चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३५

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


यथा महांति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु ॥ प्रविष्टान्यप्रतिष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥३५॥     

॥ टीका ॥
जो मी परमात्मा हृषीकेशी ॥ न रिघोनि रिघालों सृष्टीसी ॥ नातळोनि चाळीं जगासीं ॥ ते दृष्टांतेंसी स्थिती सांगों ॥५४०॥
येथें महाभूतें जैशी ॥ उच्चनीच देहासरसीं ॥ प्रवेशलीं दिसती कार्येंसी ॥ कारण स्थितीसी अप्रविष्ट ॥४१॥
तैसा मीही याचि परिपाठीं ॥ जगी प्रवेशलों कार्यदृष्टी ॥ कारणरूपें मीचि सृष्टी ॥ मज प्रवेशावया शेवटी ठावो कैंचा ॥४२॥
सागर पाहता दृष्टीं ॥ उठती कल्लोळांच्या कोटी ॥ तो सागरु कल्लोळाच्या पोटीं ॥ केवीं उठाउठी समावे ॥४३॥
कार्यदृष्टीं पाहतां पाही ॥ भूतें प्रवेशली माझ्या ठायीं ॥ कारणत्वें भूतहृदयीं ॥ मी असोनि नाहीं प्रवेशलों ॥४४॥
यापरी मी सृष्टीसी ॥ प्रवेशलों कार्यदृष्टीसी ॥ कारणत्वें सृष्टी मी आपैसी ॥ मज प्रवेशासी भिन्नत्व नाहीं ॥५४५॥
येथें कार्य ह्मणीजे तें काये ॥ औट हातामाजीं गवसूनि ठाये ॥ मानी ‘ मी इतुकाचि आहे ’ ॥ यानांव पाहे कार्य ह्मणिजे ॥४६॥
अद्वैतीं देखणें विषम ॥ द्वैतबुद्धीचा दारुण भ्रम ॥ सत्य मानी रूपनाम ॥ कार्यसंभ्रम यानांवें ॥४७॥
देहासी इंद्रियवृत्ती ॥ चळती माझिया चिच्छक्ति ॥ त्या मजचालकातें नेणती ॥ हे देहअहंकृति यानांव कार्य ॥४८॥
कार्य ह्मणिजे तें ऐसें ॥ कारण तूं ह्मणसी कैसें ॥ जेणें मी निजात्मादिसें ॥ अद्वैतविन्यासें अप्रविष्ट ॥४९॥
व्याप्य मजवेगळें उरोंलाहे ॥ मा मी व्यापकू व्यापूनि राहें ॥ हे वार्ता मजमाजीं न साहे ॥ जगद्रूप मी स्वयें चिदात्मा एक ॥५५०॥
कोटि घट प्रवेशतां गगनीं ॥ गगन अप्रविष्ट घटीं प्रवेशोनी ॥ तें जैसें स्वयें पूर्णपणीं ॥ तेवीं मी जगीं पूर्णत्वें पूर्ण ॥५१॥
ह्मणशी तूं पूर्णत्वें एकवद ॥ तर्‍ही पर्वत पाषाण कां स्तब्ध ॥ वृक्षवल्ली इत्यादि मुग्ध ॥ सज्ञानशुद्ध एक कां म्हणशी ॥५२॥
अनेकीं एकत्व परिपूर्ण ॥ तेचि अर्थींचें निरूपण ॥ आतां ऐक सावधन ॥ विरिंची तुज मी संपूर्ण सांगेन ॥५३॥
अग्निसोज्वळ ज्वाळा दिसे ॥ अथवा धूम्रांकित भासे ॥ कां खदिरांगारीं उल्हासे ॥ इत्यादि विलासे अग्नि तो येकू ॥५४॥
आदळीं उठती खळाळ ॥ वोघीं दिसे अति चंचळ ॥ डोहीं राहिलें निश्चळ ॥ त्रिविध भेदें जळ एकचि जैसें ॥५५५॥
घटमठादि महाकाश ॥ इत्यादिभेदें एक आकाश ॥ तेवीं विकाररूपें मी ईश ॥ नांदें अविनाश अविकारित्वें ॥५६॥
यालागीं अप्रविष्ठपणें संचलें ॥ माझें मजवरी स्वयंभ रचिलें ॥ जैसे अथावीं घठ बुडविले ॥ तेथें भरोनियां भरलें एकत्वें जल ॥५७॥
पोळी आंतील गव्हांशी ॥ सबाह्याभ्यंतरीं कणिक जैशी ॥ तेवीं मी सृष्टिकार्यासी ॥ प्रवेशोनि पूर्णत्वेंसी अप्रविष्ट ॥५८॥
कार्यकारणविन्यासें ॥ जग नांदे सावकाशें ॥ तोजगद्रूप मीच असें ॥ सहज समरसें परमात्मा ॥५९॥
मजहुनि कांहीं वेगळे असे ॥ मा मी जाऊंनि त्यांत प्रवेशें ॥ अथवा नप्रवेशतु असें ॥ सावकाशें वेगळा कीं ॥५६०॥
मेघमुखींची गार दुर्लभ ॥ तीमाजीं गोंठूनि जळथेंब ॥ ते गारेतें निर्धारितां सर्व अंभ ॥ तेवीं जाणा स्वयंभ चित्स्वयें ॥६१॥
तेवीं जन तोचि जनार्दन ॥ जनार्दन स्वयें जन ॥ ऐसा जनार्दन अभिन्न ॥ जगीं प्रवेशोनि अप्रविष्ट ॥६२॥
ऐसें सावळेनि सुंदरें ॥ बुद्धिबोध प्रबोधचंद्रें ॥ सांगितलें ज्ञान नरेंद्रें ॥ कृपा उपेंद्रें प्रजापतीसी ॥६३॥
येथें सृष्टीची स्थिती ते ऐशी ॥ मी जगद्रूप हृषीकेशी ॥ हेंही तूं जरी नकळे म्हणसी ॥ तैं प्राप्ति उपायाशी सांगेन ॥६४॥
मज जाणावयालागीं ॥ अभिमानें कष्टले हटयोगी ॥ अहंतेनें नपावोनि माझी मार्गी ॥ वंचले विभागीं काळवंचनेच्या ॥५६५॥
मज पावावयाकारणें ॥ दाटोनि ते देहाभिमानें ॥ स्वकर्में शिखासूत्र त्यजणें ॥ तैं मज पावणें खुंटलें त्यांचें ॥६६॥
न जाणतां कामक्रोधासी ॥ एकाकी झाला संन्यासी ॥ देहाभिमानें ग्रासिलें त्यासी ॥ क्रोधलोभांसी स्वयें विकला ॥६७॥
संन्यासी स्वप्नीं विषय देखे ॥ तरी विरजाहोम केला हें लटिकें ॥ तेणें अधोगती यथासुखें ॥ विषयअभिलाखें अणिलिघरां ॥६८॥
माझा निश्चयो नाहीं मनें ॥ आम्ही सज्ञान ज्ञानाभिमानें ॥ देह दंडिता पुरश्चरणें ॥ क्रोधाचें नागवणें नागवी कामु ॥६९॥
मंत्राचीं बीजाक्षरें ॥ चित्स्वरूपज्ञानगंभीरें ॥ हे नेणोनि जापक निदसुरे ॥ जप माळाद्वारे भ्रमणीं पडिले ॥५७०॥
एकीं शाब्दिकशास्त्रमूढीं ॥ ज्ञातेपणाची उभविलीगुढी ॥ पडतां कामक्रोधांची धाडी ॥ स्वयें चरफडी देहलोभें ॥७१॥
शब्दादेवाऽपरोक्षधी ’ ॥ हे सत्य सच्छास्त्रोक्ती ॥ शब्दीं शब्दविद्या नेणती ॥ यालागीं नपवती अपरोक्षसिद्धि ॥७२॥
सत्य कापुसाचीं वस्त्रें होतीं ॥ परी कापूस नेसता नागवे दिसती ॥ तेवीं शब्दविज्ञानस्थिती ॥ त्या शाब्दिकां अंतीं अपरोक्ष कैचें ॥७३॥
चाटु नाना मधुररस वाढी ॥ परी चाटु खातां नलभे गोडी ॥ तेवीं शब्दें स्वानंदजोडी ॥ चवी चोखडी शब्दीं नाहीं ॥७४॥
यारीतीं हे साधनधर्म ॥ आचरतां नाना कर्म ॥ माझे प्राप्तीचें निजवर्म ॥ नेणती संभ्रम देहाभिमानी ॥५७५॥
माझी पावावया निजप्राप्ती ॥ अन्वयें करावी माझी भक्ती ॥ व्यतिरेकें माझी स्वरूपस्थिती ॥ सांगेन तुजप्रती गुह्य माझें ॥७६॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP