चतुःश्लोकी भागवत - श्लोक ४४

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


तस्मा इदं भागवतं पुराणं दशलक्षणम् ॥ प्रोक्तं भगवता प्राह प्रीतः पुत्राय भूतकृत् ॥४४॥

॥ टीका ॥
निजपुत्रालागीं श्रीनारायण ॥ कळवळोनी सांगे गुह्यज्ञान ॥ तेंचि स्वपुत्रालागीं जाण ॥ ब्रह्मा आप्ण मथितार्थ बोधी ॥१॥
ज्ञान विज्ञान भगवद्भक्ती ॥ नारायणाची पूर्ण स्थिती ॥ कळवळोनि प्रजापती ॥ निजपुत्राहातीं ओपिता झाला ॥२॥
तें दशलक्षण भागवत ॥ विष्णुविरिंची ज्ञानमथित ॥ तो ऐकतां ज्ञानमथितार्थ ॥ ओपिला समस्त नारदोदरीं ॥३॥
तें न देखतां नयन ॥ नमाखतां निजकान ॥ नातळतां अंतःकरणमन ॥ ओपिलें गुह्यज्ञान नारदहृदयीं ॥४॥
सोडूनियां निज सुरबुद्धी ॥ नातळतां आदिमध्यआवधीं ॥ परिपूर्णत्वें करूनिबोधी ॥ ज्ञानार्थ सिद्धि वोपिली तया ॥८०५॥
जेवीं शिष्या विद्यातत्व देतां ॥ गुरूसी ज्ञान वाढे अर्था ॥ न्यूनत्व न घडे प्रबोधितां ॥ पूर्ण चढें माथा सच्छिष्याचिया ॥६॥
तैसा उपदेश अलौकिक ॥ उपदेशमात्रें तिन्हीलोक देख ॥ गुरुशिष्यही होती एक ॥ तेथें न्यूनाधिक कोणाचें कोणा ॥७॥
राया यापरी चतुरानन ॥ उपदेशुनी गुह्यज्ञान ॥ नारद केला ब्रह्मपूर्ण ॥ चैतन्यघन समसाम्यरूप ॥८॥
जेणें होइजे ब्रह्मपूर्ण ॥ तें भागवत दशलक्षण ॥ त्या लक्षणांचें निजलक्षण ॥ होउनि सावधान अवधारी तूं ॥९॥
इतर पुराणें जीं असतीं ॥ त्यांची पांचलक्षण व्युत्पत्ति ॥ श्रीमहाभागवताची स्थिती ॥ जाण निश्चितीं दशलक्षणें ॥८१०॥
मुख्य भागवताची व्युत्पत्ति ॥ दशलक्षण त्याची स्थिती ॥ ते मी सांगेन तुजप्रती ॥ ऐके परिक्षिती नृपवर्या ॥११॥
सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण ॥ उती, मन्वंतरें, ईशानुकथन ॥ निरोध मुक्ती आश्रय पूर्ण ॥ एवं दशलक्षण भागवत ॥१२॥
दशलक्षणांचें लक्षण ॥ तुजमी सांगेन संपूर्ण ॥ ऐक राया सावधान लक्षणचिन्ह यथार्थ आतां ॥१३॥
सर्ग बोधिजे संसारातें ॥ विसर्ग ह्मणजे संहारातें ॥ स्थान ह्मणिजे वैकुंठातें ॥ पोषण तेथें भगवद्भजन ॥१४॥
कर्म त्यानांव ऊती ॥ चौदामनूंची व्यवस्थिती ॥ यानांव मन्वंतरें ह्मणती ॥ दशावतार कीर्ती ईशचरित ॥८१५॥
सकळ इंद्रियांच्या वृत्ती ॥ एकाग्र यानांव विरोध स्थिती ॥ निःशेष जेथें विरे वृत्ती ॥ त्यानांव मुक्ती महाराया ॥१६॥
उत्पत्तिस्थितीप्रळयांत ॥ ज्या स्वरूपावरी होतजात ॥ स्वरूप अविकारी यथास्थित ॥ त्यानांव निश्चित आश्रय राया ॥१७॥
दोरा अंगीं सर्प उपजला ॥ दोरावरी सर्प नांदला ॥ दोरावरी सर्प निजला ॥ तरी दोर स्पर्शला नाहीं सर्पा ॥१८॥
तेवीं वस्तूच्या ठायीं ॥ प्रपंचाची वार्ता नाहीं ॥ तो झाला गेला घडे कांहीं ॥ आश्रय पाही यानांव बापा ॥१९॥
पावावया आश्रयप्राप्ती ॥ भावें करावीं भगवद्भक्ती ॥ ते भक्तीची निजस्थिती ॥ श्रीव्यासें भागवतीं विषद केली ॥८२०॥
ते भावें करितां भगवद्भक्ती ॥ त्या भक्तीची निजस्थिती ॥ भक्तां परमानंदप्राप्ती ॥ परिपूर्ण स्थिती ठसावें येथें ॥२१॥
ठसावली जी ब्रह्मस्थिती ॥ ते पालटो नेणें कल्पांतीं ॥ कर्मीं अकर्तृत्वाची प्रतीती ॥ नारद निश्चिती उपदेशिला ॥२२॥
तेणें उपदेशें श्रीनारद ॥ पावला तो परमानंद ॥ निर्दळूनिया भेदाभेद ॥ यापरी बोध प्रबोधिला तेणें ॥२३॥
ऐसें उपदेशितां प्रजापती ॥ श्रीभगवंताची मुख्यभक्ति ॥ आतुडली नारदाचिये हातीं ॥ अव्ययस्थिती परमानंद होत ॥२४॥
यापरी उपदेशिला नारद ॥ यालागीं सर्वकर्मीं ब्रह्मानंद ॥ कोंदाटला स्वानंदकंद ॥ परमानंद परिपूर्णपणें ॥८२५॥
बोध देखोनि चतुरानना ॥ आल्हाद जाहला चौगुणा ॥ तेणें आल्हादें करुनी जाणा ॥ आपुला ब्रह्मवीणा वोपिला तया ॥२६॥
नारदें करूनी प्रदक्षिणा ॥ स्वानंदें लागलासे चरणां ॥ मग वाहूनिया ब्रह्मवीणा ॥ ब्रह्मानंदें जाणा निघाला ते समयीं ॥२७॥
तो ब्रह्मवीणा वाजवीत ॥ ब्रह्मपदेंगीतीगात ॥ ब्रह्मपदीं डुल्लत डुल्लत ॥ ब्रह्मसृष्टी विचरत ब्रह्मबोधें ॥२८॥
ब्रह्मचर्यातें पाळित ॥ ब्रह्मबोधप्रतिपाळित ॥ ब्रह्मानंदें उन्मत्त ॥ मही विचरत ब्रह्मत्वें तो ॥२९॥
तो ब्रह्मयासी संवादत ॥ अधिकारियासि ब्रह्म देत ॥ जग ब्रह्मरूपें देखत ॥ यापरी विचरत त्रैलोक्य स्वयें ॥८३०॥
ऐसा विचरत स्वइच्छेसीं ॥ आला सरस्वती तीरासी तेथें देखिलें श्रीव्यासासी ॥ निजमानसीं व्याकुळ असे ॥३१॥
ब्रह्मप्राप्तीलागीं जाण ॥ घालूनि बैसला तो आसन ॥ दृढ करितांही ध्यान ॥ निजसमाधान नपावेंचि ॥३२॥
तीव्यासें स्वयें आपण ॥ केलें वेदविभागविवंचन ॥ भारतादीअठरापुराण ॥ इतिहास सुलक्षण व्यासें केली ॥३३॥
स्वधर्म कर्माचे लागवेग ॥ व्यासें विभागिलें सांग ॥ स्वर्गनर्कादिभोग भाग ॥ देहविभाग विभागले व्यासें ॥३४॥
जन्ममरणादि अवस्था ॥ व्यासें वर्णिल्या यथार्थता ॥ ज्ञातेपणाची समर्थता ॥ परी अंगी सर्वथा असेना त्याचे ॥८३५॥
वेदविभागीं मी सज्ञान ॥ ऐसा रावणासी अभिमान ॥ त्यासी दिधलें निग्रहस्थान ॥ श्रीव्यासें आपण ॐकारमात्रें ॥३६॥
ज्याचेनी दृष्टिस्पर्शें जाण ॥ कौरवपांडववंशवर्धन ॥ तो श्रीव्यासही आपण ॥ आत्मसमाधान नपवेची ॥३७॥
ज्याचे करितां ग्रंथ पठण ॥ ब्रह्महत्यादिदोषनिर्दळण ॥ करितां भारतकथाकथन ॥ निमाले ब्राह्मण उठविले अठरा ॥३८॥
यापरी ज्ञानसंपन्न ॥ श्रीवेदव्यास द्वैपायन ॥ तोही सद्गुरुकृपेविण ॥ आत्मसमाधान नपवेचि ॥३९॥
मुख्य व्यासाची हे अवस्था ॥ तेथें इतरांची कोण कथा ॥ शाब्दिकज्ञानाची योग्यता ॥ तेथें अतर्क्य अहंता स्वभावें असे ॥८४०॥
अनागतभाग्ययथार्थवक्ता ॥ महाकवित्वें मी कविकर्ता ॥ ऐशी अतिसूक्ष्म अहंता ॥ नकळॊंनी स्वभावता व्यासासी असे ॥४१॥
सद्गुरुकृपा न होतां पूर्ण ॥ नतुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान ॥ नकरितां गुरुसेवा अनन्य ॥ शिष्य समाधान कदां नपवे ॥४२॥
नधरितां सद्गुरूचे चरण ॥ नव्हतां अनन्यशरण ॥ वृथा ज्ञान वृथा ध्यान ॥ वृथा वाग्विलपन पांडित्य तें ॥४३॥
वृथा स्वधर्म कर्माचार ॥ वृथा विवेक विचार ॥ सद्गुरुकृपेविण जो नर ॥ भूभिभार जडमूढ तो ॥४४॥
सद्गुरुकृपा नहोतां ॥ व्यर्थकविता व्यर्थ कथा ॥ व्यर्थ सज्ञानश्लाघ्यता ॥ देहअहंता तुटेना त्याची ॥८४५॥
नकरितां सद्गुरुभजन ॥ शिष्यासी नोहे समाधान ॥ सद्गुरु तोचि ब्रह्मपूर्ण ॥ चैतन्यघन निजात्मा तो ॥४६॥
सद्गुरूचे चरणींची माती ॥ अवचठें आतुडल्या स्वहस्तीं ॥ पायां लागती चार्‍ही मुक्ती ॥ परमात्मप्राप्ती सच्छिष्या ॥४७॥
असो हें व्यासें करितां ध्यान ॥ क्षणभरी स्थिर नराहें मन ॥ अणुमात्र नपवें समाधान ॥ तेणें उद्विग्न पणें अनुतापी ॥४८॥
मग ह्मणे तो कटकटां ॥ जळो जाणीवप्रतिष्ठा ॥ झातेपणें ठकिलों मोठा ॥ मज मी उफराटा वंचलों कीं ॥४९॥
जाणपणाचा पडिला भ्रम ॥ ज्ञातेपणें मी मूर्ख परम ॥ निजहिताचें चुकलों वर्म ॥ झालें निंद्यकर्म मज झाले ॥८५०॥
माझेंदेहीं देहस्था मी कोण ॥ त्या मीपणाचें मज नाहीं ज्ञान ॥ केवीं पावेन मी समाधान ॥ यापरी संपूर्ण अनुताप जाहला ॥५१॥
नरदेहींचें निजसाधन ॥ साधावें निजात्मज्ञान ॥ तें मी नसाधितां सज्ञान ॥ अति अज्ञान ज्ञानांध केवळ ॥५२॥
ऐसी व्यासासी अवस्था ॥ ज्ञानार्थीं होतां अनुतापता ॥ तेथें निजभाग्यें स्वभावतां ॥ आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥
व्यास जंव उघडी नयन ॥ तंव पुढें देखे ब्रह्मनंदन ॥ हर्षें निर्भर झाला पूर्ण ॥ धांवोनि लोटांगण सद्भावें घालीं ॥५४॥
उपविष्टहोतां वरासन ॥ हर्षें करी चरणवंदन ॥ स्वानंदें चरणक्षालन ॥ केलें पूजन ज्ञानोपचारीं ॥८५५॥
पुष्पांजुळी प्रदक्षिणा ॥ तुळसीपत्रें वाहुनी चरणा ॥ नारदीं भगवद्भावना ॥ करूनी पूजना प्रार्थितसे ॥५६॥
व्यास ह्मणे अहोस्वामी ॥ जगीं परमभाग्याचा मी ॥ स्वयें कृपा केली तुह्मी ॥ आजि सुखसंगमीं निवालों असें ॥५७॥
ऐशि विनंती प्रीतीकरूनी ॥ धांवोनि लागलासे चरणी ॥ त्यासी आदरें नारदमुनीं ॥ सन्मानुनी उठवी अत्याल्हादें ॥५८॥
मग बैसोनियां सावचित्त ॥ व्यास निवेदी मनोगत ॥ म्यां स्वयें कथिलें ज्ञानमथित ॥ परी समाधान चित्त माझें नपवे ॥५९॥
जोमी लौकिकीं अति सज्ञान ॥ तो मी निजस्वार्था अतिअज्ञान ॥ माझ्या ज्ञातेपणाचें भूषण ॥ तेंचिदूषण मजमाझें ॥८६०॥
भीतरीं मूर्ख बाहेरी ज्ञाता ॥ हें ज्ञातेपण निजघाता ॥ तें मी वेदशास्त्रपुराणकर्ता ॥ निजस्वार्था अति अंध झालों ॥६१॥
अंतरीं नाहीं सुख समाधान ॥ जळो जळो तें ज्ञातेपण ॥ ऐसें नारदासी सांगोन पूर्ण ॥ झाला अनन्य शरण श्रीव्यास तो ॥६२॥
तंव नारद ह्मणें व्यासासी ॥ केलें अत्युत्तम ग्रंथासी ॥ जेणें विश्रांति होय वक्त्यासी ॥ त्या ग्रंथार्थासी नोळखसी ॥६३॥
स्वधर्मकर्तव्यें व्यवहाररीती ॥ हेंची निरूपिलें तुंवा ग्रंथीं ॥ परी भगवंताची निजस्थिती ॥ ती ग्रंथार्थीं प्रतिपादिली नसे ॥६४॥
सच्चिदानंद प्रभावासी ॥ नाहीं वर्णिलें श्रेवासुदेवासी ॥ तंव विश्रांति नव्हे वाचेसी ॥ मां वक्त्यासी सुख कैंचें ॥८६५॥
जो जगाचें निजजीवन ॥ जो प्रतिपाद्य श्रीजनार्दन ॥ नाहीं वर्णिला चैतन्यघन ॥ तंव वक्त्या संपूर्ण सुख कैंचे ॥६६॥
ज्याचेनी जग होय सुखरूप ॥ तो जनार्दन सुखस्वरूप ॥ त्याचें न वर्णितां निजस्वरूप ॥ वक्तयासी अल्प विश्रांती नुपजे ॥६७॥
जैं वक्त्यासी होय निजसुख ॥ त्रिलोकीं कोंदे हरिख ॥ ऐसा अत्यंत अलोलिक ॥ तुज मी अवश्यक सांगेन आतां ॥६८॥
श्रोते वक्ते सुखरूप होती ॥ जगीं प्रकटे परमशांती ॥ ऐसी भगवंताची निजस्थिती ॥ ते मी तुजप्रती सांगेन पां ॥६९॥
ज्याचें स्मरतां एक नाम ॥ निर्दाळी सकळ कर्माकर्म ॥ त्या पुरुषोत्तमाचें निजवर्म ॥ गुह्यज्ञान परम सांगेन व्यासा ॥८७०॥
जेथें शब्देंसी वक्ता निवे ॥ श्रवणेंसी श्रोता विसांवे ॥ सुखासही निजमुख फावे ॥ अनुभवा निजानुभवें निघती दोंदें ॥७१॥
जेणें शिवाचें पुरे कोड ॥ जें गोडाचें निजगोड ॥ जेणें वोसरे संसारकाबाड ॥ सुखसुरवाड सांगेन तें ॥७२॥
जेणें तुटे ज्ञानाभिमान ॥ जेणें कोंदाटे चैतन्यघन ॥ ऐसें जें गुह्याचें गुह्यज्ञान ॥ तें तुज सांगेन परात्पर मी ॥७३॥
जें भावार्थें घेतां वचन ॥ जन जनार्दन अभिन्न ॥ श्रोता वक्ता होय आपण ॥ तें गुह्यज्ञान अवधारी तूं ॥७४॥
कैसें व्यासाचें शुद्धमन ॥ नारद ज्ञाता मी काय अज्ञान ॥ ऐसा नधरीच ज्ञानाभिमान ॥ यालागीं तुष्टमन नारद झाला ॥८७५॥
जेणें जपतपाची श्रंखळा तुटे ॥ ध्येयध्यानाचें बिरडें फिटे ॥ कर्माकर्माचें खत फाटे ॥ तें वर्म गोमटें अवधारी पां ॥७६॥
जेणें अहंतेचें मूळ उपदे ॥ अविद्येचें आयुष्य खंडे ॥ अंगें ब्रह्म होईजे रोकडें ॥ तें ज्ञान धडफुडें अवधारी पैं ॥७७॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP