चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३४

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


ऋतेऽर्थं तत्प्रतीयेत न प्रतीयेत चाऽऽत्मनि ॥ तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः ॥३४॥

॥ टीका ॥
मी परमात्मा जो अधिष्ठान ॥ त्या मज सत्यार्थातें नदेखोन ॥ जें जें देखिजे द्वैतभान ॥ ते माया जाण विरिंची ॥९२॥
कंनकबीज सेऊनि पुरें ॥ तंव आपण आपणां विसरे ॥ जें जें देखों लागे दुसरें ॥ व्याघ्र वानरें ससे मासे ॥९३॥
तेवीं निजात्मयाचेनि विसरे ॥ जें जें देखोंलागे दुसरे ॥ ते माझी माया निजनिर्धारें ॥ जाण साचोकारें विधात्या ॥९४॥
निजरूपें असतां दोरू ॥ तों नदेखोनि ह्मणे सर्प थोरू ॥ तेवीं माझे मायेचा विकारू ॥ नाथिला संसारू यापरी दावी ॥४९५॥
गगनीं चंद्र एक असे ॥ तिमिरदृष्टिदोषें दुजा भासे ॥ तेवीं द्वैताचेनि आभासें ॥ माया उल्हासे भवभावरूपें ॥९६॥
सूर्यउदयीं जाग प्रकाशें ॥ अंधाच्या ठायीं अंधकार दिसे ॥ आत्मा न देखोनि तैसे ॥ माया उल्हासे भवभावरूपें ॥९७॥
सूर्य जेव्हां न देखणें ॥ तेव्हां तम वाढे प्रबळपणें ॥ सूर्य जे काळीं देखणें ॥ तेव्हां तमाचें जिणें नाहींचि होये ॥९८॥
तेवीं मज आत्म्याचें अदर्शन ॥ तेंचि मायेचें प्रबळपण ॥ आपुल्या स्वरूपाचें विस्मरण ॥ ते माया जाण विरिंची ॥९९॥
स्वरूप स्वयें आनंदघन ॥ नित्यनिर्मम स्फुरण ॥ तें स्वरूपीं अभिमानाचें स्फुरण ॥ ते जन्मस्थान मायेचें ॥५००॥
स्वरूपीं अभिमानाचें स्फुरण ॥ ते माया मुख्यत्वें संपूर्ण ॥ केवळ जें निरभिमान ॥ तेथें मायह जाण असेना ॥१॥
सत् असत् विवंचना ॥ करितां माया नये अनुमाना ॥ त्या मायेच्या निजलक्षणा ॥ सांगेन चतुरानना तें ऐक ॥२॥
विषयविषयिक कल्पना ॥ ते अविद्या जाण चतुरानना ॥ अहमात्मैकभावना ॥ ते जाण कमलासना सद्विद्या ॥३॥
विषयविषयिक कल्पना ॥ त्या स्थूलमायेचें लक्षणा ॥ निजात्मविषयीं भावना ॥ ते जाण चतुरानना मूळमाया ॥४॥
आपुली कल्पना विधातया ॥ ते जाण मुख्यमाया ॥ विद्याअविद्या दोन्ही या ॥ विवंचिलिया वृत्तीच्या ॥५०५॥
जेथें विषयकल्पनेची वस्ती ॥ तो आतुडला मायेचे हातीं ॥ जो निर्विकल्प निश्चितीं ॥ माया त्याप्रती असेना ॥६॥
जैशी छाया रूपापाशीं ॥ नातळत वर्ते देहासरसी ॥ ब्रह्मीं माया जाण तैशी ॥ असे अहर्निशीं मिथ्यात्वें ॥७॥
सदा छाया सरशी असतां ॥ कोणी नकरी छायेची वार्ता ॥ तेवीं जाण गा तत्त्वतां ॥ मायेची वार्ता ब्रह्मीं नाहीं ॥८॥
छाया कोठें असे कोठें नसे ॥ धाली भुकेली ज्याची तो नपुसे ॥ ब्रह्मीं मायेचें जाण तैसें ॥ स्फुरणही नसे सत्यत्वें ॥९॥
माझी छाया मजसवें आहे ॥ हेही आठवण कवणा कल्पांतीं नोहे ॥ यापरी ब्रह्माचे ठायीं पाहे ॥ स्फूर्तीहि नसाहे मायेची ॥५१०॥
निजछाया शस्त्रें नतुटे ॥ पर्वतभारें कदा नदटे ॥ काष्ठें कुटितां नकुटे ॥ लोटिता न लोटे अणुमात्र ॥११॥
तेवीं निरसावया निजमाया ॥ वाट नचले गा उपाया ॥ ते उपाय येती अपाया ॥ साधनीं माया ढळेना ॥१२॥
निजछाया तोडावया निवाडें ॥ जें आणिजे त्यावरी छाया पडे ॥ परी छाया तळीं सांपडे ॥ तें साधका नातुडे निजसाधनें ॥१३॥
छाया ज्याची त्यातळीं दडे ॥ तेवीं ब्रह्मीं माया समूळ उडे ॥ माया दुजेपणें पहातां पुढें ॥ अधिक वाढे अनिवार ॥१४॥
छाया जो धरूं पाहे पुढें ॥ धरूं जातां अधिक वाढे ॥ तेवीं माया साधनीं नातुडे ॥ जाण फुडें परमेष्ठी ॥५१५॥
तेवीं करावया माया निरसन ॥ साधन तितुकें मायिक जाण ॥ जेणें होय मायेचें निर्दळण ॥ तें साधका लक्षण लक्षेना ॥१६॥
लटिकपणें पहातां छाया ॥ स्वयें लोपे लाजोनिया ॥ तेवीं मिथ्यात्वें पाहतां माया ॥ जाय हारपोनियां परब्रह्मीं ॥१७॥
देह लक्षितां मिथ्या छाया ॥ स्वरूप लक्षितां मिथ्या माया ॥ हें सत्य जाण विधातया ॥ छाया माया समान ॥१८॥
एवं निजात्मप्राप्तीविण ॥ नव्हे जिजमायानिर्दळण ॥ ते आत्मप्राप्तीलागीं जाण ॥ सद्गुरुचरण सेवावे ॥१९॥
सद्भावें करितां गुरुभजन ॥ गुरुभक्ताचे निजचरण ॥ माया स्वयें वंदी आपण ॥ माया निर्दळण गुरुदास्यें ॥५२०॥
एवं सद्गुरुकृपेंपुढें ॥ माया मशक बापुडे ॥ त्याच्या वचनार्थें सुरवाडें ॥ मायाही रोकडें ब्रह्म होये ॥२१॥
जेवीं उगवलिया सुभानु ॥ अंधार होय प्रकाशघनु ॥ तेवीं बोधा आलियां गुरुवचनु ॥ माया परिपूर्ण ब्रह्म होय ॥२२॥
एवं आत्मयाचें निरूपण ॥ उत्पत्तिस्थितिनिजनिधन ॥ तुज म्यां सांगीतलें संपूर्ण ॥ सत्य जाण स्वयंभू ॥२३॥
तंव श्रोते ह्मणती नवलावो ॥ मायेचा अनिर्वाच्य भावो ॥ तिचा साधूनि अभावो ॥ ग्रंथान्वयो निर्वांळिला ॥२४॥
नसंडितां पदपदार्था ॥ मायानिरूपणाच्या अर्था ॥ साधूनिया निश्चितार्था ॥ यथार्थ ग्रंथा चालविलें ॥५२५॥
तुझेनि मुखें श्रीजनार्दन ॥ वक्ता जाहला संपूर्ण ॥ हे आह्मासि पावली खुण ॥ रसाळ निरूपण स्वानंदयुक्त ॥२६॥
बाप निरूपण सखोल ॥ पेलत स्वानंदाचे पेल ॥ येताति सुखाचे डोल ॥ येकेक बोल ऐकतां ॥२७॥
येणें चतुःश्लोकींचेनि अर्थें ॥ जें सुख जालें आमुतें ॥ तें सुख सांगावया येथें ॥ वाचाळपणातें वाचा विसरे ॥२८॥
चतुःश्लोकींचे गोष्टीसाठीं ॥ वाचे पडिली वळवटी ॥ स्वानंद नसमाये पोटीं ॥ परमानंदें सृष्टी परिपूर्ण जाली ॥२९॥
हें ऐकोनि संतवचन ॥ हर्षला एका जनार्दन ॥ जेवीं ऐकतां घनगर्जन ॥ स्वानंदपूर्ण मयूरासि उपजे ॥५३०॥
तेणें स्वानंदें पूर्ण ॥ अभिवंदिले श्रोतेसज्जन ॥ नमस्कारूनियां संतचरण ॥ माझें विनवण अवधारा ॥३१॥
माझें हेंचि मनोगत ॥ संतुष्ट व्हावे साधुसंत ॥ यालागीं श्रीभागवत ॥ आरंभिला ग्रंथ भावार्थेंसी ॥३२॥
ऐकोनिया वचनासी ॥ साच देखोनि सद्भावासी ॥ अतिसंतोष सज्जनांसी ॥ रिझोनि ग्रंथार्थेंसी बोलते जाले ॥३३॥
अगा तुझें एक एक अक्षर ॥ क्षराक्षराती पर ॥ येणें ग्रंथार्थें साचार ॥ आह्मी अपार सुखी जालों ॥३४॥
देऊनि पदपदार्थाचा झाडा ॥ करूनि श्लोकार्थ उघडा ॥ बाह्यब्रह्मींचा निजनिवाडा ॥ दाऊनि चोखडा रचिला ग्रंथू ॥५३५॥
ग्रंथ स्वानुभवें रसाळ ॥ आनंदरसे घोळिले बोल ॥ परमानंदाचे कल्लोळ ॥ ग्रंथार्थीं केवळ रूपासी आले ॥३६॥
ऐसे संतोषोनि सज्जन ॥ स्वानंदें जाले तुष्टमान ॥ तेणें सुखेंशी संपूर्ण ॥ एकाजनार्दन ग्रंथासि वदवी ॥३७॥
स्वानंद वोसंडला ग्रंथीं ॥ तेणें विराली ग्रंथार्थस्फूर्ती ॥ दूरी ठेली श्लोकसंगती ॥ क्षमा संतीं मज कीजे ॥३८॥
आतां पुढील निरूपण ॥ भूतीं प्रविष्ट अप्रविष्टपण ॥ स्वयें सांगे श्रीनारायण ॥ सावधान अवधारा ॥३९॥


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP