माघ शु. चतुर्थी

Magha shudha Chaturthi


अंगारक चतुर्थी

जर माघ शु. चतुर्थीस मंगळवार असेल तर त्या दिवशी प्रात:काळी स्नान झाल्यावर प्रथम अंगाला माती लावून नाहावे. मग लाल वस्त्र लाल परिधान करावे. पद्मरागिणी हातात घालावा आणि उत्तरेकडे तोंड करून बसून 'अग्निमूर्द्धात' या मंत्राचा जप करावा. जर जानवे नसेल तर त्याने 'अंगारकाय भौमाय नम:' या मंत्राचा जप करावा. नंतर जमीन शेणाने सारवून त्यावर लाल चंदनाने अष्टदल काढावॆ. त्यांच्या पूर्वादी चारी दिशांना भक्ष्य भोजन आणि भात घालून चार भांडी ठेवावीत. त्याची पूजा करावी. कपिला गाय आणि लाल रंगाचा बैल दान द्यावीत. बरोबर शय्यादान केल्यास सहस्त्रपट फल प्राप्त होते.

 

* कुण्डचतुर्थी

माघ शु. चतुर्थी दिवशी उपास करून देवीची पूजा करावी. अनेक उपचारांनी पुजुन सर्व प्रकारची नैवेद्यसामग्री सुपातून अगर मातीच्या भांड्यातून घालून ब्राह्मणाला दिल्यास संतती आणि सौभाग्य प्राप्त होतात.

 

* गणेशव्रत

माघ शु. पूर्वविद्धा चतुर्थी दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर

'ममाखिलाभिलषितकार्यसिद्धिकामनया गणेशव्रतं करिष्ये ।'

या मंत्राने संकल्प करावा आणि लाल वेदीवर लाल वस्त्र अंथरून व स्वत: लाल वस्त्र परिधान करून लाल पूजोपचारांनी गणपतीची यथाविधी व शास्त्रोक्त पूजा करावी व ओली हळकुंडे गूळ, साखर व तूप यांत मिसळून नैवेद्य दाखवावा. रात्री नक्‍त करून संपूर्ण अभीष्ट प्राप्त करून घ्यावे.

 

* गौरी चतुर्थी

एक व्रत. माघ शु. चतुर्थीला सर्वांनी, विशेषत: स्त्रियांनी कुंदपुष्पे वाहून गौरीची पूजा करावी. विद्वान ब्राह्मणाचा सन्मान करावा. असा याचा विधी आहे.

फल - संतती व सौभाग्य यांची प्राप्ती.

 

* तिलकचतुर्थी

माघ शु. चतुर्थीला हे नाव आहे. या दिवशी नक्‍तव्रत, गणपतीची पूजा करतात. तिल व आज्य या द्रव्यांनी हवन करतात. तिळामिश्रित गुळाच्या लाडवाचे सेवन करतात. रात्री जागरणही करतात. हिला 'कुंद चतुर्थी' असेही नाव आहे. या दिवशी कुंदाच्या फुलांनी सदाशिवाची पूजा करून जो नक्‍त भोजन करतो, त्याला लक्ष्मी प्राप्त होते.

 

*ढुण्ढिपूजा

माघ शु. चतुर्थी दिवशी नक्‍तव्रत आचरून काशीवासी ढुण्ढीराजाचे पूजन करावे आणि तिलसाखरेचे मोदक अर्पण करून तिळांच्या आहुती द्याव्यात. रात्री एकभुक्‍त राहून जागरण करावे म्हणजे त्याने संपूर्ण पापे नाहिशी होतात.

 

* यमव्रत

माघ शु. चतुर्थी दिवशी जर शनिवार आणि भरणी नक्षत्र असेल तर त्या दिवशी यमाचे पूजन करावे व तन्निमित्त व्रत करावे, याने यमभयाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होते.

 

* वरदा चतुर्थी

माघ शु. चतुर्थीस कुंदाच्या फुलांनी शिवपूजन करावे. श्रीप्राप्ती होते. या दिवशी गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य वगैरेंनी पार्वतीचे पूजन करावे व गूळ, आले, लवण, पालक ( भाजी - मुळा ) आणि खीर यांचा बली देऊन ब्राह्मणांना अर्पण करावा व भोजन द्यावे.

 

* शांतिचतुर्थी

माघ शु. चतुर्थीला गणेशपूजा करून तुपात तळलेले मोदक (अपूप ) आणि मिठाची पक्वान्ने देऊन गुरुदेवाची पूजा करावी व गूळ, मीठ आणि तूप देऊन सर्व प्रकारची शांती प्राप्त करून घ्यावी.

 

* विनायकी

या चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' म्हणतात. असुर नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी 'विनायक' नावाने अवतार धरला म्हणुन ही विनायकी प्रसिद्ध आहे. शिवाय या चतुर्थीला 'ढुंढिराज चतुर्थी' असेही म्हणतात. या दिवशी उपवास करून श्रद्धेने गणेशाची पूजा करावी; आणि पंचमीला तिळाचे जेवण करावे, अशा तर्‍हेने हे व्रत केल्यास मनुष्य निर्विघ्न व सुखी होतो.

'गं स्वाहा'

हा मूळ मंत्र आहे.

'गां नम:'

ने ह्रदयादीन्यास करावा.

'आगेच्छोल्काय'

म्हणून गणेशाला आवाहन करावे आणि

'गच्छोल्काय'

म्हणून विसर्जन करावे. गंध इ. उपचारांनी विधिपूर्वक गणपतीचे पूजन करूज त्यास लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा. नंतर आचमन, नमस्कार आणि प्रदक्षिणा इ. नंतर या गणेशगायत्री मंत्राचा जप करावा :-

'ॐ महोल्काय विद्‌महे वक्रतुंडाय धीमहि ।

तन्नोदन्ति प्रचोदयात् ॥' ( अग्निपुराण )

याच तिथीस गौरीव्रतही केले जाते. गणांसह गौरीची पूजा करतात. कुंकू इ. साहित्यांनी भगवती गौरीची पूजा करतात. आपल्या सुख-सौभाग्यासाठी सुवासिनी व ब्राह्मण यांची पूजा करावी. त्यानंतर प्रसन्न मनाने स्वबांधवांसह स्वत: भोजन करावे. या गौरीव्रताच्या प्रभावाने सौभाग्य व आरोग्य यांची प्राप्ती होते.

या पुण्यमय तिथीला स्नान, दान, जप व होम इ. शुभ कर्मांनी गजाननाच्या कृपेने सहस्रपट कामे यशस्वी होतात. या दिवशी नक्‍तव्रत करून जे धुंडिराजाची मध्यान्ही व सायंकाळी पूजा करतील त्यांना सर्व देवांच्या पूजेचे फल मिळते व ते सर्वत्र विजयी होऊन अंती गणेशलोकी जातील.

या दिवशी कोणी कोणी 'नक्‍त व्रत' पाळून ढुंढिराजाची पूजा करतात व त्यास तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. जे मांत्रिक या दिवशी तीळ व तूप यांनी हवन करतात, त्यांचे मंत्र सिद्ध होतात. हिला 'कुंद चतुर्थी' असेही नाव आहे.

या व्रताचे माहात्म्य फार आहे.

 

* सुख चतुर्थी

माघ शु. चतुर्थीस जर मंगळवार असेल तर

'सुमंतुरूवचन चतुर्थी तु चतुर्थी तु यदाङ्गारकसंयुता ।

चतुर्थ्यां तु चतुर्थ्यां तु विधानं श्रृणु यादृशाम् ॥'

प्रमाणे लाल अक्षता, गंध, फुले व नैवेद्य याने श्रीगणेशाची पूजा करावी व याप्रमाणे चतुर्थ चतुर्थ = चौथी चौर्थी व चतुर्थी चतुर्थी = माघ, वैशाख, भाद्रपद व पौष अशा चतुर्थ्याचे एक वर्षपर्यंत व्रत करावे म्हणजे सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, मात्र प्रत्येक चतुर्थीला मंगळवार असावा.

 

N/A

N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP