चतुःश्लोकी भागवत - श्लोक ४५

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


नारदः प्राह मुनये सरस्वत्यास्तते नृप ॥ ध्यायते ब्रह्म परमं व्यासायामिततेजसे ॥४५॥

॥ टीका ॥
निजकृपें श्रीनारद ॥ परमप्रीती अतिआल्हाद ॥ व्यासासी वजनानुबोध ॥ परमान्म्दें विनवीत असे ॥७८॥
श्रीनारायणें निजानंद ॥ परमष्ठीसी केला बोध ॥ तेणें ब्रह्मा पावे परमानंद ॥ स्वानंदकंद सदोदित ॥७९॥
ऐसिया निजानुभवासी ॥ ब्रह्मा अर्पी निजपुत्रासी ॥ तेणें तो नारददेवर्षी ॥ सुखस्वानंदेंसी डुल्लत असे ॥८८०॥
भुक्ति मुक्ति भगवद्भक्ती ॥ नित्य नारदातें वोळंगती ॥ येवढी स्वरूपाची प्राप्ती ॥ अगाधस्थिती पावला ॥८१॥
भुक्ति नारदाचे पायीं घोळे ॥ मुक्ति त्याचे चरणीं लोळे ॥ भक्ति त्याचेनी धाके पळे ॥ करी सोवळें निजशिवातें ॥८२॥
काम नारदापुढें पळे ॥ काळ त्याच्या तोडरीं रुळे ॥ हरिहरांचेनी भावबळें ॥ इंद्रादि पादकमळें वंदिती सदा ॥८३॥
सदा देवांचा आवडता ॥ नित्य दैत्यांचा पढियंता ॥ ज्याचे मुखींची स्वभाववार्ता ॥ नुल्लंघ्य सर्वथा हरिहरांसी ॥८४॥
शुक्र लागे ज्याचे चरणीं ॥ बृहस्पति त्यातें मस्तकीं मानी ॥ यापरी गा नारदमुनी ॥ वंद्य त्रिभुवनीं सुरां असुरां ॥८८५॥
नारदा रावणासी आप्तता ॥ शेखें रामाचा पढियंता ॥ नारद शिवाचा आवडता ॥ तो त्रिपुरासी तत्त्वतां एकांत चाळी ॥८६॥
श्रीकृष्णनारद एकांतविधी ॥ त्यातें कालयवन पुसे बुद्धी ॥ ज्यातें जरासंध नित्य वंदी ॥ तो कृष्णसभेमधीं आत्मत्वें पूज्य ॥८७॥
जेथें अत्यंत विषमता ॥ तेथें नारदासी नित्य समता ॥ तेथें समसाम्यसमानता ॥ व्यासासी तत्त्वतां निजबोधक ॥८८॥
तो पाराशर तपतेजस ॥ सरस्वतीतीरींचा निजहंस ॥ परब्रह्मध्यानीं ध्यानस्थ व्यास ॥ त्यासी करी उपदेश श्रीनारद तो ॥८९॥
ध्यानधातृत्वभेद ॥ फोडोनी जो सच्चिदानंद ॥ तोचि श्लोकार्थींचा अर्थबोध ॥ व्यासासी श्रीनारद बोध सांगे ॥८९०॥
कानावचना होतां भेटी ॥ व्यास स्वबोधेंसी स्वयें उठी ॥ श्रीनारदाचे गोष्टीसाठीं ॥ पडली मिठी परब्रह्मीं ॥९१॥
ज्या दादुल्याचें वचन ॥ निर्दळुनी ध्यातें मन ॥ ध्याता केला चैतन्यघन ॥ हा प्रताप पूर्ण सद्गुरुवचनीं ॥९२॥
तेंचि वाक्य इतर सांगती ॥ परी तेथें नव्हें अर्थप्राप्ती ॥ बाप सद्गुरुवाक्याची ख्याती ॥ वचनींच प्राप्तीं परब्रह्माची ॥९३॥
हो कां वचनामाजीं आइतें ॥ ब्रह्म बांधोनी आलें होतें ॥ हाही अर्थ नघडे येथें ॥ गुरुवाक्यचि निश्चितें परिपूर्ण ब्रह्म ॥९४॥
वस्तुवेगळें वचन राहे ॥ मां त्यामाजी वस्तु बांधिली जाये ॥ वस्तु वचनासी सबाह्य आहे ॥ एवं गुरुवाक्य होय परिपूर्ण ब्रह्म ॥८९५॥
गुरुवाक्याचें अक्षर ॥ तें क्षराक्षरातीत परमपर ॥ यालागीं गा साचार ॥ ब्रह्मपरात्पर सद्गुरुवाक्य ॥९६॥
वचन वाच्य आणिक वक्ता ॥ तिहींसी गुरुवाक्यें एकात्मता ॥ यालागीं जाण पां तत्वता ॥ गुरुवाक्य वस्तुता परिपूर्ण ब्रह्म ॥९७॥
गुरुवाक्य चैतन्यघन ॥ सद्गुरु तो ब्रह्म परिपूर्ण ॥ हें श्रीव्यासासी बाणली खूण ॥ आपणा आपण विसरला मग ॥९८॥
विसरला तो ध्येयध्यान ॥ विसरला तो ज्ञेयज्ञान॥ विसरला तो मीतूंपण ॥ देहींचें देहपण देहधर्म विसरे ॥९९॥
विसरला तो कर्मधर्म ॥ विसरला तो नित्यनेम ॥ विसरला तो जपहोम ॥ पूर्ण परब्रह्म कोंदाटलें ॥९००॥
नाठवे सज्ञानमहंती ॥ नाठवे महाकवित्वाची व्युत्पत्ती ॥ नाठवे विदेहदेहस्फुर्तीं ॥ चैतनस्थिती ठसावली तया ॥१॥
बाप गुरुवाक्याचा निजबोध ॥ निःशेषें निरसला जीवभेद ॥ पूर्ण कोंदला परमानंद ॥ स्वानंदकंद निजबोधेंसी ॥२॥
ऐसा पावतां निजबोध ॥ विसरला गुरुशिष्यत्वभेद ॥ श्रीव्यास आणि श्रीनारद ॥ झालें एकचित्तबोध निजात्मरूपें ॥३॥
यापरी श्रीभागवत ॥ दशलक्षण अर्थयुक्त ॥ नारदें व्यासासी यथोक्त ॥ पूर्ण परमार्थ प्रबोधिला ॥४॥
कृपापूर्ण पौर्णिमाद्वारें ॥ सद्गुरुप्रबोधबोधचंद्रें ॥ निजानंदें अमृतकरें ॥ निवविलें पुरें निजशिष्यातें ॥९०५॥
निरसुनी अविद्याअंधार ॥ दवडुनी अहंसोहंविकार ॥ फेडिलें मुक्तीचे भुरर ॥ सद्गुरुभास्करअरुणोदयीं ॥६॥
सूर्यकिरणाचें संघातें ॥ अंधारई प्रकाशाआतें ॥ तेवीं गुरुवाक्यभास्वतें ॥ संसारसुनिश्चितें परब्रह्म केला ॥७॥
इतर सूर्य अस्तमाना जाय ॥ गुरुसूर्य तैसा नव्हे ॥ जो उगवतांची पाहे ॥ उदयास्त खाय निजांगतेजें ॥८॥
जेवीं चंद्रकरअंगसंगें ॥ चकोरनिवालां डोलोंलागे ॥ तेवीं गुरुवाक्यसंयोगें ॥ श्रीव्यास सर्वांगें सुखरूप जाहला ॥९॥
तेणें सुखाचेनि स्वानंदें ॥ सद्गुरुकृपा पूर्ण बोधें ॥ चतुःश्लोकींचीं अगाध पदें ॥ दशलक्षशुद्धें वर्णिलीं व्यासें ॥९१०॥
प्रथमस्कंधीं आरंभभाव ॥ द्वितीयस्कंधीं साधिला आव ॥ तृतीयापासूनी नवलाव ॥ लक्षणान्वयभाव लाविला असे ॥११॥
तृतीयस्कंधी सर्गलक्षण ॥ चतुर्थस्कंधीं विसर्ग जाण ॥ पंचमस्कंधीं बोलिलें स्थान ॥ षष्टीं तें पोषण प्रतिपादिलें ॥१२॥
सप्तमस्कंधीं बोलिली ऊती ॥ अष्टमीं मन्वंतरांची गती ॥ ईशानुकथनाची स्थिती ॥ जाण निश्चितीं नवमामाजीं ॥१३॥
दशमीं बोलिला निरोध ॥ एकादशीं मोक्षपद ॥ द्वादशीं आश्रय अतिशुद्ध ॥ एवं लक्षणें विशद व्यासें केलीं ॥१४॥
जैसें वटबीज अणुमात्र ॥ त्याचा चि होय वृक्ष थोर ॥ तैसा चतुःश्लोकींचा विचार ॥ श्रीव्यासें साचार विस्तारिला ॥९१५॥
व्यास कवि हाचि माळी ॥ भूमिका शोधोनि वैराग्यहलीं ॥ गुरूकृपाजीवनमेळीं ॥ विवेकाचे आळीं वाढवी वृक्ष ॥१६॥
व्यासविंदानिया बळीं ॥ चतुःश्लोकींच्या निजमेळीं ॥ वृक्ष वाढवी समूळीं ॥ पुष्पपल्लवफळीं सफलित ॥१७॥
पदोपदीं अति गोड ॥ मोक्षसुखाचे लागले घड ॥ समूळ सगळें झाड ॥ नित्य नूतन गोड सुस्वाद लागे ॥१८॥
नित्य नूतन याची गोडी ॥ अवीटें विटोंनेणें चोखडी ॥ जे सेवूं जाणती आवडी ॥ त्यांसी बाधेना वोढी सुधैषणेची ॥१९॥
नवल या फळाची मात ॥ त्वचा बीज नाहीं त्यांत ॥ नमाखतां जीवाहात ॥ नलागतां दांत सेवावें हें ॥२०॥
हे रसनेविण रसस्वादन ॥ सेवितां नव्हे उच्छिष्टवदन ॥ परमानंदें तृप्त पूर्ण ॥ गुरुभक्त सज्ञान पावती सदा ॥२१॥
एवं दशलक्षण विस्तार ॥ द्वादशस्कंधभागवततरुवर ॥ श्रीव्यासऋषि वदला साचार ॥ स्वानंदनिर्भर रस स्रवत ॥२२॥
समूळफळरूपें सदाफळ ॥ अद्वितीय अतिरसाळ ॥ समसाम्यसदा सरळ ॥ समत्वें निर्मळ शाखोपशाखीं ॥२३॥
शाखोपशाखाउत्पत्ति ॥ निर्गमकोकिळा कूंजती ॥ आर्तभ्रमर परिभ्रमतीं ॥ जिज्ञासु घालिती झेंपा फळीं ॥२४॥
जंव अर्थाअर्थीं चोखडि गोडी ॥ तंव अतिशयें अतिआवडी ॥ श्रीशुकाची पडली उडी ॥ सर्वांगीं चोखडीं चाखिली चवी ॥९२५॥
ऐसा देखोनी अधिकार ॥ श्रीव्यासें निजकुमर ॥ उपदेशिला शुकयोगिंद्र ॥ जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥
जो ब्रह्मचर्यशिरोमणी ॥ जो भक्तांमाजीं अग्रगणी ॥ जो योग्यांचा मकुटमणी ॥ सज्ञान चरणीं लागती ज्याचे ॥२७॥
जो सुखरूपें रूपा आला ॥ कीं शांतिरसाचा ओतिला ॥ निखळ विज्ञानाचा घडला ॥ स्वयें साकारला परब्रह्मरूप ॥२८॥
त्याच्या देहाची पाहतां शोभ ॥ ब्रह्मज्ञानी निघाले कोंब ॥ तो ज्ञानाचा पूर्णबिंब ॥ स्वयें स्वयंभ पूर्णब्रह्म ॥२९॥
दशलक्षण श्रीव्यासोक्ती ॥ चतुःश्लोकींचे अर्थप्राप्ती ॥ श्रीशुकाची निजस्थिती ॥ झाली निश्चितीं परब्रह्मरूप ॥९३०॥
यापरी श्रीशुक आपण ॥ स्वयें झाला स्वानंदघन ॥ त्या आनंदाचें समाधान ॥ पाहोनि पूर्ण समाधिस्थ झाला ॥३१॥
नाहीं वृत्तिधैर्यधारणा ॥ आपेंआप सहजें जाणा ॥ समाधी आली समाधाना ॥ सुखरूपें पूर्णार्णवबोध झाला ॥३२॥
समाधी आणि उत्थान ॥ दोहीं अवस्था गिळुनी जाण ॥ शुक आपणिया आपण ॥ सुखरूपें पूर्ण प्रबोध पावे ॥३३॥
ते समाधीचा अवबोध ॥ शुकासी वाटे निमिषार्थ ॥ बाहेर लौकिक प्रसिद्ध ॥ दशसहस्त्राब्द पुराणगणना ॥३४॥
दशसहस्रवर्षेंपर्यंत ॥ श्रीशुक होता समाधिस्थ ॥ ऐसीं महापुराणें गर्जत ॥ शुकासी वाटत निमिषार्ध पैं ॥९३५॥
यालागीं स्वरूपीं निर्वाही ॥ सर्वथा रीघ मना नाहीं ॥ मुख्य काळचि जेथें नाहीं ॥ काळगणना तेठायीं ठसावे कोणा ॥३६॥
लवनिमिषपळेंपळ ॥ साधूनियां समाधि त्रिकाळ ॥ हें मायामय मृगजळ ॥ स्वरूपीं अळुमाळ स्पर्शलें नाहीं ॥३७॥
जो सूर्यापासीं स्वयें राहे ॥ त्यासी उदयास्त भेटों नलाहे ॥ तेवीं स्वरूपीं जो निमग्न होये ॥ त्यासी काळाची सोये स्वप्नींहि नलगे ॥३८॥
काळगणनाप्रसिद्धी ॥ हे लौकिकी जाण त्रिशूद्धी ॥ स्वस्वरूपींचा संबंधी ॥ काळाची अवधी निःशेष नपवे ॥३९॥
जें जें आकारासी आलें ॥ तें तें जाण काळें ग्रासिलें ॥ काळासी ज्यानें सबाह्य व्यापिलें ॥ तेथें काळाचेंही गेलें कालत्व सगळें ॥९४०॥
ते स्वरूपीं निजनिर्वाही ॥ शुक समाधिस्थ जाहला पाही ॥ मां काळगणना ते ठायीं ॥ कैंची काई सांगावी पां ॥४१॥
यालागीं समाधि आणि उत्थान ॥ हें अपक्कासीच घडे जाण ॥ पूर्णाच्या अंगीं लक्षण ॥ अणुप्रमाण असेचिना ॥४२॥
पूर्णाचीं लक्षितां लक्षणें ॥ थोटावलीं अवघीं पुराणें ॥ वेद ‘ नेति नेति ’ ह्मणे ॥ तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥४३॥
पूर्णयोगी प्रारब्धवशें ॥ लौकिकी जैसा तैसा दिसे ॥ तेही पूर्णस्थिती तो असे ॥ कांहीं अनारिसें करी ना करवी ॥४४॥
यापरी शुकाची समाधि जाणा ॥ स्वयें आली समाधाना ॥ तैंच परीक्षितीच्या सदना ॥ विचरतां त्रिभुवना अवचट आला ॥९४५॥
बाप भाग्य परीक्षिती ॥ ब्रह्मनिधी लागला हातीं ॥ ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती ॥ घातली जगतीं ज्ञानपव्हे ॥४६॥
सभाग्य कोप ब्राह्मणाचा ॥ शापें अधिकार ब्रह्माचा ॥ मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा ॥ पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥
शमीकाचा ब्रह्मेचारी पुत्र ॥ पाठकें दिधलें शिखासूत्र ॥ त्याचेनि शापें ब्रह्मधिकार ॥ जाण ब्राह्मनमात्र ब्रह्मरूपी ॥४८॥
शाप देतील जरी ब्राह्मण ॥ तरी वंदावें त्यांचें चरण ॥ कोपा चढल्याही ब्राह्मण ॥ पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥
ब्राह्मण करूं आलिया घाता ॥ त्याचे चरणीं ठेवावा माथा ॥ ब्राह्मणापरती पूज्यता ॥ आन दैवता असेनाची ॥९५०॥
ब्रह्म ब्राह्मण समसमान ॥ हेंही वचन दिसे गौण ॥ बह्मदाते स्वयें ब्राह्मण ॥ यालागीं पूर्ण पूज्यत्वें श्रेष्ठ ॥५१॥
जे वस्तु असे ज्याअधीन ॥ त्या वस्तूचें करितां दान ॥ यालागीं ब्रह्मस्वामित्वें ब्राह्मण ॥ पूज्यत्वें पूर्ण तिहीं लोकीं ॥५२॥
ब्राह्मण ब्रह्मातें प्रतिपादिते ॥ ते ब्रह्म होते कोणी नव्हते ॥ ब्रह्म ब्राह्मणाचेनी हातें ॥ पूर्ण प्रतिष्ठेतें पावलें पैं ॥५३॥
यालागीं ब्रह्म बाह्मणाधीन ॥ कदां नुल्लंघी ब्राह्मणवचन ॥ त्यांचे मंत्रमात्रें जाण ॥ पाषाणाही पूर्ण ब्रह्मत्व प्रकटे ॥५४॥
जैसा मातेचा मोहकोप ॥ तैसा ब्राह्मणांचा शाप ॥ शापें फेडूनि पराचें पाप ॥ वस्तू चिद्रूप कोपुनी देती ॥९५५॥
ब्राह्मण कोपल्या अतिक्षोभता ॥ एवढा लाभ आतुडे हाता ॥ त्या ब्राह्मणां सुखी करितां ॥ त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा ॥५६॥
यालागीं भूदेव ब्राह्मण ॥ चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण ॥ त्यांची निंदा अवज्ञा हेळण ॥ बिरुद आपण नवदावें कदा ॥५७॥
त्या बाह्मणांच्या कोपबोला ॥ राजा ब्रह्माधिकारी झाला ॥ भाग्यें श्रीशुक पावला ॥ भाग्यें आथिला परीक्षिती तो ॥५८॥
या परीक्षितीचा अधिकार ॥ पाहतां दिसे अतिसुंदर ॥ धर्माहोनी धैर्य थोर ॥ वीर्यशौर्यधर विवेकीं पैं ॥५९॥
कृष्ण असतां धर्म भ्याला ॥ कलीभेणें पाठीं पळाला ॥ हा कलीसी ग्रासुनी ठेला ॥ धैर्यें आथिला अधिकारि ॥९६०॥
चक्र घेउनी निजहस्तीं ॥ ज्यासी गर्भीं रक्षी श्रीपती ॥ त्याचे अधिकाराची स्थिती ॥ वानावी पां किती वाचाळता ॥६१॥
जेणें गर्भीं रक्षिलें निजस्थितीं ॥ त्यातें परीक्षी सर्वांभूतीं ॥ यालागीं नांव परीक्षिती ॥ येथवर प्रीती हरिचरणीं ॥६२॥
अर्जुनवीर्य निर्व्यंग ॥ सुभद्रामहीचें गर्भलिंग ॥ तो अधि काररत्न उपलिंग ॥ उभयपक्षीं चांग जन्मला शुद्ध ॥६३॥
राजा आणि सविवेक ॥ सत्त्ववृद्धि आणि सात्त्विक ॥ ब्रह्मज्ञानालागीं त्यक्तोदक ॥ असे अतिनेटक परमार्थीं ॥६४॥
ऐसें देखोनी परीक्षितीसी ॥ कृपा उपजली श्रीशुकासी ॥ मग बैसवोनी सावकाशीं ॥ श्रीभागवत त्यासी निरोपिलें ॥९६५॥
दुजें दवडून दृश्य दृष्टी ॥ अति गुप्ततेपरिपाठीं ॥ हरिब्रह्मयांची गुह्यगोष्टी ॥ बोले कर्णपुटीं अति एकांतीं ॥६६॥
तेंचि ब्रह्म्यानें नारदासी ॥ बैसोनियां एकांतवासी ॥ दुजें नपडतां दृष्टीसी ॥ अतिगुप्ततेसी उपदेशिलें ॥६७॥
तेंचि नारदमहामुनीश्वरीं ॥ अतिगुप्त सानें कुसरीं ॥ एकांतीं सरस्वतीचे तीरीं ॥ व्यासासी करी निजबोध ॥६८॥
तेचि श्रीव्यासें अतिनिगुती ॥ बैसवूनियां एकांतीं ॥ श्रीभागवत श्रीशुकाप्रती ॥ यथार्थस्थिती उपदेशिलें ॥६९॥
एवं परंपरा उपदेशस्थिती ॥ गुप्तरूपें जे आली होती ॥ तेचि प्रगट जगाप्रती ॥ शुक परीक्षिती परमार्थ सांगे ॥९७०॥
हे त्यागाची निजबोज ॥ सप्त रात्रें साधावया काज ॥ ब्रह्मशापें ऋषिसमाज ॥ मेळवूनियां सहज त्यक्तोदक जाहला ॥७१॥
ब्रह्मशापनियमावधी ॥ अंतीं संकटविषयसंधी ॥ तेथें पावला ब्रह्मनिधी ॥ ज्ञानक्षीराब्धी शुकयोगींद्र ॥७२॥
मरतया अमृतपान ॥ दुष्काळीं जेवीं मिष्टान्न ॥ अवर्षणीं वर्षे घन ॥ तेवीं आगमन श्रीशुकाचें ॥७३॥
भक्ति नवरत्नतारूं बुडतां ॥ धर्मधैर्याचा स्तंभ पडतां ॥ तो परीक्षिती शापें पीडितां ॥ झाला रक्षिता शुकयोगींद्र ॥७४॥
तेणें बैसवुनी ऋषिवर्यपंक्ती ॥ तारावयातें परीक्षिती ॥ प्रगट परिसतां त्रिजगती ॥ श्रीभागवतार्थीं शुक वक्ता ॥९७५॥
धन्य वक्ता तो श्रीशुक ॥ श्रवणें विसरवी तान्हभूक ॥ त्यक्तोदका झालें पूर्ण सुख ॥ कथापीयूष परमामृतें ॥७६॥
ब्राह्मशापें सर्प दंशतां ॥ मरणभयाची कथावार्ता ॥ विसरवुनियां नरनाथा ॥ पूर्णपरमार्था त्यासी लावी ॥७७॥
तें हें श्रीभागवत संपूर्ण ॥ दशलक्षणीं सुलक्षण ॥ श्रीशुकें करवुनी श्रवण ॥ परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला ॥७८॥
जेवीं दोराचें सापपण ॥ दोरीच मिथ्या होय जाण ॥ तेवीं देंहींचें देहपण ॥ देहस्था मीपण जाणतां मिथ्या ॥७९॥
देह असो अथवा जावो ॥ आह्मीं पूर्णपरब्रह्म आहों ॥ यापरी परीक्षिती पहाहो ॥ केला निःसंदेहो श्रवणमात्रें ॥९८०॥
श्रीशुकपरीक्षितीसंवाद ॥ तोचि जगाला उद्बोध ॥ जो गुरुकृपा पावे प्रबोध ॥ पूर्ण ब्रह्मानंद स्वयें होय तो ॥८१॥
ऐसें फावलें ज्यां श्रीभागवत ॥ ते पावले ज्ञानमथितार्थ ॥ परमानुभवीं श्रीमत्संत ॥ संतोषावया ग्रंथ म्यां हा केला ॥८२॥
त्यांचिया चरणरजकृपा ॥ हे बोल कळले मज पाहा पां ॥ वांचुनी ज्ञानार्थ संकल्पा ॥ आकळे वाग्जल्पा हें घडे केवीं ॥८३॥
माझे वाकुडेतिकुडे आर्षबोल ॥ त्यामाजीं ब्रह्मज्ञान सखोल ॥ नित्य नवे प्रेमाची ओल ॥ हे कृपा केवळ त्या संतांची ॥८४॥
श्रीभागवत आणि भाषे मराठे ॥ हे बोलणें नवल वाटे ॥ पूर्वीं नाहीं ऐकिलें कोठें ॥ अभिनव मोठें धिटावा केला ॥९८५॥
मुख्य संस्कृतचि मी नेणें ॥ यावर प्राकृत ग्रंथ करणें ॥ जें कांहीं बोलिलों धीटपणें ॥ तें क्षमा करणें जनकत्वें संतीं ॥८६॥
बालकाची सरे बडबड ॥ तेणें माउलीची निवे चाड ॥ मज आपल्याचें तुह्मां कोड ॥ प्राकृतही गोड मानिला ग्रंथ ॥८७॥
माझें आरुषवाणें बोलणें ॥ कळाकुसरी कौतुक नेणें ॥ जें बोलविलें जनार्दनें ॥ तेंचि ग्रंथकथनें कथिलें म्यां ॥८८॥
जें बळें ओढून नेईजे तैसें ॥ तेंचि चालुनी आलें आपैसें ॥ तेवीं मन हिरोन हृषीकेशें ॥ बळात्कारें ऐसें बोलविलें पै ॥८९॥
येथें पराकम नाहीं माझा ॥ हा ग्रंथ आवदला अधोक्षजा ॥ तेणें बोलविलें ज्या निजगुजा ॥ त्या ग्रंथार्थओजा वोडवला ग्रंथ ॥९९०॥
तो करवो तैसा मी कर्ता ॥ हें बोलणें अतिमूर्खता ॥ वाच्यवाचक जनार्दन वक्ता ॥ ग्रंथग्रंथार्था निजरूप दावी ॥९१॥
यालागीं पदपदार्थखोडी ॥ प्रेमरहस्य ज्ञानगोडी ॥ हे माझ्या अंगीं नलगें वोढी ॥ ग्रंथार्थधडगोडी जनार्दन जाणे ॥९२॥
घाणां उस गाळिल्या जाणा ॥ गुळाचा स्वामी नव्हे घाणा ॥ तेवीं मज मुखीं गुह्यज्ञाना ॥ वदला ज्ञातेपणा मीपण नलगे ॥९३॥
ऐसें सद्गुरूंनीं नवल केलें ॥ माझें मीपण निःशेष नेलें ॥ शेखीं माझे नावें ग्रंथ बोलिले ॥ प्रेम आथिलें ज्ञानार्थरसें ॥९४॥
ह्मणावें सद्गुरु तूं माझा ॥ कीं पूर्णब्रह्मसहजनिजा ॥ तेथें मीपणाचा उपजे फुंजा ॥ तुजमाजीं तुझा निजवास पैं ॥९९५॥
वस्त्र आणि घडी पालव ॥ स्वरूप एक वेगळें नांव ॥ परी घडी पालव अपूर्व ॥ वस्त्रगौरव शोभेसि आणि ॥९६॥
तेवीं गुरुब्रह्मही एकचि घडे ॥ परी गुरुदास्यें ब्रह्मा आतुडे ॥ गुरुवाक्यें निजनिवाडें ॥ ब्रह्मासी जोडे प्रतिष्ठा पैं ॥९७॥
गुरु ब्रह्म अभिन्नत्वें पूर्ण ॥ तेथें शिष्यासी नुरे भिन्नपण ॥ तेव्हां जन तोचि जनार्दन ॥ जनार्दनीं जन अभिन्नत्वें नांदे ॥९८॥
ऐसा निजात्मा श्रीजनार्दन ॥ अनुभवितां न होय आन ॥ कायावाचामनबुद्धिप्राण ॥ इम्द्रियेंही जाण जनार्दन झाला ॥९९॥
यालागीं माझें जें कां मीपण ॥ तें माझें अंगीं नलगे जाण ॥ माझे वाचें जें वचन ॥ तें श्रीजनार्दन स्वयें झाला ॥१०००॥
यालागीं वाचा जे वावडे ॥ तें जनार्दना अंगीं जडे ॥ सैर करितांही बडबडे ॥ समाधीची नमोडे मौनमुद्रा ॥१॥
सैराट धांवता पाय ॥ श्रीजनार्दन निजमाय ॥ पदोंपदीं कडिये घेत जाय ॥ रितें पाऊल पाहे पडोंनेदी ॥२॥
झणी कोणाची दृष्टि लागे ॥ यालागीं मज पुधें मागें ॥ सर्वदा तिष्ठे सर्वांगें ॥ मीचि आचार्यसंगें निर्भय सदा ॥३॥
जनार्दनजननीअंगसंगें ॥ भय तेंचि निर्भय होऊं लागे ॥ कळिकाळ नित्यनिजांगें ॥ येउनी पायां लागे अहर्निशीं ॥४॥
जनार्दनजननीचा स्नेह मोठा ॥ चित्प्रकाश केला दिवटा ॥ मोडेल अविद्येचा कांटा ॥ ह्मणुनी बोधखराटा भूमिका झाडी ॥१००५॥
ऋद्धिसिद्धींची कुरवंडी ॥ वोवाळुनी दुरी सांडी ॥ निजानुभवाचें ताट मांडी ॥ स्वानंदाचें तोंडीं ग्रास देत ॥६॥
समाधीचे पालखीं सुये ॥ अनुहताचा हल्लर गाये ॥ यापरी जनार्दन निजमाये ॥ निजी निजविती होये निजदासा ॥७॥
पुत्र शिष्य आणि सेवक ॥ जनार्दनासी समान देख ॥ परी पुत्रापरिस विशेष देख ॥ शिष्यासी निजसुखस्वानंद दिला ॥८॥
तेथें जनार्दनीं एक ॥ रंकाचेंहीं निजरंक ॥ त्यांही माजीं कृपापूर्वक ॥ निजात्मसुख सुखें दिधलें ॥९॥
त्या सुखाची निजगोडी ॥ चतुःश्लोकींच्या पदमोडीं ॥ श्रीसंतांलागीं घोंगडी ॥ मराठीं परवडी भावें केली ॥१०१०॥
जेवीं सकळीं लहानें ॥ मिळोनी कनकीचें चाखणी करणें ॥ तेवीं श्रीभागवत मूळ केणें ॥ म्यां वाखाणणें महाराष्ट्रीं ॥११॥
नवल माउलीचें कोड ॥ बाळक न्यासी तें लागे गोड ॥ तेवीं मीं संतांचें नडिवाळ बोबड ॥ माझें मराठीचें कोड चौगुण करिती ॥१२॥
बाळक स्वयें खेळगेपणें ॥ मातेसी लावी आंवतणें ॥ त्याचे परवडीं पडिले चणे ॥ तरी माता तृप्त होणें चौगुणें प्रीती ॥१३॥
तेवीं माझिया बोला प्राकृता ॥ ग्रंथार्थ परिसतां साधुसंतां ॥ सुख उपजेल सर्वथा ॥ निजस्वभावता निजबोध ॥१४॥
जेवीं बाळक बापाजवळी ॥ त्याचेच ग्रास त्यासी घाली ॥ कीं तो बाळकाच्या करतळीं ॥ सुखावला तळीं मिटक्या देत ॥१०१५॥
तेवीं चतुःश्लोकींभागवता ॥ व्यासें काधिलें मथितार्था ॥ तो शोधुनी म्यां आईता ॥ वोपिला संतां निजबाळकभावें ॥१६॥
तेवीं चतुश्लोकीभागवत ॥ कैसेनी झालें हस्तगत ॥ प्रवर्तावया कारण येथ ॥ ऐका सुनिश्चित सांगेन मी ॥१७॥
गोदावरीउत्तरतीरीं ॥ चौं योजनीं चंद्रगिरी ॥ श्रीजनार्दन तेथवरी ॥ दैवयोगें फेरी स्वभावें गेलों ॥१८॥
तो अतिदीर्घ चंद्रगिरि ॥ तळीं चंद्रावती नगरी ॥ स्वयें चंद्रनाम द्विजवरीं ॥ वस्ती त्याचे घरीं सहज घडली ॥१९॥
तेणें चतुःश्लोकीभागवत ॥ वाकाणिलें यथार्थ युक्त ॥ तेणें श्रीजनार्दन अद्भुत ॥ झाला उत्पुलित स्वानंदे पैं ॥१०२०॥
तेणें स्वानंदें गर्जोन ॥ श्रीमुखें सयें जनार्दन ॥ बोलिला अतिसुखावून ॥ हें वर्णी गुह्यज्ञान देशभाषा ॥२१॥
तैं माझी मध्यम अवस्था ॥ नेणें संस्कृत पदपदार्था ॥ बाप आज्ञेची सामर्थ्यता ॥ वचनें यथार्था प्रबोध झाला ॥२२॥
वसिष्ठाचे वचनासाठीं ॥ सूर्यमंडळीं तपे छाटी ॥ शिळा तरती सागरपोटीं ॥ श्रीरामदृष्टिप्रतापें ॥२३॥
विश्वामित्रवाक्यें जाण ॥ कौलिका स्वतंत्र स्वर्गस्थान ॥ तेवीं मी एकादनार्दन ॥ गुरुकृपा पूर्ण ज्ञानार्थकरितां ॥२४॥
नवल आज्ञेची सामर्थ्यता ॥ मी करूं नरिघें जरी ग्रंथा ॥ तो ग्रंथार्थ मज आंतौता ॥ बळेचि ज्ञानार्था दाटोनी दावी ॥१०२५॥
हें सांडूनियां ग्रंथकथन ॥ मज कर्मांतरीं रिघतां जाण ॥ त्या कर्मामाजीं गुह्यज्ञान ॥ ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे स्वयें ॥२६॥
गुरुआज्ञा अत्यंत लाठी ॥ ग्रंथार्थ खेळे माझे दृष्टीं ॥ आज्ञेनें पुरविली पाठी ॥ फाकटगोष्टीमाजींही ज्ञान ॥२७॥
नित्यकर्म करितां जाण ॥ ग्रंथींचें दिसे गुह्यज्ञान ॥ मागे घालूनियां संध्यास्नान ॥ ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे पुढां ॥२८॥
जागृती दिसे ग्रंथार्थज्ञान ॥ ग्रंथार्थमय जाहलें स्वप्न ॥ सुषुप्तीमाजीं दुजें नवीण ॥ हें गुह्यज्ञान कोंदाटे पैं ॥२९॥
शब्दापुढें ज्ञान धांवे ॥ ओंवीपुढें अर्थ पावे ॥ जें जें जीवीं विवंचावें ॥ तें तें आघ्वें ग्रंथार्थ होय ॥१०३०॥
सद्गुरुआज्ञा अतिशयगाढी ॥ रितें अर्धक्षण नसोडी ॥ तैं आज्ञागौरव परवडी ॥ ग्रंथार्थ जोडीजोडिला ऐसा ॥३१॥
यापरी श्रीभागवत ॥ चतुःश्लोकीं ज्ञानमथित ॥ तो हा रचितां प्राकृत ग्रंथ ॥ गुरुआज्ञा समर्थ प्रतापतेजें ॥३२॥
एका जनार्दना शरण ॥ भांवें वंदितां सद्गुरुचरण ॥ स्वप्नीं नदिसे जन्ममरण ॥ ब्रह्म परिपूर्ण होईजे स्वयें ॥३३॥
स्वयें महाभागवत ॥ चतुःश्लोकी गुह्यज्ञानार्थ ॥ परमार्थें आथिला ग्रंथ ॥ हा निश्चितार्थ निजबोधें ॥३४॥
एवं भागवतींच्या मथितार्था ॥ एकला एका नव्हे कर्ता ॥ ग्रंथग्रंथार्थ अर्थविता ॥ अंगें तत्त्वतां जनार्दन झाला ॥१०३५॥
एका आणि जनार्दन ॥ नांवें भिन्न स्वरूपें अभिन्न ॥ यालागीं ग्रंथाचें निरूपण ॥ पूर्णत्वें पूर्ण संपूर्ण झालें ॥३६॥
इतिश्रीभागवते द्वितीयस्कंधे श्रीशुकपरीक्षितिसंवादे एकाकारटीकायां नवमोऽध्यायः समाप्त ॥९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीसद्गुरुएकनाथार्पणस्तु ॥ शुभंभवतु ॥ श्लोक ॥ ॥४५॥ ओंवीसंख्या ॥१०३६॥

एकनाथकृत चतुःश्लोकी भागवत समाप्त.


References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP