मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
आग्र्र्याहून सुटका

शिवाजी महाराज पोवाडा - आग्र्र्याहून सुटका

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

कपटान धरलं जाळ्यात करुन परी हिकमत शिवबा निसटत ॥ध्रु०॥

चौक १

शाहिस्त्याची करुन हकाल पट्टी । सुरत शहर लूटी ।

शिवबा वीर गाठी । यवन यात्रेकरु मक्केला जाणार ।

केली खंडणी वसूल जोरदार । दिल्लीला कळल वर्तमान सार ।

शिवाजीन मांडला धुमाकूळ फार ॥जी जी॥

ही वार्ता कळली बादशहाला । औरंगजेबाला ।

क्रोधायमान झाला । बोलतो काय राजे मानसिंगास ।

असता तुम्हा सारखे वीर दरबारास । खुशाल तुम्ही पाहता शिवबाच्या कार्यास ।

केल ज्यान ठार कैक यवनास । दख्खन देशी काफीर राजास ।

जेरीस ज्यानं आणल विजापूरास । धक्के देऊन पोचवू लागले दिल्ली तक्तास ।

योग्य वेळी करा बंदोबस्तास ॥जी जी॥

चाल साधी

जयसिंग निघे घेऊन अफाट सैन्याला ॥जी जी॥

मदतीला घेऊन बरोबर दिलेरखानाला ॥जी जी॥

चालून गेले दख्खन देशाला ॥जी जी॥

पुरंदरचा किल्ला सर केला पहिल्या धडाक्याला ॥जी जी॥

सारा दख्खन देश जिंकण्याचा धडाका लाविला ॥जी जी॥

लटक

जवा कळल अस शिवबाला । चोहिकडे मोगल पांगला ।

कसा सामना द्यावा शत्रूला । अशा अति कठीण समयाला ।

शिवबानं मनसुबा केला । थोडे दिवस घ्यावे लीनतेला ।

मग पाजाव पाणी मोगलाला । अशा करुन पोक्त विचाराला ।

सांगितल आपल्या वकिलाला । जाऊन छावणीला ।

सांगा निरोप जयसिंगाला । आम्ही येतो तुमच्या भेटीला ।

तह करण्याला ॥जी जी॥

चाल

ज्यानं मारले मोठे मोठे खान । आज पाहतो त्याचे औसान ॥जी जी॥

भेटीत दया दावून, कपटान घेईन प्राण ॥जी जी॥

शिवबाचा निरोप ऐकून । दिलेरखान गेला हर्षुन ॥जी जी॥

खानाचा बेत पाहून । जयसिंग बोले रागान ॥जी जी॥

म्हणे शिवबा माझा महेमान । भेटीला येतो प्रेमान ॥जी जी॥

त्याचे जिविताचे रक्षण । करीन देऊन प्राण ॥जी जी॥

तू सांग दिल्लीला जाऊन । जे घडले इथे वर्तमान ॥जी जी॥

जयसिंगाचा राग पाहून । दिलेरखान गेला शर्मून ॥जी जी॥

लटक

भेटीचा दिवस उजाडला । शिवप्रभु आले भेटण्याला ।

जयसिंग सामोरा गेला, आणून बसवी उच्च आसनाला ॥जी जी॥

काय बोलतो शिवाजी राजा त्याला । या पालखी पदस्थ आनवाणी करुन बोलविला ।

मनि खेद वाटे चित्ताला । एका हिंदूनेच हिंदूला ।

कां उणं पहावं बोला । मी हिंदू ध्वज उभारिला पाहून हर्ष व्हावा तुम्हाला ॥जी जी॥

या हिंदूवृक्षवृद्धीला । नका घालू मुळावर घाला ।

तुम्ही वडिलासम आम्हाला । नीट विचार सांगा लेकराला ।

काय करावे अशा वक्ताला । देश रक्षणाला ॥जी जी॥

शिवराय प्रेमाची खाण । बोले कळवळून ।

अंतरी शिरुन, जयसिंग मनी पाझरला खास ।

सल्ला काय देतो ऐका शिवबास । एकदा तुम्ही भेटावे जाऊन बादशहास ॥जी जी॥

चौक २

दरबारी जावे दिल्लीला । सांगाव बादाशहाला ।

कबूल म्हणण्याला । देतो सारे किल्ले तुमचे तुम्हास ।

मांडलिक म्हणून ठेवावे आम्हास । पुन्हा नाही जाणार तुमचे वाटेस ।

बोलून अस याव परत देशास । जोमाने पुन्हा लागावे देश कार्यास ।

एकलिंगजी यश देईल तुम्हास ॥जी जी॥

जयसिंगचे उत्तर ऐकून । शिवबा प्रेमान ।

बोले गहिवरुन । म्हणता कसे जावे दिल्ली शहारास ।

कपटी औरंगजेब बादशहास । कैदेत ठेवले आपल्या बापास ।

राज्यास्तव मारल सख्या भावास । कपटान विष पाजल कैकांस ।

धोका कसा होणार नाही आम्हास ॥जी जी॥

चाल

ऐकून शिवबाच्या प्रश्नाला । जयसिंग देई वचनाला ।

माझा पुत्र आहे दिल्लीला । रामसिंग नांव हे ज्याला ।

चाल साधी

व्यवस्था तुमची ठेवण्याला देतो पत्र त्याला ॥जी जी॥

कशाही कठिण समयाला । करील साह्याला ॥जी जी॥

क्षत्रियांच्या करील कार्याला । योग्य समयाला ॥जी जी॥

निर्धास्त शंभूसह जावे तुम्ही दिल्लीला ॥जी जी॥

लटक

जयसिंगाच्या घेऊन पत्राला । शिवप्रभू गडावर आला ।

बोलावून मुख्य प्रधानाला । तशा निवडक सर्व मावळ्याला ।

सांगतो शिवबा सर्वाला । आम्ही जातो दिल्ली शहराला ।

त्या कपटी शहाच्या भेटीला । संगे नेतो संभाजी राजाला ।

त्या दरबारी आम्हाला । येऊ नये वक्त जर आला ।

रामराजे बसवून गादीला । चालवा राज्याला ॥जी जी॥

चाल

वंदून जाऊन मातेला । शिवप्रभू निघाले आग्रयाला ।

स्मरुन भवानी मातेला । संग घेतलं शंभू राजाला ।

तानाजी, येसाजी कंकाला । तस घेतल निवडक मावळ्याला ।

असं करुन निरवानिरवीला । केल कूच थेट दिल्लीला ।

लटक

आग्रयाला शिवबा जवा आला । चिक्कार गर्दी रस्त्याला ।

दूतर्फा लोक बघण्याला । अमीर उमराव आले भेटीला ।

दख्खनचा राजा पाहण्याला । पाहुनिया वीर शिवबाला ।

धन्यता वाटे सर्वाला । अशा घेतघेत भेटीला ।

रामसिंगाच्या गेले वाडयाला । गेले वस्तीला । ॥जी जी॥

वडिलाचे पत्र पाहून । रामसिंगानं पाहूणे म्हणून ।

ठेवली बडदास्त शिवाजीची फार । दुसर्‍या चाकाचा झाला आकार ।

शहाचा दरबार उद्या भरणार । शिवाजी शंभू तेथे जाणार ।

घडला प्रकार शाहीर गाणार ॥जी जी॥

चौक ३

शिवप्रभु तह करण्याला । दिल्लीला आला ।

कळता बादशहाला । हर्ष मावेना त्याच्या चित्तास ।

धावतो आयता उंदीर सापळ्यात । केला एक कपटी विचार मनांत ।

येताच शिवाजी राजा दरबारात । करविन अपमान सर्व लोकांत ॥जी जी॥

ती जागा द्यावी खालची । कमी प्रतीची । हुजर्‍या जवळची ।

वाटेल खास शिवाजीला अपमान । नाही राहणार त्यास देहभान ।

आलेले अपशब्द होऊन बेभान । पाहू मग आम्ही त्याच अवसान ।

दावूनी त्याला ह्या कैदेची शान । तेव्हाच तो ठेविल काफिर पैछान ॥जी जी॥

चाल

औरंगजेबाचा भरला गच्च दरबार ॥जी जी॥

आले मोठे मोठे ते खान, राजपूत वीर ॥जी जी॥

तसे जमले लोक अनिवार शिवबाला बघणार ॥जी जी॥

शिवराय निघाले रामसिंगाबरोबर ॥जी जी॥

आला ठोकीत असा आरोळी, पुढे चोपदार ।

लटक

पाहता शिवा शंभुला । सारा दरबार तटस्थ झाला ।

सांगती हुजरे शिवबाला । कुर्निसात बादशहाला ।

शिवबाने स्मरुन भवानीला । गुरु रामदास चरणाला ।

तसेच जिजाऊ मातेला । तख्ताकडे करुन मुखाला ।

केला मुजरा त्रिवार सर्वाला । औरंगजेब तोषला ।

खदखदा मोठयाने हसला । शेवटच्या जागी शिवबाला ।

सांगे बसण्याला ॥जी जी॥

माथ्याचा झाला अंगार । पण काय वीर करणार ।

म्हणे रामसिंग सरदार । कसा न्याय पाहा खरोखर ।

जिंकल ज्यास रणावर । त्या खालची जागा मिळणार ।

जरी सिंह झाला लाचार । नाही शुष्क लाकडं खाणार ।

लटक

जर बादशहा अपमान करणार । नाही सहन आम्हा होणार ।

म्हणून तुम्हा सांगतो अगोदर । मी जिंकाल ज्यास रणावर ।

तो शाहिस्तेखान सरदार । नाही त्याच्या खाली बसणार ।

जरी पहिली नाही मिळणार । दुसरी जागा मिळावी सत्वर ।

करावा याचा नीट विचार । सांगा लवकर ॥जी जी॥

ऐकून शिवबाच्या बोला । राग बादशाहाला ।

बोले शिवबाला । दिल्या जागेत मानी समाधान ।

वरच्या जागी बसती रजपूत आणि खान ।

नको तिथ मावळ्या कावळ्याला स्थान ।

मिळेल तुला जागा जसा तुझा मान ।

विचार याचा करी मनात आधी छान ॥जी जी॥

चौक ४

पाहूनी असा सोहळा । शिवबा लाल झाला ।

बोले बादशहाला । काय जाणता आम्हा मराठयास ।

महाराष्ट्राचे राजे आम्ही खास । स्थापीले स्वतंत्र हिंदू राज्यास ।

कावळे तुम्ही म्हणता राव कोणास । येऊन तुम्हा सारखे परके देशास ।

निच वृत्तीचे हिंदू हस्तास । धरुनी स्थापिले मोगल राज्यास ।

त्यांच्या बळावर भोगता वैभवास ॥जी जी॥

हे सिंहासन कोणाचे । वीर क्षत्रियाचे ।

नव्हे मोगलांचे । बसून त्यावरी पुन्हा आम्हास ।

खाऊन हिंदूच्याच अन्नास । उलट आम्हा करता उपदेशास ।

चोराच्या उलटया बोंबा खास ॥जी जी॥

लटक

औरंगजेब क्रोधला । जसा सैतान अंगामधी आला ।

काय बोलतो रामसिंगास । पकडो चूहा ले जाओ साला ।

जेलका खोलके ताला । चारो ओर पहरे का जाला ।

तोच रामसिंग बोलला । हुजूर एक विनंती करतो आपणाला ।

वडिलांची आज्ञा आहे मला । शिवाजीस रक्षणाला ।

येई तों वडील दिल्लीला । नका करु कैद शिवबाला ।

त्याच डोकं नाही ठिकाणाला । मी नेतो परत वाडयाला ।

चार गोष्टी सांगूनशान त्याला । उद्या हजर करतो दरबाराला ।

करुन अशा अर्जाला । घेऊन शिवबा संगतीला । गेला वाडयाला ॥जी जी॥

चाल

त्या रामसिंग समवेत । शिवशंभू गेले वाडयात ॥जी जी॥

तो आला अरब अगणीत । जणू आले यमाचे दूत ॥जी जी॥

तलवारी, भाले हातांत । वाडयाभोवती पाहारा देत ॥जी जी॥

तानाजी, येशा संगत । शिवशंभू पडले कैदेत ॥जी जी॥

लटक

पहा कपटान कावा कसा केला । जाताच शिवबा वाडयाला ।

भोवताली पहारा बसविला । दिला सक्त हुकूम अरबाला ।

या डोंगराच्या उंदराला । (गद्य-ऐसे तरीकेसे संभालो के,

कोई भी हालत में दख्खन का चूहा भाग न जाये-याद रखना)

तस कळविल रामसिंगाला । आमच्याच दरबारी आम्हाला ।

हा अपशब्द बोलला । म्हणून कैद केल आम्ही त्याला ।

जवा येईल आमच्या मनाला । करुन इन्साफाला ॥जी जी॥

बादशहान कावा एक केला । सिंह बद्ध झाला ।

कसा निसटला । जशाला तसा न्याय जगतात ।

तीच हकीकत पुढच्या चौकात । सांगतो लक्ष द्यावं कवनास ॥जी जी॥

चौक ५

सह्याद्रीचा सिंह कैदेत । छाव्या समवेत ।

सक्त पहार्‍यात । होता पण नव्हता स्वस्थ बसला ।

करितसे अनेक विचाराला । युक्ती एक अजब सुचली त्याला ।

बोलावून तान्हा येसाजीला । सांगती बेत मनी ठरलेला ।

करितो आम्ही आजाराच्या सोंगाला । आजारी आम्ही पडलो असा सर्वाला ।

वर्तमान कळवा याच वक्ताला ॥जी जी॥

शिवराय पडले आजारी । कळता दरबारी ।

बादशहा सत्वरी । शिवबाकडे पाठवी वैद्य हकिमास ।

उगीच जाऊन येई वाडयास । अंतरी हर्ष होई चित्तास ॥जी जी॥

लटक

औषधोपचार सुरु झाला । मोठे मोठे आले भेटीला ।

शिवाजीन डाव एक केला । सांगे तान्हाजीला ।

जाऊन बाजाराला । दोन पल्ले मिठाई आणा खरेदून ।

तसेच मोठाले पेटारे बनवून । मराठे जे फिरती वेष बदलून ।

यावे सर्वांना वाडयात घेऊन ॥जी जी॥

चौक ५

मिठाईचे पेटारे भरुन । मराठयाकडून ।

दिले पाठवून । भेटीला मोठमोठया लोकांस ।

दरबारी अमीर ऊमरावास । खैरात केली किती फकिरास ॥जी जी॥

लटक

शिवबानं डाव साधला । मिठाईच्या भरुन पेटार्‍याला ।

भेटीचा धडका लाविला । दोन तीन दिवस प्रथमाला ।

पहारेकरी तपाशी पेटार्‍याला । शिवबाने करुन हिमतीला ।

एका पेटार्‍यात संभाजीला । बसविला पोटचा गोळा ।

स्मरुनी भवानी मातेला । कळवळून बोले नेणाराला ॥जी जी॥

(गद्य---हा मराठयांचा भावी राजा. मी तुझ्या स्वाधीन करीत आहे.

हा महाराष्ट्राचा प्राण नेमल्या ठिकाणी पोचता कर.)

योजना ठरल्या प्रमाणे आपले लोक घोडे तयार ठेवून गांवाबाहेर ठरल्या ठिकाणी आमची वाट पाहात असतीलच. पेटार्‍याने नेतांना वाटेत कमी जास्त प्रकार घडला तर तुला सांगणे नकोच. तू नेक जात मराठा आहेस.

अस बोलून पेटारा उचलला । मराठयांच्या ठेवला डोक्याला । जलदीन मराठा निघाला, वाडया पार झाला ॥जी जी॥

चाल साधी

आता लागा आमच्या तयारीला । सांगे तान्हाजीला ॥जी जी॥

पेटार्‍यांत बसून आम्ही जाऊ ठरल्या स्थळा ॥जी जी॥

आजार आमचा वाढला । कळवा सर्वाला ॥जी जी॥

वैद्याचे जातो घराला । करा निमित्ताला ॥जी जी॥

दोघांनी करुन सोंगाला । याव ठिकाणाला ॥जी जी॥

लटक

अशा करता निरवा निरविला । तोच आला पेटारेवाला ।

पोचवून शंभू राजाला । करा जल्दी म्हणे शिवबाला ।

सध्या पहारा फारच ढिलावला । शिवबाने स्मरुन भवानीला ।

पेटार्‍यांत जाऊन बसला । मोठयाने पेटारा उचलला ।

बिनबोभाट पेटारा गेला । शिवप्रभू उतरला । भेटे बाळाला ॥जी जी॥

तेव्हां इकडे प्रकार काय झाला । येसाजी कंक निसटला ।

तान्हाजी करतो सोंगाला । रडत पडत बाहेर आला ।

म्हणे जल्दी बोलवा वैद्याला । नाही आशा राजा जगण्याला ।

रस्त्यान ओरडत गेला । दुःखात पाहुनी त्याला ।

अरबांनी नाही अडविला । पहारेकरी राजवाडयाला गेला ।

बादशहाच्या कानी बोलला ऐकून शहा तोषला ।

म्हणे अल्ला आज पावला । औषधीवाचून खोकला गेला ।

रोषन-आरा घेऊन संगतीला । रामसिंगाच्या गेले वाडयाला ।

तो कोणी दिसेना त्याला । गर्भगळीत बादशहा झाला ।

अरे दौडो भागो पहारेवाला । सैतान, दौडो गुप्‍त झाला ।

धाडकन खाली आदळला । दातखिळी बसली त्या वेळा ।

खोटया कपाळी गोटा आला । न्याय जगताला ॥जी जी॥

शिवशंभु तानाजी वीर । येसाजी बरोबर । घोडयावर स्वार ।

निसटले हाती देऊन तूर । बसला बादशहा बडवित उर ।

शोधाला सैन्य धाडी दूर दूर ॥जी जी॥

कसे गेले शिवबा देशाला । सांगे तुम्हाला ।

पुढच्या वेळेला । शाहीर गोकुलसिंह कवन करणार ।

वीररत्‍नांचे पोवाडे गाणार । पोवाडयाचा अखेर इथंच होणार ॥जी जी॥

N/A

References :

शाहीर : गोकुलसिंह क्षत्रिय

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP