अध्याय नववा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


शशांकप्रभासम पूर्ण ॥ कोरिले काश्मीर पाषाण ॥ त्यांची पोंवळीप्रभा घन ॥ सभोंवती रचियेली ॥५१॥

त्यामाजी सप्तरंगीं पाषाण ॥ चक्रजाळ्या चौकटी पूर्ण ॥ माजी घातल्या दारुण पाहतां आश्र्चर्य वाटतसे ॥५२॥

साधिलें पाचुबंद आंगण ॥ गरुडपाचूंचीं जोतीं पूर्ण ॥ निळयाचे गज घडोन ॥ तेचि तोळंबे लाविले ॥५३॥

त्यावरी हिरेयाचे स्तंभ ॥ वरी वैडूर्यउथाळीं स्वयंभ ॥ सुवर्णाची तुळवटें सुप्रभ ॥ लंबायमान पसरलीं ॥५४॥

गरुडपाचूचे दांडे विराजती ॥ आरक्त माणिककिलचा झळकती ॥ चर्याशेषफणाकृती ॥ जैसे गभस्ती वळीनें ॥५५॥

एकावरी एक नवखण ॥ तेथें रात्रीस नाहीं कारण ॥ जेथें गरुडपाचूचे रावे पूर्ण ॥ शब्द करिती नवल हें ॥५६॥

निळयाचे मयूर धांवती ॥ रत्नांचीं गोलांगुलें नाचती ॥ छप्पन्न देशींच्या नृपाकृती ॥ चित्रें भिंतीवरी पैं ॥५७॥

खांबसूत्रींच्या पुतळिया ॥ नाचती गिरक्या घेऊनियां ॥ नृसिंहमूर्ती स्तंभांतूनियां ॥ हुंकारिती क्षणक्षणां ॥५८॥

ऐशिया रंगमंडपांत ॥ बैसता झाला द्विपंचरथ ॥ वसिष्ठादि ऋषि समस्त ॥ अष्टाधिकारी आणि प्रजा ॥५९॥

मंडपजाळीवाटे तत्वतां ॥ पाहती कौसल्यादि माता ॥ श्रीरामें विद्या साधिल्या समस्ता ॥ देखावया आस्था सकळांची ॥६०॥

जैसा नक्षत्रांमाजी अत्रिसुत ॥ तैसा सभेसी राजा दशरथ ॥ इंद्राजवळी बृहस्पती बुद्धिमंत ॥ तैसा वसिष्ठ बैसला ॥६१॥

असो रंगमंडपापुढें दोघेजण ॥ श्रीराम आणि लक्ष्मण ॥ पाचुबंद अंगणीं येऊन ॥ उभे ठाकले तेधवां ॥६२॥

जैसे शशी आणि चंडकिरण ॥ कीं अपर्णावर आणि रमारमण ॥ कीं मेरुमांदार स्वरूपें धरून ॥ उभे ठाकले रणांगणीं ॥६३॥

साक्षात् शेषनारायण ॥ अवतारपुरुष दोघेजण ॥ अनंत जन्मींचें तपाचरण ॥ दशरथाचें फळां आलें ॥६४॥

कोटिकंदर्पलावण्यखाणी ॥ तेजासी उणा वासरमणी ॥ कीं अनंत विजा पिळूनी ॥ रामरूप ओतलें ॥६५॥

तो लावण्यमृतसागर ॥ आजानबाहु श्रीरघुवीर ॥ गुरु आणि पितयासी नमस्कार ॥ करोन शस्त्रें वंदिलीं ॥६६॥

नानावाहनीं आरूढोनि रघुपति ॥ दावी युद्धाच्या अगाध रीति ॥ रथ फिरवी नानागती ॥ विस्मित पाहती जन सर्व ॥६७॥

मग दावी कुंजरयानफेरी ॥ सवेंचि तुरंगारूढ होय झडकरी ॥ रथचमक दावी नानापरी ॥ अलातचक्र जैसें कां ॥६८॥

चरणयुद्ध अस्त्रयुद्ध ॥ शस्त्ररिति नानाविध ॥ मल्लमेषकुंजरयुद्ध ॥ व्याघ्रसिंहयुद्धगती ॥६९॥

कूर्मवृषभनक्रयुद्ध ॥ जलमंडलयुद्धविशद ॥ अंतरिक्ष भूमि गदा प्रसिद्ध ॥ सकळ कलायुद्ध दाविलें ॥७०॥

शक्ति पाशुपत तोमर ॥ शूल परिघ लहुडी चक्र ॥ कंदुक भिंडिमाळा वज्र ॥ दावी रघुवीर गति त्यांची ॥७१॥

पाश असिलता मुद्रल ॥ शतघ्नी फरशांकुश कुंतसरळ ॥ यमदंष्ट्रा शब्दयुद्ध सबळ ॥ यंत्रमंत्रयुद्धगती ॥७२॥

नेत्र झांकोनि सोडी बाण ॥ पुढें पाहे मागें भेदी जाण ॥ दळसिंधू परतटाकगमन ॥ राजीवनयन दावीतसे ॥७३॥

एक सांडितांचि बाण ॥ कोट्यावधि व्हावे त्यापासून ॥ सकळ चमूचें शिरच्छेदन ॥ एकाचि बाणें करावें ॥७४॥

अग्न्यस्त्र पर्जन्यास्त्र ॥ वात पर्वत आणि वज्र ॥ माया ब्रह्म माहेश्र्वर ॥ भूतास्त्र पैं ॥७५॥

सिंह सर्प आणि गरुडास्त्र ॥ कामवैराग्य तारकासुर ॥ पाप नाम गंधर्वास्त्र ॥ दावी रघुवीर अस्त्रें हीं ॥७६॥

ब्रह्मशिरी विश्र्वजित ॥ या अस्त्रगति दावी रघुनाथ ॥ तैसेंचि करी सुमित्रासुत ॥ मान दशरथ डोलवी ॥७७॥

वसिष्ठ उठोनि ते अवसरीं ॥ श्रीरामसौमित्रांसी हृदयीं धरी ॥ दशरथाचा आनंद अंबरीं ॥ न समाये तेव्हां सर्वथा ॥७८॥

सभा विसर्जून दशरथ ॥ वसिष्ठ सौमित्र रघुनाथ ॥ प्रवेशते जाहले सदनांत ॥ आनंदयुक्त सर्वही ॥७९॥

यावरी एके दिवशी अजनंदन ॥ दर्पणीं विलोकीं निजवदन ॥ तों दाढींत शुभ्र केश देखोन ॥ काय बोलता जाहला ॥८०॥

म्हणे शीघ्र बोलवा ब्रह्मनंदन ॥ अष्टाधिकारी ऋषि प्रजाजन ॥ सकळ व्यवहारी वैश्यजन ॥ विवेकसंपन्न थोर थोर ॥८१॥

सकळांसी बैसवोनि एकांतीं ॥ निजगुह्य पुसे कौसल्यापति ॥ म्हणे राज्य द्यावें रामाप्रति ॥ ऐसें चित्तीं वाटतसे ॥८२॥

राज्यासी योगय रघुनायक ॥ जो गुणसमुद्र प्रतापार्क ॥ जो धीर वीर उदार देख ॥ लावण्यासागर श्रीराम ॥८३॥

अनंत जन्मींच्या तपाचे फळ ॥ तो हा श्रीराम तमालनीळ ॥ राज्य द्यावें हो तात्काळ ॥ सुमुहूर्त वेळ पाहोनियां ॥८४॥

ऐकोनि दशरथाचें वचन ॥ संतोषला ब्रह्मनंदन ॥ मानवले समस्त प्रजानन ॥ म्हणती धन्य धन्य दशरथा ॥८५॥

वसिष्ठादि ऋृषि समस्त ॥ पाहोनि उत्तम सुमुहूर्त ॥ चैत्रमास अतिविख्यात ॥ गुरुपुष्ययोग साधिला ॥८६॥

श्रीरामासी द्यावया राज्यपट ॥ सुमुहूर्त नेमिला अतिवरिष्ठ ॥ सर्व सामुग्री वसिष्ठ ॥ सिद्ध करिता पैं जाहला ॥८७॥

श्र्वेतवर्ण चौदंती गज ॥ क्षीरवर्ण आणिला हयराज ॥ छत्रचामरें तेजःपुंज ॥ मृगांकवर्ण साजिरीं ॥८८॥

पंचपल्लव सप्तमृत्तिका परिकर ॥ चतुःसमुद्रींचें आणिले नीर ॥ दिव्य सिंहासन पवित्र ॥ नूतन छत्र निर्मिलें ॥८९॥

दिव्य मंडप निर्मून ॥ तेथें मांडिलें सिंहासन ॥ जपासी बैसविले दिव्य ब्राह्मण ॥ वेदोनारायण साक्षात ॥९०॥

छप्पन्न देशींचे राजेश्र्वर ॥ शाण्णव कुळीचे राजकुमार ॥ ते येत जाहले समग्र ॥ अपार करभार घेऊनियां ॥९१॥

आनंदमय अयोध्यानगर ॥ सदनें श़ृंगारिलीं सुंदर ॥ अयोध्यावासी नारी नर ॥ मंडित समग्र अलंकारें ॥९२॥

राजमंदिरें श़ृंगारिलीं विशेष ॥ वरी झळकती रत्नजडित कळस ॥ उणें आणिती उडुगणांस ॥ रजनीमाजी स्वतेजे ॥९३॥

एकांतीं बोलावूनि रघुनाथ ॥ गुह्य गोष्टी सांगें दशरथ ॥ म्हणे बारे मज ग्रहपीडा आली बहुत ॥ काळ विपरीत पुढें दिसे ॥९४॥

अष्टमस्थानीं शनैश्र्वर निश्र्चिती ॥ द्वादशस्थानीं जाण बृहस्पति ॥ बारे मज मृत्युचिन्हें जाणवती ॥ बैसें रघुपति सिंहासनीं ॥९५॥

रामा तुझी मज वाटे खंती ॥ मज टाकोनियां रघुपति ॥ दूरी जाशील निश्र्चिती ॥ हेंचि चित्तीं वाटतसे ॥९६॥

तरी लावण्यामृतसागरा ॥ तमालनीळा राजीवनेत्रा ॥ श्रीराम घनश्यामगात्रा ॥ राज्य भारी चालवीं ॥९७॥

श्रीरामेंवंदिले पितृचरण ॥ म्हणे मज आज्ञाचि प्रमाण ॥ रामसीतेसी उपोषण ॥ करवी वसिष्ठ ते दिवशीं ॥९८॥

रघुनाथाहातीं दानें ॥ अपार करविलीं ब्रह्मनंदनें ॥ राम जानकी दोघेजणें ॥ कुशासनीं पहुडविलीं ॥९९॥

जो पुराणपुरुष परब्रह्म ॥ तया हातीं ऋृषि करवी होम ॥ आहुती घाली पुरुषोत्तम ॥ दृष्टांत उत्तम ऐका ते ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP