अध्याय १३ वा - श्लोक ३१ ते ३३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


समेत्य गावोऽधोवत्सान्वत्सवत्योऽप्यपाययन् । गिलंत्य इव चांगानि लिहंत्यः स्वौधसं पयः ॥३१॥

ऐशिया गोवर्धनतळवटीं । उड्या घालूनि वत्सां निकटीं । धेनु येऊनि दाटोदाटीं । पडली मिठी स्नेहाची ॥७८॥
नवीं वत्सें गृहीं तान्हीं । पहिलीं कृष्णात्मकें रानीं । देखोनि पान्हा न धरवे स्तनीं । अगाध करणी कृष्णाची ॥७९॥
घरींचीं विसरोनि वांसुरें । कृष्णात्मकेंचि स्नेहभरें । पाजिल्या झाल्या अत्यादरें । प्रेम बावरें आवरेना ॥३८०॥
वत्सें गिळिती मोहेंकरूनि । तैशा चाटिती कळवळूनि । वत्सें झोंबती एके स्तनीं । इतर धरणीं पाझरती ॥८१॥
स्ववोहाचीं पाजिती पयें । हुंबरताती सप्रेममोहें । वत्सें चाटिती लवलाहें । नम्रदेहें गोंवताती ॥८२॥
ऐसा धेनूचा वोरस । रामें देखिला विशेष । बल्लवांचा प्रेमोत्कर्ष । तोही अशेष अवधारीं ॥८३॥

गोपास्तद्रोधनायासमौघ्यलज्जोरुमन्युना । दुर्गाध्वकृच्छ्रतोऽभ्येत्य गोवत्सैर्ददृशुः सुतान् ॥३२॥

धेनु देखोनि वत्सतांडी । बळेंचि मारिती मुसांडी । बल्लव झोडिती दांडीं धोंडीं । देती मुरकुंडी न वळतां ॥८४॥
धेनु न फिरत भरल्या रान । बल्लवांचा निष्फळ यत्न । तेणें सलज्ज साभिमान । श्वास दाटोनि धांवती ॥३८५॥
हातीं धोंडें आणि डांगा । क्रोधें कांपवी सर्वांगा । श्वास दाटोनि लागवेगां । दुर्गम मार्गा अवलंबिती ॥८६॥
सक्रोध सल्लज साभिमान । दुर्गमीं धांवतां पावला शीण । देखोनि गोवत्सें निजनंदन । बल्लवगण कळवळिला ॥८७॥
जेवीं हिक्याची पुतळी । स्नान करूनि तप्त तैलीं । होऊं पाहे जंव सोंवळी । तंव वेगळी निवडेना ॥८८॥
तेवीं सक्रोधवृत्ति गोप । धेनूवरी करितां कोप । तंव त्या स्ववत्सीं देखोनि सकृप । पावली क्रोधोर्मि लयातें ॥८९॥
हरिमायेची विचित्र करणी । स्नेह वाढे अंतःकरणीं । उचंबळे तो सर्वां करणीं । बुद्धिविवरणीं प्रवर्ते ॥३९०॥
गोप आपुलाले तोक । देखते झाले कृष्णात्मक । क्रोध लज्जा आयास दुःख । विसरोनि सुख पावले ॥९१॥
म्हणती धेनु या स्नेहाळ । वत्सें देखोनि उताविळ । येऊनि चाटिती आपुलें बाळ । आम्ही चांडाळ निषेधूं ॥९२॥

तदीक्षणोत्प्रेमरसाप्लुताशया जातानुरागा गतमन्यवोऽर्मकान् ।
उदुह्य दोर्मिः परिरभ्य मूर्धनि घ्राणैरवापुः परमां मुदं ते ॥३३॥

जगदात्मा जो जगन्मय । त्यातें भावूनि आत्मतनय । दिठी देखतां वाढला स्नेह । निमग्न हृदय तद्रसीं ॥९३॥
कृष्णें झाले निपुत्रपणें । प्रेमोत्कर्षरसजीवनें । निमग्न केलीं बल्लवमनें । पूर्वाभिमानें सांडिलीं ॥९४॥
धेनु नावरतां लज्जित । तेणें क्रोधें झाले तप्त । धांवतां पावले क्लेश बहुत । ते समस्त विसरले ॥३९५॥
वत्सें आणिलीं धेनूसमोर । येणें सापराध मानूनि कुमार । क्रोधें ताडणीं जे तत्पर । ते विकार विसरले ॥९६॥
धेनु वळितां नाटोपती । त्यांच्या ताडणीं सक्रोधवृत्ति । गळोनि गेली ते केउती । झाली उपरति कारुण्यें ॥९७॥
गाई वसुरवां पाजिती । देखोनि वारूं न इच्छिती । निजकुमारांतें आलिंगिती । मूर्ध्ने हुंगिती सप्रेमें ॥९८॥
कुमारां प्रेमें आलिंगूनि । अवघ्राण करूनि मूर्ध्नि । निमग्न झाले स्वानंदघनीं । गेले विसरोनि कल्पना ॥९९॥
आत्माकार होतां वृत्ति । हरपोनि जाय विषयस्फूर्ति । न थरे पृथक् देहस्मृति । कैंची संसृति ते ठायीं ॥४००॥
तोचि परमात्मा दृष्टीपुढें । लेऊनि पुत्रत्वा जैं आवडे । झांकती उघडी तें कवाडें । स्वयंभ उघडें परब्रह्म ॥१॥
विश म्हणोनि अमृतपान । न मरोनि जैं मरण होणें । तेवीं पुत्रत्वें कृष्णालिंगन । समाधिभोजन बल्लवीं ॥२॥
परम मोद जो आत्मानुभव । स्वपुत्र कवळूनि भोगिती बल्लव । विरोनि गेला भेदभाव । झाले स्वयमेव स्वानंद ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP