श्रीदुर्गासप्तशती - अष्टमोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - अष्टमोऽध्याय:


अष्टमोऽध्याय:
ध्यानम्
ॐ अरुणां करुणातरङ्‌गिताक्षीं धृतपाशाङ्‌कुशबाणचापहस्ताम् ।
अणिमादिभिरावृतां मयूखैरहमित्येव विभावये भवानीम् ॥
ॐ ऋषिरुवाच ॥१॥
चण्डे च निहते दैत्ये मुण्डे च विनिपातिते ।
बहुलेषु च सैन्येषु क्षयितेष्वसुरेश्वर: ॥२॥
तत: कोपपराधीनचेता: शुम्भ: प्रतापवान् ।
उद्योगं सर्वसैन्यानां दैत्यानामादिदेश ह ॥३॥
अद्य सर्वबलैर्दैत्या: षडशीतिरुदायुधा: ।
कम्बूनां चतुरशीतिर्निर्यान्तु स्वबलैर्वृता: ॥४॥
कोटिवीर्याणि पंचाशद्सुराणां कुलानि वै ।
शतं कुलानि धौम्राणां निर्गच्छन्तु ममाज्ञया ॥५॥
कालका दौर्ह्रदा मौर्या: कालकेयास्तथासुरा: ।
युद्धाय सज्जा निर्यान्तु आज्ञया त्वरिता मम ॥६॥
इत्याज्ञाप्यासुरपति: शुम्भो भैरवशासन: ।
निर्जगाम महासैन्यसहस्रैर्बहुभिर्वृत: ॥७॥
आयान्तं चण्डिका दृष्ट्‌वा तत्सैन्यमतिभीषणम् ।
ज्यास्वनै: पूरयामास धरणीगगनान्तरम् ॥८॥
तत: सिंहो महानादमतीव कृतवान् नृप ।
घण्टास्वनेन तन्नादमम्बिका चोपबृंहयत् ॥९॥
धनुर्ज्यासिंहघण्टानां नादापूरितदिङ्‌मुखा ।
निनादैर्भीषणै: काली जिग्ये विस्तारितानना ॥१०॥
तं निनादमुपश्रुत्य दैत्यसैन्यैश्‍चतुर्दिशम् ।
देवी सिंहस्तथा काली सरोषै: परिवारिता: ॥११॥
एतस्मिन्नन्तरे भूप विनाशाय सुरद्विषाम् ।
भवायामरसिंहानामतिवीर्यबलान्विता: ॥१२॥
ब्रह्मेशगुहविष्णूनां तथेन्द्रस्य च शक्‍तय: ।
शरीरेभ्यो विनिष्क्रम्य तद्रूपैश्‍चण्डिकां ययु: ॥१३॥
यस्य देवस्य यद्रूपं यथाभूषणवाहनम् ।
तद्वदेव हि तच्छक्तिरसुरान् योद्‌धुमाययौ ॥१४॥
हंसयुक्तविमानाग्रे साक्षसूत्रकमण्डलु: ।
आयाता ब्रह्मण: शक्तिर्ब्रह्माणी साभिधीयते ॥१५॥
माहेश्‍वरी वृषारूढा त्रिशुलवरधारिणी ।
महाहिवलया प्राप्ता चन्द्ररेखाविभूषणा ॥१६॥
कौमारी शक्तिहस्ता च मयूरवरवाहना ।
योद्धुमभ्याययौ दैत्यानम्बिका गुहरूपिणी ॥१७॥
तथैव वैष्णवी शक्तिर्गरुडोपरि संस्थिता ।
शङ्‌खचक्रगदाशाड्‌र्गखड्‌गहस्ताभ्युपाययौ ॥१८॥
यज्ञवाराहमतुलं रूपं या बिभ्रतो हरे: ।
शक्ति: साप्याययौ तत्र वाराहीं बिभ्रती तनुम् ॥१९॥
नारसिंही नृसिंहस्य बिभ्रती सदृशं वपु: ।
प्राप्ता तत्र सटाक्षेपक्षिप्तनक्षत्रसंहति:॥२०॥
वज्रहस्ता तथैवैन्द्री गजराजोपरि स्थिता ।
प्राप्ता सहस्रनयना यथा शक्रस्तथैव सा ॥२१॥
तत: परिवृतस्ताभिरीशानो देवशक्तिभि: ।
हन्यन्तामसुरा: शीघ्रं मम प्रीत्याऽऽह चण्डिकाम् ॥२२॥
ततो देवीशरीरातु विनिष्क्रान्तातिभीषणा ।
चण्डिकाशक्तिरत्युग्रा शिवाशतनिनादिनी ॥२३॥
सा चाह धूम्रजटिलमीशानमपराजिता ।
दूत त्वं गच्छ भगवन् पार्श्वं शुम्भनिशुम्भयो: ॥२४॥
ब्रुहि शुम्भं निशुम्भं च दानवावतिगर्वितौ ।
ये चान्ये दानवास्तत्र युद्धाय समुपस्थिता: ॥२५॥
त्रैलोक्यमिन्द्रो लभतां देव: सन्तु हविर्भुज: ।
यूयं प्रयात पातालं यदि जीवितुमिच्छथ ॥२६॥
बलावलेपादथ चेद्‌भवन्तो युद्धकाङ्‌क्षिणा: ।
तदागच्छतु तृप्यन्तु मच्छिवा: पिशितेन व: ॥२७॥
यतो नियुक्तो दौत्येन तया देव्या शिव: स्वयम् ।
शिवदूतीति लोकेऽस्मिस्तत: सा ख्यातिमागता ॥२८॥
तेऽपि श्रुत्वा वचो देव्या: शर्वाख्यातं महासुरा: ।
अमर्षापूरिता जग्मुर्यत्र कात्यायनी स्थिता ॥२९॥
तत: प्रथममेवाग्रे शरशक्त्यृष्टिवृष्टिभि: ।
ववर्षुरुद्धतामर्षास्तां देवीममरारय: ॥३०॥
सा च तान् प्रहितान् बाणाञ्छूलशक्तिपरश्वधान् ।
चिच्छेद लीलयाऽऽध्मातधनुर्मुक्तैर्महेषुभि: ॥३१॥
तस्याग्रतस्तथा काली शूलपातविदारितान् ।
खट्‌वाङ्‌गपोथितांश्चारीन् कुर्वती व्यचरत्तदा ॥३२॥
कमण्डलुजलाक्षेपहतवीर्यान् हतौजस: ।
ब्रह्माणी चाकरोच्छत्रून् येन येन स्म धावति ॥३३॥
माहेश्‍वरी त्रिशूलेन तथा चक्रेण वैष्णवी ।
दैत्याज्जघान कौमारी तथा शक्त्यातिकोपना ॥३४॥
ऎन्द्रीकुलिशपातेन शतशो दैत्यदानवा: ।
पेतुर्विदारिता: पृथ्व्यां रुधिरौधप्रवर्षिण: ॥३५॥
तुण्डप्रहारविध्वस्ता दंष्ट्राग्रक्षतवक्षस: ।
वाराहमूर्त्या न्यपतंश्चक्रेण च विदारिता: ॥३६॥
नखैर्विदारितांश्चान्यान् भक्षयन्ती महासुरान् ।
नारसिंही चचाराजौ नादापूर्णदिगम्बरा ॥३७॥
चण्डाट्टहासैरसुरा: शिवदूत्यभिदूषिता: ।
पेतु: पृथिव्यां पतितांस्तांश्‍चखादाथ सा तदा ॥३८॥
इति मातृगणं क्रुद्धं मर्दयन्तं महासुरान् ।
दृष्ट्‌वाभ्युपायैर्विविधैर्नेशुर्देवारिसैनिका: ॥३९॥
पलयनपरान् दृष्ट्‌वा दैत्यान् मातृगणार्दितान् ।
योद्धुमभ्याययौ क्रुद्धो रक्तबीजो महासुर: ॥४०॥
रक्‍तबिन्दुर्यदा भूमौ पतत्यस्य शरीरत: ।
समुत्पतति मेदिन्यां तत्प्रमाणस्तदासुर: ॥४१॥
युयुधे स गदापाणिरिन्द्रशक्त्या महासुर: ।
ततश्‍चैन्द्री स्ववज्रेण रक्‍तबीजमताडयत् ॥४२॥
कुलिशेनाहतस्याशु बहु सुस्राव शेणितम् ।
समुत्तस्थुस्ततो योधास्तद्रूपास्तत्पराक्रमा: ॥४३॥
यावन्त: पतितास्तस्य शरीराद्रक्‍तबिन्दव: ।
तावन्त: पुरुषा जातास्तद्वीर्यबलविक्रमा: ॥४४॥
ते चापि युयुधुस्तत्र पुरुषा रक्तसम्भवा: ।
समं मातृभिरत्युग्रशस्त्रपातातिभीषणम् ॥४५॥
पुनश्‍च वज्रपातेन क्षतमस्य शिरो यदा ।
ववाह रक्तं पुरुषास्ततो जाता: सहस्रश: ॥४६॥
वैष्णवी समरे चैनं चक्रेणाभिजघान ह ।
गदया ताडयामास ऎन्द्री तमसुरेश्‍वरम् ॥४७॥
वैष्णवीचक्रभिन्नस्य रुधिरस्रावसम्भवै: ।
सहस्रशो जगद्‌व्याप्तं तत्प्रमाणैर्महासुरै: ॥४८॥
शक्त्या जघान कौमारी वाराही च तथासिना ।
माहेश्‍वरी त्रिशूलेन रक्‍तबीजं महासुरम् ॥४९॥
स चापि गदया दैत्य: सर्वा एवाहनत् पृथक् ।
मातृ: कोपसमाविष्टो रक्तबीजो महासुर: ॥५०॥
तस्याहतस्य बहुधा शक्तिशूलादिभिर्भुवि ।
पपात यो वै रक्‍तौघस्तेनासञ्छतशोऽसुरा: ॥५१॥
तैश्‍चासुरासृक्सम्भूतैरसुरै: सकलं जगत् ।
व्याप्तमासीत्ततो देवा भयमाजग्मुरुत्तमम् ॥५२॥
तान् विषण्णान् सुरान् दृष्ट्‌वा चण्डिका प्राह सत्वरा ।
उवाच कालीं चामुण्डे विस्तीर्णं वदनं कुरु ॥५३॥
मच्छस्त्रपातसम्भूतान् रक्तबिन्दून्महासुरान् ।
रक्‍तबिन्दो: प्रतीच्छ त्वं वक्त्रेणानेन वेगिना ॥५४॥
भक्षयन्ती चर रणे तदुत्पन्नान्महासुरान् ।
एवमेष क्षयं दैत्य: क्षीणरक्तो गमिष्यति ॥५५॥
भक्ष्यमाणास्त्वया चोग्रा न चोत्पत्स्यन्ति चापरे ।
इत्युक्त्वा तां ततो देवी शूलेनाभिजघान तम् ॥५६॥
मुखेन काली जगृहे रक्‍तबीजस्य शोणितम् ।
ततोऽसावाजघानाथ गदया तत्र चण्डिकाम् ॥५७॥
न चास्या वेदनां चक्रे गदापातोऽल्पिकामपि ।
तस्याहतस्य देहात्तु बहु सुस्राव शोणितम् ॥५८॥
यतस्ततस्तद्वक्त्रेण चामुण्डा सम्प्रतीच्छति ।
मुखे समुद्गता येऽस्या रक्‍तपातान्महासुरा: ॥५९॥
तांश्‍चखादाथ चामुण्डा पपौ तस्य च शोणितम् ।
देवी शूलेन वज्रेण बाणैरसिभिऋष्टिभि: ॥६०॥
जघान रक्‍तबीजं तं चामुण्डापीतशोणितम् ।
स पपात महीपृष्ठे शस्‍त्रसङ्घसमाहत: ॥६१॥
नीरक्तश्र्च महीपाल रक्तबीजो महासुर: ।
ततस्ते हर्षमतुलमवापुस्रिदशा नृप ॥६२॥
तेषां मातृगणो जातो ननर्तासृङ्‌मदोद्धत: ॥ॐ॥६३॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्म्ये
रक्तबीजवधो नामाष्टमोऽध्याय: ॥८॥
उवाच१, अर्धश्‍लोक: १,श्लोका: ६१,
एवम् ६३, एवमादित: ५०२ ॥


आपल्या अरुणिम (फिकट लाल) आणि सिद्धमयी प्रभेने तेजोमय आभा आपल्याभोवती पसरविणार्‍या भवानी देवीला माझे त्रिवार वंदन. तिचे आरक्त अनुरागी आशीर्वाद देणारे डोळे, त्यांतून झरणारी वात्सल्य मायाकिरणे (मयूख) आणि हातीचे धनुष्यबाण, चाप इ. आयुधांनी सजलेली देवी शिवा आमचे निरंतर मंगल करो.
ऋषी म्हणाले, "याप्रमाणे चण्ड आणि मुण्ड राक्षसांचा देवीने रणात पराभव करून त्यांचा वध केल्याचे समजताच दैत्यांचा प्रतापी राजा शुंभ खूप रागावला आणि त्याने आपल्या प्रचंड सेनेला देवीशी युद्धाला निघण्याची आज्ञा केली. ॥१।२॥
महाप्रतापी शुंभ राक्षस राजा क्रोधाच्या आहारी जाऊन त्याने सर्व सैन्य एकत्र केले आणि देवीशी घोर संग्राम करण्याचे ठरवून मोठमोठे टणत्कार काढले. ज्यांचे पडसाद या पृथ्वीवरच नव्हे, तर आकाशातही पुन:पुन्हा निनादत राहिले. ॥३॥
देवीच्या सिंहानेही रागाने मोठमोठ्या गर्जना केल्या. स्वत: अंबिकाही घंटानादाने अविरतपणे युद्धभूमीवर युद्धाचे वातावरण तापवीत होती. ॥९॥
धनुष्याची प्रत्यंचा, घंटानाद, सिंहगर्जनानाद या सर्व आवाजांचा कल्लोळ ऎकून महाप्रतापी काली जागृत झाली व तिने आपली विक्राळ तोंडे (राक्षसांना खाण्यासाठी) उघडली. ॥१०॥
ह्या सर्व आवाजांचा गोंधळ, रणभेरी, शंखनाद, आरोळ्या ऎकून दैत्य-सैन्याने देवीच्या सिंहाला व महाकाली देवीला सर्व बाजूंनी घेरून कोंडले. ॥११॥
हे राजा ! (ऋषी सुरथ राजाला कथा सांगताना म्हणाले) युद्धाला तोंडे फुटण्याआधीच ब्रह्मा, विष्णू, शिव यांच्या शक्‍तीमधून शक्‍ती साकार झाल्या व त्यांनी दैत्यसैन्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली. ॥१२॥
ब्रह्मा, विष्णु, महेश आणि देवाधिराज इंद्र या शक्‍ती आपापली निराकारता सोडून शरीर धारण करून महामाया चंडिकेच्या मदतीसाठी युद्धक्षेत्रात उतरल्या. ॥१३॥
ज्या ज्या देवाचे जे जे रूप त्याचे वाहन, त्याचे साज, अलंकार लेवून त्या त्या देवतेच्या शक्‍ती मोठ्या आवेशाने असुरांशी दैत्यशत्रूंशी लढू लागल्या. ॥१४॥
प्रथमत: हंसांनी वाहून नेलेल्या विमानात अक्षस्रूत्र आणि कमंडलू घेऊन ब्रह्मा शक्‍ती साकार झाली व तिने युद्धासाठी आयुधे सज्ज केली. ॥१५॥
नंदीवर बसलेली देवी माहेश्वरी आपल्या हाती तेजस्वी त्रिशूळ घेऊन हाती महानागाचे कंकण बांधून आपले आयुध, अलंकार व तेजस्वी चंद्रकलेचा किरीट धारण करून प्रकटली. ॥१६॥
मोरावर बसून हाती शक्‍ती घेऊन कार्तिकेयरूपा जगदम्बा धीवरकन्येच्या (मत्स्यकन्येच्या) स्वरूपात युद्ध-क्षेत्रावर युद्धास आली. ॥१७॥
गरुडावर बसून येणारी शक्‍ती वैष्णवी स्वरूपात हाती शंख, चक्र, गदा, तलवार, ढाल इत्याद आयुधे सर्व हातांत घेऊन रणांगणात उतरली. ॥१८॥
अतुलनीय आणि महाप्रबल अशी श्री विष्णूची शक्ती वाराहस्वरूप धारण करून युद्धासाठी रणात प्रविष्ट झाली. ॥१९॥
नारसिंही शक्ती नृसिंहाप्रमाणे रौद्र रूप व विक्राळ शरीर धारण करून आली. तिच्या मानेच्या आयाळाच्या झटक्यांनी आकाशातील तारे भयाने गळून पडावेत असे तिचे भयानक स्वरूप होते. ॥२०॥
ऎंद्री देवी मात्र हातात धनुष्यबाण घेऊन एका महान्हत्तीवर बसून आली. ही इन्द्रशक्ती असल्याने इंद्रासारखेच हजार डोळे तिच्या रूपाला होते व ती दशादिशांतील सूक्ष्म हालचालीही-आपल्या सहस्त्र नेत्रांनी टिपून घेई. ॥२१॥
त्यानंतर देवशक्तीबरोबर असलेल्या भगवान शंकरांनी देवी चंडिकेला सांगितले, "देवी मी आपल्या शौर्यावर प्रसन्न आहे. आम्हाला तुझा गर्व वाटतो. आमच्या कल्याणासाठी तू या असुरांना युद्धातनष्ट कर. ॥२२॥
त्यावेळी तत्क्षणी देवी-शरीरातून एक महाभीषण, अतिउग्र महाशक्तीशाली चण्डिका अवतीर्ण झाली व मोठमोठ्या आरोळ्यांनी, गर्जनांनी तिने रणभूमी थरथरून सोडली. त्या आवाजाने भयानक आवाजांनी कलकलाट करणारी हजारो गिधाडेही भांबावून भ्याली. ॥२३॥
त्यानंतर अपराजिता देवीने धूसर जटा झालेल्या भगवान्शंकरांना नम्रतेने सांगितले की, भगवान् आपण माझे दूत म्हणून शुंभ व निशुंभाकडे जावे व त्यांना माझा निरोप द्यावा अशी माझी आपणास प्रार्थना आहे. ॥२४॥
त्या अत्यंत गर्विष्ठ व मदांधकारी उन्मत्त दोन्ही राक्षसांना शुंभ-निशुंभांना सांगावे. त्याच बरोबर त्या असुरांच्या जोडीने लढायला आलेल्या सर्व दैत्यगणांना हा माझा निरोप सांगावा. ॥२५॥
त्यांना सांगावे, "हे दैत्यांनो, तुम्हाला यापुढे आयुष्य कंठण्याची इच्छा असेल तर, इंद्रादी सर्व देवदेवतांना तुम्ही त्यांचेपासून हिरावून घेतलेले अधिकार आणि यज्ञभागाचे अधिकार निमूटपणे परत करावे व सत्वर पाताळलोकी निघून जावे. ॥२६॥
आपली ताकद आणि शक्ती यांच्या खोट्या घमेंडीवर व गर्वावर अनाठायी विश्वास ठेवून तुम्ही माझ्याशी युद्ध करू म्हणाल तर माझ्या या शिवदूती तुम्हा सर्वांचे रक्त आणि मांस खाऊन तृप्त होतील. मग युद्ध आणि विजय यांचा विचार बाजूला राहील. ॥२७॥
शिवाशक्ती देवीने स्वयं भगवान्शंकरजींना आपला दूत म्हणून शत्रूसेनेकडे पाठविल्याने ती त्यानंतर शिवदूती या नावाने तिन्ही लोकांत विख्यात झाली. ॥२८॥
भगवती शिवादेवीचे दूत म्हणून स्वयं भगवान्चंद्रमौलि शुंभ-निशुंभाकडे गेले व त्यांनी देवीचा निरोप असुरांना सांगितला. हा निरोप ऎकताच राक्षस भयंकर खवळले, पिसाळले व दैत्यांनी देवी कात्यायनीसमोर येऊन झुंझीस सुरुवात केली. ॥२९॥
त्यापाठोपाठ अनेक महादैत्यांनी चिडीला जाऊन देवीवर प्रथम लक्षावधी बाणांची, शक्तींची, ऋष्टींची व शस्त्रांची वृष्टी (वर्षाव) केला व अशा प्रकारे असुरांकडूनच या युद्धाला सुरुवात झाली. ॥३०॥
सभोवती दैत्यांनी सोडलेल्या बाणांची भिंत, अनेक अस्त्रांचे अनेक दैत्यांचे प्रहार, शस्त्रांनी होणारे घात देवीने अगदी सहजपणे परतवून लावले, अस्त्रे, धनुष्य मोडून टाकून दैत्यसैन्य हतबल केले. ॥३१॥
त्यानंतर महाकाली देवी हातात धारदार त्रिशूळ घेऊन पुढे आली. आपल्या हातातील शूळाने व दांडक्याने सपासप वार करीत रणभूमीत दिसेल त्याचा नाश करू लागली. कित्येक वीरांचे कंबरडेच मोडले गेले. ॥३२॥
ब्रह्माणी देवी मात्र शत्रुसैन्यात ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणीं आपल्या हातातील कमंडलूतील पवित्र जल ती शत्रूंवर शिंपडून, त्यांचे बल आणि तेज काढून त्यांना निष्प्रभ करू लागली. ॥३३॥
माहेश्वरीने त्रिशूळाने, वैष्णवी देवीने चक्राने व कुमार कार्तिकेयाची शक्ती वापरून कौमारीने अत्यंत रागाने व ईर्षेने दैत्यसैन्याचा संहार करायला सुरुवात केली. ॥३४॥
ऎंद्री देवीच्या वज्रप्रहारांनी शेकडो दैत्य-सैनिक धारातीर्थी पडून रक्ताच्या पाटांतून लोळू लागले. कित्येक रक्त-मांस यांच्या चिखलातच मरून भूमीवर पडले. ॥३५॥
वाराहि देवी तर आश्चर्यकारक धडकांनी शत्रूंचा नाश करीत होती. आपल्या जबड्यांच्या प्रहारांनी ढकलून मुखातील दातांच्या तीक्ष्ण सुळ्यांनी कित्येकांच्या छात्या फाडून, चक्रांनी शत्रूंची मुंडकी उडवून तिने अनेकांचा नि:पात केला. ॥३६॥
नारसिंही देवीने आपल्या तीक्ष्ण नखांनी हजारो दैत्यांची पोटे फाडून त्यांतील आतडी खाऊन टाकण्याचा सपाटा लावला. तिचा संचार त्या वेळी धरतीवर, आकाशात, दशदिशांना, युद्ध-क्षेत्रात लढाईसाठी सहजतेने होई. ॥३७॥
भयानक व प्रचंड विकट हसण्याने शिवदूताने कित्येक शत्रूवीरांना भिववून खाली पाडले. ते खाली धरतीवर पडताच त्यांना खाऊनच टाकण्याचा उपक्रम तिने सुरू ठेवला. ॥३८॥
देवीने आपल्याबरोबर लढण्यासाठी निर्माण केलेल्या मातृकदेवीही पुढे सरसावल्या व त्यांनी अत्यंत रागाने व आवेशयुक्त प्रहारांनी दैत्य-सैन्याचा पाडाव करून धीर खचवला. दैत्य आत पळून माघार घेण्याच्याच तयारीत होते. ॥३९॥
आपले सैन्य देवीच्या व तिच्या सख्यांच्या टोलेबाजीने त्रासून पळायच्या तयारीत आहे हे पाहून रक्तबीज नामक एका दैत्यवीराला- "रक्तबीजाला" राग आला व युद्धाची मोडकळणारी फळी सावरण्यासाठी त्याने झुंजीत उडी घेतली. ॥४०॥
या रक्तबिंदूचे वैशिष्ट्य एक होते की, दैत्यावर प्रहार झाल्यानंतर होणार्‍या जखमांमधून गळणार्‍या प्रत्येक रक्त-बिंदूतून त्याच्याइतकाच बलशाली राक्षस निर्माण होई व तो पृथ्वीवर येताच लढाईला सुरुवात करी. ॥४१॥
रक्तबीजाने इन्द्रशक्तीशी युद्धात खेळ सुरू केला. इन्द्रशक्तीने (ऎंद्री देवीने) आपल्या हातांतील धनुष्याने त्याचेवर बाण सोडले. ॥४२॥
ऎंद्री देवीचे बाण रक्तबीजाला लागले व त्याला जखमा होऊन त्यांतून रक्त गळू लागले. ते रक्त भूमीवर पडताच त्यातील थेंबा-थेंबातून अनेक राक्षसवीर जन्मले व तेही लढून पराक्रम गाजवू लागले. ॥४३॥
जोपर्यंत रक्तबीजाच्या शरीरातून रक्त गळत होते तोपर्यंत अखंडपणे प्रत्येक थेंबागणिक महापराक्रमी राक्षस निर्माण होत व तेही लढत. त्यांच्या शौर्यालाही सीमा नव्हती. ॥४४॥
अशा नवनिर्मित दैत्यांच्या अंगांवरील जखमांमधूनही असे शेकडो लाखो महादैत्य उत्पन्न झाले व आपल्या हातांतील शस्त्रांनी ते देवीच्या मातृकागणाशी शौर्याने लढू लागले. ॥४५॥
असे पुन:पुन्हा प्रहार होत जखमांतून रक्त गळे, त्यातून नवे शत्रू निर्माण होत. तेही लढत, त्यांच्याही अंगावर जखमा होत. रक्त गळे व त्यातूनही नवे दैत्य निर्माण होत, असे चक्र सुरू राहिले. ॥४६॥
वैष्णवी देवीने आपल्या हातातील चक्राने हजारो दैत्य मारले. ऎंद्री देवीने गदेच्या टोल्यांनी मारले तरी सुद्धा शेकडो, हजारो, लाखो राक्षस जन्मत, मरत, पुन्हा गळत्या रक्तातून नवीन जन्म घेत. ॥४७॥
अशा प्रकारे गळणार्‍या रक्तातून रक्तबीज आणि त्यांच्य़ा रक्तबिंदू- पुत्रांच्या वाढत्या व न आवरणार्‍या संख्येने हे विश्व संपूर्णपणे भरून गेले. ॥४८॥
कौमारीने शक्तीने, वाराहीने तलवारीने, माहेश्वरीने त्रिशूळाने महाअसुर रक्तबीजाला मारायचा सामूहिक प्रयत्न केला, तरी असुरसंख्या घटली नाही. ती वाढतच राहिली. ॥४९॥
आपल्या जखमांतून रक्त गळत असताना रक्ताचे पाट वहात असतानाही रक्तबीजाने अत्यंत रागाने देवीच्या मातृगणांवर वेगवेगळे हल्ले केले व त्यांना त्रासून सोडले. ॥५०॥
निरनिराळी शस्त्रे, शक्ती, शूळ, आदींनी झालेले घाव याप्रमाणे रक्तबीजाच्या पथ्यावरच पडत होते. कारण प्रत्येक जखमेतील गळणार्‍या रक्तबिंदूतून निर्माण होणार्‍या त्याच्या सैन्याची संख्या याप्रमाणे वाढतच होती. ॥५१॥
हे रक्तबिंदूतून निर्माण होणार्‍या असुरजन्माचे चक्र इतक्या भयंकर वाढत्या प्रमाणात झाले की, त्या राक्षसांनी सारी पृथ्वी व्यापली व मरणार्‍यांपेक्षा जिवंत होणार्‍या राक्षसांची संख्या वाढली हे पाहून सर्व देवही भयभीत झाले. हे आटोक्यात न येणारे अद्‌भुत चक्र थांबवावे असे देवांना वाटले. ॥५२॥
राक्षसांच्या चिंता करायला लावणार्‍या वाढत्या संख्येने व पराभवाच्या भीतीने देवगण खिन्न झाले हे चंडिकेने ओळखले. हे निसर्गाविरुद्ध चाललेले चक्र थांबले पाहिजे हे तिलाही वाटू लागले. तिने कालीला सांगितले, "देवी आता तुझे भयानक व विस्तृत तोंड उघड. ॥५३॥
मी ज्या ज्या राक्षसवीरावर शस्त्राघात करीन आणि जखमी होणार्‍या त्या शत्रूचे रक्त वाहू लागेल त्यावेळी त्याचे वाहते रक्त जमीनीवर न पडू देता तू त्या शत्रूला वाहत्या रक्तासकटच आपल्या मुखांत अधाशीपणे एकामागून एक, एका वेळी अनेक या प्रमाणे खाऊन टाक. ॥५४॥
असे अनेक शत्रू रक्त पडू न देता तू खाल्लेस तरच हा रक्तबीज त्याच्या रक्तातून उत्पन्न झालेले नवे राक्षस आणि त्यांच्याही रक्ताने निर्माण होणारे दैत्यांची संख्या थोडीफार कमी होईल आणि ते रक्तहीन होऊन नष्ट होतील. ॥५५॥
या सर्वांना तू खाल्लेस म्हणजेच नवीन दैत्य निर्माण होण्यास वाव राहणार नाही. तू असेच सर्वांना खाऊन टाकीत रहा. मी मारीत जाते. आपल्या दोघींच्या सहकार्याशिवाय पर्याय नाही असे म्हणून देवीने रक्तबीजावर वारंवार शस्त्राघात केले. ॥५६॥
आपली भयानक व महाविक्राळ तोंडे पसरून कालीने त्यांच्या वाहत्या रक्ताची धार जमीनीवर पडू न देता आपल्या तोंडात धरली. त्यावर रक्तबीजाने चण्डिकेवर गदाप्रहार सुरू केले. ॥५७॥
रक्तबीजाच्या गदेचे वार देवीने सहज झेलले. तिला कोणतीही वेदना झाली नाही, पण रक्तबीज मात्र प्रचंड वाहत्या रक्तांच्या पाटांनी (जे रक्त आता काली पिऊन टाकी) त्यामुळे प्रचंड रक्त वाहिल्याने रक्तहीन झाला. ॥५८॥
कारण त्याच्या अंगावर होणार्‍या जखमांनी वाहणारे रक्त देवी कालीच्या मुखात पडे. त्यातून राक्षस निर्माण होत त्यांना काली खाऊन टाकी. त्यामुळे नवनिर्मित राक्षसांची संख्या आता घटू लागली. ॥५९॥
कालीने मुखात पडणारे रक्त व नवनिर्मित राक्षस व त्याचेही रक्त खाल्ल्याने आता देवीने शेवटचा व अती भयानक टोल देऊन हे युद्ध संपवायचे ठरवले. ॥६०॥
याप्रमाणे रक्तहिन झालेला रक्तबीज व त्याचे रक्तबिंदू-पुत्र सर्व जणांना चामुण्डेने कालीच्या मदतीने संपुष्टात आणले. त्यामुळे आपल्या शस्त्रास्त्रांसह तो पृथ्वीवर कोसळला व मरून पडला. ॥६१॥
अशा प्रकारे महादैत्य रक्तबीजाशी महासंग्राम करून देवीने त्याला नीरक्त (रक्तहीन) करून मारल्याने हे राजा (सुरथ राजा) देव-देवतांना हर्षोन्माद झाला व त्यांनी या अनुपम युद्धाची, देवीची व महाकालीची मन:पुर्वक स्तुती केली व आभार मानले. ॥६२॥
देवीच्या मातृगणा मात्र रक्तबीज आणि इतरांचे रक्त प्यायला मिळाल्याने उन्मत्तपणाने नाचू-खिदळू लागल्या व त्यांच्या आनंदाला उधाण आले.
असा हा श्रीमार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतर काळी घडलेल्या देवीमाहात्म्य कथांमधील रक्तबीजाचा वध नावाच आठवा अध्याय आहे.
श्री चामुण्डा विजयते
श्री कालिका विजयते

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP