श्रीदुर्गासप्तशती - एकादशोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - एकादशोऽध्याय:


एकादशोऽध्याय:
ध्यानम्
ॐ बालरविद्युतिमिन्दुकिरीटां तुङ्‌गंकुचांनयनत्रययुक्‍ताम् ।
स्मेरमुखीं वरदाङ्‌कुशपाशाभीतिकरां प्रभजे भुवनेशीम् ॥
'ॐ' ऋषिरुवाच॥१॥
देव्या हते तत्र महासुरेन्द्रे
सेन्द्रा: सुरा वन्हि पुरोगमास्ताम् ।
कात्यायनीं तुष्टुवुरिष्टलाभाद्
विकाशिवक्त्राब्जविकाशिताशा: ॥२॥
देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद
प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य ।
प्रसीद विश्वेश्‍वरी पाहि विश्वं
त्वमीश्वरी देवि चराचरस्य ॥३॥
आधारभूता जगतस्त्वमेका
महीस्वरूपेण यत: स्थितासि ।
अपां स्वरूपस्थितया त्वयैत-
दाप्यायते कृत्स्नमलङ्‌घ्यवीर्ये ॥४॥
त्वं वैष्णवी शक्तिरनन्तवीर्या
विश्‍वस्य बीजं परमासि माया ।
सम्मोहितं देवि समस्तमेतत्
त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्‍तिहेतु: ॥५॥
विद्या: समस्तास्तव देवि भेदा:
स्त्रिय: समस्ता: सकला जगत्सु ।
त्वयैकया पूरितमम्बयैतत्
का ते स्तुति: स्तव्यपरा परोक्‍ति: ॥६॥
सर्वभूता यदा देवी स्वर्गमुक्‍तिप्रदायिनी ।
त्वं स्तुता स्तुतये का वा भवन्तु परमोक्‍तय: ॥७॥
सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य ह्रदि संस्थिते ।
स्वर्गापवर्गदे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥८॥
कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनि ।
विश्वस्योपरतौ शक्‍ते नारायणि नमोऽस्तु ते ॥९॥
सर्वमङ्‌गलमांङ्‌गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥१०॥
सृष्टिस्थितिविनाशानां शक्‍तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥११॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥१२॥
हंसयुक्‍तविमानस्थे ब्रह्माणीरूपधारिणि ।
कौशाम्भ:क्षरिके देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥१३॥
त्रिशूलचन्द्राहिधरे महावृषभवाहिनि ।
माहेश्‍वरीस्वरूपेण नारायणि नमोऽस्तु ते ॥१४॥
मयुरकुक्कुटवृते महाशक्‍तिधरेऽनघे ।
कौमारीरूपसंस्थाने नारायणि नमोऽस्तु ते ॥१५॥
शङ्‌खचक्रगदाशाङ्‌र्गगृहीतपरमायुधे ।
प्रसीद वैष्णवीरूपे नारायणि नमोऽस्तु ते ॥१६॥
गृहीतोग्रमहाचक्रे दंष्ट्रोद्धृतवसुन्धरे ।
वराहरूपिणि शिवे नारायणि नमोऽस्तु ते ॥१७॥
नृसिंहरूपेणोग्रेण हन्तुं दैत्यान् कृतोद्यमे ।
त्रैलोक्यत्राणसहिते नारायणि नमोऽस्तु ते ॥१८॥
किरीटिनि महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले ।
वृत्रप्राणहरे चैन्द्रि नारायणि नमोऽस्तु ते ॥१९॥
शिवदूतीस्वरूपेण हतदैत्यमहाबले ।
घोररूपे महारावे नारायणि नमोऽस्तु ते ॥२०॥
दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे ।
चामुण्डे मुण्डमथने नारायणि नमोऽस्तु ते ॥२१॥
लक्ष्मि लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टिस्वधे ध्रुवे ।
महारात्री महाऽविद्ये नारायणि नमोऽस्तु ते ॥२२॥
मेधे सरस्वति वरे भूति बाभ्रवि तामसि ।
नियते त्वं प्रसीदेशे नारायणि नमोऽस्तु ते ॥२३॥
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्‍तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि  नमोऽस्तु ते ॥२४॥
एतत्ते वदनं सौम्यं लोचनत्रयभूषितम् ।
पातु न: सर्वभीतिभ्य: कात्यायनि नमोऽस्तु ते ॥२५॥
ज्वालाकरालमत्युग्रमशेषासुरसूदनम् ।
त्रिशूलं पातु नो भीतेर्भद्रकालि नमोऽस्तु ते ॥२६॥
हिनस्ति दैत्यतेजांसि स्वनेनापूर्य या जगत् ।
सा घण्टा पातु नो देवि पापेभ्योऽन: सुतानिव ॥२७॥
असुरासृग्वसापङ्‌कचर्चितस्ते करोज्ज्वल:।
शुभाय खड्‌गो भवतु चण्डिके त्वां नता वयम् ॥२८॥
रोगानशेषानपहंसि तुष्टा
रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां
त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॥२९॥
एतत्कृतं यत्कदनं त्वयाद्य
धर्मद्विषां देवि महासुराणाम् ।
रूपैरनेकैर्बहुधाऽऽत्ममूर्तिं
कृत्वाम्बिके तत्प्रकरोति कान्या ॥३०॥
विद्यासु शास्त्रेषु विवेकदीपै-
ष्वाद्येषु वाक्येषु च का त्वदन्या ।
ममत्वगर्तेऽतिमहान्धकारे
विभ्रामयत्येतदतीव विश्वम् ॥३१॥
रक्षांसि यत्रोग्रविषाश्र्च नागा
यत्रारयो दस्युबलानि यत्र ।
दावानलो यत्र तथाब्धिमध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ॥३२॥
विश्वेश्‍वरि त्वं परिपासि विश्वं
विश्वात्मिका धारयसीति विश्वम् ।
विश्वेशवन्द्या भवती भवन्ति
विश्वाश्रया ये त्वयि भक्‍तिनम्रा: ॥३३॥
देवि प्रसीद परिपालय नोऽरिभीते-
र्नित्यं यथासुरवधादधुनैव सद्य: ।
पापानि सर्वजगतां प्रशमं नयाशु
उत्पातपाकजनितांश्‍च महोपसर्गान् ॥३४॥
प्रणतानां प्रसीद त्वं देवि विश्‍वार्तिहारिणि ।
त्रैलोक्यवासिनामीड्‍ये लोकानां वरदा भव ॥३५॥
देव्युवाच ॥३६॥
वरदाहं सुरगणा वरं यन्मनसेच्छथ ।
तं वृणुध्वं प्रयच्छामि जगतामुपकारकम् ॥३७॥
देवा ऊचु: ॥३८॥
सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि ।
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥३९॥
देव्युवाच ॥४०॥
वैवस्वतेऽन्तरे प्राप्ते अष्टविंशतिमे युगे ।
शुम्भो निशुम्भश्‍चैवान्यावुत्पत्स्येते महासुरौ ॥४१॥
नन्दगोपगृहे जाता यशोदागर्भसम्भवा ।
ततस्तौ नाशयिष्यामि विन्ध्याचलनिवासिनी ॥४२॥
पुनरप्यतिरौद्रेण रूपेण पृथिवीतले ।
अवतीर्य हनिष्यामि वैप्रचित्तांस्तु दानवान् ॥४३॥
भक्षयन्त्याश्‍च तानुग्रान् वैप्रचित्तान्महासुरान् ।
रक्‍ता दन्ता भविष्यति दाडिमीकुसुमोपमा: ॥४४॥
ततो मां देवता: स्वर्गे मर्त्यलोके च मानवा: ।
स्तुवन्तो व्याहरिष्यन्ति सततं रक्‍तदन्तिकाम् ॥४५॥
भूयश्‍च शतवार्षिक्यामनावृष्ट्यामनम्भसि ।
मुनिभि: संस्तुता भूमौ सम्भविष्याम्ययोनिजा ॥४६॥
तत: शतेन नेत्राणां निरीक्षिष्यामि यन्मुनीम् ।
कीर्तयिष्यन्ति मनुजा: शताक्षीमिति मां तत: ॥४७॥
ततोऽहमखिलं लोकमात्मदेहसमुद्‌भवै: ।
भरिष्यामि सुरा: शाकैरावृष्टे: प्राणधारकै: ॥४८॥
शाकम्भरीति विख्यातिं तदा यस्याम्यहं भुवि ।
तत्रैव च वधिष्यामि दुर्गमाख्यं महासुरम् ॥४९॥
दुर्गा देवीति विख्यातं तन्मे नाम भविष्यति ।
पुनश्‍चाहं यदा भीमं रूपं कृत्वा हिमाचले ॥५०॥
रक्षांसि भक्षयिष्यामि मुनीनां त्राणकारणात् ।
तदा मां मुनय: सर्वे स्तोष्यन्त्यानम्रमूर्तय: ॥५१॥
भीमा देवीति विख्यातं तन्मे नाम भविष्यति ।
यदारुणाख्यस्त्रैलोक्ये महाबाधां करिष्यति ॥५२॥
तदाहं भ्रामरं रूपं कृत्वाऽसंख्येयषट्‌पदम् ।
त्रैलोक्यस्य हितार्थाय वधिष्यामि महासुरम् ॥५३॥
भ्रामरीति च मां लोकास्तदा स्तोष्यन्ति सर्वत: ।
इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति ॥५४॥
तदा तदावतीर्याहं करिष्याम्यरिसंक्षयम् ॥ॐ॥५५॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्म्ये देव्या: स्तुतिर्नामकादशोऽध्याय:
॥११॥
उवाच ४, अर्धश्‍लोक: १, श्‍लोका: ५०,
एवम् ५५,
एवमादित: ६३० ॥
- श्री दुर्गा शाकंभरी भ्रामरी विजयते -


प्रात:कालीन सूर्यकिरणांच्या तेजाप्रमाणे तळपणारा किरीट, मस्तकावर चंद्रकोर, भरदार स्तनसंभार, तेजस्वी त्रिनेत्र, हाती वरद अंकुशपाशा आणि मुखावर निश्‍चयी आभा विलसणारी अशा प्रसन्न भुवनेश्‍वरीचे मी भक्तिपूर्वक ध्यान करतो, तिल वंदन करतो.
ऋषी म्हणाले, "देवीने मोठमोठ्या राक्षसांचा नि:पात केल्यानंतर इंद्रादीदेव अग्नीच्या नेतृत्वाखाली देवीकडे येऊन तीची स्तुती करू लागले. कार्यपूर्तीचा आनंद व संतोष देवीच्या वदनकमलावर प्रसन्नतेने दिसत होता; ज्यामुळे पृथ्वीवरील सर्व वातावरण व दशदिशाही प्रसन्नपणे उजळल्या. ॥१।२॥
देवांनी देवीची स्तुती सुरू केली. ते म्हणाले, "शरण आलेल्यांना तू नेहमी संकटमुक्‍त करतेस. आमच्यावरही तू प्रसन्न हो. तू या जगाची माता आहेस, जगदम्बा आहेस. या जगाचे, त्यातील चराचरांचे रक्षण कर. तूच फक्त या जगातील जीवांची ईश्‍वरी आहेस. रक्षणकर्ती आहेस. ॥३॥
या जगाला आधारभूत अशी तूच आहेस. तू या पृथ्वीचा अंश आहेस. तुझा पराक्रम इतका प्रचंड आहे, की त्याला तोड नाही. हे देवी, तू जलरूपाने स्थित होऊन सकल जीवांची तहान भागवतेस, जीवन देऊन जगवतेस. ॥४॥
हे देवी वैष्णवी, तुझी शक्‍ती अपार आहे. या विश्‍वाची आदिम बीजधारणा तू केलीस. तू दयेची चरम सीमा आहेस. या जगाला तुझ्या कर्तृत्वाने, शक्‍तीने व संकट-मुक्‍ततेने मोहून टाकले आहेस. तू आमच्यावर प्रसन्न झालीस तर जीवसृष्टीला मोक्षाचे दार आपोआप उघडेल. ॥५॥
सकल आणि भिन्न विद्यांची धात्री तू आहेस. हे देवी, या विश्‍वात असणार्‍या स्त्रियांची तू आदिमाता असून त्या तुझीच रूपे आहेत. हे जगदम्बे, या विश्‍वात तू सर्व ठिकाणी वावरतेस. असे असताना आम्ही शब्दांनी तुझी स्तुती काय करणार ! आमचे स्तोत्रशब्द जेथे संपतील त्या वेळी मूक स्वरूपाने आम्ही तुझे सदैव ऋणी असू. ॥६॥
सर्व जीवमात्रांमध्ये तू सामावलेली असल्याने सर्वभूता आहेस. हे देवी, तू आम्हाला स्वर्ग व मुक्‍ती प्रदान करणारी आहेस, हीच तुझी योग्य स्तुती होईल. अन्य तर्‍हेने पूजाअर्चा, मंत्र-तंत्र यापेक्षा मूक भावनेने आम्ही शरण आल्यानेच तुझे स्तवन पूर्ण होईल. तुला आमचे नमस्कार. ॥७॥
बुद्धिरूपाने सकल जनांच्या अंत:करणात निवास करणार्‍या जगदोद्धारिणी देवी, तू भक्तांना केवळ स्मरणानेही स्वर्गद्वारी नेतेस. एका भक्ति-प्रतिष्ठेच्या मार्गाने तू आमचा उद्धार करतेस. हे नारायणी तुला आमचे वारंवार वंदन ! ॥८॥
तू सर्व कलांची अधिष्ठात्री व उद्योगांची, परिश्रमाची चरमसीमा (काष्ठा) असून तू परिवर्तनशील व फलस्वरूपाची दात्री आहेस. या विश्‍वाचा आदि आणि अंत करण्याची महान शक्‍ती असणार्‍या देवी नारायणीला आमचे पुन:पुन्हा नमस्कार. ॥९॥
सर्व मंगलमय वस्तूंत तू सर्वाधिक सुमंगल आहेस. हे देवी, शिवे ! सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी तू सिद्धिदेवता आहेस. तू शरण आलेल्यांना अभय देतेस. हे गौरी, त्रिनेत्री (नारायणी) तुला आमचे त्रिवार वंदन ! ॥१०॥
या सृष्टीचे पालन आणि अखेर करण्याची शक्‍ती असणार्‍या देवी नारायणी, तू आदिम अतिप्राचीन आहेस. तुझ्या आशीर्वादानेच आम्ही गुणसंपन्न होतो. तू सकलगुणांची निधी (संपत्ती) आहेस. आम्ही तुला शरण आहोत, हे नारायणी तुला आमचे वंदन. ॥११॥
तुझ्या पायाशी नम्रतेने शरण आलेल्यांना तू सर्वदा संकटातून तारलेस. त्यांच्या रक्षणातच तुझे चित्त सदैव निमग्न आहे. हे सर्व पीडाहारिणी आई नारायणी, तुला आमचे त्रिवार वंदन ! ॥१२॥
तू ब्रह्माणीरूपाने हंसांनी चालविलेल्या विमानातून सर्व जीवसृष्टीवर मंगल व वत्सलतेने पाहतेस, व दर्भाने पवित्र जलसिंचन करतेस. हे नारायणी, तुला आमचे वारंवार नमस्कार असोत. ॥१३॥
श्रीशंकराचे वाहन-महानंदीवर बसून, हाती त्रिशूळ, मस्तकी चंद्ररेखा आणि नाग धारण करून, तू माहेश्‍वरी स्वरूपाने आमचे कल्याण करतेस. हे नारायणी तुला आम्ही नम्रतेने नमस्कार करतो. ॥१४॥
मोर आणि कोंबड्यांनी (कुक्कुट) नेहमी घेरलेली तू आहेस. तशीच तुझ्याजवळ महाशक्‍ती असूनही कौमारीरूपाने तू निष्पाप मनाने जीवांना अभय देतेस. हे देवी, नारायणी; आमचे तुला पुन:पुन्हा नमस्कार ! ॥१५॥
तुझ्या हाती शंख, चक्र, गदा व तलवार इत्यादी आयुधे आमच्या संकटनाशनासाठीच तू धारण केली आहेस. त्यामुळे हे वैष्णवी, नारायणी ! आम्ही तुला शरण येऊन विनयाने वंदन करीत आहोत. ॥१६॥
हातात एक महाचक्र आणि दातांच्या दोन सुळ्यांवर पृथ्वीचा डोल सांभाळला आहे, अशा वाराहस्वरूपिणी संकटविमोचिनी नारायणी तुला आमचे शतश: वंदन ! ॥१७॥
अतिसंतप्त अशा नरसिंहाचे रूप धारण केलेल्या देवी नृसिंहे, तू दैत्यांचा समूळ नाश करून या जगातील जीवांना जीवदान दिलेस, रक्षण केलेस व वरदायिनी झालीस ! हे नारायणी, आमच्या संकटकाळी तू पाठीशी उभी रहावीस अशी प्रार्थना करून तुला वंदन करतो. ॥१८॥
मस्तकावर रत्‍नजडित तेजोमय किरीट, हातात महावज्र जे कधी निष्फळ होत नाही, सहस्त्र डोळ्यांनी भक्तांवर प्रेमळ नजर व शत्रूंवर धाक ठेवणार्‍या वृत्रासुराचा वध करणार्‍या ऎंद्री नारायणी देवी, तुला आमचे नम्र वंदन ! ॥१९॥
तू शिवदूतींची अनेक रूपे स्वत:पासून निर्मून महापराक्रमी दैत्यांचा व त्यांच्या सेनेचा नाश केलास. भयंकर रूप आणि घोर विकट गर्जना करणार्‍या कालीदेवी तू नारायणीच आहेस. तू आम्हाला संकटमुक्त केलेस, तुला वंदन ! ॥२०॥
अत्यंत विस्तृत मुखे आणि विक्राळ दाढा असणार्‍या देवी, काली ! तुझ्या गळ्यात रुंडमाळा व त्यातून लोंबणारे वाळलेले मांस, हे तुझ्या अघोररूपाचे दर्शन. त्या रूपाने चामुंडा बनून तू चण्ड-मुण्ड मारलेस. हे नारायणी, तुला आमचे वंदन ! ॥२१॥
तू स्वत: ऎंद्री (लक्ष्मीस्वरूप), विनयावती, प्रत्यक्ष विद्यास्वरूप सरस्वती देवी, श्रद्धा पालनकर्ती वैष्णवी, महारात्री तसेच अविद्यास्वरूपिणीही आहेस. कारण तमानंतर प्रकाशाचे चक्र तुझ्या हाती आहे. तुला आमचे या विविध स्वरूपासाठी नम्र वंदन. ॥२२॥
तू विचारशक्‍ती, तर्कशक्‍ती सरस्वती (साहित्य) वरदायिनी (श्रेष्ठ) आहेस ! तुझा वर्ण राखाडी रंगासारखा आहे. युद्धात तू तामसी  (काली) आहेस. क्षमेसाठी संयमी आहेस. तसेच सर्वांची आदिमाया म्हणून ईशाही आहेस. या तुझ्या संकलित व विभक्त स्वरूपांना हे नारायणी, आमचे वंदन ! ॥२३॥
हे देवी, तू सर्वस्वरूपी आहेस, तशीच सर्वांची ईश्वरी सर्वेश्वरी आहेस । तुझ्या ठायी त्रिखंडातील सर्व शक्‍ती एकवटलेली आहे. तुझ्या पराक्रमाने आणि आशीर्वादाने आम्ही भयमुक्त होऊ, असा विश्वास आहे. हे नारायणी, तुला आमचे वारंवार वंदन ! ॥२४॥
आणि आम्ही तुझी, या जगाची माता-महामाया म्हणून ज्या ज्या वेळी प्रार्थना करतो, त्या वेळी तुझी सौम्य वदनाकृती, प्रेमळ नजर, वत्सल त्रिनेत्र या आनंद व प्रसन्नमय दर्शनानेच आम्ही भयमुक्त होतो. आमचा सर्व भार तुझ्यावर सोपवतो. हे नारायणी, तुला आमचे वंदन ! ॥२५॥
हे भद्रकाली तीन ज्वाला (टोके) असलेला तुझा भयानक त्रिशूळ ज्या वेळी विक्राळपणे भयानक आणि सर्व राक्षसांच्या नाशाला तू उद्युक्त करतेस, त्या वेळी वाटणारी भीती नष्ट कर आणि तू तो शत्रू-संहारासाठीच वापर, या प्रार्थनेने तुला आमचे वंदन ! ॥२६॥
आपल्या निनादाने तुझ्या हातातील घंटा जेव्हा प्रचंड रणनाद करते त्या वेळी शत्रूंचे तेजोहरण होते. तो घंटारव आमची पापापासून मुक्तता करो. हे देवी ! त्या घंटारवाने तुझ्यात आणि आमच्यात मातापुत्र स्नेह प्राप्त होऊन तू आम्हाला अभय दे ! ॥२७॥
हे चण्डिके, तुझ्या हातांतील सर्व आयुधे राक्षसांच्या रक्‍त, मांस व चरबींनी माखलेली आहेत. शत्रूच्या रक्ताने न्हालेली शस्त्रे नेहमी विजयाचीच असतात. त्यामुळे हे देवी, आमच्या उद्धारासाठीच आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक आहोत. ॥२८॥
हे गौरी, तू आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला रोगमुक्त कर. आमच्यावर रागावून जाऊन आमचा कार्य-विनाश होणार नाही यासाठी आम्ही तुला शरण आहोत. आमचे मंगल कर. तुझ्या भक्तांना तू विपत्तीत कधीही लोटीत नाहीस आणि तुझा भक्त झाल्याने आम्हीही इतरांना कधीही आपत्तीत-विपत्तीत ढकलणार नाही. ॥२९॥
हे अंम्बिके, दुष्ट राक्षसांचे निर्दालन तुझ्याशिवाय इतर कोणी केले असते? सगुण आणि सत्त्वशीलांच्या संकटकाळी तू महापराक्रमी दैत्यांशी अनेक रूप-गुण शौर्य-धैर्यादी कृत्यांनी युद्ध केलेस. तुझ्या विविध रूपांनी तू लढून न्यायाची बूज राखलीस. हे कृत्य तुझ्याशिवाय इतर कोणीही कसे केले असते ? ॥३०॥
विद्येत, ज्ञानात, सुविचारांत, वादविवादांत व संभाषणात नेहमी तुझेच सत्त्वशील अधिष्ठान असते. तू जगाचे आदिम सनातन ज्ञान आहेस. आमच्या ठायी असलेली व्यर्थ, माया, ममता, ज्ञानांधकार या त्रयींमध्येच आम्ही जखडलेले आहोत. या जोखडातून ममत्वतेने व वात्सल्याने तुझ्याशिवाय आम्हास दुसरे कोण मुक्त करणार ? ॥३१॥
भयानक विषारी नागासारखे शत्रू, मानवी-अमानवी लूटमार करणारे चोर, डाकू, जमिनीवर वणवा, समुद्रमार्गात वडवानल या सर्व मार्गातील अरिष्टांपासून तू आमचे रक्षण करतेस. रक्षण, लालन-पालन वा मुक्ती हे तुझे ब्रीद आहे आणि या विश्वात तुझ्याशिवाय अन्य कॊणीही तारक नाही. ॥३२॥
तू विश्वाचे पालन करणारी विश्वेश्वरी आहेस. विश्वरूप आहेस. विश्वाला धारण करणारी, संतुलन ठेवणारी विश्वात्मिका आहेस. देवादिकांनीही संकटकाळी तुझी प्रार्थना केली, म्हणून विश्ववंद्य आहेस. म्हणून आम्ही तुझे भक्त तुझ्या या विश्वरूपला अतिनम्रतेने शरण आलेलो आहोत. ॥३३॥
ज्याप्रमाणे हे देवी, तू असुर-युद्धात देवांना मदत करून संकटातून भयमुक्त केलेस, तसेच नेहमी भक्तांना अभय दे ! या जगातील सर्व पापांचा व पापाचारींचा नाश कर ! मोठमोठ्या उपसर्गांचा-पीडांचा तू नाश करून आमचे जीवन सुखमय कर ! ॥३४॥
हे देवी, आम्ही तुला अतिलीनतेने शरण आलेले आहोत आमच्यावर कृपा असू दे. हे वरदायिनी, जगदम्बिके ! या त्रैलोक्यात तुला वंद्य मानतात. तू सर्व चराचरांना. जीवांना वरदायिनी होऊन या विश्वाचे मंगल कर ! ॥३५॥
देवी म्हणाली, "हे भक्तांनो, देवांनो ! मी वर देण्यास उत्सुक आहे. तुमच्या मनात या जगाच्या कल्याणासाठी जी इच्छा असेल ती सांगा ! या विश्वकल्याणासाठी मी तुम्हाला अवश्य वर देईन." ॥३७॥
देव म्हणाले, "हे त्रैलोक्याच्या अखिलेश्वरी ! या तिन्ही लोकांतील बाधा-पीडा-संकटॆ नाहीशी कर आणी ज्या ज्या वेळी शत्रूची संकटे, आक्रमणे आमच्या भूमीवर होतील त्या त्या वेळी तू त्यांचा परिहार कर." ॥३८।३९॥
देवी म्हणाली, "वैवस्वत मन्वंतरात अठ्‍ठाविसाव्या युगारंभी शुंभ-निशुंभ नावाचे दोन दैत्यराज उन्मत्तपणाने अन्यायी झाले व त्यांनी अनाचार मांडला. ॥४०।४१॥
त्यावेळी मी नंद गवळ्याच्या घरी त्याची पत्‍नी यशोदा हिच्या पोटी जन्म घेऊन विंध्य पर्वताच्या स्थानी या दोन राक्षसांचा नाश करीन. ॥४२॥
पुन्हा अत्यंत विकट आणि घोर रूपाने मी या पृथ्वीवर अवतार घेऊन विप्रचित्ती नावाच्या राक्षसाचा वध करीन. विप्रचित्ती कुळाचे राक्षस त्यावेळी पृथ्वीवर अनाचार करून माझ्या हातूनच नाश पावतील. ॥४३॥
विप्रचित्ती महादैत्य त्या वेळी रणांगणात माझ्या तावडीत सापडून माझ्या तीक्ष्ण व रक्‍ताने माखलेल्या अजस्र व विक्राळ  दाढांखाली रगडले जातील त्या वेळी रक्‍ताने माखलेले माझे दात डाळिंब-फळासारखे लाल होतील. ॥४४॥
या राक्षसांना खाल्ल्यामुळे देव-देवता, स्वर्गातील देव, ऋषीमुनी, विश्‍वातील मर्त्य मानव माझी पूजा-अर्चा करताना नेहमी रक्तदंतिका या नावाने भक्‍ती करून मला प्रसन्न करतील. ॥४५॥
त्यानंतर शेकडो वर्षे या भूतलावर दुष्काळ पडेल व जीवमात्रांना पाण्याशिवाय जगणे असह्य होईल. त्यावेळी ऋषी, मुनी, तपस्वी, मानव-भक्त माझी स्तुती प्रार्थना करतील. त्यावेळी अशरीरी (अयोनिजा) रूपने मी प्रकट होईन. ॥४६॥
माझे स्तवन करणार्‍या ऋषी-मुनी आदि भक्‍तांकडे मी प्रेमभावनेने, वात्सल्याने पाहीन. त्या वेळी दशदिशांना अभय देण्यासाठी माझी कृपादृष्टी शंभर डोळ्यांनी सर्व विश्‍वात आशीर्वादरूपाने जाईल व लोक मला शताक्षी म्हणतील. ॥४७॥
मी माझ्या स्वत:च्या शरीरापासून हे भक्तांनो, जी वनस्पती (शाक) निर्माण करीन ती वनस्पती या विश्वातील जीवजंतूंना या दुष्काळात जगवील, व ती संजीवनी वनस्पती प्राणदायिनी होईल. ॥४८॥
मी उत्पन्न केलेल्या संजीवनी शाक वनस्पतीमुळे जीवरक्षा झाल्याने सर्वजण मला शाकंभरी या नावाने ओळखतील व माझी भक्ती करतील. त्या वेळी मी दुर्गम नावाच्या महादैत्याचा पराभव करून वध करीन. ॥४९॥
दुर्गमाला मारल्याने भक्त मला दुर्गादेवी हे नाव देतील. त्यानंतर मी महाप्रचंड भीमकायस्वरूप घेऊन पुन्हा हिमालयात प्रचंड रूपाने अवतीर्ण होईन व तेथील दुष्टांना मारीन. ॥५०॥
माझ्या स्तुतिस्त्रोतांत लीन असलेल्या सात्त्विक ऋषीमुनींना त्यांच्या सदाचरणात, विद्याभ्यासात, होमहवनात जे राक्षस त्रास देतील, त्यांना मारून मी भक्त-रक्षण करीन. ॥५१॥
त्या वेळी भीमकायस्वरूपाने मी भक्त-रक्षण केले म्हणून त्रैलोक्यात मला 'भीमा' या नावाने ओळखतील, आणि ज्या वेळी अरुण नावाचा राक्षस त्रैलोक्यातील माझ्या भक्तांच्या सत्त्वशील जीवनात अडथळे आणून त्यांना त्रास देईल. ॥५२॥
त्या वेळी त्या अरुण दैत्याचे सहा पायांच्या भृंग (भुंगा) रूपाने पारिपत्य करून भक्तपीडा हरण करीन. व त्या महादैत्याच्या त्रासातून त्रैलोक्यातील सर्व जीवांची मुक्तता करीन. ॥५३॥
अशाप्रकारे अरुण राक्षसाच्या त्रासातून निर्भय केलेले भक्त मला भ्रामरी या नावाने ओळखतील; आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या काळी दुष्प्रवृत्ती, दुराचार आणि संकटे दैत्य भक्तांसमोर उभी करतील तेथे तेथे त्यांचा नाश करून मी भक्तरक्षण करीन. ॥५४॥
ज्या ज्या वेळी माझ्या भक्तांवर संकटे येतील त्या त्या वेळी मी संकट-विमोचनासाठी नवीन अवतार घेऊन भक्तांचे रक्षण करीन, हा माझा निश्च्य आहे व भक्तांना शब्द दिला आहे. ॐ॥५५॥
असा हा श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरकाळी घडलेला देवीमाहात्म्य कथेतील देवी-स्तुती नावाचा अकरावा अध्याय आहे.
- श्री दुर्गा शाकंभरी भ्रामरी विजयते -

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP