अध्याय १३ वा - श्लोक ४४ ते ४६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं संमोहयन् विष्णुं विमोहं विश्वमोहनम् । स्वयैव माययाऽजोपि स्वयमेव विमोहितः ॥४४॥

जो निर्मोह मोहातीत । विश्व स्वमोहें विमोहित । त्या विष्णूतें धिषणानाथ । मोहें व्याप्त करूं गेला ॥६१॥
तंव तें झालें विपरीत । स्वयेंचि झाला स्वमोहग्रस्त । अज नामें जो विश्वतात । केला भ्रांत स्वगुणेंचि ॥६२॥
खडकावरी हाणितां धोंडा । तो फिरोनि लागे आपुल्या तोंडा । चूर्ण होती दांत दाढा । तोचि रोकडा हा न्याय ॥६३॥
तंव परीक्षिति म्हणे शुका । एथ थोडीसी वाटे शंका । मायाश्रियां ब्रह्मादिकां । केवीं मोहकां मोह गिळी ॥६४॥

तम्यां तमोवन्नैहारं खद्योतार्चिरिवाहनि । महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युंजतः ॥४५॥

शुक्र म्हणेगा जगतीवरा । सांगेन ऐकें दृष्टांतद्वारा । अल्पकें गोवूं जातां थोरां । होय मातेरा तयाचा ॥४६५॥
ज्याचे मायेमाजीं विधिहर । अनंतकोटीब्रह्मांडधर । होऊनि लोपती तरंगाकार । तो तरंगें सागर केंवी झांके ॥६६॥
कीं प्रावृटिं कुहूची निशी । झांकूं प्रवर्ते धुई जैसी । तंव तेचि हारवे निशीमाजीं जैसी । झांकावयासीं असमर्थ ॥६७॥
कां स्वपुच्छाच्या प्रकाशकिरणीं । खद्योत लोपवूं प्रवर्ते तरणी । परी ते अघटित न घडे करणी । जाय हरपोनि तत्तेजीं ॥६८॥
स्फुलिंग प्रतापें प्रळयानळा । जाळावया चढे सळां । तैं तो उरेचि वेगळा । मग कैंचा तो दळा उरेल ॥६९॥
कीं परमाणु पृथ्वी गिळीन । म्हणूनि धरितां आंगवण । तैं तो केतुला कोठील कोण । जाय हारपोन भूमाजीं ॥४७०॥
तेवीं मायेचा जो नियंता । भुलवावया त्या अनंता । स्वमाया पसरूं गेला धाता । पडला गुंता तोचि त्या ॥७१॥
त्याची माया परम अगाध । त्यासि अल्प मायिकें करितां मुग्ध । तंव तो स्वसंवेद्य स्वतःसिद्ध । न घडे रोध तद्बोधा ॥७२॥
जेथून त्रिगुणांचा उद्भव । तो मायावि वासुदेव । त्यावरी ब्रह्मरजोद्भव । राजसी माव करूं गेला ॥७३॥
बाळकापाशीं बागुलभय । दावितां तो बुद्ध निर्भय । बाळकचि सकंप होय । ऐकतां सोय बाऊची ॥७४॥
तेवीं महापुरुषीं नीच माया । योजिली न शके भुलवावया । स्वसामर्थ्यें सहित राया । जाय विलया स्वस्थानीं ॥४७५॥
ऐशी शंका परिहारिली । ब्रह्मा भुलला स्वकृतभुली । तेणें वत्सवत्सप क्रीडा पहिली । तैशी देखिली हरिकृत ॥७६॥
ब्रह्मयाचा सृजनाभिमान । निरसावया श्रीभगवान । दावी स्वमायाविंदाण । तें तूं श्रवण करीं राया ॥७७॥

तावत्सर्वे वत्सपालाः पश्यतोऽजस्य तत्क्षणात् । व्यदृश्यन्त घनश्यामाः पीतकौशेयवाससः ॥४६॥

मीचि एक सृष्टिकर्ता । ब्रह्म्यासी होती हे अहंता । वत्सें वत्सप कृष्ण होतां । ते तत्त्वतां निरसली ॥७८॥
ब्रह्म्याचा जो विष्णु बाप । तैसे सृजूनि दावी अमूप । जितुके होते वत्सवत्सप ।ते ते तद्रूप पालटिले ॥७९॥
म्हणाल स्वरूपता वैष्णवगणां । असे वैकुंठीं अवघ्यां जणां । परी ते न लाहती श्रीवत्सचिन्हा । एथ त्या खुणा सर्वांसी ॥४८०॥
ब्रह्मा सृजी विश्व असकें । परी विष्णूसी सृजूं न शके । तो कृष्णमायेच्या लाघवें देखे । वत्सपवत्सकें विष्णुमय ॥८१॥
वत्सेंवत्सप परमेष्टि । संशये पहिलेचि मानी पोटीं । विष्णुस्वरूपें देखोनि दृष्टि । पाहे सृष्टि सलज्ज ॥८२॥
वत्स वत्सप विष्णुमूर्ति । विधीनें देखिल्या त्या आकृति । जैशा वर्णी शुकभारती । तैशा श्रोतीं परिसाव्या ॥८३॥
ब्रह्मा पाहे ज्म्व साशंक । तंव वत्सपाळादि जे वत्सक । यष्टि विषाण वस्त्रादिक । झाले सम्यक हरिरूप ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP