चैत्र शु. सप्तमी

Chaitra shuddha Saptami


१ अनोदना सप्तमी :
चैत्र शु. षष्ठी व सप्तमी दोन्ही दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करावयाचा असतो. सप्तमीस सूर्यपूजा करावयाची.
२ गोमयादी सप्तमी :
गोमयादी सप्तमी चैत्र शु. सप्तमीचे नाव. या दिवसापासून प्रत्येक महिन्यातल्या शु. सप्तमीस एक वर्षपर्यंत सूर्यपूजा करतात. त्या दिवशी गोमय, यावक, दूध किंवा गळलेली पाने भक्षण करुन राहतात.
३ तुरग सप्तमी :
हे चैत्र शु. सप्तमीस करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी उपास करुन रवी, निकुंभ, अरुण, यम, यमुना, शनी, रविपत्‍नी छाया, सप्त छंद, धाता, आर्यमा इ. देवतांची पूजा करतात. उद्यापनाच्या वेळी घोडा दान देतात.
४ नामसप्तमी :
हे व्रत चैत्र शु. सप्तमीपासून एक वर्षपर्यंत करतात. चैत्रादी बारा महिन्यांत सूर्याच्या बारा नावांनी यथाक्रम पूजा करावी. जसे - चैत्रात 'धाता' या नावाने, 'वैशाखात' अर्यमा, ज्येष्ठात 'मित्र',  आषाढात 'वरुण' , श्रावणात 'इंद्र' भाद्रपदात 'विवस्वान्, आश्‍विनात 'पर्जन्य', कार्तिकात 'पूषा', मार्गशीर्षात 'अंशुमान्' , पौषात  'भग', माघात 'त्वष्टा', फाल्गुनात 'विष्णू' अशा नामोच्चारासहित सूर्याचे पूजन करुन एकभुक्त राहावे. असे केल्याने आयुष्य, आरोग्य आणि ऐश्‍वर्य यांची अपूर्व अभिवृद्धी होते.
५ मोदनव्रत :
हे व्रत चैत्र शु. सप्तमीला करतात. त्या दिवशी सकाळी प्रातःस्नानादी उरकून सूर्यनारायणाची पूजा करावी. ब्राह्मणांना खिरीचे भोजन घालावे आणि आपणही एकदा ते सेवन करावे.
६ सूर्यव्रत :
हे व्रत चैत्र शु. सप्तमीलाच करतात. यासाठी घरातील एका बाजूचा निवान्त भाग धुऊन, सारवून स्वच्छ करावा. तेथे मध्यभागी वेदी तयार करावी आणि तिच्यावर अष्टदल कमल काढावे. कमळाच्या निरनिराळ्या दलांवर पुढीलप्रमाणे देवतांच्या मूर्तीची स्थापना करावी. पूर्वेकडील दलावर दोन ऋतुकारक 'गंधर्व' , आग्नेयेकडील दलावर दोन ऋतुकारक 'गंधर्व' दक्षिण दलावर दोन 'अप्सरा', नैऋत्य दलावर दोन 'राक्षस', पश्‍चिमेकडील दलावर दोन ऋतुकारक 'महानाग', वायव्यदलावर दोन 'यातुधान', उत्तर दलावर दोन 'ऋषी' आणि ईशान्यदलावर एक 'ग्रह', याप्रमाणे स्थापना करून त्या सर्वांची गंधपुष्प, धूप, दीप, आणि नैवेद्य यांनी वेगवेगळी पंचोपचार पूजा करावी. सूर्याला तुपाच्या १०८ आहुती द्याव्या व इतर सर्वांना ८-८ आहुती द्याव्या. प्रत्येक देवतेच्या नावाने एकएक ब्राह्मण याप्रमाणे ब्राह्मण निमंत्रित करुन त्यांना भोजन घालावे. अशातर्‍हेने एक वर्षपर्यंत प्रत्येक शु. सप्तमीस केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होते.
७ कमल सप्तमी :
हे चैत्र शु. सप्तमीचे नाव. या दिवशी सूर्याचे व्रत करतात. व्रतावधी एक वर्ष. सूर्य ही या व्रताची देवता. तिलपात्रात कमलावर सूर्याची स्थापना करुन पूजा करतात आणि सुवर्णकमलाचे ब्राह्मणास दान करतात. असा या व्रताचा आणखीन एक विधी आहे.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP