मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १९

वेदस्तुति - श्लोक १९

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


स्वकॄतविचित्रयोनिषु विशन्निव हेतुतया तरमतश्वकास्स्यनलव्त्स्वंकृतानुकृति: ॥
अथ वितथास्वभूष्ववितथं तव धाम समं विरजधियोऽन्वयंत्यभिविपण्यव एकरसम् ॥१९॥

॥ टीका ॥
तरीं जीवांचे तारतम्य ॥
सहसा नोहे ईश्वरासम ॥
केंवि तें दोहींमाजी प्रथम ॥
जीवांचेचि श्रुति वदती ॥१९॥
स्वकॄत म्हणिजे निजाचरित ॥
इष्ट अनिष्ट आणि मिश्रित ॥
तदनुसार होती प्राप्त ॥
विचित्र योनिफ़ळभोगा ॥२०॥
मग त्या विचित्र योनीमाजी ॥
कर्म संकल्प फ़ळभोग बिजीं ॥
अनुप्रवेश करुनि सहजीं ॥
आविष्कारें अवभासे ॥२१॥
परिमित निर्मित पुरातनें ॥
योनि म्हणिजे जन्मस्थानें ॥
तेथ जन्मूनि तदभिमानें ॥
देह होवोनि विचंबिजे ॥२२॥
खेचर भूचर जलचर योनी ॥
स्थावर जंगम वनचर कोण्ही ॥
योनींमाजी देह श्रेणी ॥
अनुकरुनि तारतम्यें ॥२३॥
कुत्र्जरयोनी परमथोर ॥
मशक मॄकुट अतिलघुतर ॥
तारतम्यें तदाकार ॥
आविर्भवूनि आनुकरे पैं ॥२४॥
अनळ म्हणिजे पावक जैसा ॥
लहानथोर इन्धनासरिसा ॥
अनुकरुनि निज प्रकाशा ॥
करी तद्वत् जीवही पैं ॥२५॥
स्वकर्म कॄता ज्या ज्या योनि ॥
त्यांमाजी तैसाचि अनुकरुनि ॥
जीव प्रकाशे म्हणवूनि ॥
स्वकॄतानुकॄति बुध म्हणती ॥२६॥
तया जिवांचिये परी ॥
तारतम्य परमेश्वरीं ॥
कैसें न घडे तें श्रुतिनिकरीं ॥
वाखाणिजेतें तें ऎका ॥२७॥
न रमी एकाकी म्हणोन ॥
बहुधा चित्र योनि निर्मून ॥
त्यांमाजी तैसाचि अनुकरुन ॥
कूटस्थपणें अवभाससी ॥२८॥
स्वकॄता योनींच्या अनुकारें ॥
अनुकरुनि तदाकारें ॥
भाससी म्हणोनि तुज बुधनिकरें ॥
स्वकॄतानुकृति म्हणिजे तो ॥२९॥
कर्मजनित योनिप्रभव्व ॥
आधीं निर्माण होय देह ॥
तेथ प्रवेश करी जीव ॥
तैसा भाव तुज न घडे ॥३०॥
जैसी तृणजलूका काडी ॥
पुढील धरुनि मागील सोडो ॥
तैशा देहाच्या परवडी ॥
स्वकर्म आवडी जीव धरी ॥३१॥
तैसें घडे तुज ईश्वरा ॥
जेविं स्वयंभ गगनोदरा- ॥
माजी होतां घटमठनिकरा ॥
गमे अंबरा अनुकरणें ॥३२॥
किंवा पावक प्रसवोनि जळ ॥
द्रमाकार होय सकळ ॥
तयांचे गर्भीं आपुलें स्थळ ॥
पूर्वीच असे कीं मग निर्मीं ॥३३॥
तेंवि स्वकॄता योनींमाजीं जाण ॥
पूर्वीच अससी तूं विद्यमान ॥
प्रविष्टा परी तदनुकरण ॥
प्राकॄत जन अवगमिती ॥३४॥
मिथ्या विवर्तरुपा योनी ॥
त्यांमाजीं वास्तव तुज वाचूनी ॥
नाहींच ऎसें जाणती ज्ञानी ॥
जें श्रुतिवननीं प्रतिपाद्य ॥३५॥
जीव प्रविष्ट एका देहीं ॥
सर्वभूती तूं निगूढ पाहीं ॥
भूतान्तरात्मा ठायींच्या ठायीं ॥
सर्वव्यापी साक्षिस्वें ॥३६॥
सर्व भूतांमाजी वसता ॥
कर्माध्यक्ष साक्षी चेता ॥
केवळ निर्गुण अविकारता ॥
म्हणोनि स्तविती श्रुतिनिचय ॥३७॥
विवर्तरुपा योनि मिथ्या ॥
त्यांचें कारण तूं वस्तुता ॥
इहामुत्रिकफ़ळकर्मरहिता ॥
सन्मात्र तत्त्वता एकरस तूं ॥३८॥
सांडूनि रजस्तमांचा लेप ॥
विशुध्द मति जे निर्लेप ॥
ज्यांसी नातळे पापताप ॥
जे निप्पंक गुणरहित ॥३९॥
इहामुत्रिकफ़ळाभिलापी ॥
कर्मव्यवहार न शिवे ज्यांसी ॥
ते तुज जाणती निश्र्चयेंसी ॥
सन्मात्रासी स्वात्मत्वें ॥४०॥
यास्तव विभो तुझ्या ठायीं ॥
उपाधिकृत हें तारतम्य नाहीं ॥
अविच्युत ऎश्वर्य यास्तव पाहीं ॥
उपास्यत्व तुजचि घडे ॥४१॥
पूर्व शंकेची निवृत्ति ॥
केली असतां येथ पुढती ॥
परमाश्र्यर्य मानूनि चितीं ॥
वदती श्रुति तें ऎका ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP