मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २१

वेदस्तुति - श्लोक २१

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


दुरवगमातत्मतत्वनिगमाय तवात्ततनोश्चरितमहामॄताब्धिपरिवर्तपरिश्रमणा: ॥
न परिलपंति केचिदपवर्गमपीश्वर ते चरणसरोजहंसकुलसंगविसृष्टगृहा: ॥२१॥ (८)

॥ टीका ॥
श्रुति म्हणती भो ईश्र्वरा ॥
दुर्बोध आत्मविचार खरा ॥
तदवगमार्थ विवेक दुसरा ॥
भक्तिवांचूनि असेना ॥९०॥
भक्ति म्हणिजे जाति काय ॥
हा विवरितां अभिप्राय ॥
प्रेमरसावांचूनि सोय ॥
न लगे अन्वय बोधावया ॥९१॥
देव भक्त इतकें द्वैत ॥
परि माजील प्रेम अद्वैत ॥
भेद असतां तेथ किंचित ॥
ये वैयर्थ्य भक्तिसी ॥९२॥
भक्तितत्व ऎसें एक ॥
जें सर्वीं सर्वत्र रोचक ॥
प्रपंचीं ही विषयसुख ॥
विपरीत बोधें रुचवीतसे ॥९३॥
युवायुवती परस्परें ॥
सप्रेम भजती स्मरपडिभारें ॥
यामाजीं पातिव्रत्य जैं खरें ॥
तैं निस्तरे भवसिन्धु ॥९४॥
पितापुत्र कीं सेवकस्वामी ॥
अभेदप्रेमें वर्ततां सद्मीं ॥
विषय सेवितां सुकृतोद्यमीं ॥
भवदुर्गमीं निस्तरती ॥९५॥
असो हे स्वरौचारें विषय ॥
सप्रेम सेवितां रोचक होय\ ।
प्रेमराहित्यें विषप्राय ॥
लागे हें काय सांगावें ॥९६॥
विपरीत बोघें बिषयाभास ॥
प्रेमरसेंचि रुचे अशेष ॥
प्रेम भंगतां वैराग्यास ॥
कारण होय तेच क्षणीं ॥९७॥
विषयाभासीं जें वैरस्य ॥
वैराग्यनामें बोलिजे त्यास ॥
तैं देहादि प्रपंच फ़ोस ॥
प्रेमा ओस सहजेंचि ॥९८॥
तैं मग प्रेमा वास्तवबोधें ॥
पूर्ण चैतन्यीं येवोनि नांदे ॥
मृगजल सांडुनि अगाध ह्रदें ॥
जेंवि निवती पिपासिक ॥९९॥
पूर्ण चैतन्य तूं ईश्वर ॥
धर्मसेतुस्थापनापर ॥
घेऊनि युगानुयुगीं अवतार ॥
लीला विचीत्र प्रकाशिसी ॥४००॥
सूर्योदयीं नासे तम ॥
डोळ्या रुचे प्रकाशप्रेम ॥
तव विग्रहीं भक्तसत्तम ॥
जडती निष्काम सकामवत् ॥१॥
युवायुवति सकाम रमती ॥
विपरीत बोधाचिये भ्रान्ती ॥
वास्तवबोधें सप्रेम भक्ति ॥
तेंवि लाहती सभ्द्दक्त ॥२॥
तुझी जे कां अवतारमूर्ति ॥
तयेचि जे अमोघ कीर्ती ॥
तया अमृताब्धीमाजिं निवती ॥
लाहती विश्रांति अक्षय ते ॥३॥
तया सप्रेम सुखापुढें ॥
कैवल्य सुखही नेच्छिती कोडें ॥
तेथ आमुष्मिक बापुढें ॥
कोणीकडे बैवती ॥४॥
ऎसे विरळा भक्तिरसिक ॥
भक्तिप्रेमा पुढें आणिक ॥
अपवर्गादि नेच्छिती देख ॥
रमती सम्यक सत्संगीं ॥५॥
प्रेमसुखें पूर्ण धाले ॥
केवळ सत्संगीं निवाले ॥
थितें देहादिसुख विसरले ॥
मां इतरां भजलें केविं घडे ॥६॥
त्वत्पदसरोजंहसकुळ ॥
झाले सत्संगे जे अमळ ॥
देहगेहादि बंदिशाळ ॥
मानूनि केवळ संन्यसिती ॥७॥
श्रवणकीर्तन नवविध प्रेमा ॥
भोगितां विसरुनि गेले कामा ॥
अभेद-वोधें निष्कामधामा ॥
माजी विश्रामा पावले ॥८॥
ऎसिया भक्तांचें पदमळ ॥
मुक्त वंदिती सनकादि अमळ ॥
मुमुक्षुही विश्रांतिस्थळ ॥
वेळाऊळ सेविती ते ॥९॥
तया सुखाची विश्रान्ती ॥
दुर्लभ मानूनि बध्द वांछिती ॥
एवं सर्वां वरिष्ठ भक्ति ॥
म्हणती श्रुति भो ईशा ॥१०॥
भक्तिसुखोपब्धिस्थळ ॥
तें एक हें भूमंडळ ॥
येथ नर तनु लाहूनि अमळ ॥
न भजती केवळ आत्मघ्र ते ॥११॥
ज्याच्या प्रकाशें विश्वोद्यान ॥
कोणी तयातें न पाहोन ॥
विश्वीं विषयाभिलाषें पूर्ण ॥
रमती अनभिज्ञ मूढत्वें ॥१२॥
जेथूनि जन्म झाला आपणा ॥
विसरुनि तया आत्मकारणा ॥
आत्मच्छायेच्या आलिंगना ॥
स्नेह चौगुणा वाढविती ॥१३॥
अरे प्राणी हो तुम्ही सकळ ॥
अज्ञान पांघुरलां केवळ ॥
तेणें विसरलां आपुलें मूळ ॥
भुललां टवाळ देखोनि ॥१४॥
प्राणपोषक विषयासक्त ॥
अनित्य पदार्थी अनुरक्त ॥
होऊनि वदतां जो वेदान्त ॥
तोचि भ्रान्तिकर होय ॥१५॥
सकाम भ्रमकर वेदवचनें ॥
प्रतिपादिती जे कर्माचरणें ॥
तत्फ़लमोगें जन्ममरणें ॥
योनि भ्रमणें न चुकती ॥१६॥
यास्तव भूलोकीं नरतनु ॥
लाधल्या कीजे ईश्वर भजन ॥
हितोपदेशें श्रुतींचा गण ॥
आक्रोशोन हेंच वदे ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP