चैत्र शु. पंचमी

Chaitra shuddha Panchami

१ कुमारव्रत :
हे व्रत चैत्र शु. पंचमीला करतात. त्या दिवशी मयूरारुढ कार्तिकस्वामीची सुवर्णसमान मूर्ती बनवून त्याचे पूजन करावे. आचार्यांना वस्त्रदान व सुवर्णदान करावे. उपवास करावा आणि चांगल्या वैद्याच्या संमतीने ब्राह्मीचा रस व तूप घ्यावे. अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध पंचमीला याप्रमाणे एक वर्षपर्यंत हे व्रत केले असता व्रत करणारा महाबुद्धिमान होतो. शास्त्राचे आकलन सहजतेने होते आणि शास्त्रार्थामध्ये  'स्फुरणशक्‍तीचा'  चांगला विकास होतो. 
२ पंचरात्र :
नवरात्र व्रतांमधीलच हे एक व्रत आहे. याचे वैशिष्ट्य असे की, या व्रतात पंचमीला एकभुक्‍त व्रत करतात.  षष्ठीला नक्‍त व्रत, सप्तमीला अयाचित भोजन घेतात, अष्टमीला उपवास (निराहार) आणि नवमीला व्रताचे पारणे करतात. हे व्रत केल्याने देवी अधिक प्रसन्न होते.
३ मत्स्यजयंती :
चैत्र शु. प्रतिपदेला दोनप्रहरी मत्स्यावतार झाला, असे मानतात. यानिमित्त जो उत्सव करतात, त्याला 'मत्स्यजयंती' असे म्हणतात. विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार हा विष्णूचा लीलावतार होय.
मत्स्यजयंती या नावाने एक व्रत आहे. चैत्र शु. पंचमीला हे व्रत करतात. मत्स्यावतारी विष्णूच्या मूर्तीची पूजा हा या व्रताचा मुख्य विधी आहे. या तिथीला हयपंचमी असेही म्हणतात. फल- संकटनिवारण.

४ लक्ष्मीव्रत :
हे व्रत चैत्र शु. पंचमीला करतात. या व्रतात लक्ष्मीचे पूजन करुन सुवर्णाचे कमलपुष्प दान करावे असे सांगितले आहे. असे केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांचा परिहार होतो.
५ श्रीव्रत :
हे व्रत चैत्र शु. पंचमीच्या दिवशी करतात. यासाठी तृतीयेला अभ्यंगस्नान करुन शुद्धवस्त्र परिधान करावे. शुभ्र माला धारण करावी व व्रतमग्न व्हावे. तूप ,दही यांजबरोबर भात सेवन करावा. चतुर्थीला स्नान करुन पुनश्‍च व्रतस्थ व्हावे आणि पंचमीला प्रातःस्नानादी नित्यविधी उरकून लक्ष्मीचे पूजन करावे. पूजेमध्ये धान्य, हळद, आले, ऊस, गूळ व मीठ या वस्तू वाहाव्या आणि लक्ष्मीसूक्‍त म्हणून कमलपुष्पे वाहावीत. ती न मिळाल्यास बिल्वपत्रे  (बिल्वकाष्ठे) आणि तीही न मिळाल्यास केवळ घृताची आहुती द्यावी. पुष्करिणी (कमलपुष्पांचे तळे)- मध्ये स्नान करुन सुवर्णदान करावे. असे केल्याने लक्ष्मी प्राप्त होते, श्रीप्राप्ती होते.
६ सौभाग्यव्रत :
हे व्रत चैत्र शु. पंचमीला करतात. या व्रतात पृथ्वी, पंचमी आणि चंद्र यांचे गंधादी साहित्याने पूजन करुन एकवेळ भोजन करुन राहतात. हे व्रत केल्याने आयुष्य आणि ऐश्‍वर्य वाढते.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP