माघ शु. सप्तमी

Magha shudha Saptami


* जयंती सप्तमी

माघ शु. सप्तमीला 'जयंती सप्तमी' असे नाव आहे. या दिवशी सूर्य व्रताला आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. या व्रतासाठी माघापासून क्रमाने पौषापर्यंत वर्षाच्या बारा महिन्यांचे प्रत्येकी तीन महिन्यांचा एक, असे चार विभाग करतात. प्रत्येक विभागात सूर्यपूजेसाठी वेगवेगळी पूजाद्रव्ये घेतात. व्रतसमाप्तीनंतर उद्यापन करतात.

फल - सूर्यलोकाची प्राप्ती.

 

* पुत्रसप्तमी

माघ शु. षष्ठी दिवशी उपवास करून सप्तमीस प्रात:काळी स्नान करावे आणि सूर्यनारायणाची पूजा करून हवन करावे. दूध, दही, भात व खीर यांचे ब्राह्मणभोजन घालावे. याचप्रकारे व. पक्षात उपवास करून लाल कमळांनी सुर्याची पूजा करावी व असे एक वर्षभर केल्यास उत्तम पुत्राची प्राप्ती होते.

 

* भानुसप्तमी

भानुसप्तमी ही माघ शु. सप्तमी दिवशी येते. सर्वांत प्रथम सूर्यनारायणाने मन्वन्तरापूर्वी याच दिवशी आपला प्रकाश प्रकाशित केला. ही एकप्रकारे जयंती पण होते. या दिवसासाठी सूर्योपासनेचे अनेकविध प्रकार दिले आहेत. यासाठी याला 'अर्क - अचला - सूर्य - रथ - भानुसप्तमी' अशी नावे आहेत. ही सप्तमी अरुणोदयव्यापिनी असावी. दोन दिवस असेल तर पहिली धरावी. माघ-स्नान करणार्‍यांनी पूर्व दिशा लालसर झाल्यावर भानुसप्तमीचे स्नान करणार्‍यांनी सुर्योदयानंतर स्नान करावे, ही गोष्ट स्नान करणार्‍यांनी ध्यानात घ्यावी. स्नान करण्यापूर्वी धोतर्‍याची सात पाने व बोराटीची सात पाने कुसुम्भाच्या वातीच्या तिळाच्या तेलाच्या दिव्यात घालून तो डोक्यावर धरावा आणि सूर्याचे ध्यान करत उसाने पाणी ढवळून दिवा प्रवाहात सोडावा. दिवोदासाच्या मतानुसार दिव्याऎवजी धोतर्‍याची सात पाने डोक्यावर धारण करून उसाने पाणी ढवळून आणि

'नमस्ते रुद्ररूपाय रसानां पतये नम: । वरुणाय नमस्तेऽस्तु'

म्हणून दिवा पाण्यात सोडून द्यावा. नंतर

'ययद् जन्मकृतं पापं यच्च जन्मान्तरार्जितम् ।

मनोवाक्कायजं यच्चा ज्ञाताज्ञाते च ये पुन: ॥

इति सप्तविधं पापं स्नानान्ते सप्त सप्तिके ।

सप्तव्याधि समाकीर्णं हर भास्करि सप्तमी ।'

असा जप करून केशव आणि सूर्य यांच्याकडे पाहून पादोदक (गंगाजळ अथवा चरणामृत) पाण्यात घालून स्नान करावे. याने क्षणभरात सर्व पापे दूर होतात. यानंतर अर्ध्या कलशात पाणी, गंध, अक्षता, पुष्पे, दूर्वा, सात अर्कपत्रे व सात बोरीची पाने घालून

'सप्तसप्तिवह प्रीत सप्तलोक प्रदीपन ।

सप्तम्या सहितो देव गृहाणार्घ्यं दिवाकर ।'

या मंत्राने सूर्याला व

जननी सर्वलोकाना सप्तमी सप्तसप्तिके ।

सप्तव्याह्रतिके देवि नमस्ते सूर्यमंडले ॥'

या मंत्राने सप्तमीला अर्घ्य द्यावा. याच दिवशी तालकदान देण्यासाठी नित्य कृत्ये झाल्यावर चंदनाने अष्टदल काढावे. पूर्वेकडून क्रमवार अशा आठी कर्णिकांवर यांची स्थापना करून पूजा करावी. ताम्हनात सोन्याचे कुंडल ( कर्णभूषण ), तूप, गूळ व तीळ घालून लालवस्त्राने गुंडाळावे आणि गंधफुलांनी पूजा करावी.

'आदित्यस्य प्रसादेन प्रात:स्नानफलेन च ।

दुष्टदुर्भाग्य दु:स्वप्नं मया दत्तं तु तालकम् ।'

असे म्हणुन ते कुंडल ब्राह्मणाला दान द्यावे.

'भानुसप्तमी' दिवशी प्रात:स्नानादी कृत्ये झाल्यावर जवळपास सुर्यमंदिर असेल तर त्याच्यासमोर बसून सोन्याची सूर्यमूर्ती अष्टदल-कमलात स्थापन करून

'ममाखिलकामनासिद्‌द्ध्यर्थं सूर्यनारायणप्रीतये च सूर्यपूजनं करिष्ये ।'

असा संकल्प करून '

ॐ सूर्याय नम:'

या नाममंत्राने अथवा पुरुषसूक्‍ताने ध्यानावाहनादी षोडशोपचार पूजा करावी. यथाऋतू व कालोद्भव पत्री, फुले; फळे, खीर, डाळभात अशा दध्योदनाचा नैवेद्य दाखवावा आणि देवास सुशोभित रथावर आरूढ करून स्वजन-परजनादिकंसह नगर-भ्रमण करवून स्थानापन्न करावे. ब्राह्मणांना खिरीचे भोजन घालून दिवस बुडण्यापूर्वी आपण एकवेळ जेवावे. त्या दिवशी भोजनात तेल, मीठ हे पदार्थ नसावेत. याप्रमाणे प्रतिवर्षी केल्यास सूर्यपर्वात केल्याप्रमाणे पुण्य प्राप्त होते.

 

* महती सप्तमी

माघ शु. सप्तमी दिवशी रथारूढ सूर्यनारायणाची पूजा करून उपवास करावा म्हणजे सात जन्मांतील पापे नष्ट होतात. हिलाचा रथसप्तमी म्हणतात.

 

* महासप्तमी

माघ शु. सप्तमीला 'महासप्तमी' असे म्हणतात. व्रतावधी एक वर्ष. याच विधी-पंचमीला एकभुक्‍त राहून षष्ठीला व सप्तमीला सूर्याची पूजा करावी. करवीर पुष्पे आणि रक्‍तचंदनाने पूजा करावी. एका वर्षाचे माघ महिन्यापासून चार-चार महिन्यांचे तीन भाग करावे. प्रत्येक भागात निरनिराळी फुले, नैवेद्य, धूप इ. उपचार करावेत. उद्यापनाच्या वेळी एक रथ दान द्यावा.

 

* रथसप्तमी

माघ शु. सप्तमीस रथसप्तमी म्हणतात. या व्रताचा विधी-षष्ठीच्या दिवशी एकभुक्‍त राहून सप्तमीला पहाटे स्नान करावे. सोन्यारुप्याची पणती लावून सूर्याचे ध्यान करावे. मग तो दिवा उदकात सोडावा. घराच्या अंगणात रक्‍तचंदनाने सूर्याचा सात घोड्यांचा रथ व त्यावर अरुणासह सूर्य प्रतिमा काढावी. गोवर्‍याच्या विस्तवावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवावा. सप्त धान्ये, सात रुईची पाने, सात बोरे सूर्याला वाहावीत. अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणाला भोजन घालावे. सायंकाळी हळदीकुंकू करावे

 

* रथांक सप्तमी

माघ शु. सप्तमी दिवशी उपवास करून सूर्यनारायणाची पूजा करावी व त्यास सुवर्णरथात बसवून प्रत्येक शु. सप्तमी दिवशी पूजा करावी व वर्षाच्या शेवटी ब्राह्मणाला दान द्यावी.

 

* विजययज्ञ सप्तमी

एक तिथिव्रत. माघ शु. सप्तमीला हे व्रत करतात. सूर्य ही व्रताची देवता. व्रतावधी एक वर्ष. याचा विधी - प्रत्येक महिन्यात सूर्याची निरनिरळ्या नावांनी पूजा करावी. बारा ब्राह्मणांचा सत्कार करावा. उद्यापनाच्या वेळी सूर्याची सोन्याची मूर्ती, सोन्याचा रथ व सारथी करून त्या वस्तू आचार्याला दान द्याव्या.

फल - आरोग्य व दीर्घायुष्य यांची प्राप्ती

 

* सप्त सप्तमी

ज्याप्रमाणे योगविशेषाने वारुणी, महावारुणी, महा-महावारुणी किंवा माघी, महामाघी, महामहामाघी अगर जया, विजया, महाविजया वगैरे होतात. त्याचप्रमाणे वारविशेषयोगाने माघ शु. सप्तमीचेही कित्येक प्रकार होतात. जसे - जया, विजया, महाजया, जयन्ती, अपराजिता, भद्रा, नंदा अगर अर्क, संपुटक, मरीची, निम्बपत्र, सुफला, अनोदना, विजया कामिका या सर्व रविवारी पंचतारक किंवा पुन्नाम नक्षत्र आल्यास होतात. यावेळी व्रत, उपवास, पूजा, पाठ, दान, पुण्य, हवन आणि ब्राह्मणभोजन इ. कृत्ये केल्याने अनंतपट फळ मिळते. विशेषत: अर्कसंपुटामुळे धनवृद्धी, मरीचीने प्रियपुत्रसंगम, निम्बपत्रीने रोगनाश, सुफलाने पुत्र-पौत्र, दोहित्रादीची अपूर्व अभिवृद्धी, अनोदानाने धनधान्य, सुवर्ण, चांदी आणि आरोग्य यांचा लाभ. विजयामुळे शत्रुनाश व कामिकामुळे सर्व प्रकारची अभीष्ट सिद्धी मिळते. यासाठी माघ शु. सप्तमी दिवशी प्रात:स्नानादी झाल्यावर आकाशस्थ व सुवर्णबद्ध सूर्याची मिळाल्या उपचारांनी पूजा करावी. खीर, डाळ, भात, दूधदही अथवा दध्योदन यांचा नैवेद्य दाखवावा आणि ब्राह्मणभोजन घालून नंतर स्वत: जेवावे म्हणजे यथोक्‍त फळ मिळते.

N/A

N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP