अध्याय नववा - श्लोक २०१ ते २२७

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


भरतापरीस रघुनंदन ॥ तुज प्रिय होता मनांतून ॥ आतां कां कठीण केलें मन ॥ मजलागून सांग तें ॥१॥

कैकयीपुढें पसरी पदर ॥ वना धाडूं नको शतपत्रनेत्र ॥ यरी म्हणे तूं अधम साचार ॥ माझीं वरदानें न देसी तूं ॥२॥

तुझे पुर्वज संपूर्ण ॥ भाकेकारणें वेंचिती प्राण ॥ त्यांचिये वंशीं जन्मोन ॥ डाग लाविला कुळासी ॥३॥

कैकयीशद्बवज्र कठिण ॥ रायाचें हृदय जाहलें चूर्ण ॥ भूमीवरी मूर्च्छा येऊन ॥ निचेष्टित पडियेला ॥४॥

इतुका रात्रीं वर्तला वृत्तांत ॥ तों प्रातःकाळीं आला सुमंत ॥ रायासी करून प्रणिपात ॥ वचन बोलता जाहला ॥५॥

सर्व साम्रगी जाहली पूर्ण ॥ वाट पाहत ब्रह्मनंदन ॥ अरुणोदय जाहला चंडकिरण ॥ उदय करूं पाहतो ॥६॥

तरी तुम्हीं येऊनियां तेथ ॥ राज्यीं स्थापावा रघुनाथ ॥ वचन न बोलतां दशरथ ॥ चकित सुमंत विलोकी ॥७॥

मनीं विचारी अजसुत ॥ ही मात ऐकतां रघुनाथ ॥ वनास जाईल यथार्थ ॥ थोर अनर्थ ओढवला ॥८॥

कैकयी म्हणे सुमंता ॥ येथवरी आणीं रघुनाथा ॥ मी त्यांसी सांगेन अवघी वार्ता ॥ जे जाहली कथा पूर्वींची ॥९॥

रायास निद्रा लागली जाण ॥ यालागीं न बोलेचि वचन ॥ तो इकडे ब्रह्मपुत्रें संपूर्ण ॥ सामग्री सिद्ध केली असे ॥२१०॥

सुमंत म्हणे कैकयीलागून ॥ रायें भूमीवरी कां केलें शयन ॥ तों दशरथे स्फुंदस्फुंदोन ॥ रुदन करूं लागला ॥११॥

म्हणे सुमंता ऐक वचन ॥ माण् जवळी आलें मरण ॥ येथवरी आणी रघुनंदन ॥ कोणासी वर्तमान न सांगावें ॥१२॥

सुमंत आज्ञा वंदून ॥ निघाला तेव्हां म्लानवदन ॥ जैसा सूर्य ग्रहणीं कलाहीन ॥ तैसे आनन दिसतसे ॥१३॥

विचार करी सुमंत ॥ रामधामाकडे जात ॥ जैसा मुमुक्षु संसारतापें संतप्त ॥ वेगें येत संतसदना ॥१४॥

केवळ आत्मप्राप्तीचें स्थान ॥ तैसें दिसे रामसदन ॥ चारी महाद्वारें ओलांडून ॥ जाता जाहला तेधवा ॥१५॥

दृष्टी पाहावया रघुवीर ॥ क्रमोनि गेला स्थूळदेहद्वार ॥ दुसरें सूक्ष्म सुंदर ॥ तत्त्वांसहित ओलांडिलें ॥१६॥

पुढें क्रमोनियां कारण ॥ वेगें निघाला प्रधान ॥ तों महाकारण दैदीप्यमान ॥ चौथें द्वार देखिलें ॥१७॥

चतुर्थ द्वारींची पाहतां रचना ॥ ब्रह्मानंद जाहला मना ॥ तुर्येचा उंबरा ओलांडूनि जाणा ॥ पुढें सत्वर जातसे ॥१८॥

तों मणिमय मंडपप्रभा घन ॥ त्यासी आठ पायऱ्या दैदीप्यमान ॥ श्रवण कीर्तन स्मरण ॥ पादसेवन तें चौथें ॥१९॥

अर्चन वंदन दास्य सख्य ॥ चढे सत्वर प्रधान देख ॥ तों स्वानंदचौकीवरी सीतानायक ॥ प्रधानोत्तमें विलोकिला ॥२२०॥

मग नवविधा भक्ति आत्मनिवेदन ॥ सुमंतें केलें साष्टांग नमन ॥ तंव तो कमलपत्राक्ष सुहास्यवदन ॥ काय तेव्हां बोलिला ॥२१॥

सुमंता तूं मुख्य प्रधान ॥ आम्हांस ज्येष्ठबंधूसमान ॥ तुझे निर्मळ गुण पाहोन ॥ ब्रह्मानंद मज वाटे ॥२२॥

मग तो जोडूनि दोन्ही कर ॥ उभा राहे राघवासमोर ॥ सांगे दशरथें सत्वर ॥ कैकयीसदनीं बोलाविलें ॥२३॥

आतां कैकयीसदना श्रीराम ॥ कैसा जाईल पूर्णब्रह्म ॥ तें कथाकौतुक सप्रेम ॥ संत सज्जन ऐकोत पां ॥२४॥

श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ भक्तिज्ञानवैराग्यभांडार ॥ दृष्टांत रत्नेंअपार ॥ माजी सतेज झगमगती ॥२५॥

ब्रह्मानंदा श्रीधरवरा ॥ श्रीमद्भीमातटविहारा ॥ पुराणपुरुषा निर्विकारा ॥ जगद्वंद्या अभंगा ॥२६॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार । सदा परिसोत पंडित चतुर ॥ नवमाध्याय गोड हा ॥२२७॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP