित गुरुचे पादपद्मा । दुसरें नावडेचि राहतां धामा । खेळणें कांहीं ॥२२॥

आणीकही नव पुत्र जाले । यास्तव दशपुत्री नाम त्यां पडिलें । उभयतांही आनदांते पावले । म्हणती कृपा गुरुची ॥२३॥

असो उद्धव पांच वर्षाचा जाला । पित्यानें व्रतबंध आरंभिला । तंव तो बापासी बोलूं लागला । कीं मी तुमचा नव्हे ॥२४॥

माझे जनक आणि जननी । आप्त सुहृद कुळस्वामिनी । एक समर्थाचि असे तुह्मा लागुनी । मंजुही करूं नेदी ॥२५॥

ऐकोनिही बापें बळें धरिला । मांडिये घेऊन बैसे भोवला । तंव तो बापासी बोलूं लागला । कीं मी तुमचा नव्हें ॥२४॥

माझे जनक आणी जननी । आप्त सुहृद् कुळस्वामिनी । एक समर्थाचि असो तुह्मा लागुनी । मुंजही करुं नेदी ॥२५॥

ऐकोनिही बापें बळें धरिला । मांडिये घेऊन बैसें भोवला । तंव ते बाळ रडुनी म्हणतसे भोवला । कित्येकासी हा न कळे ॥२६॥

असो त्या संधींत अकस्मात । समर्थ येते जाले त्या मंडपांत । तुह्मी कोण रे चोर माझ्या बाळाची त्वरित । मांडिये मुंज लावितां ॥२७॥

तसैचिं दोघांसी उठविलें । निजांकीं बाळासि घेऊन बैसले । ते समयीं बाळही आनंदलें । ह्मणे जनक माझा मज भेटला ॥२८॥

मग गुरु पित ज्ञाप्ति माता । पुण्याहवाचन करितां उभयतां । ब्रह्माण मंत्रघोष करिती तत्वतां । ऐसा व्रतबंध जाहला ॥२९॥

मग महावाक्यरुप जे गायत्री । स्वमुखें उपदेशिती कर्णपात्रीं । असो सर्व विधान होतां झडकरी । समर्थ उडोनी चालिले ॥३०॥

तंव तें बाळ लागलें पाठिसी । माउलिये ! माझी उपेक्षा करिसी । तरी मी न राहे सोडून चरणांसी । हें सत्य सत्य त्रिवाचा ॥३१॥

मग समर्थें अति कळवळोनी । तया उद्धवा समागमें घेउनी । बैसले गंगातीरीं येवोनी । सर्व जनही विस्मित ॥३२॥

तंव समर्थ मनीं विचारित । येथें जालों आम्हीं विख्यांत । आणि मारुती कृष्णातीरा जा आज्ञा करिता तरी येथे राहणें उचित नव्हे ॥३३॥

परि या लेंकरासी कैसें करावें समागमें कासया न्यावें । येथेंचि निजहस्तें स्थापावें । जगदुद्धाराकरितां ॥३४॥

हें वर्म अंतरी ठेऊन बरवें । तेथें मिळाले होते सर्वें । तयांसी ह्मणती आह्मांसी स्थळ द्यावें । निवांत रहावया ॥३५॥

सर्व म्हणती कोणत्या भागा । समर्थ दाविती ग्रामाच्या पुर्व भागा । जेथून किंचित दुर असे गंगा । आणिक एक नदी असे ॥३६॥

मग ते जागा सर्वीं दिधली । तेथें एक झोपडी केली । एक मुर्ति शेणाची निर्मिली । स्वहस्ते मारुतीची ॥३७॥

स्थापना करुनी यथासांग । शेंदूर चर्चून केली अभंग । ग्रामस्थ अधिकारी मिळोनी मग । इनाम देते जाले ॥३८॥

पांचा ग्रामींचें पांच चाहूर । मिळवुनी केला एक शिवार । तया मठासी नाम ठेविलें सुंदर । टाकळी ग्रामा म्हणोनी ॥३९॥

तेथें एकटची त्या मुलासी घेऊन । राहिले असती अल्प दिन । पुढील कथेचें अनुसंधान । चिमणें बाळ बोलेल ॥४०॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । उद्धवहंसाख्यान निगुती । द्वितीय प्रकरणीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP